(२८ एप्रिल १७५८ – ४ जुलै १८३१). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष (कार.१८१७-२५) व मुत्सदी. त्याचा जन्म सधन घराण्यात वेस्टमोरलंड (व्हर्जिनिया) येथे झाला. सुरूवातीचे शिक्षण वेस्टमोरलंडमध्ये घेऊन तो विल्यम आणि मेरी महाविद्यालयांत पुढील शिक्षणासाठी गेला (१७७४-७६), पण क्रातिकारक वातावरणामुळे तो अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाकडे आकृष्ट झाला आणि तत्काळ क्रांतिसैन्यात दाखल झाला(१७७६). या युद्धात त्याने पराक्रम दाखवून मेजरपर्यंतचे लष्करी हुद्दे मिळविले. नंतर त्याने व्हर्जिनियात टॉमस जेफर्सनच्या मार्गदर्शनाखाली कायद्याचा अभ्यास केला(१७८०).
पुढे त्याने वकिली व्यवसाय सुरू केला व तो १७८२ मध्ये व्हर्जिनियाच्या प्रतिनिधी सभेवर निवडून आला. अमेरिकेच्या घटनेच्या मसुद्याला संमती देण्याविषयी व्हर्जिनिया राज्याने बोलावलेल्या परिषदेचा तो सदस्य होता. एकून घटनेच्या स्वरूपाविषयी त्याचे मत अनुकूल नव्हते, मात्र व्हर्जिनियाच्या परिषदेने घटनेला मान्यता दिली (१७८८).
मन्रो १७८३ ते १७८६ दरम्यान अमेरिकन काँग्रेसचा सदस्य होता. या सुमारास एलिझाबेथ कोर्टराइट या न्यूयॉर्कमधील एका सुंदर युवतीबरोबर त्याचा विवाह झाला(१६ फेब्रुवारी १७८६). त्यानंतर तो आल्वेमार्ले परगण्यात स्थायिक झाला. त्यांना तीन मुले झाली. त्यांपैकी इलिझा व मारिआ या मुली पुढे राजकीय क्षेत्रात प्रसिद्धीस आल्या. १७९० मध्ये तो अमेरिकेच्या सिनेटवर निवडून आला. जॉर्ज वॉशिंग्टनने त्याला फ्रान्समध्ये राजदूत नेमले (१७९४-९६), पुढे मन्रोची व्हर्जिनियाचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली (१७९९-१८०२). या छोट्याशा कारकीर्दीत त्याने प्रशासनात शिस्त व कार्यक्षमता आणली आणि गुलामांची बंडाळी मोडली.
जेफर्सन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रॉबर्ट लिव्हिगस्टनला मदत करण्यासाठी त्याने मन्रोला खास दूताचा दर्जा देऊन फ्रान्सला पाठविले (१८०३), यावेळी पहिल्या नेपोलियनने लुइझिअॅना प्रदेश अमेरिकेला विकत घेण्याचे आवाहान केले. मन्रोने या संधीचा फायदा घेऊन संवैधानिक मान्यतेचा विचार न करता लुइझिअॅना प्रदेश खरेदी केला आणि नंतर अमेरिकन शासनाची परवानगी मिळविली. त्यामुळे मन्रोची लोकप्रियता वाढली नंतर त्याची ग्रेट ब्रिटनमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८०३-०७). त्याने या काळात स्पेनमध्ये जाऊन पश्चिम फ्लॉरिडा हा प्रदेश विकत घेउन लुइझिअॅनात समाविष्ट करावा से सुचविले, परंतु स्पेनने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे त्याची अमेरिकन मुत्सद्यांत गणना होऊ लागली. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेत त्याचा सिंहाचा वाटा होता. परिणामत: रिपब्लिकन पक्षातर्फेभावी अध्यक्षीय निवडणुकीत त्याची उमेदवारी निश्चित झाली, परंतु जेम्स मॅडिसनच्या उमेदवारीमुळे त्याला काही काळ माघार घ्यावी लागली.
राष्ट्राध्यक्ष मॅडिसनच्या राजवटीत मन्रोने प्रथम परराष्ट्रमंत्री व नंतर युद्धमंत्री म्हणून काम केले. पुढे डिसेंबर १८१६ मध्ये मन्रो अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. १८२० साली तो दुसर्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आला. मन्रोने आपल्या दुसर्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या शेवटी अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणाबद्दल निश्चित ठरवून ⇨ मन्रो सिद्धांताची घोषणा केली (२) डिसेंबर १८२३). हा सिद्धांत म्हणजे मन्रोची अत्यंत महत्वपुर्ण व टिकावू कामगिरी होय. अमेरिकेच्या अंतर्गत व्यवहारात यूरोपीय सत्तांनी हस्तक्षेप करू नये, असा इशारा या सिद्धांताद्वारे देण्यात आला. पुढे विसाव्या शतकात लॅटिन अमेरिकन देशांना मन्रो सिद्धांत हे अमेरिकन वर्चस्वाचे प्रतीक वाटू लागले. मन्रोच्या ह्या तत्वांनी किमान शंभर वर्षे अमेरिकन परराष्ट्रधोरणावर आपली पकड कायम ठेवली.
त्याला व्हर्जिनिया विद्यापीठ व व्हर्जिनिया कॉन्सिटट्यूशनल कन्व्हेंशन यांचे अध्यक्षपदही मिळाले (१८२९). राष्ट्राध्यक्ष पदनिवृत्तीनंतर त्याच्या राजकीय जीवनास ओहोटी लागली. अखेरच्या दिवसांत तो ओकहिल येथे राहत होता, त्यातच त्याची पत्नी मरण पावली. बिकट आर्थिक परिस्थिती तो नाईलाजाने न्यूयॉर्क येथे आपल्या मुलीकडे रहावयास गेला. तेथे त्याने आत्मवृत्त लिहिले व तेथेच त्याचे निधन झाले.
अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक तडफदार योद्धा, कार्यक्षम प्रशासक मुत्सद्दी आणि खंबीर परराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कर्ता राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याचे अमेरिकेच्या इतिहासातील स्थान वैशिष्टयपुर्ण आहे.
संदर्भ: 1. Ammon, Henry, James Monroe: the Quest For Natlonal Identity. New York, 1971.
2. Bemis, S.F. John Quincy Adams & the Foundations Of American Foreign Policy, Norton,1973.
करंदीकर, शि. ल.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/8/2020
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिके...
टांझानिया प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष व ए...
फिलीपीन्सचा लोकप्रिय तिसरा राष्ट्राध्यक्ष रामॉन मा...
ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष आणि ख्यातनाम राजनीतिज्ञ...