अकोला शहरापासून चांदूर (खडकी) हे अवघ्या नऊ किलोमीटरवरील गाव. गावापासून अवघ्या काही अंतरावरून मोर्णा नदी वाहते. या पाण्याचा उपयोग करीत संरक्षित शेतीचे पर्याय येथील शेतकरी अवलंबतात. त्याच बळावर भाजीपाल्यासारखी व्यावसायिक पीक पद्धती गावात विकसित झाली आहे.
गावातील काशीराम व आशाताई निखाडे या दांपत्याची केवळ एक एकर शेती आहे; परंतु आपले क्षेत्र अत्यंत अल्प आहे असे न मानून निराश न होता जिद्दीने, चिकाटीने ही शेती निखाडे दांपत्याने चांगल्या प्रकारे फुलवली आहे. दहा वर्षांपूर्वी या कुटुंबाची शेती मोर्णा आणि विद्रुपा नदीच्या संगमावर होती. नदीला पूर आल्यानंतर त्याचे पाणी शेतात शिरून नुकसान होत होते. नदीतील पाणी उपसाही प्रशासनाच्या नियमांमुळे शक्य होत नव्हता, त्यामुळे नदीकाठावरील शेती विकून काशीराम यांच्या वडिलांनी गावालगत दोन एकर शेती खरेदी केली. त्यातील एक एकर काशीराम यांच्या वाटणीस आली.
शेतीच्या खरेदीनंतर सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर देण्याच्या प्रयत्नाअंतर्गत निखाडे दांपत्याने विहीर खोदली. गाठीशी असलेले पैसे व कुटुंबीयांचे श्रमदान या माध्यमातून हे काम तडीस गेले. सत्तर फूट खोदलेल्या या विहिरीवर दीड लाख रुपयांचा खर्च झाला, तरीही पाणी न लागल्याने नाइलाजाने बोअर घ्यावे लागले. सुरवातीला कपाशी, कांदा, गहू, तूर यासारखी पीक पद्धती आत्मसात केली. कपाशीची एकरी उत्पादकता दहा क्विंटल होत होती. अकोला जिल्ह्यातीलच पातूर हे आशाताईंचे माहेर. त्यांचे वडील सुपाजी निमकंडे यांची 40 एकर शेती. सुखवस्तू कुटुंबातील आशाताईंना शेतात फारसे जावे लागत नसे. लग्नानंतर मात्र कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्या सरसावल्या. पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शेतीची सूत्रे सांभाळली. आता शेतीसोबत पोल्ट्री व्यवस्थापनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो.
पालकाची बारमाही शेती
कपाशी किंवा अन्य पिकांत कायम येणाऱ्या समस्या लक्षात घेता बाराही महिने घेता येईल व बाराही महिने मागणी राहील, अशा पालकाची निवड निखाडे यांनी केली. एका एकरचे प्रत्येकी दहा गुंठ्याचे चार भाग केले आहेत.
सुमारे पंधरा दिवसांच्या अंतराने त्यात चक्री पद्धतीने पालक लावला जातो, त्यामुळे वर्षभर पालक विक्रीस उपलब्ध राहतो. या पिकात खते फारशी द्यावी लागत नाहीत. कीडनाशकांची फवारणीही गरजेपुरती व अत्यंत कमी राहते. साहजिकच उत्पादन खर्च कमी होतो.
सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत एका पिकाचा कालावधी संपतो. दहा गुंठ्यांत दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
समाधानकारक उत्पन्न
अकोला शहर सुमारे दहा किलोमीटरवर असल्याने गावातील अन्य पालक उत्पादकांच्या शेतमालासोबत निखाडे आपला पालक दररोज एक ते दीड क्विंटल प्रमाणात विक्रीला पाठवतात. तेवढ्या क्षेत्रात दोन महिन्यांत सुमारे 10 ते 12 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यात साडेपाच हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च असतो. वर्षभराची सरासरी पाहिल्यास किलोला दहा ते बारा रुपये दर मिळतो. किमान आठ रुपये तर कमाल 25 ते 30 रुपये दर मिळाला आहे. पावसाळा वा उन्हाळा काळात आवक कमी असेल, त्या वेळी चांगल्या दरांचा फायदा मिळतो.
निखाडे दांपत्याला दोन मुले आहेत. त्यांचे शिक्षण व घरचा आर्थिक खर्च पाहाता केवळ एक एकर शेतीतील उत्पन्न पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. सुमारे पावणेदोन लाख 75 हजार रुपये खर्चून 50 बाय 20 फूट आकाराच्या शेडची उभारणी केली. ब्रॉयलर (मांसल) कोंबड्याचे उत्पादन तेथे घेतले जाते. सहा महिन्यांपूर्वीच या व्यवसायास सुरवात केली. आतापर्यंत सुमारे चार ते पाच बॅचेस घेतल्या आहेत. पोल्ट्रीची क्षमता एक हजार पक्ष्यांची असली तरी सध्या आर्थिक क्षमतेनुसार सहाशे पक्ष्यांचेच संगोपन केले जाते. पक्ष्यांची विक्री किलोला 70 ते 80 रुपये दराने केली आहे. व्यापारी जागेवर येऊनच कोंबड्यांची खरेदी करतात. बहुतांश विक्रीसाठी 80 रुपये तर उन्हाळ्यात काही कालावधीत 95 रुपये दर मिळाला आहे. आशाताईंनी पोल्ट्री व्यवसायातील पंधरा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्या आधारे पक्ष्यांचे व्यवस्थापन, त्यांचे खाद्य, लसीकरण या गोष्टी त्यांनी माहीत करून घेतल्या आहेत.
आशाताईंनी आणखी एक पाऊल पुढे जाऊन छोटे दळणयंत्र (पीठ चक्की) खरेदी केले आहे. एका तासात 25 किलो धान्य भरडण्याची त्याची क्षमता आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी त्यांनी या यंत्राच्या वापराविषयी चर्चा केली आहे. त्यांच्याद्वारा मार्गदर्शन घेऊन येत्या काळात हा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. निखाडे कुटुंबाकडे पूर्वी दोन म्हशी होत्या. नव्याने शेतजमीन खरेदी केल्यानंतर शेणखताचा वापर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी त्यांनी केला. आज त्यांच्याकडे केवळ बैलजोडी आहे. मात्र एकरी सात ट्रॉली खत बाहेरून आणून ते शेताला दिले आहे.
तन, मन ओतून आम्ही दांपत्य शेतीत राबतो. केवळ एक एकरातील उत्पन्नातूनच शेतातच छोटे घर बांधले. शेजारीच पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मुलांची शिक्षणे सुरू आहेत. विहीर खोदली. पूर्वी काही काळ मजुरीही केली. आता मात्र शेतीतून स्वयंपूर्ण झालो आहोत.
स्त्रोत- अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...