केशवराव मारोतराव जेधे : (२१ एप्रिल १८९६–१२ नोव्हेंबर १९५९). महाराष्ट्रातील एक राजकीय पुढारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. इतिहासप्रसिद्ध जेध्यांच्या घराण्यात पुणे येथे जन्म. त्यांना विशेष असे महाविद्यालयीन शिक्षण मिळाले नाही; तथापि विद्यार्थिदशेतच ते ब्राह्मणेतर चळवळीत सहभागी झाले. त्यांचा कल प्रथमपासूनच सत्यशोधक समाजाकडे होता. म्हणून त्यांनी तरुण मराठा पक्ष स्थापन केला आणि त्याच्या प्रचारार्थ शिवस्मारक हे साप्ताहिक काढले (१९२३). नंतर त्यांनी मजूर (१९२४) हे वर्तमानपत्र काढून सत्यशोधक समाजाच्या विचारप्रणालीचा प्रचार केला. ब्राह्मणांच्या गणेशोत्सवास शह देण्याकरिता वेगळा गणेशोत्सव मेळा काढला (१९२४–२५). पुढे कैवारी या साप्ताहिकाचे ते सहसंपादक झाले (१९२७). १९२० मध्ये लोकमान्य टिळकांना त्यांनी विरोध करून प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागत समारंभात भाग घेतला. ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय जेधे यांना द्यावे लागेल. त्यांनी देशाचे दुश्मन (१९२५) हे पुस्तक लिहिले. त्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद करण्यात आली; पण ते अपिलात निर्दोषी ठरले. अस्पृश्यांच्या अनेक चळवळींत त्यांनी भाग घेतला. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते (१९२८). पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष होते (१९३३). १९३० पासून त्यांनी काँग्रेसच्या विविध सत्याग्रहांत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाल्या. १९३५ मध्ये ते मध्यवर्ती कायदे मंडळात निवडून आले. १९४२ च्या लढ्यात त्यांना वीस महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. १९३८ व १९४६–४८ च्या काळात ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसमधील मतभेदांमुळे ते शेतकारी-कामगार पक्षात गेले (१९४८–५३); पण पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे निवडून आले. तत्पूर्वी त्यांनी दोन महत्त्वाच्या चळवळींत भाग घेतला : गोव्याचे मुक्ती आंदोलन (१९५५) व संयुक्त महाराष्ट्र चळवळ (१९५६).
राजकारणात असूनही त्यांनी वृत्तपत्रकार या नात्याने विपुल स्फुटलेखन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९४८). मुंबईच्या सत्याग्रहावर त्यांनी एक पोवाडा रचला (१९३१) व त्या काळी तो फार गाजला होता. त्यांनी १९२१ मध्ये शितोळे घराण्यातील वेणुताई यांच्याशी विवाह केला. हाडाचे कार्यकर्ते व दलितांचे उद्धारक म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून काँग्रेसचा जो प्रचार व प्रसार झाला, त्याचे श्रेय जेध्यांना देण्यात येते. ते पुण्यात निधन पावले.
लेखक - इंदुमति केळकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2020
भारताचे सहावे राष्ट्रपती व स्वातंत्र्य चळवळीतील एक...
भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्य...
महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते व मुंबई ...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘कर्नाटक सिंह’ या नावान...