অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लसीका ग्रंथि

शरीरातील परिधीय ऊतकांपासून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या- पेशींच्या -समूहांपासून) रक्ताकडे जाणाऱ्या लसीकावाहिन्यांच्या मार्गात लसीकाभ ऊतक [लसीका तंत्र] सीमित पुंजांच्या रूपात विकसित होऊन त्यांचे रूपांतर सस्तन प्राण्यांमध्ये लसीका ग्रंथींमध्ये झाले आहे. निरनिराळ्या स्तनींमध्ये ग्रंथींची एकूण संख्याशरीराच्या मानाने आकारमान, आकार व लसीकाभेतर ऊतकांचे प्रमाण यांत भिन्नता दिसते. उदा., माणसात सु. ४६५ व घोड्यामध्ये ८,००० ग्रंथी असतात, तर कुत्रा व गाय यांमध्ये तुलनेने मोठ्या अशा अनुक्रमे ६० ते ३०० ग्रंथी आढळतात. स्तनींशिवाय इतर कॉर्डेट प्राण्यांमध्ये [पृष्ठरज्जू असलेल्या प्राण्यांमध्ये; ⟶ कॉर्डेटा] लसीकाभ ऊतकाचे ग्रंथींमध्ये रूपांतर फक्त काही पक्ष्यांमध्ये व तेही अत्यल्प संख्येत आणि अंशतः विकसित अवस्थेत झालेले आढळते. लसीकावाहिन्यांकडून निचरा होणाऱ्या परिघीय ऊतकांमध्ये होणाऱ्या विकारजन्य बदलांचे प्रतिबिंब अल्पावधीत त्या क्षेत्रातील लसीका ग्रंथींमध्ये उमटते. या सूक्ष्म व स्थूल बदलांमुळे रोगनिदानात लसीका ग्रंथींना महत्त्व असते.

रचना

लसीका ग्रंथी त्वचेखालीच म्हणजे पृष्ठस्थ आणि अधस्त्वचीय पातळीच्याही खाली म्हणजे खोल अशा दोन प्रकारच्या गटांत आढळतात. लसीका अभिसरण तंत्रात सर्व शरीरभर पसरलेल्या अनेक लसीका ग्रंथींखेरीज काही विशिष्ट भागांत (उदा., मान, जांध, काख, उदर, आतड्यांच्या भित्ती) त्यांचे गुच्छ असतात. निरोगी शरीरातील प्रत्येक ग्रंथी विच्छेदनाने स्वतंत्रपणे काढणे शक्य असते.

तिचा आकार वृक्कासारखा (मूत्रपिंडासारखा), गोल किंवा काही बाजूंनी चपटा असू शकतो. लांबी, १ ते २० मिमी. असते. सर्व बाजूंनी तंतुमय संयोजी ऊतकाचे सैलसे आवरण (संपुट) प्रत्येक ग्रंथीली पूर्णपणे आच्छादते. त्यात काही अरेखित (आडव्या रेखा नसलेले;अनैच्छिक) स्नायूही आढळतात. त्यांची संख्या मानवेतर प्राण्यामध्ये जास्त असते. ग्रंथिपृष्ठावर एका बाजूला असलेल्या खळग्यासारख्या नाभिकेतून रक्तवाहिन्या आत शिरतात आणि अपवाही लसीकावाहिनी बाहेर पडते. इतरत्र बहिर्गोल पृष्ठभागावरून अनेक अभिवाही लसीकावाहिन्या व काही रक्तवाहिन्या संपुटाच्या आतील अवकाशात प्रवेश करतात. संपुटापासून आतवर पोचणाऱ्या आधारदायी ऊतकांचे पडदे लसीकाभ ऊतकात लहानमोठ्या कप्प्यांची रचना निर्माण करतात.

ग्रंथीतील लसीकाभ ऊतकाची विभागणी स्थूलमानाने बाह्यक व मध्यक अशी करता येते. आधार ऊतकांमुळे बाह्यकाची विभागणी अनेक कक्षांमध्ये होते. या कक्षांमध्ये सर्वत्र लसीका कोशिका पसरलेल्या असल्या, तरी त्यांचे बाहेरील अनेक थर गोलाकार ग्रंथिकांच्या रूपात दिसतात. त्यांना पुटके म्हणतात. प्रत्येक पुटकाच्या मध्यभागी एक जननकेंद्र असते आणि तेथील कोशिकासंपुंजन विरळ आणि केंद्रके (कोशिकांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे पुज) फिकट असतात. कधीकधी मध्ये मोकळी जागा असल्यासारखे दिसते. या क्षेत्रात बी-लसीका कोशिकांचे समविभाजन [⟶ कोशिका] मोठ्या प्रमाणात चालू असते. बी-कोशिकांशिवाय महाभक्षिकोशिका व प्रतिपिंडनिर्मितीसाठी ⇨ प्रतिजन सादर करणाऱ्या शाखायुक्त कोशिका या जननकेंद्रात दिसतात. पुटकातील भोवतालच्या कोशिका आकारमानाने लहान व जास्त गडद अशा बी-कोशिका असतात. प्रतिजनाने उत्तेजित झाल्यावर त्यांचे रूपांतर प्रतिपिंड निर्मितिक्षम अशा प्लाविकाकोशिकांमध्ये होते. पुटकांच्या समूहातून आतवर पोचणारे तंतुमय ऊतकस्तर लसीकाभ ऊतकाला आधार देतात आणि अधःसंपुटीय लसीकाद्रवाचा प्रवाह पुटकांभोवती पोचण्यास वाव देतात. प्रत्येक पुटकाचा मध्यापर्यंत पोचलेला द्रव नंतर लसीकावाहिन्यांच्या जाळ्यांतून अपवाही वाहिनीत जाऊन पोचतो.

मध्यकातील कोशिकांची मांडणी एकमेकांना मिळणाऱ्या लांब रज्जूंच्या रूपात असते. या रज्जूंच्या मधल्या मोकळ्या जागांना मध्यक कोटरे म्हणतात आणि ती एकमेकांना मिळून शेवटी अपवाही वाहिनीस मिळतात. मध्यकातील या रज्जूंच्या जाळ्याची रचना बाह्यकापेक्षा जास्त दाट असते, त्यामुळे येथील लसीका कोशिकांच्या हालचाली व विनिमय मर्यादित प्रमाणावर असतात. बाह्यकातील आधारदायी ऊतकांतून निघालेल्या तंतूंचे जाळेही मध्यकात पोचलेले असते. त्याच्या आधारे व आधाराशिवायही असलेल्या भक्षिकोशिका व काही बृहत् कोशिका दिसतात. जालिका-अंतःस्तरीय तंत्राचाच हा एक भाग असून त्याकडून सूक्ष्मकणांचे भक्षण होऊ शकते.

बाह्यक व मध्यक यांच्यामधील भागास पराबाह्यकीय किंवा खोल बाह्यकीय क्षेत्र म्हणतात. यौवनलोपी ग्रंथीच्या नियंत्रणाखाली विकसित झालेल्या या भागात टी-लसीका कोशिकांचे समूह जवळजवळ सलग अशा थरात पसरलेले असतात. स्पष्ट अशी पुंजरचना किंवा जननकेंद्रे दिसत नाहीत. रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या या नीला असून त्यांच्या अंतःस्तराची रचना उठावदार अशा घनाम अधिस्तर कोशिकांमधून झालेली असते. या अंतःस्तरातून रक्तातील टी-कोशिका आरपार बाहेर पडून लसीकाभ ऊतकामध्ये येतात आणि त्यांचा तेथे भक्षिकोशिकांमध्ये अडकलेल्या प्रतिजनांशी संपर्क घडून येतो. टी-कोशिकांच्या उद्दीपनासाठी असा संपर्क आवश्यक असतो. विलंबित अतिसंवेदनशीलता प्रतिक्रिया [⟶ रोगप्रतिकारक्षमता] कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असे कोशिकीय बदल यामुळेच या क्षेत्रात घडून येतात.

कार्य

लसीका ग्रंथींच्या वर वर्णिलेल्या विशिष्ट रचनेमुळे त्यांच्याकडून पुढील कार्य घडून येते : (१) अभिवाही लसीकेतून येणाऱ्या सूक्ष्मजंतूंचे व इतर कणांचे भक्षिकोशिकांकडून भक्षण व त्यांच्या पुढे जाण्यास अटकाव. (२) रक्तातून व परिघीय लसीकेतून येणारे प्रतिजन शास्त्रयुक्त कोशिकांमध्ये दीर्घकाळ बद्ध करून ते बी-कोशिकांना प्रतिपिंडनिर्मितीस उद्दीपक म्हणून सादर करणे. निर्माण झालेले प्रतिपिंड लसीकेत व रक्तात सोडणे. (३) टी-कोशिकांच्या प्रजननाद्वारे कोशिकीय रोगप्रतिकारक्षमता यंत्रणा कार्यान्वित करणे. त्याचप्रमाणे बी-कोशिकांची निर्मिती करणे.

विकृतिजन्य बदल

शरीरातील निरुपयोगी पदार्थांचे उत्सर्जन करणाऱ्या इंद्रियांना होणारी इजा, सूक्ष्मजीव संक्रामण, शोथ (दाहयुक्त सूज), अर्बुदांचा (नव्या कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्णाण होणाऱ्या गाठींचा) उद्‌भव किंवा अधिहृषताजनक (ॲलर्जी निर्माण करणाऱ्या) पदार्थांशी संपर्क यांमुळे लसीका ग्रंथीच्या आकारमानात वाढ होते आणि एरवी न जाणवणाऱ्या ग्रंथी स्पर्शक्षम होतात. तीव्र पूयजनक संक्रामणांमध्ये त्या मऊ व स्पर्शासह्य (स्पर्श केल्यास वेदना होणाऱ्या) असतात, तर दीर्घकालीन संक्रामणात त्यांची वाढ स्पर्शास दृढ जाणवते. क्षयरोगामध्ये वाढलेल्या ग्रंथी प्रथम जराशा कठीण होतात व लगतच्या ग्रंथी एकमेकींशी अनुबद्ध होतात. नंतर त्यांमध्ये ऊतकमृत्यू झाल्याने पनीरासारखे मऊ द्रव्य निर्माण होऊन ग्रंथींचा स्पर्श बदलतो. अनेक ग्रंथी एकत्र होऊन शीत गळू तयार होते. त्वचेच्या पृष्ठभागापर्यंत हे वेदनाहीन गळू कोटराच्या स्वरूपात पोहोचते व तेथे ते फुटल्यावर व्रण तयार होतो. हा विकार मानेच्या वरच्या भागात ⇨ गंडमाळांच्या रूपात विशेषेकरून आढळतो.

कर्करोगाच्या कोशिकांनी ग्रासलेल्या ग्रंथी अतिशय कठीण व वेड्यावाकड्या होतात आणि आसपासच्या होतात आणि आसपासच्या ऊतकांशी विशेषतः खोलवरच्या भागाशी बद्ध होतात. त्यामुळे जवळपासच्या तंत्रिकांवर (मज्जातंतूंवर) किंवा रक्तवाहिन्यांवर दाब पडून त्यापासूनही काही लक्षणे निर्माण होऊ शकतात.

कोणत्याही रोगाने होणारे बदल प्रथम जवळच्या ग्रंथींमध्ये आढळले, तरी ते हळूहळू दुसऱ्या ग्रथिसमूहांकडे पसरत जातात. लसीकाभ ऊतकांच्या अर्बुदामुळे होणारी वाढ मात्र अनेक समूहांमध्ये एकाच वेळी सुरू होते [उदा., लसीकार्बुदे (हॉजकिन व इतर), श्वेतकोशिकार्बुदे इत्यादी]. रोगनिदानाबद्दल शंका असल्यास पृष्ठस्थ ग्रंथीचे उच्छेदन करून (काही भाग शस्त्रक्रियेने काढून घेऊन) तिच्या जीवोतक परीक्षेवरून अगदी प्राथमिक अवस्थेत निदान करणे शक्य असते. मारक अर्बुदांच्या कोशिका लसीका ग्रंथीच्या आत पोहोचल्यावर काही काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. नंतर लसीकाभ ऊतकाचा नाश करून तेथेच झपाट्याने वाढतात आणि त्यातूनच त्यांचा इतर इंद्रियांकडे लसीका मार्गाने व रक्तमार्गाने प्रसार होतो. त्यामुळे लसीका ग्रंथींमध्ये आक्रमण ही रोगाच्या फलानुमानाच्या (रोगाच्या परिणतीच्या पूर्वानुमानाच्या) दृष्टीने गंभीर स्थिती समजली जाते.


संदर्भ : 1. Anderson, J. R., Ed., Muir's Textbook of Pathology, London, 1985.

2. Humphery, J. H.; White, B. G. Immunology for Medical Students, London, 1970.

3. Last, R. J. Anatomy: Regional and Applied, Edinburgh, 1984.

4. Oglivie, C.; Evans, C. C., Ed., Chamberlian's Symptoms and Signs in Clinical

Medicine, Bristol, 1987.

श्रोत्री, दि. शं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate