অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागरी समाज

नागरी समाज

नागरी समाज : नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय. समाजातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी बिगरशेती अगर बिगरप्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणे, समाजाची लोकसंख्या मोठी असणे आणि लोकवस्तीची दाटी अधिक असणे, ही तिन्ही वैशिष्ट्ये एकत्रित असल्यास त्याला नागरी समाज म्हणता येईल. यांतील एखादेच वैशिष्ट्य दिसून आले, तर त्याला नागरी समाज म्हणता येणार नाही.

उपभोग्य वस्तूंची प्राप्ती नैसर्गिक रीतीने करून घेणे अगर बिनकसबी मजुरीतून सेवा उपलब्ध करून देणे, हे प्राथमिक व्यवसाय होत. शेती, खाणकाम, गुरे चारणे, मेंढ्या हाकणे, जंगलातून काटक्याकुटक्या, डिंक, मध गोळा करणे इ. हेही प्राथमिक व्यवसाय होत. या कामांचे स्वरूपच असे आहे, की त्यांतील माणसांच्या मानाने कामाची जागा मोठी असते. ग्रामीण समाजात अशा व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांची संख्या अधिक असते. बिगरप्राथमिक व्यवसायांमध्ये यंत्रोपकरणे, हत्यारे यांच्या साह्याने बुद्धिकौशल्य अगर कारागिरी वापरून उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करणे अगर सेवास्वरूपी कामे करणे, हे प्रकार येतात. भिन्नभिन्न क्षेत्रांतील व्यवस्थापनाचा व्यवहार सांभाळणारा अधिकारी वर्ग, प्रत्यक्ष उत्पादनात गुंतलेले लोक आणि अनेक तऱ्हेची सेवा करणारे लोक यांत येतात. नगरांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक असते. यांच्या कार्याच्या मानाने त्यांना दैनंदिन व्यवहारांकरिता जागा कमी लागते. ग्रामीण आणि नागरी व्यवसायांमधला हा फरक सर्वकालीन नागरी समाजांच्या संदर्भात दिसून येतो; परंतु औद्योगिकीकरणपूर्व नागरी समाजात वस्तूंचे उत्पादन हे बव्हंशी अगर संपूर्णतया माणसांच्या हस्तकौशल्यावर अगर अंगमेहनतीवर अवलंबून असे. बैल, घोडा अशा जनावरांचा उपयोग जरी करून घेतला, तरी त्यांबरोबर माणसांनाही खपावे लागत असे.

उत्पादक साधने किंवा हत्यारे ही माणसांनी प्रत्यक्ष हाताळावी अशीच होती आणि त्यांकरिता खास प्रशिक्षणाची आवश्यकताही फारशी नव्हती. औद्योगिकीकरणानंतर उत्पादक व सेवात्मक साधने ही अधिकतर यांत्रिक बनली. यंत्रोपकरणे हाताळण्याकरिता प्रत्यक्ष मनुष्यबळाची आवश्यकता न लागता, यांत्रिक प्रक्रिया ही अधिकाधिक वायू, वाफ, वीज व अणुशक्ती अशा अचेतन शक्तींवर अवलंबून राहिली. प्राचीन व आधुनिक नागरी समाजांमधला हा महत्त्वाचा फरक होय. नागरी समाजाचे वैशिष्ट्य हे केवळ अप्राथमिक अगर बिगरशेती व्यवसायांवर अवलंबून असलेले लोक बहुसंख्य असण्यावर अवलंबून नाही. उदा., रहदारीच्या मार्गांवर असलेली दुकाने, उपाहारगृहे, पेट्रोलपंप इत्यादींच्या छोट्या समूहाला नागरी समाज म्हणता येत नाही. त्यांच्या संख्यांत भर पडून समूह मोठा झाला आणि दैनंदिन व्यवहारांतील स्वायत्तता अगर स्वयंपूर्णता त्याला लाभली, की तो नागरी समाज बनतो. म्हणून अप्राथमिक व्यवसायांच्या आधिक्याबरोबरच अधिक लोकसंख्येची पण आवश्यकता असते.

लोकसंख्या अधिक आहे ह्या एकाच निकषावरही कोणताही समाज नागरी समाज ठरू शकत नाही. अदमासे ५,००० वस्तीच्या समूहाला शहर (टाउन) म्हणावे, असे जनगणनेने स्वीकारले आहे. एक लाख वस्तीच्या समूहाला नगर (सिटी), दहा लाख वस्तीच्या समूहाला महानगर (मेट्रोपलिस) आणि सर्वसाधारणपणे पन्नास लाखांपेक्षा अधिक वस्ती असलेल्या समूहाला प्रचंड नगर (मेगॅलोपलिस) असे म्हटले जाते. परंतु ५,००० वस्तीच्या सर्वच समूहांना शहर म्हणता येणार नाही. भारतात आंध्र प्रदेशामधील काही गावांची लोकसंख्या ५,००० हून अधिक असलेली दिसून आलेली आहे. त्याचप्रमाणे काही उपनगरांतील लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असलेली उदाहरणे आहेत. म्हणून लोकसंख्येबरोबरच लोकांचा व्यवसायही लक्षात घेणे आवश्यक आहे.

नगर हे त्याच्या संपर्कात येणाऱ्या भोवतालच्या प्रदेशातील लोकांच्या गरजा भागविण्याकरिता अस्तित्वात आलेले मध्यवर्ती ठिकाण होय. त्यातील लोकसंख्या ही त्याच्याशी व्यावहारिक संपर्कात येणाऱ्या भोवतालच्या प्रदेशाच्या व्याप्तीवर अवलंबून असते. संपर्काच्या साधनांची विपुलता, तसेच वेग व खर्च या दृष्टीनी त्यांची कार्यक्षमता, यांवर नगराशी संबंधित असणाऱ्या भोवतालच्या प्रदेशाची व्याप्ती अवलंबून असते. भोवतालच्या प्रदेशाच्या गरजांची संख्या व स्वरूपावरून नगरातील व्यवसायांची संख्या व स्वरूप ठरते. गरजा आणि नागरी व्यवसायांमधील विविधता ही, नगरात उपलब्ध होऊ शकणारी निसर्गनिर्मित संपत्ती व तिचा वापर करण्याकरिता आवश्यक असलेले ज्ञान, बुद्धिकौशल्य, कारागिरी, हत्यारे व अवजारे ह्या साधनसामग्रीवर अवलंबून असते. अर्थातच यंत्र-तंत्राच्या विकासाने औद्योगिकीकरण झाले, म्हणजे उत्पादन झपाट्याने मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे हेच किफायतशीर ठरते. कोणतेही काम मोठ्या प्रमाणावर करणे हेच किफायतशीर ठरते.

कोणतेही काम मोठ्या प्रमाणावर होऊ लागले, की एकूण कामाचे आटोपशीर भाग पाडून स्वतंत्र व्यक्तीकडे अगर एखाद्या तुकडीकडे ते काम सोपविणे आवश्यक ठरते. अशा सर्व विभागांतील कामांत सुसूत्रता आणण्याकरिता नोकरशाही अस्तित्वात येते. यंत्र-तंत्रांच्या विकासामुळे कामाचा व्याप वाढतो, एवढेच नव्हे, तर एकूण कामाची जी विभागणी केली जाते, ती यांत्रिक प्रक्रियेच्या आणि त्याकरिता लागणारे खास बुद्धिकौशल्य अगर कसब यांच्या भिन्नतेनुसार असते. हे बुद्धिकौशल्य अगर कसब कौटुंबिक परंपरेतून उपलब्ध होणारे नसून प्रशिक्षणाने मिळवावयाचे असते आणि हे प्रशिक्षणही कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचे असून प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या कुवतीनुसार ते स्वतंत्र प्रशिक्षण-केंद्रातून घ्यावे लागते. आधुनिक नागरी समाजातील औद्योगिक उत्पादनाच्या व सेवाकार्याच्या केंद्रांना लागणारा कर्मचारीवर्ग व अधिकारीवर्ग हा, म्हणूनच त्यांच्या प्रशिक्षणानुसार व त्यायोगे सिद्ध झालेल्या पात्रतेनुसार नेमलेला असतो. धर्म, प्रदेश, भाषा इ, बव्हंशी जन्मजात व पात्रतानिरपेक्ष भेदांनुसार कर्मचारीवर्ग नेमणे औद्योगिक व व्यावहारिक कार्यक्षमतेच्या दृष्टीने शक्यच नसते. म्हणून नागरी समाज हा आकाराने मोठा असतो, एवढेच नव्हे, तर त्यातील लोकांत सांस्कृतिक दृष्टिने बहुजिनसीपणा अगर बहुविधता असते.

लोकांमधील हा भेद आधुनिक नगरांत अधिक दिसून येतो. नगरांच्या संपर्कात येणाऱ्या प्रदेशाच्या व लोकांच्या विविधतेवर ही विविधता अवलंबून असते. आधुनिक यंत्र-तंत्राच्या विकासाने नगरांच्या संपर्कात येणाऱ्या प्रदेशाचा विस्तारही वाढला आहे. तरीही भिन्नभिन्न नगरांच्या संपर्कात अगर वर्चस्वाखाली येणाऱ्या प्रदेशावरून नगरांची प्रादेशकि केंद्रे, विभागीय केंद्रे, जिल्हा केंद्रे, राज्य केंद्र, राष्ट्रीय केंद्र, आंतरराष्ट्रीय केंद्र अशी विभागणी करता येते. प्रादेशिक केंद्रापेक्षा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केंद्रांत लोकसंख्या व त्यांची सांस्कृतिक विविधता ही अधिकाधिक असणे स्वाभाविक आहे.

नागरी समाजाचे तिसरे वैशिष्ट्य लोकवस्तीची दाटी. ही त्यातील व्यवसायांचे स्वरूप व व्यवसायांच्या प्रमुख कार्याला लागणारी कमी जागा यांमुळे ग्रामीण वस्तीपेक्षा मुळातच अधिक असणे स्वाभाविक आहे. यंत्र-तंत्रांच्या विकासानंतर कमीत कमी जागेत अवजड यंत्रे बसवून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कामात गुंतविणे शक्य झाल्यामुळे जागेचे महत्त्व वाढले आणि वस्तीचे केंद्रीकरण होऊ लागले. म्हणून आधुनिक नगरांतील वस्ती ही औद्योगिकीकरणपूर्व नगरांतील वस्तीपेक्षा अधिक दाट असल्याचे दिसून येते. परंतु दाट वस्ती ही केवळ नागरी समाजाचेच वैशिष्ट्य होऊ शकत नाही. समृद्ध अगर बागायती शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील वस्तीही काही ठिकाणी नागरी समाजाइतकीच दाट असलेली दिसून येते. भारतातील सुंदरबनासारख्या समृद्ध प्रदेशातील वस्ती याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. नागरी समाज हा भोवतालच्या प्रदेशाच्या गरजा भागविण्याकरिता मध्यवर्ती ठिकाणी निर्माण झालेले केंद्र जरी असले, तरी सर्वच गरजा या एकाच केंद्रातून भागविल्या जातातच, असे नव्हे. ऐतिहासिक परंपरेनुसार अगर दळणवणाच्या सोयीसवलती व लोकांच्या आवडीनिवडींनुसार विशिष्ट गरजा भागविण्याकरिता विशिष्ट नागरी केंद्रेही अस्तित्वात येतात. एका केंद्रावर भोवतालच्या प्रदेशाचा भार प्रमाणाबाहेर वाढला, तर त्याचा भार हलका करण्याकरिता एखादे उपकेंद्र अस्तित्वात येते. नागरी केंद्राकडून भागविल्या जाणाऱ्या प्रमुख गरजांनुसार नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण करता येते. शासकीय केंद्र, दळणवळणाचे केंद्र, औद्योगिक केंद्र त्याचप्रमाणे शैक्षणिक, आरोग्यविषयक, व्यापारविषयक, यात्राविषयक, सैनिकी इ. भिन्नभिन्न नागरी केंद्रे असू शकतात. या प्रत्येक केंद्रात एका विशिष्ट कार्याभोवती त्या विशिष्ट कार्याला पूरक असलेल्या इतर अनेक व्यवसायांची गुंफण झालेली दिसून येते. केंद्रातील प्रमुख कार्य वा व्यवसाय कोणताही असला, तरी काही मूलभूत गरजा भागविणारी दुकाने, करमणुकीची साधने, शाळा व छोटेमोठे स्वतंत्र व्यावसायिक हे सर्वत्र दिसून येतात.

नागरी समाज उदयास येण्याकरिता पूरक ठरणाऱ्या गोष्टींमध्ये भरपूर पाणीपुरवठा हा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. मानवी वसाहत मुळात नदीकाठी अगर तळ्याशेजारी जेथे पाण्याचा पुरवठा अनिर्बंधपणे होऊ शकेल, अशाच ठिकाणी प्रथम सुरू झाली. पुरातन संस्कृतीचा उगम व विकासही नाईल, युफ्रेटीस, टायग्रिस, सिंधू, गंगा, यमुना अशा बारमाही नद्यांच्या परिसरातच झाला. साहजिकच पुरातन आणि औद्योगिकीकरणपूर्व नगरेही पाणीपुरवठा अधिक व अव्याहत असेल, अशाच ठिकाणी वसविलेली दिसून येतात. पाणीपुरवठ्याच्या खालोखाल वाहतुकीची व दळणवळणाची साधने ही महत्त्वाची मानली जातात. अनेक नगरे दळणवळणाच्या अगर रहदारीच्या संगमावर उदयास आलेली आहेत. वाहतुकीची आणि दळणवळणाची साधने जितकी जलद गतीची आणि कार्यक्षम असतील, तितका नगराचा भोवतालच्या अधिकाधिक प्रदेशाशी संपर्क-संबंध येणे शक्य होते व नगराचा आकार मोठा होत जातो. नागरी समाजाचा आकार जसा मोठा होईल, त्या प्रमाणात नागरी लोकसंख्येला पुरेल इतके अतिरिक्त धान्याचे उत्पादन ग्रामीण भागातून व्हावयास हवे. शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण होऊन अगर अन्य कारणांनी ग्रामीण भागातील व्यवसाय उपजीविकेचे साधन बनण्यास असमर्थ ठरू लागले, की ग्रामीण भागातील अतिरिक्त लोक कामधंदा शोधण्याकरिता छोट्या-मोठ्या नगरांकडे धाव घेऊ लागतात. त्याचप्रमाणे यांत्रिकीकरणामुळे वा अन्य कारणांनी नगरांतील व्यवसायांकरिता अधिकाधिक प्रशिक्षित किंवा अशिक्षित कर्मचारी ग्रामीण व छोट्या शहरांतून खेचले जातात. नागरी भागांत अशा प्रकारे बाहेरील लोकांना खेचण्याची व ग्रामीण भागांत लोकांना बाहेर घालविण्याची प्रक्रिया सतत चालू असते. नागरी भागांतील मागणी आणि ग्रामीण भागांतील अतिरिक्त मजूरकारागीर-वर्ग यांनुसार ही प्रक्रिया चालते. दळणवळणाच्या व रहदारी मार्गांच्या जाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नगराची वाढ झापाट्याने होते. अशा केंद्रस्थानी औद्योगिक, शैक्षणिक, शासकीय, सांस्कृतिक व इतर सामाजिक व्यवहारांची केंद्रेही आकर्षिली जातात. पाणीपुरवठा, वाहतूक व दळणवळणाची सोय या मुख्य गोष्टींबरोबरच शासकीय संपर्काची सोय, पतपेढ्या, व्यापारी उलाढालींकरिता आवश्यक असलेली बाजारपेठ, कच्च्या मालाचा तसेच प्रशिक्षित व इतर मनुष्यबळाचा पुरवठा, उत्पादित वस्तू व संघटित सेवाकार्ये यांकरिता पुरेशी मागणी यांवर नगरांचे अस्तित्व व वाढ अवलंबून असते. आधुनिक नगरांकरिता विजेची व तत्सम शक्तींची आवश्यकता असते. आधुनिक औद्योगिक आणि नागरी केंद्रांमध्ये अशा शक्तींच्या आधारे चालणाऱ्या अवजड यंत्रांच्या साहाय्याने विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते, तसेच सेवा कार्यांची निर्मिती व वितरण केले जाते. उत्पादनक्षेत्रात या अवजड यंत्रांचा प्रवेश झाल्यामुळे आणि या यंत्रांची उत्पादनक्षमताही मोठी असल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणे अपरिहार्य व आवश्यक बनते. त्याकरिता लागणारे मनुष्यबळही मोठे आणि विविध प्रकारचे असते. अधिकाधिक यंत्र-तंत्राच्या प्रवेशाने नगरातील लोकसंख्या अधिक व बहुविध बनत जाते.

नागरी समाजाची संपूर्ण ओळख सर्वसाधारणपणे परिस्थितिवैज्ञानिक, लोकसंख्यात्मक, संस्थात्मक, सामाजिक मूल्यात्मक, स्तरीकरणात्मक, संरचनाभेदात्मक व सामाजिक रोगचिकित्सात्मक या सात दृष्टिकोनांतून होते. या दृष्टिकोनांतून एकाच समाजाच्या विविध अंगांचे ज्ञान होते. ही विविध अंगे अर्थातच परस्परांवर अवलंबून आहेत.

नगरांचे परिस्थितिवैज्ञानिक स्वरूप

या संप्रदायाचे आद्य प्रणेते आर्. ई. पार्क आणि ई. डब्ल्यू बर्जेस हे आहेत. शिकागो नगराचा अभ्यास करून त्यांनी हा दृष्टिकोण मांडला, म्हणून या संप्रदायाला शिकागो संप्रदाय असेही म्हटले जाते. आधुनिक नगराच्या एकूण क्षेत्रांमध्ये विशिष्ट जागी विशिष्ट व्यवहारच चालतो आणि त्यामुळे त्या त्या जागी विशिष्ट संस्कृतीचे कप्पे निर्माण होतात किंवा विशिष्ट संस्कृतीचे लोक वावरताना अगर राहताना दिसतात, असे या संप्रदायाने प्रतिपादिले आहे. स्थानीय अगर भौगोलिक वैशिष्ट्य, तेथे राहणाऱ्या लोकांची सांख्यिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि उत्पादनाकरिता त्याच्यांजवळ उपलब्ध असलेली कारागिरी, ज्ञान, हत्यारे इ. साधने यांत समतोल साधलेला असतो, या परिस्थितिवैज्ञानिक सिद्धांतानुसार त्यांनी हे प्रतिपादिले आहे. परिस्थितिविज्ञानाच्या दुसऱ्या एका सिद्धांतानुसार प्राणिजीवनामध्ये व वनस्पति जीवनामध्ये परस्परावलंबन दिसून येते. एकमेकांवर अवलंबून असलेले प्राणी वा वनस्पती एकत्र दिसून येतात. अर्थात भौगोलिक परिसर हा मुळात अनुकूल असावा लागतो. त्याचप्रमाणे मानवी समाजातदेखील एकमेकांवर अवलंबून असलेले व्यवसायिक, हे एकत्र दिसतात. नगरांत प्रत्येक व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालत असल्यामुळे व व्यवसायांकरिता अनुकूल असलेली जागाच प्रत्येक व्यावसायिक निवडत असल्यामुळे विशिष्ट जागी विशिष्ट व्यवसायाचे भाग स्वाभाविकपणे निर्माण होतात. ज्या व्यवसायात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते, त्या व्यवसायास अनुकूल असलेल्या जागेची किंमत वाढते आणि याउलट ज्या जागेकरिता मागणी नाही, अशा जागेची किंमत कमी होते. साहजिकच आर्थिक बळ कमी असलेले व्यवसायिक अशी जागा उपयोगात आणतात. या नियमानुसार नगरातील मोठी बाजारपेठ ही मध्यवर्ती असते. पतपेढ्यांच्या, शासनाच्या आणि तर सामाजिक व्यवहारांच्या मुख्य कचेऱ्या बहुधा अशा मध्यवर्ती ठिकाणीच असतात. मालाची ने-आण मोठ्या प्रामाणावर होणारे, अवजड वाहनांची वर्दळ असलेले व वाहतुकीची सोय जवळ असणे आवश्यक असलेले कारखाने, घाऊक व्यापाराची केंद्रे इ. नगराच्या बाह्य परिसरात असणे क्रमप्राप्त होते. याचबरोबर राहती घरे ही मागणी कमी असेल, अशा जागी लांब उपनगरांत फेकली जातात. आपापल्या कामाच्या जागेजवळ राहणे ही वृत्ती सार्वत्रिक आहे. प्रत्येक कुटुंब आपल्या ऐपतीप्रमाणे राहण्याची जागा निवडते. यानुसार नगरातील वस्ती ही श्रीमंत, मध्यमवर्ग, गरीब आणि बेघर लोक व झोपडपट्टी अशी विभागली जाते. पैकी श्रीमंत आणि बेघर किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांत सांस्कृतिक मिश्रण दिसून येत असले, तरी मध्यमवर्ग आणि गरीब लोकांच्या वस्त्या ह्या सास्कृतिक भेदांना अनुसरून निर्माण झालेल्या दिसतात. मध्यवर्ती बाजारपेठेत दिवसा गर्दी दिसते; परंतु रात्री वर्दळ कमी असते किंवा अजिबात नसते. रोज कामाला येणारे लोक तसेच बाहेर गावाहून एकदोन दिवसांकरिता येणारेच तेथे दिवसा दिसतात. रोज कामावर येणारेही बहुधा ५०-६० मैलांपर्यंतच्या उपनगरांतून आलेले असतात. त्यांच्या गरजा भागविण्याकरिता आवश्यक असलेली उपाहारगृहे, वसतिगृहे व त्यांच्या तात्पुरत्या गरजा भागविणारे इतर व्यावसायिकही अशा मध्यवर्ती ठिकाणी व आसपासच्या गल्लीबोळांतून फैलावतात. अशा ठिकाणी मध्यमवर्गीय व श्रीमंत कुटुंबे राहत नाहीत. नगराच्या वाढत्या विस्ताराबरोबर ही मध्यवर्ती बाजारपेठ रुंदावत जाते. आसपासच्या राहत्या घरांच्या जागेची किंमत वाढत जाते. त्यामुळे तिथल्या घरांचे मालक ती जागा व्यापारी उपयोगाकरिता वापरू देणे पसंत करतात. घरात राहणाऱ्यांना बाहेर काढण्यात येते किंवा ते स्वखुशीने जातात. घरांची डागडुजी थांबते. परंतु ती जागा व्यापारी उपयोगाकरिता दिली जाईपर्यंत मधल्या काळात तेथे गरीब लोक राहणण्याकरिता येतात. मोठ्या असलेल्या घरात विभाग पाडून दोन किंवा अधिक गरीब कुटुंबांना राहता येईल, अशी व्यवस्था केली जाते. अर्थात पूर्वयोजनाविरहित अशा छोट्या घरांना हवा, उजेड, पाणीपुरवठा, स्नान व स्वच्छतागृह यांची कमतरता तीव्रपणे जाणवते. मध्यवर्ती बाजारपेठेभोवती संक्रमणावस्थेत असलेल्या या पट्ट्याला बर्जेस यांनी संक्रमण पट्टा किंवा विभाग असे म्हटलेले आहे. या संक्रमण विभागाच्या बाहेर मजूरवर्गाची वस्ती व तिच्याभोवती मध्यमवर्ग, श्रीमंतवर्ग यांची वस्ती असते. उच्चभ्रू लोकांची निवासस्थाने व उपाहारगृहे, वसतिगृहे हीसुद्धा नगराच्या बाहेर प्रशस्त जागा, मोकळी हवा उपलब्ध असेल आणि कनिष्ठ वर्गाची वस्ती अगर वर्दळ नसेल, अशा ठिकाणी असतात. केंद्रीकृत बाजारपेठेभोवती वर्तुळाकाराने पसरत जाणाऱ्या विविध वस्त्यांचा हा सिद्धांत बर्जेस यांनी १९२५ साली मांडला. १९३३ साली हायटर याने नगरवाडीचा खंड-सिद्धांत (सेक्टर थिअरी ऑफ सिटी ग्रोथ) मांडला. औद्योगिक संस्था एका जागी प्रस्थापित झाल्यास उच्च वर्गाची वस्ती त्यांच्या विरुद्ध भागात अस्तित्वात येते आणि या दोन्हींच्या मध्ये मजूरवर्गाची वस्ती असते. अशा रीतीने वेगवेगळ्या जागी अस्तित्वात आलेल्या समूहांचा विस्तार होऊन ते एकमेकांना भिडले, की पुन्हा नवी प्रक्रिया सुरू होते, असे त्याचे म्हणणे आहे. अमेरिकेतील अनेक नगरांच्या उदाहरणांवरून त्याने हे मत मांडले आहे. या बाबतीत तिसरा सिद्धांत सी. डी. हॅरिस आणि उलमन एडवर्ड यांनी १९४५ साली मांडला. नगर हे एकाच केंद्रावर अवलंबून नसते. कारखाने, घाऊक व्यापार, बाजारपेठा, राहती घरे यांची अलगअलग केंद्रे निर्माण होतात. मध्यवर्ती बाजारपेठ अपुरी पडू लागली, की तिचा विस्तार न होता तिचे विकेंद्रीकरण होऊन मूळची बाजारपेठ लांब पडत असेल, अशा लोकांकरिता वेगळी बाजारपेठ अस्तित्वात येते, असे यांचे मत आहे.

वरील तिन्ही सिद्धांतांवरून उपयोगाच्या दृष्टीने नागरी क्षेत्रात अलगअलग भाग स्वाभाविकपणे पडतात; परंतु त्यांचा प्रकार वा क्रम हा एकाच पद्धतीचा असतो, असे सांगता येत नाही, हे स्पष्ट होते.

नगरवाढीच्या संदर्भात विशिष्ट जागेचे प्रयोजन सारखे बदलत राहते आणि एका व्यवहाराकरिता अगर कारणाकरिता उपयुक्त असलेली जागा त्या कारणाकरिता निरुपयोगी ठरून दुसऱ्याच कारणाकरिता तिचे प्रयोजन वाढते आणि त्या जागेचे व तिचा उपयोग करणाऱ्या लोकांचे स्वरूप बदलत जाते. अशा रीतीने नागरी सारीपाटावर बहुरंगी सोंगट्या फिरत असतात. या प्रक्रियेचे परिस्थितिवैज्ञानिकांनी केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, विलगता, स्थलांतर, अतिक्रमण आणि स्थळीय वारसा हे सहा टप्पे सांगितले आहेत. विशिष्ट व्यवहाराकरिता अनुकूल असलेल्या जागी त्या व्यवहाराचे केंद्रीकरण होते, व्यवहारानुरूप जागेचे विभाजन होते व व्यवसायात्मक, सांस्कृतिक, आर्थिक भेदांनुसार लोकांच्या अलग वस्त्या निर्माण होतात, बाहेरून नगरात येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली, की नगरातील मोकळ्या जागांवर व नगराच्या परिसरातील खेड्यांवर त्यांचे अतिक्रमण होते, तसेच वाढते उद्योगधंदेही आसपासाच्या खेड्यांवर अतिक्रमण करतात, कालांतराने त्या खेड्यांचे स्वरूप पार बदलून जाते, शेतीव्यवसाय बंद पडतो व खेड्यांतील लोक अन्यत्र जातात किंवा उद्योगधंद्यांत काम पतकरतात म्हणजे तिथल्या जागेचा वारसा दुसऱ्याच प्रकारच्या लोकांकडे जातो, अशा ह्या सहा प्रक्रिया नगरात व नगराबाहेर सतत चालू असतात, असा याचा अर्थ आहे.

परिस्थितिवैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडलेले नगराचे हे चित्र आधुनिक नगरालाच लागू होते. औद्योगिकीकरणपूर्व नगराचे चित्र विस्तृत खेड्यासारखे होते. उच्च वर्गांची वस्ती नगराच्या मध्यभागी असे व नगराच्या सीमेपर्यंत कमीकमी दर्जाचे लोक राहत असत. अगदीच हीन दर्जाच्या लोकांना नगरात राहवयास जागाही मिळत नसे. व्यवसायांचे यांत्रिकीकरण झाले नसल्यामुळे त्यांचे स्वरूप कौटुंबिक होते आणि कौटुंबिक परंपरेने व्यवसाय ठराविक लोकांच्याच हाती राहत असे. समान व्यावसायिकांची वस्ती एकत्र असे. म्हणून प्रत्येक वस्तूची विक्री ही त्या त्या व्यावसायिकांच्या वस्तीतच बहुधा होत असे. त्या वस्तूंची स्वतंत्र बाजारपेठ असली, तरी ती त्याच वस्तीत असे. रेशीम बाजार, कापडबाजार, दाणाबाजार इ. स्वतंत्र पेठा ह्या औद्योगिकीकरणपूर्व नगरांत आणि त्यांचे अवशेष असलेल्या आजच्या नगरांतही पहावयास मिळतात.

नगरांचे लोकसंख्यात्मक स्वरूप

नागरी कुटुंबात जननप्रमाण ग्रामीण कुटुंबापेक्षा कमी असते. नागरी श्रीमंत सुखवस्तू कुटुंबात हे प्रमाण त्याहून कमी असते. नागरी कुटुंबाला आईवडील सोडून नात्यागोत्यांतील इतर निराधार, अपंग अगर विद्यार्थ्यांना पोसणे जड जाते. ज्यांना शक्य असेल, ते आईवडिलांनासुद्धा अन्यत्र लहान शहरांत अगर ग्रामीण भागात ठेवणे पसंत करतात. पाश्चिमात्य देशांत आईवडिलांना व इतर आप्त-स्वकीयांना पोसण्याची जबाबदारी कुटुंबप्रमुखाकडे सहसा नसते किंवा तो ती स्वीकारीत नाही. काही माणसे निवृत्तीनंतर स्वखुशीने लहान शहरांत अगर ग्रामीण भागात जाऊन राहतात. यामुळे नागरी लोकसंख्येत वयस्कर माणसे आणि लहान मुले यांचे प्रमाण कमी असते. काही माणसे प्रपंचाचा भार वाहण्याची कुवत, इच्छा अगर संधी नसल्यामुळे अविवाहित राहतात अगर उशिरा लग्न करतात. नगरात राहून कुटुंबाचा खर्च सोसणे परवडत नाही. म्हणून ती कुटुंबाला लहान शहरात अगर खेड्यात सोडून येतात किंवा शिक्षणाकरिता अगर कामधंदा शोधण्याकरिता कुटुंबातील सदस्यांना अन्यत्र सोडून आलेली असतात. या सर्व कारणांमुळे नगरात, निवासी उपाहारगृहात, वसतिगृहात वा स्वतंत्र खोली घेऊन एकटेदुकटे राहणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. पाश्चिमात्य देशांत अशांपैकी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. स्त्रियांकरिता स्वतंत्र उपजीविकेची साधने उपलब्ध असणे आणि स्त्रियांना स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा, ही याची मुख्य कारणे होत. आशियाई राष्ट्रांत एकटेदुकटे राहणाऱ्यांमध्ये पुरुष अधिक आहेत. नागरी समाजातील लोक हे धर्म, भाषा, शिक्षण, व्यवसाय, बुद्धिकौशल्य, आर्थिक-राजकीय-सामाजिक स्थान, आत्मसात केलेली मूल्ये, अभिवृत्ती, अभिरुची व एकूण सांस्कृतिक पातळी या दृष्टींनी अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यात एकजिनसीपणा नसतो.

नगरांचे संस्थात्मक स्वरूप

नागरी समाजाच्या संदर्भात कुटुंब, अर्थव्यवस्था, शासकीय व्यवस्था, धर्म व सामाजिक नियंत्रण ह्या प्रमुख सामाजिक संस्था ठरतात.

कुटुंब

नागरी कुटुंब हे केंद्र कुटुंब असते व मुलांची संख्या कमी असते. पाश्चिमात्य देशांत तीन ते चार सदस्य असलेली कुटुंबे प्रमाणाने अधिक आहेत. आर्थिक दृष्ट्या स्त्रिया पुष्कळशा स्वतंत्र असतात, त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाणही अधिक असते.

औद्योगिकीकरणानंतरच्या सुरुवातीच्या काळात विवाह उशिरा करण्याची प्रथा पडली होती. आता पुन्हा विवाहसमयीचे वय खाली येत असावे, असा तर्क आहे. कुटुंबात पती हा पत्नीच्या सल्ल्याने अधिकार वापरतो अगर पतिपत्नींमध्ये हा अधिकार विभागलेला असतो. कौटुंबिक व्यवहार व कुटुंबातील कामे यांबाबतीत लिंगभेदानुसार श्रमविभाजन टिकत नाही. बहुतेक सर्वच कुटुंबांत स्वयंपाकाची कामे स्त्रिया करत असतात अगर त्यांवर देखरेख ठेवीत असतात; परंतु इतर कामांच्या बाबतीत पतिपत्नी हे आपापल्या सोयीसवडीनुसार घरातील व कुटुंबासंबंधीची घराबाहेरची कामे करतात. रहावयाची जागा व कामाची जागा यांत अंतर असल्यामुळे कामावर जाणाऱ्या पुरुषास कुटुंबाच्या दैनंदिन व्यवहारांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे घरातल्या स्त्रीलाच आल्यागेल्यांकडे पाहणे, मुलांना शाळेत पोहोचविणे, बाजार करणे, टपाल कचेरी, बँक इ. ठिकाणी जाणे, ही कामे करावी लागतात. म्हणून स्त्रीला आपोआपच ह्या सर्व बाबतींत व्यावहारिक निर्णय घेणे व व्यवहार पार पाडणे यांत स्वातंत्र्य मिळते. स्त्री ही नोकरी करणारी असली, तर हे स्वातंत्र्य तिला अधिकांशाने मिळते. त्याचप्रमाणे पुरुषालाही घरातील कामे, विशेषतः पत्नी नोकरी करणारी असल्यास, करावी लागतात. अशा रीतीने पतिपत्नींमध्ये परिस्थितिजन्य समता प्रस्थापित झालेली असते.

नागरी समाजातील मुलांचे सामाजीकरण कुटुंबाच्या हातात फारसे राहिलेले नाही. मुलांना कुटुंबबाह्य पर्यावरणात दिवसाचा बहुभाग वावरावे लागते. हे पर्यावरण कौटुंबिक संस्कारमूल्यांना पोषक असतेच, असे नाही. पतिपत्नी हे दोघेही नोकरी करणारे असले किंवा काही कारणाने घराबाहेर राहत असतील, तर मुले कौटुंबिक संस्कारांना पारखी होतात. करमणूक, खेळ, शिक्षण यांकरिता कुटुंबाच्या सदस्यांना कुटुंबबाह्य संस्थावर अवलंबूवन राहावे लागते. साहाजिकच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आवडीनिवडींवर बाह्य परिसराचा व कुटुंबबाह्य गटांचा प्रभाव अधिक पडतो. त्यांची वृत्ती कुटुंबनिरपेक्ष असे वैयक्तिक हित पाहण्याची बनते. याचा परिणाम म्हणून पतिपत्नींमध्ये मतभेद, वितुष्ट निर्माण होऊन अंती विवाहविच्छेद होण्याची शक्यता नागरी समाजात अधिक असते. अमेरिकेसारख्या भौतिक दृष्ट्या प्रगत देशांत विवाहविच्छेदाचे प्रमाण विवाहाच्या सुरुवातीच्या व मुले होण्याच्या अगोदरच्या काळात अधिक असल्याचे व एकूण विवाहांपैकी एकतृतीयांश विवाह घटस्फोटाने बाद ठरत असल्याचे दिसून आले आहे.

आधुनिक कुटुंबाकडून घरातील वडील व नात्यागोत्यांतील अपंग, निराधार व्यक्तींचे पालनपोषण होणे अशक्य झाले आहे. सामाजिक गतिशीलतेमुळे कुटुंबप्रमुख व त्याचे मातापिता यांच्यात स्थळीय, आर्थिक, सामाजिक व भावनिक दुरावा निर्माण होतो. आधुनिक नागरी समाजात परित्यक्त वृद्ध माणसांची समस्या बिकट झाली आहे. वृद्धापकाळी कौटुंबिक संरक्षण मिळेनासे झाल्यामुळे निवृत्तिवेतन, आयुर्विमा, भविष्यनिर्वाहनिधी, वृद्धाश्रम इ. इतर संख्या निर्माण झाल्या आहेत. उदरनिर्वाहाला यांनी थोडीफार मदत होत असली, तरी भावनिक दुरावा अगर एकाकीपणा नाहीसा करणारे कुटुंबाइतके प्रभावी असे अन्य साधन उपलब्ध झालेले नाही. आज बाजारात कोणतीही वस्तू विकत मिळते; परंतु मायाममता, आपुलकी ही कुटुंबाशिवाय अन्यत्र मिळत नाही, म्हणून कुटुंबातील ऐक्य या एकाच कारणामुळे टिकू शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

व्यवसाय हा कुटुंबाच्या हातातून गेल्यामुळे व व्यवसायपरत्वे मिळणारे सामाजिक स्थान व्यक्तीस स्वतःच्या कुवतीवर मिळवावे लागत असल्यामुळे आणि ही कुवत कुटुंबनिरपेक्ष अशा शिक्षणावर अवलंबून असल्याने, व्यवसायपरत्वे व सामाजिक स्थानपरत्वे मिळणारा सामाजिक दर्जा हा व्यक्तीला स्वतंत्रपणे मिळतो. कुटुंबाकडून व्यक्तीस सामाजिक दर्जा न मिळता तो व्यक्तीवरून कुटुंबाला मिळतो. व्यक्तीचे सामाजीक स्थान कुटुंबातील पुढच्या पिढीत टिकण्याची शाश्वती नसल्याने सामाजिक दर्जा हा कुटुंबात पिढ्यान्‌पिढ्या टिकून राहील, याचीही शाश्वती नसते. अशा रीतीने अर्थोत्पादन हे संपूर्णपणे कुटुंबाच्या हातातून गेले आहे आणि कुटुंब हे उत्पादित वस्तूंचा एकत्र उपभोग घेणाऱ्यांचा गट बनले आहे.

अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, विनिमय, वितरण व उपभोग या चार प्रक्रियांपैकी केवळ उपभोग कुटुंबाच्या हातात राहिला आहे. इतर तिन्ही प्रक्रिया सार्वजनिक संस्थांच्या हातात आहेत. प्रत्येक प्रक्रियेत यांत्रिकीकरणामुळे विशेषीकरण आलेले आहे. शिवाय एकच गरज भागाविण्याकरिता अनेक पर्यायी वस्तू उपलब्ध करून देणे, आता शक्य झाले आहे. नगरातील अर्थोत्पादनाची व्याप्ती मोठी असल्यामुळे आणि अर्थोत्पादनाचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे उत्पादन प्रक्रियेत अनेक जागा निर्माण होतात. ह्या जागा भरण्याकरिता विविध प्रकारचे असंख्य लोक लागतात. वाढत्या नगराची विविध मनुष्यबळाची मागणीही वाढत असते. म्हणून बाहेरून येणाऱ्या माणसांची संख्याही वाढत असते. समव्यवसायी माणसांची संख्या नगरात खूप असल्याने व त्यांचे आर्थिक हितसंबंध सारख्या वा एकाच संस्थेशी निगडित असल्याने स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याकरिता त्यांचे संघ अस्तित्वात येतात. हे संघ राजकीय पक्षांचे अड्डे बनण्याची शक्यताही असते. म्हणून वेतन व अन्य सवलतींकरिता होणाऱ्या संघर्षांना राजकीय स्वरूप प्राप्त होते. प्रत्येक क्षेत्रातील कर्मचारीवर्गाची संख्या मोठी असल्यामुळे आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक संस्था ह्या बव्हंशी स्वायत्त असल्यामुळे वेतनवाढीकरिता स्वतंत्रपणे लढा चालविणे व त्याकरिता संख्याबळाचे प्रदर्शन करणे हे नगरातच शक्य होते. अनेक वेळा यांनी सामाजिक शांततेचा भंग होत असल्यामुळे स्वायत्त संस्थातील लढा मिटविण्याची जवाबदारी शासनावर येऊन पडते.

नागरी मागणीपेक्षा अधिक माणसे नगरात कामधंदा शोधण्याकरिता येण्याची शक्यताही असते. ग्रामीण भागात उपजीविकेची पुरेशी साधने उपलब्ध न होणे, हे याला मुख्य कारण आहे. अशा वेळी नगरात येणाऱ्या प्रत्येकास काम मिळेलच, याची शाश्वती नसते. काम न मिळणाऱ्या बेकार माणसांची संख्या नगरात वाढली, की समाजविघातक कृत्यांना संधी मिळते. उपजीविकेची साधने शोधण्याच्या धडपडीत माणसे समाजबाह्य व अवैध मार्ग पतकरतात. म्हणून नगरात चोरट्या धंद्यांत असलेल्या माणसांची संखाही अधिक असते. अशा चोरट्या धंद्यामुळे वैध अर्थव्यवस्था कोलमडून पडते. चलनवाढ झाल्याने आवश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढतात.

शासकीय व्यवस्था

नगरात येऊन राहणाऱ्यांची संख्या मोठी असते व त्यांना राहण्याची व इतर सोय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावी लागते. या कामाकरिता स्वायत्त शासकीय संस्था, नगरपालिका अस्तित्वात येते. राहण्याकरिता घरे, नगरातील विविध विभागांना जोडणारे रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाणी जाण्याकरिता गटारे, वाहतुकीची व दळणवळणाची साधने ही नगरपालिकेस उपलब्ध करून द्यावी लागतात. त्याचबरोबर शिक्षण, बाजार, आरोग्य, करमणूक इत्यादींच्या सोयीही उपलब्ध करून द्याव्या लागतात. मुक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांत ही कामे खाजगी संस्थाही करतात; परंतु साम्यवादी देशांत शासनावरच ही जबाबदारी येऊन पडते. प्रमाणाबाहेर आणि झपाट्याने नगराची लोकसंख्या वाढली, की नगरपालिकेची व्यवस्था अपुरी पडते. नगरपालिकेला कररूपाने लोकांकडून पैसे घेऊन ह्या सोयी उपलब्ध करून द्यावयाच्या असतात. परंतु नगरात येणाऱ्या प्रत्येक माणसाचा राहण्याचा ठावठिकाणा नसतो व कर देण्याची त्याची कुवतही नसते. अशा परिस्थितीत नगरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस व झपाट्याने अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तीस सर्व सवलती देऊ करणे नगरपालिकेस अशक्य होते. यामुळे नगरात अनेक गलिच्छ वस्त्या निर्माण होतात.

धर्म

नागरी समाज हा अंधविश्वासाने पछाडलेला नसतो. जीवनाच्या बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये यंत्र-तंत्रांचा शिरकाव झाल्यामुळे नागरी माणसाचा दृष्टीकोन वैज्ञानिक, बुद्धिनिष्ठ व चिकित्सक असतो, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते; परंतु याला वस्तुस्थितीचा तितकासा आधार नाही. बहुतेक सामाजिक, सार्वजनिक व्यवहार हा धर्मनिरपेक्ष तत्त्वांनुसार होत असल्यामुळे नागरी जीवनात धर्माचे वर्चस्व कमी झालेले दिसते. नागरी जीवन हे वेळापत्रकानुसार आणि चाकोरीबद्ध असते. व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारांत अनेक अनोळखी माणसांशी संबंध येतो. धार्मिक कर्मकांड व विधिनिषेध सांभाळून नागरी जीवन जगणे जवळजवळ अशक्य असते. म्हणूनही धर्माला गौण स्थान मिळालेसे वाटते; परंतु याचा अर्थ नागरी समाजात धर्माला मुळीच स्थान नसते, असे नाही. जन्ममरणाचे गूढ विज्ञानाने अजूनही उकलले नाही, वैयक्तिक जीवनात उद्‌भवणाऱ्या समस्या केवळ विज्ञानाने सुटत नाहीत व भविष्यात काय होणारे आहे हे जोवर कळत नाही, तोवर कोणत्यातरी स्वरूपात देवाचे अस्तित्व मानणारे आधुनिक नागरी समाजातही सापडतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. नागरी जीवनात सामाजिक संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात. बहुतेक संबंध हे दुय्यम स्वरूपाचे म्हणजे अप्रत्यक्ष असतात. जे प्रत्यक्ष संबंध असतात, ते जुजबी, कामचलाऊ असतात. कुटुंबातील व्यक्तींशीसुद्धा घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत नाहीत. त्यामुळे भावनिक दृष्ट्या व्यक्ती एकाकी पडते. एकटेदुकटे राहणाऱ्यांना हा एकाकीपणा अधिक भेडसावतो. असंख्य लोकांच्या समूहात वावरत असूनही व्यक्ती त्यापासून अलिप्त राहते. या अलिप्ततेचा व्यक्तीच्या मनावर विपरीत पिरणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत धर्म किंवा देवावरील श्रद्धा ही पर्याय म्हणून उभी राहते. मानसिक ताण कमी करणारे ते एकमेव साधन बनते. नगरात सर्व धर्मांचे, पंथांचे लोक बहुसंख्येने असतात. ग्रामीण भागात एरव्ही एखाददुसरा किंवा अल्पसंख्य असणारे काही धर्मपंथांचे लोकही नगरात पुष्कळ असतात व त्यांचा संबंध इतर धर्मीयांशी या ना त्या कारणाने येतो. त्यामुळे इतर धर्मीयांबद्दल सहिष्णू वृत्ती निर्माण होण्यास मदत होते. परंतु स्वधर्मीय आणि स्वपंथीय लोक अनेक असल्याने त्यांच्यांत स्वधर्माबद्दल अभिमानही दुणावतो. त्यांच्यात धार्मिक अस्मिता उदयास येऊन, स्वतःचे धार्मिक सण वगैरे सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची अहमहमिका लागते व स्वतंत्र अस्मिता जोपासली जाते. नगरात प्रत्येक धर्मीयाला धर्मप्रणीत जीवन जगण्याकरिता एक प्रकारची सांस्कृतिक स्वायत्तता लाभू शकते. धर्मपंथांनुसार लोकांची वस्ती असल्यास प्रत्येक वस्ती ही विशिष्ट संस्कृतीचे आगर बनते. म्हणूनच आर्थिक-राजकीय प्रश्न सोडविण्याकरिता धार्मिक मूल्यांच्या आधारे संघटना बांधणे, धर्माच्या नावाने लोकांच्या भावनांना आवाहन करणे, हे नगरातच शक्य होते. धर्मपालन हे ग्रामीण असले, तरीही धर्मांधता ही नागरी आहे

विज्ञानाच्या आधारे धार्मिक अंधश्रद्धांचा तिरस्कार करणारे नगरातच सापडतात. सामाजिक संबंध हे करारात्मक असल्याने कोणालाही धर्मनिरपेक्ष जीवन नगरात जगता येते. याच कारणामुळे धार्मिक सुधारणेची चळवळही नगरातच फोफावू शकते. बहिष्काराची अगर अन्नपाणी बंद होण्याची भीती नगरातील सुधारकांना नसते. वैज्ञानिक सिद्धांतांनी धार्मिक समजुतींना, दंतकथांना तडा जाण्याची शक्यता असते. वैयक्तिक सामाजिक जीवनात उद्‍भवणाऱ्या समस्यांना पारंपरिक धार्मिक ग्रंथांतून नीट उत्तरे मिळेनाशी होतात. अशा वेळी धर्मग्रंथांचा नवीन संदर्भात अर्थ करून सांगण्याची आवश्यकता असते. आधुनिक नगरांमध्ये धर्मांचा व धर्मग्रंथांचा नव्याने अर्थ सांगणारे सर्वत्र उदयास आले आहेत. त्यांना धनिक वर्गाकडून उत्तेजन मिळते, विद्वानांकडून त्यांचे कौतुक केले जाते आणि सामान्य जन त्यांचा उदोउदो करतात. कोणताही धर्म असला, तरी तो सर्वकाळी टिकावयाचा असेल तर त्याचे सिद्धांत त्रिकालाबाधित असावयास हवेत. आधुनिक काळातील धर्मग्रंथांवर पुनर्भाष्य करण्याचा प्रयत्न म्हणजे धर्म टिकविण्याचा प्रयत्न होय. विज्ञानाचे आव्हान नागरी जीवनात प्रकर्षाने जाणवत असल्याने, आज नवनवीन समस्या नागरी जीवनातच उद्‍भवत असल्यामुळे व संस्कृतीची लाट नगरातून खेड्यांकडे वाहत असल्यामुळे धर्मजागृतीचे प्रयत्न नगरांत होणे स्वाभाविक आहे. म्हणून नागरी जीवनात गुंतागुंतीचे कर्मकांड व विधिनिषेध यांचा लोप होत असला, तरी धर्मभावना पुरती गेली आहे, असे म्हणता येत नाही.

सामाजिक नियंत्रण

धर्म, नीती, परंपरा आणि कायदा ही चार सामाजिक नियंत्रणाची साधने सर्वसामान्यपणे सर्व समाजांत अस्तित्वात असतात. पारंपरिक समाजात ही चारही साधने परस्परपूरक असतात. नागरी समाजात अनेक धर्मांचे भिन्नभिन्न परंपरांतून आलेले व विविध नीतिमूल्यांना मानणारे लोक असतात. शिवाय घराबाहेर सर्वच अनोळखी माणसांच्या वर्तुळात वावरत असतात. ओळख असली, तरी जुजबी व वरवरची असते. संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची व नातेगोते, कौटुंबिक पार्श्वभूमी, आवडीनिवडी, सवयी यांची ओळख नसते. कुटुंबबाह्य पर्यावरण हे स्वतंत्र व स्वैर वागणुकीला मोकळीक देणारे, असे मिश्र संस्कृतीचे असते. कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा अगर पारंपरिक संस्कृतीचा अंमल तेथे चालत नाही. त्यामुळे सामाजिक नियंत्रणाची पारंपरिक साधने नागरी जीवनात कमकुवत बनतात. नियंत्रणाचा सर्व भार हा कायद्यावर येऊन पडतो. नीति-अनीतीच्या कल्पना ह्या मुळात समाजजीवनाच्या दृष्टिकोनातून आलेल्या असतात. परंतु नागरी जीवनात व्यक्तिस्वातंत्र्याला प्राधान्य असल्यामुळे वैयक्तिक मूल्ये व पारंपरिक सामाजिक मूल्ये यांत तफावत निर्माण होण्याची शक्यता असते. नागरी सामाजिक संबंध हे करारात्मक असल्याने व कोणत्याही गटाचे सदस्यत्व ऐच्छिक असल्याने पारंपरिक सामाजिक मूल्यांना झुगारून, परंतु कायद्याच्या चौकटीत, व्यक्ती जीवन जगू शकते. नैतिक-अनैतिक, श्लील-अश्लील यांची व्याख्या कायद्याने व कायद्याच्या भाषेत करावी लागते. समाजाच्या अगर त्यातील एका गटाच्या त्याविषयीच्या तात्कालिक प्रतिक्रियेची कदर करणे, यामुळे आवश्यक वाटत नाही. कायद्याची याविषयीची संवेदनक्षमता लवचिक असणे अशक्य असते. म्हणूनच काहींना अश्लील अगर अनैतिक वाटणारे साहित्य व चित्रशिल्पादी इतर कलानिर्मिती इ. कायद्याच्या दृष्टीने निषिद्ध ठरतीलच, असे नव्हे. ग्रामीण समुदायात प्रचलित कायदा काहीही असला, तरी समुदायाला अयोग्य वाटणारे वर्तन करणाऱ्यांस सामाजिक जीवन असह्य करून टाकण्याइतके त्यांच्यावर दडपण आणण्याची शक्ती असते; ती नागरी समाजाजवळ नसते.

नागरी समाजात सामाजिक नियंत्रणाचे काम मुख्यतः कायद्याकडे असल्याने व्यक्तीला सामाजिक नियंत्रणाचे दडपण प्रत्यक्षतः व सातत्याने जाणवत नाही; कारण कायदा हा व्यक्तिनिरपेक्ष साधन आहे. सामाजिक नियंत्रणाच्या इतर साधनांप्रमाणे समाजातील कोणत्याही व्यक्तीला त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार नसतो. अधिकार असलेले पोलीस वगैरे सर्वत्र नसतात. म्हणून नियंत्रणाला न जुमानता प्रच्छन्नपणे व्यक्ती गुन्हा करू शकते. नागरी व्यवहार कागदपत्रांद्वारे अधिक चालतो. व्यवहारांशी संबंधित असलेल्या व्यक्ती समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. म्हणून खोट्या कागदपत्रांद्वारे गैरव्यवहार करण्यास व्यक्तीस नगरात अधिक संधी मिळते. एखाद्या अपराधास नियंत्रणाच्या इतर साधनांकडून शिक्षा लगेच दिली जाते. परंतु कायद्याची प्रक्रिया दीर्घ मुदतीची, खर्चाची, अपराध्यास स्वसंरक्षणाची मुभा देणारी असते. गुन्हा करून पळून जाण्यास अगर लपून राहण्यास नगरात संधी असते; तशी संधी ग्रामीण भागात अगर छोट्या समाजात मिळत नाही. म्हणून गुन्ह्याची वर्दी, नोंद, तपासणी, गुन्हेगाराचा शोध ह्या प्रक्रिया झाल्यानंतरच नगरात न्यायालयातील प्रक्रिया सुरू होते. म्हणून नगरातील सामाजिक नियंत्रण हे बव्हंशी अप्रत्यक्ष असते.

नगरांचे सामाजिक मूल्यात्मक स्वरूप

आधुनिक समाजात रूढ झालेली समता, स्वातंत्र्य ही मूल्ये मुळात आधुनिक नागरी जीवनात अपरिहार्य, सोयीची म्हणून स्वीकारलेली आहेत. अनोळखी माणसांशी सतत येणारा संबंध, कोणत्याही गटाचे सदस्यत्व स्वतःच्या कुवतीवर स्वेच्छेने स्वीकारण्याची व्यक्तीस असलेली मुभा, गटातील इतर सदस्यांशी असलेले जुजबी, कामचलाऊ संबंध, समाजातील स्पर्धात्मक व्यवहार, सामाजिक व्यवहारात व्यक्तीच्या विशिष्ट गटात असलेल्या उच्च वा नीच स्थानास मिळणारे गौणत्व व त्याकडे होणारे दुर्लक्ष इत्यादींमुळे सामाजिक समता नकळत प्रस्थापित होते. कोण कुठला याचा विचार न होता नित्य संबंधात येणाऱ्या भिन्नभिन्न अपरिचित व्यक्तींशी वागण्याची एक ठराविक पद्धत नगरात रूढ होते. त्याचप्रमाणे कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून कायम वा दिवसभर दूर नगरात येऊन काम करणाऱ्यांना कौटुंबिक, सांस्कृतिक व पारंपरिक नियंत्रणांपासून मोकळीक मिळते. त्यांना ओळखणारे असे फारसे कोणी नसतात, म्हणून मनातील सुप्त आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची त्यांना तेथे संधी मिळते. जवळजवळ सर्वच किंवा बहुसंख्य लोकांची अवस्था अशीच असल्याने नगरात, विशेषतः मध्यवर्ती बाजारपेठ, कोर्टकचेऱ्या, पतपेढ्या इ. असलेल्या विभागात, स्वच्छंद व सैल वागणेच सर्वमान्य बनण्याची शक्यता असते. वेषभूषा, साहित्य, कला, नाटके, चित्रपट इत्यादींत नावीन्याचे अगर पारंपरिक व कौटुंबिक मूल्यांना धक्का देणाऱ्या गोष्टींचे प्रदर्शन वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली केले जाते व ते त्याच कारणाकरिता सह्य अगर क्षम्यही ठरते. स्वातंत्र्य अगर समता ही मूल्ये परिस्थितिजन्य आहेत. प्राप्त परिस्थितीत मानवाने केलेली ही तडजोड आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा आगगाड्या प्रथम सुरू झाल्या, तेव्हा तेथील उच्चभ्रू लोकांनी, सामान्यजन आपल्याशी धक्काबुक्की करू लागले व जमाव आपल्या दाराशी आला, म्हणून त्यांचा धिक्कार केला. वाहतुकीच्या या अवाढव्य साधनांमुळे माणसामाणसांमधील सामाजिक अंतर कमी झाले. नागरी जीवनात घर आणि कामाची जागा यांमध्ये रोज सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणारे असंख्य असतात. त्यांना समतेचे दर्शन रोज घडते व समता त्यांना पाळावीच लागते

या दोन मुख्य मूल्यांबरोबर नागरी समाजात व्यक्तिवाद, उपयुक्ततावाद, बुद्धिप्रामाण्यवाद, भावनिक अलिप्तता, परिवर्तनशीलता, गतिशीलता इ. मूल्ये नागरी जीवनाला अनुकूल व पोषक म्हणून स्वीकारली जातात. नागरी जीवनात वैयक्तिक हित हे अंतिम उद्दिष्ट असून सामाजिक संबंध हे ते उद्दिष्ट गाठण्याची साधने बनतात. ग्रामीण जीवनात सामाजिक संबंध टिकविणे हेच अंतिम उद्दिष्ट असते; कारण व्यक्तीचे हित दूरच्या दृष्टीने त्या सामाजिक संबंधांतच सामाविलेले असते. ठराविक संबंधांना चिकटून राहिल्यास नागरी जीवनात व्यक्तीची भौतिक प्रगती खुंटण्याचीच शक्यता असते. भौतिक प्रगती म्हणजे जीवनमान वाढविणे, हेही नागरी मूल्य आहे. या सर्व मूल्यांच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या नागरी व्यक्तीचे जीवन ग्रामीण जीवनाहून भिन्न व विशिष्ट प्रकारचे बनते. या विशिष्ट प्रकारच्या जीवनाला व त्याला पोषक ठरणाऱ्या मूल्यांना नागरवाद असे नाव लुई व्हिर्ट याने १९३८साली दिले. नागरवाद म्हणजे विशिष्ट प्रकारची जीवनपद्धती होय, असे त्याने प्रतिपादिले आहे. काही शास्त्रज्ञ नागरवादाच्या जागी नागरीकरण हा शब्द वापरतात; परंतु नागरीकरण म्हणजे नगरे अस्तित्वात येण्याची व नगरात राहणाऱ्या लोकांची एकूण लोकसंख्येतील विशिष्ट जीवनपद्धती होय, असे आता बहुतेकांनी मान्य केले आहे.

नगरांतील स्तरीकरण

आधुनिक नागरी समाजात व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. त्याकरिता कुटुंबावर अवलंबून राहावे लागत नाहीं. उलट कुटुंबालाच व्यक्तीचा दर्जा लाभतो. व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा त्या व्यक्तीच्या जीवनमानावरून व आर्थिक बळावरून स्पष्ट होतो. नागरी बाजारपेठेत जीवन सुखाचे व कमी श्रमाचे करण्याची अनेक साधने विकत मिळतात. घरातील कामाकरिता अनेक यंत्रोपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यांनी श्रम वाचतात. त्याचप्रमाणे सुख म्हणजे इंद्रियसुख वाढविणारी साधनेही अनेक निर्माण झाली आहेत. ज्यांच्या घरात ही साधने अधिक व अद्ययावत, त्यांचे जीवनमान उच्च पातळीचे असे समीकरण झाले आहे. राहण्यास बंगला तोही प्रशस्त, घरात कोचाचा संच, तऱ्हेतऱ्हेच्या खुर्च्या, पंखे, ट्रँझिस्टर, फीतमुद्रक, रेकॉर्डप्लेअर, मिक्सर, ग्रांइडर व इतर अद्ययावत चैनीच्या वस्तू असणे, भारी कपडेलत्ते, मोटार, स्कूटर इ. वाहने ही उच्च जीवनमानाची लक्षणे आहेत. भौतिक प्रगतीस महत्त्वाचे मूल्य मानणाऱ्या नागरी समाजात श्रीमंतीला उच्च दर्जा मिळतो. आधुनिक श्रीमंती ही प्रदर्शनी उपभोगाची आहे, दिखाऊ आहें. यावरून सामाजिक दर्जा हा नगरात व्यक्तीच्या उपभोग्य वस्तूंच्या आधारे निश्चित होतो. समान दर्जाच्या लोकांत जवळीक निर्माण होणे, त्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटणे अगर संबंध प्रस्थापित करण्यास योग्य असे वाटणे, स्वाभाविक असते. प्रत्येक दर्जाच्या लोकांची संख्याही नगरात खूप असल्यामुळे सामाजिक दर्जास अनुसरून नगरात सामाजिक वर्ग निर्माण होतात. कार्ल मार्क्सच्या मते, उत्पादनव्यवस्थेत मालक हा एक वर्ग आणि नोकर हा दुसरा वर्ग असे दोनच वर्ग समाजात असतात; परंतु आधुनिक समाजशास्त्रज्ञांच्या मते, सामाजिक दर्जानुसार उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग असे तीन वर्ग तरी असतात. काहींच्या मते, अत्युच्च, उच्च-मध्यम, मध्यम, मध्यम-कनिष्ठ, व कनिष्ठ असे पाच वर्ग असतात. नगरात रहावचाचे घर नगराच्या कोणत्या भागात आहे, मुले कोणत्या शाळेत अगर महाविद्यालयात जातात, कुटुंबातील माणसे कोणत्या व्यवसायांत आहेत, त्यांचे शिक्षण किती झाले आहे, त्यांची करमणुकीची साधने कोणती, ते रिकामा वेळ कसा घालवितात, त्यांच्या सुखसंवादाचे विषय कोणते, ते कोणत्या ऐच्छिक संघसंस्थांचे सदस्य आहेत इ. बाह्य लक्षणांद्वारा व्यक्तीचा सामाजिक दर्जा दिसून येतो. यावरून तिचा सामाजिक वर्ग निश्चित होतो.

नगरांचे संरचनाभेदात्मक स्वरूप

नगरातील प्रत्येक व्यवसायाचा व्याप वाढत जातो आणि अधिकाधिक यांत्रिकीकरणामुळे त्यांच्यात विशेषीकरणही वाढत जाते. म्हणून उत्पादन, वितरण, विनिमय, प्रशासन, शिक्षण, करमणूक अशा प्रत्येक क्षेत्रात विशेषीकरण वाढत जाते आणि प्रत्येक कामाचे तपशीलवार भाग पाडून प्रत्येक भाग एखाद्या गटाकडे देणे आवश्यक ठरते. प्रत्येक गटाच्या कामाचे स्वरूप भिन्न असल्यामळे व गटातील सदस्यांची संख्यापण सारखी नसल्यामुळे प्रत्येक गटाच्या अंतर्गत व्यवस्थेकरिता वेगळीच मूल्ये, प्रमाणके आणि श्रमविभाजन आवश्यक बनते. कुटुंब, प्रशासकीय कार्यालय, कारखाना, मोठे दुकान, विद्यापीठ इ. विशिष्ट काम करणाऱ्या गटांची मूल्ये व एकमेकांशी वागण्याचे नियम हे भिन्न असतात. त्याचबरोबर नगरातील व्यक्ती एकाच वेळी अनेक गटांचा ऐच्छिक सदस्य असते आणि प्रत्येक गटात तिच्या वाट्याला सारख्याच दर्जाचे स्थान असते, असे नाही, यामुळे प्रत्यके गटात मूल्य आणि तदनुसार वागणुकीचे नियम भिन्न असल्यामुळे व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका वठवावी लागते. ग्रामीण भागात याउलट व्यक्ती ही सर्वत्र एका कुटुंबाचा सदस्य म्हणून वावरत असते. सर्व गटांतील वागणुकीचे नियमही जवळजवळ सारखेच असतात.

नगरांचे सामाजिक रोगचिकित्सात्मक स्वरूप

नागरी जीवनातील समस्या ह्या वर सांगितलेल्या नागरी वैशिष्ट्यांतून उद्‌भवलेल्या आहेत. त्या सोडवावयाच्या झाल्यास नगरापुरता विचार करून चालणार नाही. एकूण व्यापक समाजाच्या दृष्टिकोनातून आणि नगररचनेपासूनच त्यांचा विचार करावा लागेल.

नगररचनेच्या परिस्थितिवैज्ञानिक वैशिष्ट्यांवरून कामाची जागा व राहती घरे यांच्यात खूप अंतर पडते. सर्व व्यवहारांच्या केन्द्रकचेऱ्या बहुतेक नगराच्या एकाच भागात असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर फार लांबून यावे लागते. त्यांच्याकरिता सार्वजनिक वाहनांची व रस्त्यांची सोय करावी लागते. वाढत्या नगरवस्तीत ह्या सोयी नेहमीच अपुऱ्या पडतात. वाहनांचा लोंढा सकाळ-संध्याकाळ एकाच दिशेने वाहत असतो. अपुऱ्या रस्त्यांमुळे त्यांच्या वाहतुकीस व्यत्यय येतो. नगरातील व्यक्तींचा दिवसाचा बराच वेळ प्रवासात जातो. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक-मानसिक ताण पडण्याची शक्यता असते. अपुऱ्या रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही नगरात अधिक असते.

कामधंद्यानिमित्तं नगरात येणाऱ्या अनेक लोकांना काम मिळत नाही, घरे मिळत नाहीत व रोजच्या प्रवासाचा खर्च पेलवत नाही. अशा गरीब, बेघर लोकांच्या गलिच्छ वस्त्या नगरातच दिसून येतात. गलिच्छ वस्त्यांमुळे समाजाचे नैतिक आरोग्य बिघडण्याचा व तेथे राहणाऱ्यांमध्ये व इतरत्र रोग फैलावण्याचा धोकाही असतो. कुटुंबांच्या व स्वकीयांच्या नियंत्रणापासून अलिप्त अशा पर्यावरणात व्यक्ती दिवसाचा बहुभाग वावरत असल्यामुळे व एकटेदुकटे राहणाऱ्यांचे प्रमाण नगरात अधिक असल्यामुळे त्यांच्या सुप्त व दबलेल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची त्यांना नगरात संधी मिळते. मद्यपान, इतर व्यसने व स्वैर लैंगिक जीवन यांना नगरात प्रतिष्ठा, प्रोत्साहन अगर परवानगी मिळण्याची शक्यता अधिक असते. मुक्त व प्रच्छन्न वेश्याव्यवसायही नगरातच अधिक बोकाळतो. यांमुळे समाजाचे नैतिक व शारीरिक आरोग्य बिघडते. अती मद्यपान व इतर व्यसनांच्या अधीनतेने अकाली मृत्युचे प्रमाण नगरांत अधिक असते. मुक्त लैंगिक जीवनाने व्यक्तीचे आरोग्य बिघडते व गुप्त रोग बळावतात. त्यांच्या संततीत जन्मतः व्यंग निर्माण होते. पतिपत्नींमध्ये वितुष्ट उद्‌भवते, घटस्फोटाचे प्रमाण वाढते व मुलांचे सामाजीकरण नीट न होता सामाजविघातक प्रवृत्तींना ती बळी पडण्याचा धोका असतो. भावनिक दृष्ट्या एकाकी जीवन जगणाऱ्यांचे प्रमाण नगरात अधिक असते. काहींच्या बाबतीत असले जीवन लहानपणापासून वाट्याला येते. त्यामुळे मानसिक दृष्ट्या कमकुवत, मानसिक वाढ पुरेशी न झालेली इ. मनोविकृत माणसे नगरात प्रमाणाने अधिक असतात. एकाकी जीवन जगणाऱ्यांत आत्महत्येचे प्रमाणही अधिक आढळून येते. परित्यक्त महिला, बेवारशी मुले तसेच बाल-गुन्हेगारी, चोरटे धंदे, संघटित गुंडगिरी इ. समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांची व त्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या नगरात जास्त दिसून येते. प्रत्येक विशिष्ट हितसंबंधांचे लोक नगरात बहुसंख्येने राहत असल्याने हितसंबंधांच्या रक्षाणाकरिता एकजुटीने प्रयत्न करणे, चळवळी करणे हे नगरातच शक्य होते. संप, मोर्चे, बंद इ. प्रकार नगरातच शक्य होतात. अशांना जलद हिंसक वळण लागण्याचा धोकाही नगरातच असतो

शेजारच्या आधारे नगराची पुनर्रचना करणे, नगराचा आकार सुटसुटीत करणे, त्याकरिता ग्रामीण भागात उद्योगधंद्यांची वाढ करणे अशा रीतीने औद्योगिक व नगरवाढीच्या प्रोत्साहक घटकांना सर्वत्र फैलावून नगरवाढीचे विकेंद्रीकरण करणे व त्याबरोबरच विकासात प्रादेशिक समतोल साधणे इ. उपाय वरील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी सांगितले जातात विकासकार्यात आर्थिक नफातोटा व क्षमता यांबरोबरच सामाजिक-नैतिक नफातोट व क्षमता यांचाही विचार व्हावा, असे काहींचे मत आहे.

समाज-जीवनात नगराची व नागरी समाजाची भूमिका

नगरे म्हणजे भौगोलिक नेतेच होत, असे काही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. लहान मुले प्रौढांचे अनुकरण करतात, खालचे वर्ग वरच्या वर्गांचे अनुकरण करतात. त्याप्रमाणे ग्रामीण भागातील लोक नागरी संस्कृतीचे अनुकरण करतात. संस्कृतीचा प्रवाह नगराकडून खेड्यांकडे वाहतो. नव्या संस्कृतीचा उगम व विकास नगरात होतो. कोणत्याही संस्कृतीचे प्रातिनिधिक स्वरूप नागरी समाजावरून निश्चित होते. साहित्य-कला-विचार क्षेत्रांतील विकासाचा कळस नगरात होतो. अभिजात कलावंतांना तसेच कोणत्याही क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्यांना नगरातच आश्रय व प्रोत्साहन मिळते. समाजसुधारक, राजकीय भाष्यकार, विचारवंत, राजकीय पक्ष, आर्थिक-औद्योगिक संस्था, धर्मपंथांचा प्रचार, अनेक चळवळी इत्यादींचा उदय व विकास नगरातच होतो व त्यांचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात होतो. नागरी जीवनात अपरिहार्य व स्वाभाविक ठरणारी मूल्ये व प्रमाणके ग्रामीण भागावर आदर्श म्हणून लादली जातात. ग्रामीण जीवनात ती पूर्णपणे रुजू शकत नाहीत. नागरी जीवनाच्या परिवर्तनातील वेगाने ग्रामीण जीवन बदलू न शकल्याने ग्रामीण समाजाला मागासलेपणाचा दोष पतकरावा लागतो. सामाजिक परिवर्तनाची दिशा नागरी समाजावरून निश्चित होते. नागरी जीवनाची मूलभूत परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय नागरी जीवनातील मूल्ये व प्रमाणके ही सर्वत्र समप्रमाणात रूजणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

भारतातील नागरी समाज

औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून पश्चिमात्य देशांत ज्या प्रकारचे नागरीकरण एकोणिसाव्या शतकापासून झपाट्याने वाढत गेले, तशा प्रकारचे नागरीकरण भारतात दिसून येत नाही. याला मुख्य कारण म्हणजे भारतात अजूनही जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आणि देशाच्या सर्व भागांत व सर्व व्यवसायांत औद्योगिकीकरणाचा व यांत्रिकीकरणाचा प्रवेश झालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असून त्यातील सु. ८०·१%प्रतिशत लोक खेड्यांतच राहतात. नागरी लोकसंख्येचे प्रमाण १९·९% आढळते (१९७१). औद्योगिक दृष्ट्या अधिक प्रगत असलेल्या पाश्चिमात्य देशांशी तुलना केल्यास, हे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसून येते. कृषिप्रधान असलेल्या या देशात कृषिव्यवसायाचे यांत्रिकीकरण फारसे झालेले नाही. जे झाले आहे तेही काही मोजक्या गावांतच झालेले आहे. औद्योगिकीकरणही काही मोजक्या नगर-महानगरांभोवतीच केंद्रीभूत झालेले आहे. औद्योगिकीकरणास पायाभूत असलेल्या गोष्टींपैकी वीज, पाण्याचा पुरवठा, दळण-वळण व वाहतुकीच्या सोयी इ. अजून खेड्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात अगर मुळीच पोहोचलेल्या नाहीत. दळणवळण व वाहतुकीच्या सोयी उपलबध असलेल्या काही गावांचा नगर-महानगरांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. अशा गावांत वैयक्तिक आणि सामाजिक क्षेत्रांत नागरीकरणाचा प्रभाव दिसून येतो. ही गावे बहुतकरून नगर-महानगरांच्या परिसरातीलच आहेत; परंतु बहुसंख्य गावे नागरीकरणापासून अलिप्त आहेत. शहरांपासून लांब जसे जावे, तसे लोकसंख्येची घनता, साक्षरता आणि सुशिक्षितांचे प्रमाण, बिगरशेती व्यवसायांतील लोक इ. नागरी वैशिष्ट्ये कमी दिसून येतात. नागरीकरणाचा प्रभाव दळणवळण व वाहतुकीच्या सुलभतेनुसार शहराच्या परिसरातील प्रदेशावरच पडत असल्यामुळे आणि बहुसंख्य गावांना शहरांशी नित्य आणि सहज संपर्क साधण्याकरिता ही साधने उपलब्ध नसल्यामुळे भारतात शहरे आणि खेडी यांतील समाजव्यवस्थेत मोठीच तफावत आढळते.

भारतीय नागरीकरणाचे दुसरे वैशिष्ट्य सध्या विकसनशील असलेल्या जवळजवळ सर्वच पौर्वात्य देशांमध्ये दिसून येते. नागरीकरणाने परमोच्च बिंदू गाठलेल्या पाश्चिमात्य देशांत नागरी लोकसंख्येच्या वाढीची गती आता मंदावली आहे. परंतु विकसनशील देशांतील शहरांची लोकसंख्या अधिक तीव्रतेने वाढत आहे.

नगर-महानगरांतील लोकसंख्या, खेड्यांतील लोक आपापली गावे सोडून सतत येत राहिल्यामुळे वाढत आहे. ही वाढ १९२१-३१या दशकापासून विशेषतः जास्त दिसून येते. बहुसंख्य गावांतील लोकांना, उदरनिर्वाहाकरिता अगर शैक्षणिक सोयी-सवलतींकरिता नगरांकडेच धाव घ्यावी लागते. ग्रामीण समाजात जननप्रमाण अधिक आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्याही अधिक तीव्र गतीने वाढते. या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीउत्पादनावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या वाढून राहणीमान खाली येते. एकीकडे गरजा वाढलेल्या, पण त्या मानाने स्थानिक साधनांची कमतरता अगर अभाव आणि दुसरीकडे पूर्वीचे राहणीमानही टिकून न राहण्याची भीती यांमुळे पुष्कळ लोकांना शहरांत येऊन कामधंदा शोधणे भाग पडते. शिक्षणाला आणि मिळालेल्या शिक्षणास अनुरूप अशा उद्योगव्यवसायांना खेड्यांत वाव नसल्यामुळे, शिक्षित कुटुंबातील तसेच जमिनी नसलेले आणि शेतमजुरी अगर बिनकसबी मजुरी करणारे लोक पारंपरिक व्यवसायांमध्ये आर्थिक सामाजिक आणि मानसिक गरजा भागत नसल्यामुळे नगर-महानगरांकडे जाऊ लागले. शिवाय शहरात यांत्रिकीकरणाच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर कमी खर्चात होणाऱ्या उत्तम प्रतीच्या उत्पादनास टक्कर देण्यास असमर्थ ठरलेले आणि म्हणून आर्थिक दृष्ट्या अस्थिर असलेले खेड्यांतील व्यावसायिक लोक नगरवासीयांमध्येच येऊन सामील झाले. औद्योगिकीकरणाचे विकेंद्रीकरण झाले नसल्यामुळे असे होणे अपरिहार्य होते. परंतु स्थलांतर करून शहरांत येणाऱ्यांमध्ये पुरुषच अधिक दिसून येतात. भारतातील शहरांत कुटुंबापासून दूर एकटेदुकटे राहणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. पाश्चिमात्य देशांत याउलट परिस्थिती आहे. कामधंद्याकरिता येणाऱ्यांमध्ये हंगामी मजूरही बरेच असतात. या कारणामुळे शहरात आलेल्या लोकांचा खेड्यात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीय आणि नात्यागोत्यांतील माणसांशी सामाजिक-आर्थिक संबंध कायम राहतो. शहरातील घरांची टंचाई व महागाई यांमुळेही बायका-मुलांना खेड्यांत ठेवणे आवश्यक ठरते. कामधंद्याकरिता शहरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांची स्थावर मालमत्ता, विशेषतः जमीन, खेड्यातच असते व निवृत्त झाल्यावर किंवा म्हातारपणी कामधंदा मुलांच्या हाती सोपवून ते खेड्यातच राहायला जातात. म्हणूनच भारतीय नगरांत छोटी कुटुंबे (पतिपत्नी आणि मुले) आणि एकटेदुकटे पुरुष वरकरणी जरी अधिक दिसत असले, तरी क्रियात्मक दृष्ट्या त्यांचा ग्रामीण समाजाशी सतत संबंध राहिलेला असतो. भारतीय नगरांत छोटी किंवा विभक्त कुटुंबे ग्रामीण समाजाहून अधिक असतातच, असेही सर्वसामान्य नियम म्हणून म्हणता येणार नाहीं. अलीकडील बऱ्याच लहानमोठ्या शहरांच्या पाहणीमध्ये छोट्या अगर विभक्त कुटुंबाचे प्रमाण आसपासच्या ग्रामीण समाजापेक्षा फार जास्त असल्याचे दिसून आलेले नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण समाजातही विभक्त कुटुंबे काही स्तरात तरी पूर्वापार चालत आलेली दिसतात, परंतु शहरांतील कुटुंबांचा निवासगट कोणत्याही प्रकारचा असो, त्याचा सामाजिक-आर्थिक संबंध, त्याच्या विस्तृत रक्तसंबंधीयांशी आणि कमीअधिक प्रमाणात विवाहसंबंधीयांशी काही अंशी तरी चालू राहतो, हे भारतीय नागरीकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य होय. साहजिकच त्यामुळे कौटुंबिक संस्कारांच्या आणि नात्यागोत्यांतील आचारविचारांचा पगडा नागरी कुटुंबावर टिकून राहतो.

परंपरागत कौटुंबिक संस्कार, विस्तृत कुटुंबाशी असलेला सामाजिक-आर्थिक संबंध, जातिसंस्था, आंतरजातीय विवाहास विरोध, जातीवर अवलंबून असलेला श्रमविभाग व उच्चनीच भावना आणि तीतून उद्‌भवणारे सामाजिक स्तर व सामाजिक स्थान आदींची पकड भारतीय मनावर, विशेषतः ग्रामीण समाजात, अजूनही कायम आहे. नागरी लोकसंख्येची वाढ ग्रामीण भागांतून येणाऱ्या लोकांवर अधिक अवलंबून असल्यामुळे साहजिकच नागरी समाजात ग्रामीण समाजाची ही वैशिष्ट्ये दिसून येतात.

कुटुंबांतर्गत सर्व धार्मिक विधींच्या बाबतीतील जातीचे महत्त्व शहरांतही कायम आहे. काही सार्वजनिक संस्थांच्या निधर्मी समारंभांतही धार्मिक विधी दिसून येतात. गणपत्युत्सव, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आदी धर्माधिष्ठित सामाजिक समारंभ शहरांतही सामूहिक रीत्या पार पाडले जातात. सामूहिक राजकीय जागृतीची सुरुवात या धार्मिक समारंभांद्वाराही शहरांतून करण्यात आली, हे सर्वश्रुत आहे. यावरून धार्मिक विधींचे महत्त्व शहरांत पूर्वीही होते व अजूनही कायम आहे, हे स्पष्ट होते. तसेच पुराणिक, कीर्तनकार, भजनीमंडळे यांचेही महत्त्व शहरांत कमी झालेले नाही त्याचप्रमाणे रामकृष्ण मठ, आर्यसमाज आदी संस्था हिंदुधर्माबद्दल नवा दृष्टिकोन, नवी जागृती व नवी आस्था निर्माण करीत आहेत. त्यांच्या चाहत्यांचा वर्गही शहरांतून कमी नाही. हिंदुधर्माप्रमाणे इतर धर्माबाबतही जवळजवळ हीच परिस्थिति दिसून येते. किंबहुना हिंदूंपेक्षाही नगरवासीयांमधील इतर धर्मीयच अधिक धार्मिक असल्याचे दिसून येते.

नागरी उद्योगधंदे जातिपद्धतीच्या कक्षेत बसत नाहीत. त्यामुळे व्यवसायात्मक गतिशीलता अपरिहार्य झालेली आहे. जातिनिष्ठ परंपरागत व्यवसाय न सोडण्याबद्दलची आणि परंपरेच्या बाहेरील व्यवसाय न स्वीकारण्याबद्दलची पूर्वीची सामाजिक बंधने आता शिथिल किंवा काही बाबतींत पूर्ण नाहीशी झालेली आहेत; परंतु धार्मिक विधींतील मंत्रतंत्रांच्या काटेकोरपणाला आणि मुळात धार्मिक विधींना अजृनही महत्त्व दिले जाते. म्हणून धार्मिक समारंभांतील पौरोहित्य अजूनही ब्राह्मणांकडेच आहे. त्याचप्रमाणे शिंप्याचा व काही प्रमाणात सुताराचा व्यवसाय सोडल्यास बाकीचे सर्वच बिगरशेती व्यवसाय आजही त्या त्या जातीच्याच हातात आहेत. जातिनिष्ठ व्यवसाय विभागणीत हीन, कमी दर्जाच्या आणि अस्वच्छ गणल्या गेलेल्या व्यवसायांमध्ये बहुधा त्या त्या जातीतीलच लोक दिसतात. या दृष्टीने व्यवसायात्मक गतिशीलता मर्यादितच आहे. अर्थात ही मर्यादा परंपरागत व्यवसायांपुरतीच आहे. औद्योगिकीकरणानंतर नव्याने निर्माण झालेल्या व्यवसायांमध्ये गतिशीलता शक्य असल्यामुळे, व्यवसायपरत्वे मिळणारा आर्थिक मोबदला आणि आर्थिक मूल्यांवर आधारलेले सामाजिक स्तर हे जातिनिरपेक्ष बनलेले आहेत. परंतु सामाजिक स्थान आणि व्यक्ति-व्यक्तींतील अन्योन्यक्रिया संपूर्णपणे जातिनिरपेक्ष बनल्या आहेत, असे म्हणता येत नाही. या विसंगतीस कारण म्हणजे प्रत्यक्षतः समाजातील परंपरागत खालचा वर्ग हा अजूनही बव्हंशी आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलाच राहिला आहे. म्हणून त्याला समाजातील प्राप्त गतिशीलतेचा फायदा उचलता आलेला नाही. दूसरे कारण धर्माधिष्ठित आणि धर्मप्रधान मूल्ये तसेच चालीरीती यांत आहे. जाति-जातींतील धार्मिक संस्कार वेगळे, दैवते वेगळी, खाण्यापिण्याची घरांतील बंधने वेगळी, भाषा अगर बोली वेगळी, विवाहसंबंध जातीपुरते किंवा पोट-जातीपुरतेच मर्यादित, धार्मिक संस्कारांत नात्याच्या आणि जातींच्या लोकांना असलेले महत्त्व आणि यामुळे सामाजिक-आर्थिक हितसंबंध जाति-बांधवांशीच निगडित असलेले, अशा परिस्थितीत सर्वजातीय लोक जास्त जवळचे वाटावेत, हे साहजिकच आहे. हिन्दू समाजात धर्माचरण हे संपूर्णपणे कुटुंबाच्या आधीन आहे. जाति जातींतील कौटुंबिक परंपरा ही धार्मिक परंपरा असते. कुळाचार आणि धर्म यांचे समीकरण झालेले असते. म्हणून स्वजातीय लोकांकरिता स्थापिलेल्या संघ-संस्था, त्या त्या जातीपुरतेच समाजकार्य करीत असल्याचे दृश्य नगर -महानगरांतही दिसून येते. याचे प्रत्यंतर भारतीय नागरी जीवनात विविध क्षेत्रांतून घडते.

भारतीय शहरांत वस्त्यांचे पृथक्करण धर्म, जात तथा व्यवसाय आणि आर्थिक स्थानांनुसारही झालेले आहे. हिंदू, मुसलमान, खिस्ती, ज्यू, पारशी या लोकांच्या वस्त्या एके ठिकाणी इतरांपासून अलग अशा दिसून येतात. त्याचप्रमाणे हिंदूपैकीदेखील विशिष्ट जातीच्या अगर भाषेच्या लोकांच्या वस्त्या अलग दिसतात. धर्म आणि भाषा या बाबतींत अधिक प्रभावी आहेत, असे दिसते. परंतु अधिक उत्पन्नाच्या वरच्या वर्गाच्या वस्त्यांत अनेक भेद नाहीसे झालेले आहेत, तसेच कमी उत्पन्नाच्या मजूरवर्गाच्या वस्त्यांत तसे भेद कमी प्रमाणात आढळून येतात. हिन्दू, ख्रिस्ती आणि मुसलमान आदींच्या वस्त्या एकमेकांना लागलेल्या असूनही त्यांचे सांस्कृतिक जीवन पृथक राहिल्यामुळे व त्या त्या धर्मातील लोक पुरेशा संख्येने एकत्रित राहिल्यामुळे धर्मप्रधान संस्कृतीच्या दृष्टीने त्या त्या जमातीचे लोक स्वयंपूर्ण आहेत, असे म्हणावयास हरकत नाही. अशा परिस्थितीत धर्माधिष्ठित चाली-रीती, सामाजिक-आर्थिक-राजकीय हितसंबंधांचे स्वधर्मीयांपुरते व स्वजातीपुरते मर्यादित स्वरूप आणि त्या त्या जमातीचे वा जातीचे एकत्र राहणे हे एकमेकांवर अवलंबून आहेत असे दिसते. लोकशाही तत्त्वास अनुसरून शिक्षणाची साधने, व्यवसाय, राजकीय सत्ता आणि उत्पन्नाची इतर साधने सर्वांना जातिधर्मनिरपेक्ष खुली असल्याने, तत्त्वतः तरी जातिपद्धतीवर आधारित असलेल्या समाजरचनेस धक्का पोहोचला आहे. शिक्षण, सत्ता, व्यवसाय आणि उत्पन्न यांवर अवलंबून असलेल्या सामाजिक स्तरीकरणाने जातिनिष्ठ सामाजिक स्थानाचे महत्त्व शहरांतील दैनंदिन व्यवहारांत कमी झालेले आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भाषा, वेशभूषा, बाहेरचे खाणे-पिणे, एकंदर वागणुकीची पद्धत इ. बाह्य लक्षणांचे निधर्मीकरण बव्हंशी झालेले आहे. त्यामुळे जातिभेदाची बाह्य लक्षणे पुसट झालेली आहेत. आधुनिकतेची आवश्यकता व परंपरेची ओढ यांचा संमिश्र प्रभाव भारतीय नागरी जीवनात दिसून येतो.

भारतीय नगरांचे आधुनिकीकरण सु.१००वर्षांपूर्वी इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर सुरू झाले, असे म्हणावयास हरकत नाही. त्यापूर्वींची भारतीय नगरे राजधानी, बाजारपेठ, सैनिकी बालेकिल्ले किंवा तीर्थक्षेत्रांचे अधिष्ठान म्हणूनच उदयास आलेली होती. ही नगरे देशाच्या सीमेपासून पुष्कळ आत होती. परकीयांनी येथे पाय रोवायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी व्यापारी उलाढालींकरिता सोयीचे व्हावे म्हणून किनाऱ्यालगत काही नगरे वसविली. मुंबई, कलकत्ता, मद्रास आदी शहरे अशा व्यापारी उलाढालींमधूनच उदयास आलेली आहेत. ही नगरे सुरुवातीला बाहेरच्या देशांना देशातील कच्चा माल पुरविणारी केंद्रे होती. कालांतराने ती शासनसंस्थेची तथा औद्योगिकीकरणाची केंद्रे बनली. देशातील निसर्गसंपत्तीचा शोध व तिचा औद्योगिकीकरणाकरता वापर सुरू झाल्यावर काही नगरे औद्योगिक केंद्रे म्हणूनही निर्माण झाली. काही नगरे दळणवळण आणि वाहतुकीचा व्याप सांभाळण्याच्या केंद्रस्थानी वसविली गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर योजनाबद्ध विकास सुरू झाल्यानंतर नवीन औद्योगिक केंद्रे, विद्यापीठ -महाविद्यालयादी शैक्षणिक केंद्रे व शासनकेंद्रे उदयास आलेली आहेत.

 

संदर्भ : 1. Anderson, Nels, The Urban Community, London, 1959.
2. Bergel, E. E. Urban Sociology, New York, 1965.
3. Burgess, E. W. Ed. Urban Community, Chicago, 1926.
4. Hatt, P. K. Reiss, A. J. Eds. Reader in Urban Sociology, Glencoe, 1951.
5. Sorokin, P. A., Zimmerman, C. C. Principles of Rural-Urban Sociology, New York, 1929.

 

लेखक - मा. गु. कुलकर्णी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate