অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाहिनी क्लथन

(थ्राँबोसिस). रक्ताचे अभिसरण होत असताना रोहिणी किंवा नीला या वाहिन्यांमध्ये रक्तातील काही घटकांचे द्रवरूपातून स्थित्यंतर (साखळण्याची क्रिया ) झाल्याने गाठ वा गुठळी निर्माण होण्याच्या क्रियेला वाहिनीक्लथन म्हणतात. निरोगी व्यक्तीच्या शरीरात कोठेही जखम झाल्यास तेथील रक्तस्त्राव बंद होण्यासाठी घडून येणारे क्लथन (साखळणे), शरीराबाहेर काढून ठेवलेल्या रक्तामधून रक्तरस वेगळा होत असताना घडणारे क्लथन आणि वाहिनीक्लथन या तिन्ही क्रियांमध्ये मूलभूत साम्य आहे. त्यामध्ये बिंबाणू (रक्तातील वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार, २-३ मायक्रॉन व्यासाच्या तबकड्या; १ मायक्रॉन= मीटरचा दशलक्षांश भाग), विविध क्लथनकारक घटक आणि फायब्रिनोजेन (तंत्वीजन) यांच्या आंतरक्रियांमुळे फायब्रिनाचे (तंत्वीचे) सूक्ष्मजाल निर्माण होते आणि रक्तातील सर्व प्रकारच्या कोशिका (पेशी) त्यात अडकून क्लथ वा गाठ तयार होऊ लागते. ही मऊ गाठ हळूहळू कठीण व आकुंचित होते.

कारणे

प्रवाही रक्तात क्लथनाची क्रिया सुरू होण्यास पुढील तीन प्रकारचे दोष कारणीभूत असू शकतात. रुडोल्फ फिरखो (१८२१ – १९०२) या जर्मन विकृतिवैज्ञानिकांनी यांचे प्रथम वर्णन केले म्हणून त्यांना ‘फिरखोत्रय’ म्हणतात : (१) रक्ताची क्लथनशीलता (साखळण्याची क्षमता ) वाढणे. बिंबाणूंची संख्या व पर्यायाने असंजकता (चिकटपणा) वाढल्याने असे होऊ शकते. (२) वाहिन्यांमध्ये अंशतः अडथळा आल्याने किंवा हृदयाच्या अकार्यक्षमतेमुळे रक्तप्रवाहाचा वेग मंदावणे. रोहिणीपेक्षा नीलेतील रक्तप्रवाहाचा वेग बराच कमी असल्याने नीलेत क्लथन होण्याची अधिक शक्यता असते. (३) वाहिनीभित्तीच्या अंतःस्तरास झालेली इजा, विकारामुळे होणारा अपकर्ष (ऱ्हास), जंतुसंसर्ग किंवा अन्य कारणांमुळे वाहिनीचा आतील पृष्ठभाग गुळगुळीत न राहता खरबरीत होणे. खरबरीत भागावर बिंबाणू सहज चिकटतात. अशा रीतीने होणाऱ्या क्लथनाची अधिक तपशीलवार माहिती आता झालेली आहे. क्लथनास कारणीभूत होणारे सु. सोळा घटक रक्तात आढळले आहेत. यांपैकी बहुतेक प्रत्येक घटकाचे एखाद्या अन्य घटकाकडून सक्रियण (अधिक क्रियाशील बनविण्याची क्रिया) होऊन ही संपूर्ण प्रक्रिया प्रपातमालेप्रमाणे टप्याटप्याने घडून येते, असे दिसते. [⟶ रक्तक्लथन].

शरीराबाहेर काढलेल्या रक्तात ही क्लथनक्रिया फायब्रीन पूर्णपणे संपेपर्यंत चालू राहते व सर्व कोशिका फायब्रिनाच्या जालात अडकतात. वाहिनीक्लथनामध्ये मात्र एका विशिष्ट आकारमानाची गाठ तयार झाल्यावर प्रक्रिया थांबते व क्लथन तेवढ्या भागापुरते मर्यादित राहते. रक्तातील ‘प्रथिन सी’ व ‘प्रिथिन एस’ या के जीवनसत्त्वावर अवलंबित अशा दोन क्लथनविरोधी घटकांकडून हे नियंत्रण होत असावे. यांशिवाय थॉंब्रिनाच्या क्रियेला विरोध करून रक्तातील हा बदल थांबविणारी पाच-सहा अँटिथ्राँबीन (एटी; थ्राँबिनाला अक्रिय बनविणारी) द्रव्ये सापडली आहेत. यकृतातील प्रसित (क्षारकीय रंजन सहजपणे होणाऱ्या अनेक कणिकांनी युक्त अशा मोठ्या) कोशिकांमध्ये असणारे हेपॉरीन हे द्रव्यही क्लथनास विरोध करते.

वाहिनीक्लथनाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, ते प्रवाही रक्तात घडून येते व क्लथाची संरचना विषम असते. क्लथनाची सुरुवात जेथे होते त्या ठिकाणी वाहिनीच्या अंतःस्तरास इजा झाल्यामुळे बिंबाणूंचे पुंज आणि श्वेतकोशिका यांचा फायब्रिनाने बद्ध असा गोळा तयार होतो. त्याला क्लथाचे शीर्ष वा डोके म्हणतात. तेथून रक्तप्रवाहाच्या दिशेने पसरलेल्या निमुळत्या भागामध्ये बिंबाणू कमी असून फायब्रीन व तांबड्या कोशिकांचे प्रमाण जास्त असते. हे क्लथाचे पुच्छ वा शेपूट म्हणता येईल. वाहिनीबाहेर होणाऱ्या क्लथनात असा भेद आढळत नाही. नीलेमधील क्लथाचे शीर्ष लहान असते. बऱ्याच वेळा ते झडपेजवळ अंतःस्तरास चिकटलेले असते. त्यापासून सुरू होणारे लाल पुच्छ मात्र बरेच लांब असू शकते. याउलट रोहिणीतील बिंबाणुप्रधान शीर्ष बरेच मोठे असते व कधीकधी त्यामुळे रक्तप्रवाह पूर्णपणे थांबू शकतो. अडथळा पूर्ण नसल्यास किंवा सुरूवातील असलेला अडथळा क्लथप्रत्याकर्षणाने (आत वा मागे ओढला गेल्याने) अंशतः दूर झाल्यास रक्तप्रवाहात तरंगणारे फायब्रीनयुक्त पुच्छ तयार होते.

वाहिनीक्लथनाची शक्यता वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे वाहिनीशोथ [वाहिनीभित्तीची दाहयुक्त सूज; ⟶ नीलाशोथ], अंतःस्तराचा वसापकर्ष (कोशिकांत वसेचे-मेदाचे-कण साचून उतकांचा-समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहांचा-ऱ्हास होणे), दीर्घकाल अंथरुणावर पडून रहावे लागणे, मोठ्या शस्त्रक्रिया, नीलेमध्ये वरचेवर अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) औषधे अथवा द्रव पदार्थ देणे; वाहिनीमार्गावर दीर्घकाल दाब उत्पन्न करणारी अर्बुदे (कोशिकांच्या अत्याधिक वाढीने बनलेल्या व शरीरास निरुपयोगी अशा गाठी), जलोदर, घट्ट बांधलेले पट्टे इ. होत. आर्सेनिक, पारा, सर्पविषे, गर्भिणी विषबाधा [⟶ गर्भारपणा], सर्वांग भाजणे यांमुळेही वाहिनीक्लथन होऊ शकते. झडपांवर संधिवातामुळे चामखिळीसारखा अंकुरोद्‌भव होतो. त्यावर आणि तंतुक आकुंचनामुळे (हृदयाच्या स्नायूच्या तंतूंच्या अतिजलदपणे होणाऱ्या अनियमित आकुंचनामुळे) अलिंदाच्या (जिच्यात नीलांमार्फत रक्त येते व जिच्यातून ते निलयात पाठविले जाते त्या) पोकळीत रक्तसंचय होते. त्यांमध्येही वाहिनीक्लथनाची शक्यता जास्त असते. स्त्रीमदजनक व गर्भरक्षक हॉर्मोने (उत्तेजक स्त्रावाप्रमाणे कार्य करणारी संयुगे) असलेल्या प्रतिबंधक गोळ्यांच्या अनिष्ट परिणामातील एक परिणाम म्हणूनही वाहिनीक्लथनाचा उल्लेख केला जातो.

