অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपायिता

अपायिता

दहा दिवसांपेक्षा अधिक अवधीनंतर तोच बाह्य पदार्थ दुसऱ्‍या वेळी शरीरात टोचला असताना एखाद्या वेळी जीðअवसादासारखी (शॉकसारखी) तीव्र अवस्था उत्पन्न होते, तिला ‘अपायिता’ असे म्हणतात.

अंडी किंवा मासे खाल्ल्याने काही व्यक्तींच्या अंगावर गांधी उठतात. शरीरात आलेल्या बाह्य प्रथिनपदार्थांच्या बाबतीत प्रथम एकदा त्या पदार्थांशी संयोग येऊन गेल्यानंतर दुसऱ्‍या वेळी त्याच पदार्थाबाबतची नेहमीची प्राकृत प्रक्रिया न होता एक प्रकारे हळवेपणाची अथवा अधिहृषतेची (ॲलर्जीची) स्थिती निर्माण होते. त्यामुळे सामान्य प्राकृत निरोगी व्यक्त्तीपेक्षा त्या व्यक्त्तीमध्ये वेगळा परिणाम दिसून येतो. असा परिणाम होण्याचो कारण म्हणजे काही पदार्थांत असलेले हृष्यजन (ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ) हे होत. ह्या हृष्यजनांना विशिष्ट प्रतिरोध करू शकणारी प्रतिपिंडे शरीरात तयार होतात.

आपल्या आहारातील प्रथिने ही अनेक ॲमिनो अम्लांची बनलेली असतात. स्थूल प्रथिनांचे पचनतंत्रात ॲमिनो अम्लांत विभंजन (विभागले जाणे) केले जाते; ती पुन्हा सांधली जाऊन शरीरीतील प्रथिने बनविली जातात. खुद्द ॲमिनो अम्ले शरीरात टोचली असता काही अपाय होत नाही. परंतु अंड्याचा बलक किंवा रक्तरसात आढळणारी प्रथिने टोचली तर मृत्यूही ओढवू शकतो, एवढी तीव्र प्रतिक्रिया होते. सर्व प्रथिनांना निरनिराळ्या जातींतील प्राण्यांत, एवढेक नव्हे तर एकाच प्राण्याच्या शरीरातील वेगवेगळ्या ऊतकांतही (समान रचना व कार्य असलेल्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहांतही), तद्विशिष्टत्व असते. वर सांगितलेल्या हृष्यजनांप्रमाणेच प्रत्येक बाह्य प्रथिन हे रतिजन असते. त्याचा शरीराशी प्रथम संयोग आला की, शरीर त्याविरुद्धप्रतिपिंड निर्माण करते.

प्रतिजनांपासून शरीराचे रक्षण करणे हे या प्रतिपिंडाचे कार्य असते. हे प्रतिपिंड रक्तात जाऊन काही ऊतकांत साठून राहतात.

प्रथम संयोगामुळे शरीरात काही प्रतिपिंडे निर्माण झाल्यानंतर दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटल्यावर पुन: त्याच बाह्य प्रथिनाचा शरीरातील ऊतकाशी संबंध आला तर त्या बाह्य प्रथिनापासून शरीराचे संरक्षण करण्याची पात्रता नष्ट झालेली असते. त्यामुळे या नव्या बाह्य प्रथिनांच्या पुन:संयोगाने अनेक इंद्रियांची प्राकृत कर्मे एकदम बिघडून अवसादासारखी लक्षणे उद्भवून अनेक वेळा मृत्यूही ओढवतो.

या घटनेचे कारण असे की, प्रथम संयोगानंतरच्या काळात प्रतिजनाविषयी तद्विशिष्ट हळवेपणा निर्माण झालेला असतो; त्याला तीव्रग्राहिता म्हणतात. या तीव्रग्रहितेमुळे प्रतिजन-प्रथिनाशी शरीरातील ऊतकांचा पुन:संयोग झाला की, अत्यंत तीव्र गतीने दुर्घटनांना प्रारंभ होतो. या दुर्घटनांचा आविष्कार निरनिराळ्या प्राण्यांच्या जातींमध्ये भिन्न असतो. गिनीपिगमध्ये श्वास कोंडला जातो. कुत्रा व ससा ह्या प्राण्यांत रक्त्तदाब एकदम खूप कमी होतो. सशांमध्ये फुप्फुस रोहिण्यांचे आकुंचन होते, तर कुत्र्यांमध्ये आंत्रमहानीलेचे आकुंचन होते. प्रतिजन-प्रतिपिंड-संयोग ज्या इंद्रियात होतो त्यावर हे अवलंबून असते. या संयोगातून ‘हिस्टामीन’ नावाचे एक ॲमिनो अम्ल निर्माण होते व त्याचा लगेच शेजारच्या इंद्रियावर परिणाम होतो.

तीव्रग्राही प्राण्यांच्या ऊतकांत प्रतिजन-संयोगाने तसेच अपायिता-अवसाद झालेल्या प्राण्यांच्या रक्त्तात व लसीकेत  हिस्टामिनाचा स्राव होतो, हे दाखविता येते. मनुष्यात होणारा अपायिता-अवसादही हिस्टामिनाच्या स्रावामुळे होतो. बाह्य प्रथिनाच्या पहिल्या संयोगानंतर प्रतिपिंडे ऊतककोशिकांमध्ये असतात. दुसऱ्‍या संयोगानंतर प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया कोशिका-शरीरातच होऊन हिस्टामीन स्रवले जाते व त्याचाच परिणाम म्हणून अवसाद होतो. या अवस्थेत हिस्टामीन-विरोधी द्रव्यांचा उपयोग होतो. हेपारीन (यकृतद्रव्य) व इतर काही पदार्थांचाही त्यामध्ये भाग असावा.

कालावधीनंतर येणाऱ्‍या अवसादाचा हिस्टामिनाशी काही संबंध नसावा, असे दिसून आले आहे.

तीव्रग्राही प्राण्यांना योग्य प्रक्रिया करून फिरून प्राकृतावस्थेत आणता येते. या प्रक्रियेला ‘ तीव्रग्राहिता–नाशन ’ असे म्हणतात.

 

लेखक - ना. रा. आपटे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate