कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यातील ग्रामीण भागात 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्वशालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारे सर्व 19 वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळी देण्याचा कार्यक्रम ठाणे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपुर, गडचिरोली हे जिल्हे वगळता इतर जिल्हयातील ग्रामीण भागात होणार आहे. याविषयी आपण जाणून घेऊया...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 24 कोटी 10 लाख (68 टक्के) बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. जगात 28 टक्के बालकांना असा कृमीदोष होण्याची शक्यता असते.
भारतात 6 ते 59 महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येक 10 बालकामागे 7 बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो व ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्तही असू शकते. तसेच 15 ते 19 वर्षे वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलीमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. भारतामध्ये 5 वर्षांखालील जवळजवळ 50 टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे आणि साधारणतः 43 टक्के बालके कमी वजनाची आहेत. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देवू शकत नाहीत. शाळेतही उपस्थित राहू शकत नसल्याने याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो.
01 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्वशालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारे सर्व 19 वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राज्य व जिल्हास्तरावर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेसाठी पथके स्थापन करुन 10 फेब्रुवारी 2015 रोजी जंतनाशक दिन व 13 फेब्रुवारी 2015 रोजी मॉप-अप राऊंड दिन यादिवशी शाळा व अंगणवाडी केंद्राना आरोग्य विभागामार्फत भेटी देण्यात येणार आहेत.
1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुले-मुली, सर्व शासकीय शाळा/ शासकीय अनुदानित शाळा/ अंगणवाडी केंद्र/ आश्रमशाळा/ खाजगी शाळा स्वेच्छेने या मोहिमेअंतर्गत लाभ घेण्यास तयार असतील तर उपलब्ध जंतनाशक गोळी साठ्याप्रमाणे त्या शाळेतील लाभार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग व शिक्षण विभागाचा सहभाग आहे.
जंतनाशक दिनाबाबतचे पर्यवेक्षण व सनियंत्रण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये एमडीएअंतर्गत (Lymphatic Filariasis Mass Drug Administration) मोहीम अंमलबजावणी झालेली आहे. ते जिल्हे वगळून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी व अक्कलकोट तालुका व्यतिरिक्त इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिनाची अंमलबजावणी करण्यात येणार नाही.
आजचे बालक हे देशाचे भवितव्य असल्याने ते सुदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे. शासनाची राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम ही त्या दिशेने टाकलेले पाऊलच म्हणावे लागेल.
लेखक - राजेंद्र सरग,
जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/25/2020
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व ...
आई’ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वात्सल्याचा झरा.....
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशा...
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, ...