परिणाम व लक्षणे

वाहिनीक्लथनाने रक्तप्रवाहात अंशतः अडथळा आला, तरी संबंधित ऊतकाची कार्यक्षमता घटते. तीव्र रोधामध्ये रक्तातील पोषक द्रव्ये, ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे वेदना, ऊतकहानी किंवा अभिकोथ (एक प्रकारचा ऊतकमृत्यू) हे परिणाम होतात. रोहिणीक्लथनाच्या परिणामांची गंभीरता त्या इंद्रियाचे शरीरक्रियेतील महत्त्व, पर्यायी वाहिन्यांची उपलब्धता, क्लथनाची पूर्णता आणि त्यामुळे होणारा अडथळा किती काळ टिकला आहे यांवर अवलंबून असते. उदा., हृदयाच्या रोहिणीमध्ये क्लथन झाल्यावर (हृदयविकाराचा झटका) रक्ताभिसरणात तत्काळ बाधा येते; रक्तदाब कमी होतो आणि तीव्र वेदना होऊ लागतात. अशा वेदनांमुळे अस्वस्थ होऊन रुग्णाने जास्त हालचाल केल्यास मृत्यूचाही धोका असतो. मेंदूच्या रोहिणीक्लथनाने विशिष्ट क्षेत्रातील तंत्रिका कोशिकांचे (मज्जापेशींचे) कार्य कमी होऊन त्यांनी नियंत्रित केलेला शरीराचा भाग दुर्बल होतो किंवा पूर्णपणे बलहीन (पक्षाघात किंवा अंगघात) होतो. क्लथन जर पूर्ण किंवा विस्तृत असेल, तर असंख्य कोशिकांचा मृत्यू होतो व त्या परत निर्माण होऊ शकत नसल्याने कायमचे अपंगत्व येते. पायाच्या रोहिणीत होणाऱ्या अवरोधी वाहिनीक्लथनशोथ या रोगात मधूनमधून वेदना आणि लंगडणे अशी लक्षणे दिसतात.

नीलाक्लथनांमुळे रक्ताचा निचरा होण्यात अडथळा येतो. निचराक्षेत्रात सूज निर्माण होते. सोबत नीलाशोथ व जंतुसंक्रमण असल्यास आजूबाजूच्या क्षेत्रातील ऊतकांमध्ये पूतियुक्त शोथ ( पू असणारी दाहयुक्त सूज) पसरू लागते. आंत्र (आतडे) किंवा वृक्क (मूत्रपिंड) यांच्या नीलांमध्ये क्लथन झाल्यास विष्ठेमध्ये अथवा मूत्रात रक्त दिसून येते. नीलाक्लथाचे पुच्छ मुख्य भागापासून तुटून रक्तप्रवाहाबरोबर हृदयाच्या दिशेने वाहत जाऊन तेथून फुफ्फुसाच्या रोहिणीत पोहोचल्यास तेथे अंतर्कीलनाचा [ रक्तप्रवाह बंद पडण्याचा; ⟶ अंतर्कीलन] धोका असतो. मोठ्या रोहिणीत निर्माण झालेल्या क्लथाचा एखादा भाग तुटून जर प्रवाहात गेला, तर पुढे असलेल्या एखाद्या लहान रोहिणीत असेच अंतर्कीलन होऊ शकते. अंतर्कीलनामुळे त्या विशिष्ट रोहिणीच्या पुरवठा क्षेत्रातील ऊतकांचा मृत्यू होऊन अभिकोथ दिसू लागतो.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate