অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुपोषण - जटिलता आणि आयुर्वेद

कुपोषण -जटिलता आणि आयुर्वेद

लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशाच्या एक ‘आदिमाया’ ल्यूसीचे अस्थि अवशेष आहेत, त्यावरून ल्यूसी फक्त ४ फूट उंचीची होती असे दिसते. लाखो वर्षांनंतर आज लंडनमध्ये विंबल्डन टेनिस स्पर्धात  ६-६ फुटी अँग्लो सॅक्सन आणि निग्रो तरुणी टेनिसचा मर्दानी खेळ झोकात खेळताना दिसतात. मानव वंशाच्या प्रगतीत उंची साधारणपणे वाढत असल्याचे दिसते. आज नॉर्डिक वंशाचे लोक साडेसहा फुटांपर्यंत उंच आहेत.

तर चिनी जपानी अजून साडेपाच फुटीच व भारतीय जेमतेम तेवढाच आहे. स्त्री-पुरुषांच्या उंचीमध्ये सरासरी अर्ध्या-एक फुटाचा फरक कसा पडत गेला याची पण शास्त्रीय चर्चा चालू आहे. या सगळ्यात जेनेटिक्सचा प्रभाव किती, पोषक पदार्थांचा किती, हवामान व आजारांचा किती याबद्दल तीव्र वादविवाद चालू आहेत. भारतात कुपोषण आणि त्यातल्या त्यात बालकुपोषण फारच जास्त आहे याची रास्त ओरड चालू आहे. भारतीय कुपोषण फार  (म्हणजे ३०-४०% व्यक्ती कुपोषित आहेत) असा निष्कर्ष आहे आणि यासाठी संदर्भ म्हणून जागतिक मोजमाप व संख्याशास्त्रीय निकष वापरले जातात.

वर्षभरापूर्वी कोलंबिया विद्यापीठातल्या प्राध्यापक अरविंद पंगरिया या अर्थशास्त्रज्ञाने भारतीय कुपोषणाची आकडेवारी अर्धसत्य आहे असे प्रतिपादन केले आणि एकच जागतिक फूटपट्टी उंची वजनाला लावण्यात जेनेटिक्सचा प्रभाव नाकारला जातो असे प्रतिपादन केले. यावरून बराच वादविवाद झाला व सदर प्राध्यापक भारतीय कुपोषणाची समस्या आणि त्याला कारण असणारी गरिबीची समस्या ही सौम्य करू पाहतात असे आरोप झाले. मात्र संपन्न जपान आणि संपन्न नॉर्डिक देशांच्या नागरिकांच्या सरासरी उंचीतला ८-१० इंचांचा फरक कसा काय पडतो याचे उत्तर मात्र कोणी देऊ शकले नाही.

सांगायचे असे की कुपोषण हा केवळ वैद्यकीय मुद्दा नसून भारतातली गरिबी, मागासलेपणा वगैरे सामाजिक, आर्थिक घटकांशी त्याचा निकटचा संबंध असल्यामुळे त्याचा राजकीय वापर पण होत असतो. मेळघाट, नंदुरबार व ठाण्यामधल्या कुपोषणाच्या बातम्या वाचताना व हेडलाईन्स वाचताना माझ्या मनात त्यात खरे किती आणि कांगावा किती हा पण प्रश्नक असतो. महत्त्वाचे म्हणजे हा प्रश्ना जणू केवळ सरकारी अपयश आहे असे दाखवण्याने नेमके काय साध्य होते व कोणते मुद्दे झाकले जातात याचा पण शोध आवश्यक आहे. या समस्येची जटिलता लक्षात न घेता शेरेबाजी किंवा वरवरचे उपाय सांगून प्रश्नव सुटणार नाही.

कुपोषणाची जटिलता

पोषण कुपोषणाच्या बर्याशवाईट संकल्पनांमध्ये बराच परस्पर विरोध असतो पण मुलाबाळांना, तरुण-तरुणींना आणि प्रौढ-वृद्धांना वयानुसार योग्य खायला प्यायला मिळाले पाहिजे आणि त्यांची वयानुसार वाढ व्हावी आणि आरोग्य अबाधित राहावे हे मूळ सत्य उरते हे निश्चिपत. इथून पुढे मात्र मतभेदांना सुरुवात होते.

कुपोषणासाठी कोणते मापदंड वापरावेत, ‘जागतिक की भारतीय’ हा मुद्दा खरे म्हणजे शमलेला नाही, याचा उल्लेख वर येऊन गेला आहे. तसेच कुपोषणासाठी वजनाचे मोजमाप चांगले, उंचीचे की शरीरभाराचे की दंडघेरांचे या देखील मुद्यांवर चर्चा होत असते. उंची हा तसा एक भरवशाचा मापदंड आहे. उंचीवर वजन बरेचसे अवलंबून असते पण केवळ वजनावर पोषण कुपोषण ठरवणे फार योग्य नाही.

विशेषत: सध्याच्या काही मेदवृद्धीमुळे वजनाचा मापदंड सदोष ठरू शकतो.  पण तरीही अंगणवाडीच्या सामाजिक स्तरात वजनाचा निकष सामान्यपणे ठीक आहे असे म्हणता येईल. दंडघेर हा मुद्दा स्नायूभाराशी संबंधित आहे. स्नायूभार कमी तर दंडघेर कमी, पण दंडघेराचे मोजमाप योग्य-अयोग्य आणि त्यासाठी वयाचा स्तर कसाकसा लागू होतो हे वादाचे मुद्दे आहेत. याबद्दल पुढे विस्ताराने येईलच. अडचण अशी की काही संस्था एक मापदंड वापरतात तर दुसर्याय वेगळा मापदंड वापरतात. यामुळे तुलनात्मक काम करणे अवघड होते.

सध्या आपण केवळ बालकुपोषणाबद्दल बोलतो कारण शासकीय कार्यक्रमाच्या दृष्टीने तो सगळ्यात सोयीचा वयोगट आहे. परंतु पोषण-पुपोषणाच्या संकल्पना अर्थातच जीवनव्यापी असतात. त्या दृष्टिकोनातून आजच्या अनेक आरोग्य समस्या, उदा. मधुमेह, स्थूलता, अतिरक्तदाब, हृदयविकार आणि काही अंशी कॅन्सर हे कुपोषणाशी संबंधित आहेत. भारतीय उपखंडात प्रचलित असलेला सिंड्रोम एक्स हा लक्षण समूह (स्थूलता, वाढलेला रक्तदाब आणि रक्तशर्करा) हा बहुश: कुपोषणामुळे तयार झालेला आहे पण त्याची मुळे वांशिक निवडीत असू शकतात. भारतीय आहारातला मुख्य घटक म्हणजे धान्य म्हणजे पिष्टमय पदार्थ. वाजवीपेक्षा जास्त धान्य आहारामुळे व तुलनेत इतर प्रथिनादि पदार्थ कमी पडल्यामुळे मधुमेहाला चालना मिळते.

अर्थातच पोषण शास्त्रामध्ये त्या त्या देशाची भौगोलिक आणि शेतीविषयक परिस्थिती प्रभावी असते तसेच अन्न संस्कृती आणि धर्मकल्पना यांची सांगडही महत्त्वाची ठरते. जगभर केवळ भारतातच शुद्ध शाकाहारी आहाराचे प्राबल्य आहे, उपखंडातील इतर देशातही अशी परिस्थिती नाही. धार्मिक अधिष्ठान आहे, ते असावे, पण इतरत्र बौद्ध धर्मीय देखील पूर्ण शाकाहारावलंबी नाहीत. (उदा. चीन, जपान, तिबेट इ.)

पुण्याचे मधुमेह शास्त्रज्ञ डॉ. याज्ञिक यांच्या प्रतिपादनानुसार भारतातले सध्याचे कुपोषण बर्यााच प्रमाणात ऐतिहासिक ‘वारसा हक्काने’ मिळालेले आहे. भारतीय बाळे कमी वजनाची जन्मतात (अडीच किलोच्या खाली ३५% बाळे) कारण भारतीय मातांची मुळात उंची व कटिभाग-श्रोणीकक्ष छोटा असतो व आईच्या रक्तातून मिळणारे पोषणही कमी असते. ७०% भारतीय स्त्रिया ऍनिमियाग्रस्त आहेत. एवढे असूनही भारतीय बाळांमध्ये इतर देशातल्या बाळांपेक्षा मेदाचे जन्मत:च प्रमाण जास्त असते व तेवढ्या अंशाने स्नायूभार कमी असतो. हा मेदाचा साठा दुष्काळी चक्रांमुळे भारतीय मानवसमूहात दृढमूल झालेला असू शकतो. भारतीय समाजाचे कमी प्रथिनांवर जगणे हे कदाचित बुद्ध महावीर कालीन अहिंसा कल्पनांचा अतिरेकी अवलंब केल्याने उद्भवला असेल असा डॉ. याज्ञिकांचा तर्क आहे. (खुद्द भगवान बुद्ध डुकराच्या मांसाच्या सेवनाने आजारी पडून निर्वाण पावले असा इतिहास आहे.)

सरासरी भारतीय आहारात दूध सोडता बहुश: कोणताही मांसाहारी पदार्थ फारसा उरला नाही ही वस्तुस्थिती आहे. सांस्कृतिक दृष्ट्या सामिष आहार घेणार्याद समाजांवर आपण सांस्कृतिक दहशत निर्माण करतो हे आणखीनच. सावरकर,विवेकानंद वगैरे हिदू विद्वानांनीही याबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले आहे हे आपण सोयीस्कर रित्या झाकून ठेवतो. परिणामी आपल्या आहारात प्राणिज प्रथिने थोडीच उरली आहेत आणि त्यामुळे स्नायूभार कमी असणे, ऍनिमिया, कार्यशक्ती कमी असणे, कमी उंची वगैरे परिणाम संभवतात. यासाठी समुचित उपाय शोधणे आणि ते सार्वत्रिक करण्याची गरज आहे.

आयुर्वेदामध्ये सामिष आहाराचा निषेध नाही कारण त्या काळी तरी विविध मानव समूह मुक्तपणे मांस, मासे अंडी आदि आहारात वापरत होते.  वेदांपासून रामायण महाभारतात देखील असे उल्लेख आहेत. सध्याचा आयुर्वेद समुदाय याबद्दल काहीसा मूक आहे. याची चर्चा आवश्यक आहे.

सध्याच्या अंगणवाडी व्यवस्थेत मूलत: वयानुसार वजन हाच मुख्य मापदंड आपण वापरतो. २००७ सालापासून यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे आंतरराष्ट्रीय निकष भारत सरकारने मान्य केले आहेत. यात मुलामुलींसाठी वेगळे वाढतक्ते आहेत. कुपोषण आहे की नाही हे ठरवण्यासाठी संख्या शास्त्रीय निकष आता वापरले जातात. मायनस टू (-२) स्टँडर्ड डेव्हिएशनच्या खालची बालके कुपोषित धरली जातात यातही मायनस थ्री म्हणजे वजा ३च्या खालची बालके तीव्र कुपोषित धरली जातात. अंगणवाडीत सॉल्टर झोळी काट्यावर बालकाचे वजन करून तक्त्यात वयानुसार त्याची नोंद केली जाते व श्रेणी ठरवली जाते. सध्या महाराष्ट्रातली सुमारे २०% मुले या हिशोबात अल्पवजनी आहेत तर २% तीव्र अल्प वजनी आहेत.

कुपोषणाचा दुसरा मापदंड म्हणजे रोडपणा मोजणे. यासाठी बालकाचे वजन उंचीनुसार कमी की योग्य हे ठरवले जाते. यासाठी अंगणवाडीत तक्ते असतात. मुलामुलींच्या तक्त्यात उंचीच्या पातळीनुसार वजन पाहून श्रेणी ठरवतात.  मोठ्या माणसांमध्ये जसा शरीरभार काढतात (वजन भागिले उंची२) अशीच काहीशी ही पद्धत आहे. इंग्रजीत याला वेस्टींग असे म्हणतात. मूल जर तीव्र रोडावलेले असेले (-२एस.डी.) तर ते मूल दगावण्याची शक्यता असते म्हणून पोषण पुनर्वसनासाठी त्याची शिफारस केली जाते. ही शिबीरे निरनिराळ्या सरकारी रुग्णालयात वेळोवेळी चालू असतात. २-३ आठवड्यांच्या उपचारांनंतर मुलाला घरी सोडले जाते. अर्थातच या शिबीरात सोबत आई असते आणि तिला बुडीत मजुरी द्यायची व्यवस्था आहे. पोषण विषयक प्रयोग करायला अशी शिबीरे योग्य भूमी ठरू शकतात.

अंगणवाडीत दंडघेरासाठी एक रंगीत पट्टी मिळते. ६ महिने ते ३ वर्ष वयोगटात डाव्या दंडावर मध्यभागी ही पट्टी गुंडाळून श्रेणी ठरवतात. दंडपट्टीच्या चौकोनी खिडकित लाल रंग दिसला (११.५से.मी.च्या खाली) तर तीव्र कुपोषण समजायचे. साडेबारा से.मी. च्या वर हिरवी म्हणजे सामान्य श्रेणी सुरू होते. या दोन्हीमध्ये पिवळा भाग असतो ते मध्यम कुपोषण. यानुसार तीव्र कुपोषित मुलांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करता येते.

अंगणवाडीच्या मोजमापांवर पोषण पुनर्वसन केंद्राची शिफारस आजकाल फार महत्त्वाची राहिलेली नाही कारण तालुकावार बाल वैद्यक पथके सुरू झालेली आहेत. (या पथकात मुख्यत: आयुर्वेदाचे स्त्री-पुरुष डॉक्टर्स काम करीत आहेत) ही पथके दर सहा महिन्याला बालकाचे मोजमाप घेतात आणि जन्मल्यापूसन १८ वर्षे वयापर्यत लक्ष्य गट असतो. रोज २००-३०० मुले तपासून व मोजमाप करून नोंदी कराव्या लागतात. अर्थातच सहा महिन्यांचा काळ हा पोषण कुपोषणाच्या दृष्टीने जास्तच लांब असल्याने गैरसोय होते यात शंका नाही.

अंगणवाडी व्यवस्थेत त्यांच्या वेबसाईटवर राज्यातल्या सर्व बालकांची (शून्य ते सहा वयोगट) आकडेवारी उपलब्ध आहे पण ती मुख्यत: गोषवारा स्वरुपात असते. म्हणजे कुठल्या तालुक्यात-गावात अंगणवाडीत किती मुले सामान्य किंवा कुपोषित आहेत असा गोषवारा मिळू शकतो. हा गोषवारा २-३ महिने इतका जुना असू शकतो.

कुपोषण विषयात सध्या तरी ऍलोपथीक वैद्यकशास्त्राचीच पकड आहे, त्यामानाने आयुर्वेद अजून लांबच ठेवला गेला आहे. गेल्या काही वर्षात अनेक आयुर्वेदिक मंडळी यात नवीन नवीन प्रयोग करून बघत आहे पण याला अजून संघटित किंवा काटेकोर शास्त्रीय स्वरूप आलेले नाही. त्यामुळे आयुर्वेदिक मंडळीना प्रयोग करायचे असतील तर सुरुवातीपासून संख्याशास्त्रीय निकष पूर्ण करूनच काहीतरी साध्य होऊ शकते. केवळ वजन एवढे वाढले किंवा तसेच राहिले याला फारसा अर्थ नसतो. ते संख्या शास्त्राने सिद्ध करावे लागते.

माझ्यामते पोषण कुपोषणाच्या प्रश्नावत आयुर्वेदाच्या अनेक संकल्पना अभ्यासणे, तपासणे आवश्यक आहे. प्रकृती विचार ही पहिली गोष्ट. पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. श्रीमती देशमुख यांनी केलेल्या अभ्यासानुसार आयुर्वेदातल्या प्रकृती विचारात जेनेटिक पुराव्यांनी पुष्टी मिळते. बालपणापासून वजन, उंची, स्नायूभार आदि मोजमापात प्रकृतीनुसार किती-कसा फरक पडू शकतो याचा अभ्यास करता येईल.

आयुर्वेदिक आहार शास्त्रात धातू आणि बल वर्धक पोषक पदार्थ सांगितलेले आहेत. पोषण शास्त्राच्या दृटीने व्यक्तिश: मला त्याची अद्याप संगती लागलेली नाही. उदा. तालिमखाना खाऊन तेवढाल्या बियांनी स्नायूबळ कसे वाढेल याबद्दल मला शंका आहे. पण निदान काही प्रयोग व्हावेत अशी अपेक्षा आहे. उदा. कोणत्या पदार्थांनी बालकांचे वजन, उंची व बळ जास्त वाढते याचे अभ्यास व्हायला पाहिजेत. आहार पचणे, न पचणे हे अर्थातच पोषणात महत्त्वाचे असते यासाठी आयुर्वेद किंवा अंगणवाडीतल्या पद्धतींची सांगड घालता येईल का हे बघावे लागेल.

पोषक बस्तीचा उपयोग होतो का शोधावे लागेल. जिथे नेहमीच्या मार्गाने कुपोषण कमी झालेले आहे किंवा झाले नाही तिथे आयुर्वेदिक विश्ले षण देखील महत्त्वाचे ठरू शकते. वैज्ञानिक सिद्धता करताना केवळ संकल्पना सुचवणे, उपलब्ध पुरावे तपासणे आणि प्रत्यक्ष प्रयोग करून यश-अपयश मोजणे, त्यातील घटकांचे कमी अधिक प्रभाव शोधणे अशा क्रमश: वरच्या पायर्या् गाठायला पाहिजे.

निरनिराळ्या समाजगटात (उदा. कातकरी, फासेपारधी, वारली इ.) पोषण कुपोषण वेगवेगळे असेल त्याची कारणे शोधून उपाय करायला पाहिजेत. यासाठी कुणी अडवायचे कारण नाही. पण अर्थातच यासाठी शास्त्रीय पाठबळ व तयारी लागेल. आपल्या महाविद्यालयांमध्ये असे तयारीचे संशोधन फारसे होत नाही त्यामुळे दावे, प्रतिदावे, लोकांचे आधार एवढाच मुद्दा राहतो. अशा मार्गानी राष्ट्रीय पातळीवर पोषण-कुपोषणावर प्रभाव टाकणे शक्य नाही.

केवळ बाल कुपोषणाचा विचार न करता प्रौढ कुपोषणाचा (उदा.  ढेरपोटे पुरुष किंवा स्त्रियांमधले स्थूलत्व किंवा स्नायूभार कमी असणे) अशा गोष्टींचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.

दुधाबद्दल आपण खूप बोलतो पण प्रचलित विज्ञानानुसार अनेक मुद्दे आता पुढे येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दूध सगळ्यांनाच पचते असे नाही. अनेकांना लॅक्टिक इनटॉलरन्स असतो. दुसरा मुद्दा म्हणजे एकदा उकळलेले दूध त्यातली प्रथिने, साकळल्यामुळे (कोऍग्युरेशन) पचायला जड होते. यापेक्षा दही आणि त्यापेक्षा ताक चांगले याबद्दल प्रो बायोटिक्सच्या दृष्टिकोनातून अभ्यास होत आहेत. दूधाचे अल्फा वन आणि अल्फा टू हे दोन प्रकार आता वेगळे ओळखले जातात. अल्फा टू म्हणजे ऑस्ट्रेलियन, युरोपीयन दूध काहीसे रोगजनक आहे त्यामुळे हृदयविकारादि वाढतात असे प्रतिपादन होत आहे. पुण्यातील डॉ. अशोक काळे हे याबद्दल हल्ली अध्ययन व जागृती करत आहेत. कच्च्या दुधाचा वापर हा त्यांचा मुख्य आग्रह आहे.

पोषण कुपोषण राष्ट्रीय विकासासाठी आणि मानवी प्रगतीसाठी एक अत्यावश्यक क्षेत्र आहे. यात अनेक दिशांनी संशोधन व विकसन होण्याची गरज आहे. आयुर्वेदाने यात मागे राहता कामा नये. हे करण्यासाठी ताबडतोब सरकारी परवानगी मिळो ना मिळो अनेक प्रयोग करणे शक्य आहे. अंगणवाड्या, शालेय माध्यान्ह भोजन वगैरे क्षेत्रे तर आहेतच. त्यासाठी स्थानिक पातळीवरही सहकार्य शक्य आहे. शेवटी अंगणवाडीत किंवा शाळेत एखाद-दुसरेच जेवण मिळते, इतर वेळी मूल आपापल्या घरात असते. खाजगी आश्रमशाळा अनेक आहेत. तिथे देखील सुपोषणाचे आणि स्वयंपाक पद्धतींचे विविध प्रयोग हाती घेता येतील यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सजगतेने आजूबाजूला डोकावण्याची गरज आहे.

 

स्त्रोत: आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate