केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत होय. लोकसेवा आयोगाने जाणीवपूर्वक या टप्प्यास व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. स्वाभाविकच नागरी सेवापद प्राप्त करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे प्रशासन चालविण्यासाठी आवश्यक, पूरक व पोषक क्षमता आहेत अथवा नाहीत याची चाचपणी याद्वारे केली जाते. 275 गुणांसाठी असलेला हा टप्पा अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरतो. कित्येकदा अंतिम यादीतील स्थान मुलाखतीत मिळालेल्या गुणांवरच निर्धारित होते.
व्यक्तिमत्त्व चाचणीद्वारा नागरी सेवापदासाठी आवश्यक क्षमतांची चाचपणी केली जाते. यात उमेदवाराच्या शैक्षणिक आणि शिक्षणबाह्य अशा दोन्ही आयामांना महत्त्व दिले जाते. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. तज्ज्ञ व निष्पक्ष मुलाखत मंडळाद्वारा उमेदवारांची व्यक्तिगत सुयोग्यता जोखणे हा मुलाखतीमागील मुख्य उद्देश असतो. व्यापक अर्थाने उमेदवाराचा सामाजिक कल, वर्तमान घडामोडीविषयक भान व समज, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दृष्टीतील सकारात्मकता व आशावाद, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा, आवडीच्या गोष्टीमधील सखोलता, नेतृत्वगुण, बौद्धिक व नैतिक बांधिलकी इ. गुणवैशिष्ट्यांची चाचपणी केली जाते. प्रत्येक उमेदवाराने व्यक्तिमत्त्व चाचणीचा अर्थ लक्षात घेऊन त्याची प्रभावी तयारी करणे क्रमप्राप्त ठरते.
मुलाखत ही तुमच्या ज्ञानाची कसोटी पाहणारी परीक्षा नसते. पूर्व व मुख्य परीक्षेद्वारा विद्यार्थ्याचे ज्ञान तपासलेले असते. मुलाखत मंडळाद्वारे विचारले जाणारे काहीच (फारच कमी) प्रश्न तथ्थाधारित (फॅकच्युअल) व माहितीप्रधान असतात. मंडळास रस असतो तो मुख्यत: उमेदवाराचा एखाद्या बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे जाणून घेण्यात.
मुलाखतीतील बहुतांश प्रश्न उमेदवाराचा दृष्टिकोन, भूमिका, उपायात्मक विचार करण्याची क्षमता तपासणारेच असतात. त्यामुळे मुलाखतीत विचारलेल्या किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली यापेक्षा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य माहिती व आकलनावर आधारित, नेमकी आणि संतुलित स्वरूपाची असणे महत्त्वाचे ठरते. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यास वा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्यास, तसे सांगण्याची उमेदवाराची प्रामाणिक वृत्ती मुलाखत मंडळाला अभिप्रेत असते.
व्यक्तिमत्त्व चाचणीत उमेदवाराच्या विविध क्षमतांचे मूल्यमापन केले जाते. त्यातील मध्यवर्ती क्षमता म्हणजे महत्त्वाच्या बाबीविषयी स्वत:चे मत मांडण्याची क्षमता. आपल्या भोवताली घडणाऱ्या महत्त्वपूर्ण कळीच्या मुद्यांविषयी उमेदवाराचे स्वत:चे मत असणे अत्यावश्यक ठरते. दुसरी बाब म्हणजे त्याची उलट तपासणी करणारे प्रश्न मुलाखत मंडळाने विचारल्यास आपल्या मताच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण देण्याची क्षमतादेखील उमेदवारामध्ये असणे महत्त्वपूर्ण ठरते. अर्थात प्रस्तुत मत टोकाचे अथवा अतिरेकी स्वरूपाचे असणार नाही याची खात्री बाळगावी. त्यामुळे एखाद्या विषयासंबंधी सविस्तर विचार करूनच आपले मत विकसित करणे अत्यावश्यक ठरते.
उमेदवाराकडून अपेक्षित दुसरी महत्त्वाची क्षमता म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता होय. प्रशासकीय सेवकास विविध स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात हे सर्वश्र्रुत आहे. त्यामुळे मुलाखतीतील काही प्रश्न उमेदवाराकडे प्राप्त परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा नाही याची चाचपणी करणारे असतात. मुलाखत मंडळ कित्येकदा जाणीवपूर्वक परिस्थितीजन्य प्रश्न विचारून निर्णयक्षमतेची पडताळणी करत असतात.
अपरिचित अशा मुलाखत मंडळासमोर उमेदवार किती स्वाभाविकपणे आणि आत्मविश्वासपूर्वक स्वत:चे व्यक्तिमत्त्व सादर करतो यावर, व्यक्तिमत्त्व चाचणीतील गुण अवलंबून असतात. मुलाखत मंडळाबरोबर होणारा संवाद हा स्वाभाविक, नैसर्गिक अशा स्वरूपाचा असला पाहिजे. प्रश्नांची उत्तरे तयार करून, पाठांतर केलेली आहेत अशा रीतीने मांडली जाऊ नयेत. त्यासाठी मंडळाने प्रश्न विचारल्यानंतर काही सेकंदाचा विराम घेतच विचारपूर्वक उत्तर द्यावे. अन्यथा मुलाखत यांत्रिक होण्याचीच शक्यता असते. आत्मविश्वास हा मुलाखतीतील आधारभूत घटक आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
उमेदवाराच्या तयारीचे स्वरूप; आकलन व विचारातील स्पष्टता, त्याविषयक उमेदवारास वाटणारी खात्री; परिणामी मुलाखत मंडळासमोर आपले मत मांडण्याचा आलेला निर्भीडपणा आणि संवादातील प्रभावीपणा (औपचारिक संतुलित भाषा, आवाजाची योग्य पातळी, मंडळातील सर्वांना संबोधित करत सर्वांना संवादात सामावून घेणारी दृष्टी इ.) या घटकांआधारे उमेदवाराचा आत्मविश्वास निर्धारित व आविष्कृत होत असतो.
केंद्र लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेतील मुलाखतीसाठी विशिष्ट अभ्यासक्रम नमूद केलेला नसला तरी या टप्प्याची तयारी करण्यासाठी पुढील घटक लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. मुख्य परीक्षेचा अर्ज भरतांना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा ‘बायोडाटा’च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी.उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील पहिला घटक म्हणजे नाव होय. यात उमेदवाराचे स्वत:चे नाव, आईवडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. यातील कोणत्याही नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी माहिती संकलित करावी.
दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकरण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्ट्ये यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते. त्यातही आपला जिल्हा, विभाग आणि राज्य याविषयी लोकसंख्यात्मक माहिती, आर्थिक स्थितीविषयक आकडेवारी व वैशिष्ट्ये, विकासविषयक स्थिती आणि इतर काही खास वेगळेपण या अनुषंगाने एक प्रकारचे प्रोफाइलच तयार करावे. आपल्या भागातील महत्त्वाच्या समस्या व आव्हाने, त्याविषयक शासकीय, बिगरशासकीय उपाय याव्यतिरिक्त काही आवश्यक उपायांचा सविस्तर विचार केलेला असावा.
उमेदवाराची शैक्षणिक पार्श्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती पदवी संपादन केली आहे. त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपायोजनात्मक भाग, अलिकडील शोध व घडामोडी यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधीदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.
उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील ‘अभ्यासबाह्य बाबीतील रस’ हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धांत प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे, शालेय-महाविद्यालयीन जीवनात भूषवलेल्या जबाबदाऱ्या यापासून ते एखाद्या सामाजिक कार्यातील सहभाग अशा अभ्यासबाह्य घटकांचा समावेश होतो. वास्तविक पाहता अभ्यासबाह्य घटक हा त्या-त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. त्यामुळे मुलाखत मंडळदेखील बहुतांश वेळा या घटकावरच भर देत असते. उमेदवाराने खरेच या बाबी केल्या आहेत का? कशा केल्या आहेत? उमेदवार त्यातून काय शिकला आहे? त्याबाबतीत तो किती प्रामाणिक, जिज्ञासू आहे? अशा महत्त्वपूर्ण बाबींची तपासणीच जणू केली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते.
उमेदवाराने मुख्य परीक्षेसाठी निवडलेला वैकल्पिक विषय हा देखील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संबंधित विषय का निवडला? संबंधित विषयाचा नागरी सेवेत कसा उपयोग होईल? यासारख्या प्रश्नांपासून वैकल्पिक विषयातील मूलभूत संकल्पना, विचार, चालू घडामोडी, उपाययोजनात्मक भाग यावर विविध प्रश्न विचारले जातात.
आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. चर्चेतील मुद्यांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्यांविषयी स्वत:चे मत असणे महत्त्वाचे ठरते.अशा रीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक ‘मॉक इंटरव्यूव्ह’ चा सराव केल्यास अधिक गुण मिळविता येतील.
लेखक - तुकाराम जाधव
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 8/17/2020
लोकांनी आरोग्यविषयक गैरसमजुती, चुकीच्या सवयी टाकून...
आपत्तीच्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाची जबाबदार...
‘नैसर्गिक निवड’
आवेष्टन विषयी माहिती