हा रोग संसर्गजन्य असून गुरे, डुकरे व प्रसंगी मानवातही आढळतो. या रोगात चिरकारी (कायम स्वरूपाची) दृढशोथ (दडस सूज) व नाली व्रण (अरूंद, खोल व तोंड लहान असलेले गळू) ही मुख्य लक्षणे असतात. रोगकारक कवच तोंड, दात व गिलायू ग्रंथींच्या (टॉन्सिल्सच्या) गृहिकेत (पोकळीत) नेहमीच असते पण काही कारणाने त्या ठिकाणच्या ऊतकांना (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांना) इजा झाल्यास त्या ऊतकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्यापासून रोगोत्पत्ती होते. उदा., दात उपटल्यानंतर कित्येक वेळा हो रोग दिसतो कारण उपटलेल्या दाताच्या गर्तेत या रोगाची सुरूवात होते. कवकसदृश इतर सूक्ष्मजीवांपेक्षा या सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रजननाला ऑक्सिजन लागत नाही. म्हणून ज्या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल तेथेच रोगोद्भव होतो. उदा., अप्रसुत (न फुगलेले) फुफ्फुस वा उंडुकामध्ये (मोठ्या आतड्याच्या पहिल्या गोमुखाकार भागामध्ये) या रोगाची सुरुवात होऊ शकते. क्वचित हे कवक रक्तमार्गे गेल्यामुळे यकृत, वृक्क (मूत्रपिंडे), प्लीहा (पानथरी) वगैरे ठिकाणीही रोग होऊ शकतो.
फुफ्फुसांच्या खालच्या खंडांत सूज येऊन परिफुफ्फुस (फुफ्फुसावरील पातळ आवरण) व छातीच्या त्वचेवर वरच्यासारखे नाली व्रण होतात. सुरुवातीस ताप, खोकला, अशक्तता एवढीच लक्षणे असल्यामुळे क्षयाचा संशय येतो; पण छातीच्या त्वचेला सूज येऊन विद्रधी व नाली व्रण आल्यावर संशय रहात नाही.
पोटात आंत्रपुच्छ (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीस असलेला शेपटीसारखा आतड्याचा बंद भाग, ॲपेंडिक्स), उंडुक वगैरे भागांतही हा रोग होतो त्यावेळी सुरुवातीस कर्करोग, क्षय किंवा अमीबाजन्य विकार (अमीबिॲसीस) या रोगांचा संशय येतो व कित्येक वेळा त्या रोगाकरिता पोट उघडल्यानंतरच निश्चित निदान होते.
शस्त्रक्रिया करून ग्रस्त भागातील पू वाट काढून बाहेर पडल्यास त्वरित गुण येतो. पूर्वी पोटॅशियम आयोडाइड, क्ष-किरण प्रयोग वगैरे उपचार करीत, पण आता त्याचा उपयोग करण्यात येत नाही.
कापडी, रा. सी.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...