स्थापना
महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी 1916 साली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे. 1921 मध्ये या विद्यापीठातून पाच महिला पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्या. या विद्यापीठाचे मुख्य केंद्र चर्चगेट येथे तर उपकेद्र मुंबईतील जुहू आणि पुण्यातील कर्वे रोड येथे आहे.
उद्दिष्ट
शिक्षणाद्वारे महिलांना स्वतंत्र व स्वावलंबी बनविणे, तसेच सुगृहिणीपदाच्या दृष्टीने त्यांना योग्य ते शिक्षण देणे या हेतूने थोर समाजसुधारक भारतरत्न अण्णासाहेब (धोंडो केशव) कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. मुंबई येथे 1916 मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या विद्यापीठास थोर उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख रूपयांची देणगी दिली होती. त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे करण्यात आले. पुढे मुंबई राज्याच्या 1951 च्या विधानसभा अधिनियमानुसार या विद्यापीठास शासकीय मान्यता मिळाली आणि विद्यापीठाची पुनर्रचना झाली. सर्व घटक महाविद्यालये घटकसंस्था होऊन विद्यापीठाचे स्वरूप संघात्मक (फेडरल) झाले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती असून कुलगुरूंची नियुक्ती त्यांच्यामार्फत होते. विद्यापीठातील अभ्यासक्रम स्त्री जीवनाशी संबंधित, स्त्री वर्गाचा सर्वांगीण विकास साधणारा असावा आणि शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे, या दोन मूलभूत बाबींवर विद्यापीठाने प्रारंभापासून भर दिला आहे. महिलांना उच्च शिक्षणाची संधी देणारी एस. एन. डी. टी. ही आद्याक्षरे हे प्रतिकात्मक बोधचिन्ह बनले आहे.
विद्यापीठाचे स्वरुप
या महिला विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक आहे. विशेष म्हणजे त्याचे क्षेत्र अखिल भारतभर आहे. विद्यापीठाच्या पुणे तसेच मुंबईमधील चर्चगेट व जुहू येथील परिसरात 11 महाविद्यालये व 32 विद्यापीठीय विभाग आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील 44 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. विद्यार्थिनींची संख्या आताची 44 हजार 625 इतकी आहे. विद्यापीठात मानव्यविद्या, तंत्रविद्या व विज्ञान, ललित कला व सामाजिकशास्त्रे, संगणक विज्ञान, परिचारिका अभ्यासक्रम या विषयांच्या विद्याशाखा असून संशोधनाची सोय आहे. या विद्यापीठात गृहविज्ञान विषयावर अधिक भर दिला जातो. विद्यापीठात सर्व विषयांमधील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. परीक्षांची तसेच पदविका व प्रमाणपत्र परीक्षांचीही सोय आहे. तंत्रविद्या व व्यवस्थापन-अभ्यास या विषयांसाठी स्वतंत्र संस्था विद्यापीठाने 1997 मध्ये सुरू केल्या आहेत. चार मान्यताप्राप्त संशोधन संस्था विद्यापीठाच्या कक्षेत 1998 पासून कार्यरत आहेत. पुणे व मुंबई येथील विद्यापीठाच्या ग्रंथालयात 2 लाख 54 हजार ग्रंथ असून अनेक महत्त्वाची नियतकालिके, संशोधन-पत्रिका, अहवाल इ. उपलब्ध आहेत.
विद्यापीठाचे कार्य
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या थोर समाजसुधारकाने जुलै 1916 मध्ये रोवलेल्या शिक्षणरूपी बिजाचा आज वटवृक्ष झाला आहे, विद्यापीठाने लक्षावधी स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवला आहे. डिसेंबर 1915 मध्ये महर्षींनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. उच्च आणि व्यावहारिक शिक्षण देऊन स्त्रीला आत्मनिर्भर करणे हा त्या कल्पनेमागचा उद्देश होता. अभ्यासक्रम 39 पदव्युत्तर विभाग, 13 संस्था, 4 सेंटर्स आणि सात राज्यांतील 174 संलग्नित महाविद्यालये यांच्यामार्फत 200 हून अधिक अभ्यासक्रम आज या विद्यापीठांतून स्त्रियांना उपलब्ध आहेत. गृहविज्ञान या महत्त्वाच्या विद्या शाखेपासून सुरुवात करून आज विद्यापीठाच्या 12 विद्याशाखा आहेत. यात आर्टस, फाइन आर्टस, कॉमर्स, सायन्स, सोशल सायन्स, एज्युकेशन, होम सायन्स, लायब्ररी ॲण्ड इन्फॉर्मेशन सायन्स, मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी, लॉ ॲण्ड सोशल वर्क यांचा समावेश आहे. नवनवीन अभ्यासक्रम आखून एकविसाव्या शतकातील स्त्री समाजाच्या शिक्षणविषयक गरजा पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य करीत एस. एन. डी. टी. विद्यापीठ करीत आहे. आज या विद्यापीठातून पदवीपर्यंतचे 51 अभ्यासक्रम, पदव्युत्तर 61 अभ्यासक्रम आणि डिप्लोमा अभ्यासक्रम 13 विषयात उपलब्ध आहेत.
दिग्गज विद्यार्थ्यांची परंपरा
डॉ. प्राची घारपुरे, प्रसिद्ध लेखिका चित्रा मुदगल, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर, डॉ. भारती वैशंपायन, प्रसिद्ध नायिका राणी मुखर्जी, आताची आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, फॅशन डिझायनर अनिता डोंगरे, नीता लुल्ला आणि आताच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी मसाबा गुप्ता एसएनडीटीचे विद्यार्थी आहेत हे विशेष....
महिला विद्यापीठाची वैशिष्ट्ये
भारतातील या महिला विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात महिलांसाठी पहिली नवीन पायवाट निर्माण केली, आज तिचा राजमार्ग झाला आहे. उच्चशिक्षण क्षेत्रात आज दूरस्थ आणि मुक्त शिक्षणाची संकल्पना रुजली आहे. महर्षीनी महिलांच्या महाविद्यालयात येण्यावर बंधने असतील हे ओळखून त्याकाळी स्वयं अध्ययनाचा पर्याय आपल्या विद्यापीठात उपलब्ध करून दिला. विद्यार्थीनी अभ्यासक्रम स्वत: अभ्यासून परीक्षेस बसत. विद्यापीठाने स्त्रियांची गरज ओळखून अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रेही सुरू केली. आज विद्यापीठाचे दूरस्थ शिक्षण केंद्र हजारो विद्यार्थिनींना 28 पदवी/पदविका अभ्यासक्रम देत आहे. केवळ छापील स्वयंअध्ययन साहित्यावरच भर न देता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून Video lectures, Internet Radio, Online learning यांच्या माध्यमातून विद्यार्थिंनींपर्यंत गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम पोहोचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
पायाभूत अभ्यासक्रम (Foundation Courses)
विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात पायाभूत अभ्यास विषय शिकवले जातात. यातील पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आहे. परंतु विद्यापीठाने स्त्रियांना त्यांचे समाजातील, जगातील स्थान, स्त्री विषयक महत्त्वाचे प्रश्न, नवनवीन वैश्विक करारांचा स्त्रियांवर होणारा परिणाम आणि अशा स्त्री जीवनावर, समाज जीवनावर परिणाम करणाऱ्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह करण्याच्या दृष्टीने पायाभूत अभ्यासक्रमाची आखणी करून त्यांना सजग बनविण्याचे कार्य केले आहे.
तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माध्यमभाषा. महर्षीनी मातृभाषा ही बोध-भाषा (Medium of Instruction) मानली. त्यामुळे इथे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा अनेक भाषांतून अभ्यासक्रम देण्यात येऊ लागले. मात्र महर्षीनी इंग्रजी हा विषय ‘आवश्यक’ विषय मानून अभ्यासक्रमात ठेवला होता, ते त्याकाळी अनेकांना रुचले नव्हते. इंग्रजी हा आवश्यक विषय का ठेवला, याबद्दलची महर्षीची मते अगदी स्पष्ट होती. ते म्हणतात, ''त्या वेळी माध्यमिक शिक्षणात देखील कोणताही विषय शिकताना इंग्रजीचा उपयोग आवश्यक होता. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले पाहिजेत. इंग्रजी भाषा ही अर्धा जगाची भाषा झाली आहे. कोणत्याही विषयाचे विशेष ज्ञान करून घ्यावयाचे असले, अगर कोणत्याही गोष्टीची विशेष माहिती पाहिजे असेल तर ती आज इंग्रजीच्या ज्ञानावाचून होणे शक्य नाही.'' महर्षीचे हे विचार आजच्या जगात तर किती तरी चपखल वाटतात. आज विद्यापीठात अनेक बोधभाषा वापरल्या जात असल्या तरीही इंग्रजी 'अनिवार्य' विषय आहे. विविध विषयात पीएचडी, सर्टिफिकेट कोर्स, पदव्युत्तर अभ्यासक्रम या विद्यापीठात आज उपलब्ध आहेत.
भारतभरात संलग्नित महाविद्यालये हे महिला विद्यापीठाचे आणखी एक वैशिष्ट्य 1916 साली महिला विद्यापीठाची स्थापना 'भारतवर्षीय महिला विद्यापीठ' (इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) या नावाने झाली, कारण महर्षीच्या अनेक सुहृदांना हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्राचे न राहता त्याला व्यापक स्वरूप द्यावे असे वाटत होते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या बाहेरही काही संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर 1951 मध्ये महाराष्ट्र सरकारची विद्यापीठाला मान्यता मिळाली तरीही विद्यापीठाची ही व्यापकता कायम राहिली. 1994 च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात एक वेगळे कलम (क्र. 105) केवळ श्रीमती ना.दा.ठा. महिला विद्यापीठासाठी आहे. या विद्यापीठास महाराष्ट्रात तसेच इतर कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात महाविद्यालये संलग्नित करता येतात. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मात्र काही जिल्ह्यांपुरतेच मर्यादित असते. निरंतर शिक्षण प्रक्रिया मानव समाजासाठी अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण ज्ञानयुगात पदोपदी अनुभवत आहोत. महिला विद्यापीठाने हे 1970 सालीच ध्यानात घेऊन निरंतर शिक्षण विभागाची स्थापना केली, त्याला भारत सरकारचेही पाठबळ मिळाले. गेल्या 4 दशकांत या केंद्राने लाखो स्त्रियांना निरंतर शिक्षणाचा वसा आपला 'कौशल्य विकास आणि अर्थोत्पादन शिक्षण' या (Skill development & Income Generating activities) कार्यक्रमांतर्गत दिला. आजही या विभागातर्फे स्त्रियांसाठी जवळ जवळ 100 विविध अभ्यासक्रम दिले जातात. एकविसाव्या शतकातील स्त्रीला स्वत:चा मार्ग आखण्यासाठी, त्या मार्गावर चालण्यासाठी तसेच त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी महिला विद्यापीठ कायम सजग आहे. शतक महोत्सवानिमित्त अनेक नवीन प्रकल्पांचे आयोजन होत आहे. विद्यार्थिंनींना अध्ययन स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानकेंद्राची (Knowledge Centre) स्थापना, विज्ञान संस्था (Institute of Science, डिझाइन संस्था, (Institute of Design) जनसंपर्क आणि माध्यम अभ्यास संस्था (Institute of Mass Communication & Media Studies) अशासारख्या नवीन संस्थांची स्थापना, तसेच ई-लर्निंग सेंटर, मध्यवर्ती यंत्रसामग्री साहाय्यता (Central equipment facility) संशोधन संस्था (Advance Research Institute) अशा स्वरूपात विद्यापीठीय शिक्षक वर्गाला, विद्यार्थिनींना, अध्यापन अध्ययनात साहाय्य करण्याचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. इनक्युबेशन केंद्र पदवी घेतल्यानंतर विद्यार्थिनींनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करावा हा विचार आजच्या काळात प्रकर्षांने समोर येतो. व्यवस्थापनशास्त्र (Management), तंत्रज्ञान (Technology), संगणकशास्त्र (Computer Science) या क्षेत्रात पदवी घेणाऱ्या विद्यार्थींनींसाठी इनक्युबेशन केंद्र सुरू करणे तुलनेत प्रचलित आहे. परंतु याबरोबर सामाजिकशास्त्रे (Social Science), समाजकार्य (Social Work), तसेच गृहविज्ञान क्षेत्रात पदवी घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी विद्यापीठ इनक्युबेशन केंद्र सुरू करीत आहे.
आज या विद्यापीठाच्या विद्यार्थीनी जगाच्या नकाशावर आपली मोहोर उमटवून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. संपर्क अधिक माहितीसाठी
www.sndt.ac.in या वेबसाईटवर अथवा चर्चगेट येथे 022 -22031879, 022-22032159 जुहू येथे 022-26608493, 022-26608462 तर पुणे येथे 020- 25421678 येथे संपर्क साधू शकता.
- वर्षा फडके,वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)
माहिती स्त्रोत :
महान्युज