অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेबीज रोगाकडे नको दुर्लक्ष

रेबीज हा अतिशय तीव्र स्वरूपाचा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे. रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे. हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो. रोगाची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे.
रेबीज हा रोग कोल्हा, लांडगा, तरस, वटवाघूळ, मुंगूस, घुबड या सगळ्या जंगली प्राण्यांत व गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुगरे, उंट, घोडा, कुत्रा यांसारख्या पाळीव प्राण्यांतही आढळून येतो. 
1) रेबीज रोगाचे विषाणू हे अतिसूक्ष्म 30 - 300 नॅनोमीटर लांब आणि 70 - 75 नॅनोमीटर रुंद असून, त्यांचा आकार बंदुकीच्या गोळीसारखा असतो. 
2) हे विषाणू बाधित प्राण्याने चावा घेतल्यानंतर त्याच्या लाळेतून जखमेत शिरतात. तेथून मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात. तेथे विषाणूंची वाढ होते व नंतर ते लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथीत स्थिरावतात. 
3) त्यानंतर लाळेच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होतो.

इन्फो रोगाची लक्षणे

1) रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे म्हणजेच हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो. 
2) कुत्रा चावल्यानंतर 3 ते 8 आठवड्यांत या रोगाची लक्षणे दिसून येतात; परंतु चावा मेंदूपासून किती अंतरावर घेतलेला आहे उदा. चेहरा, मान, खांदा, हात, बोटे, पाय नुसार रोग लक्षणे दाखविण्याचा कालावधी हा कमी-जास्त असू शकतो. 
3) काही वेळेस हा कालावधी 12 ते 23 महिने किंवा त्याहीपेक्षा अधिक महिन्यांचा/ वर्षांचा आढळून येतो. 
4) प्राण्यांप्रमाणेच माणसांमध्येही या रोगाची लक्षणे आढळतात. सुरवातीला ताप येणे, डोके व अंग दुखणे, स्नायू अडकणे, भूक मंदावणे, घसा खवखवणे, उलट्या होणे, पोटाचा दाह होणे अशी लक्षणे दिसून येतात. 
5) माणसांमध्ये जसजसा आजार वाढत जातो तसतशी संवेदनशीलता जास्त प्रमाणात दिसून येते. 
प्रकाश, आवाज व पाणी यांची भीती निर्माण होते. पाण्याची जास्त प्रमाणात भीती निर्माण होणे याला हायड्रोफोबिया म्हणतात. 
5) रेबीजच्या प्रादुर्भावामुळे नाडीचे ठोके वाढतात, बाहुल्या विस्फुरतात, बुबुळे मोठी होतात, डोळ्यांतून पाणी येते, माने व जबड्याभोवतालचे स्नायू आकडले गेल्यामुळे तोंडातून लाळ व फेस येतो, श्‍वसनास त्रास होऊन रुग्ण कोमात जातो. शेवटी त्याचा मृत्यू होतो.

इन्फो उपाययोजना

1) आपल्याकडे प्रामुख्याने हा आजार बाधित कुत्रा चावल्यामुळे दिसून येतो. 
2) त्यामुळे कुत्र्याने चावा घेतलेली किंवा ओरखडलेली कोणतीही जखम असो, ती सर्वप्रथम पुष्कळ पाणी व साबणाने दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत स्वच्छ धुवावी. एक टक्का पोटॅशियम परमॅंगेनेटचे द्रावणही धुण्यासाठी वापरता येते. 
3) यानंतर जंतुनाशक लावावे. लगेचच दवाखान्यात जाऊन डॉक्‍टरांच्या सल्ल्याने कुत्रा चावल्यानंतरचे लसीकरण करून घ्यावे. 
लसीकरण ः
1) पहिला प्रकार - कुत्रा चावण्यापूर्वी लसीकरण करणे. 
2) दुसरा प्रकार - कुत्रा चावल्यानंतर लसीकरण करणे.

इन्फो रोगाचे प्रकार

रेबीज या रोगाची लक्षणे फ्युरीअस आणि पॅरालायटिक अशा दोन प्रकारांत आढळून येतात.
1) फ्युरीअस प्रकार ः

  • आवाजातील बदल तसेच तोंडातून लाळ, फेस येणे आणि शेपटी मागील दोन्ही पायांच्या मध्ये असणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे.
  • फ्युरीअस प्रकार या प्रकारात बाधित प्राणी हे अस्वस्थ व रागीट होतात.
  • प्राण्याची भूक मंदावते, विनाकारण इतरांवर भुंकतात, सैरावैरा धावतात.
  • रागीट बनून मालकावरही हल्ला करतात, निर्भिड होतात.
  • प्रकाश व आवाजाला जास्त संवेदनशील होतात. काही वेळेस अंधाऱ्या कोपऱ्यातही दडून बसतात.
  • आवाजात बदल होऊन घोगरा बनतो.
  • सतत लाळ गाळतात.
  • डोळ्यांची बुबुळे विस्फुरतात, बाहुल्या मोठ्या होतात, पापण्या लवत नाहीत.
  • अशी लक्षणे दाखविल्यानंतर साधारणतः 2 ते 4 दिवसांत गाई-म्हशींचा मृत्यू होतो, तर कुत्र्यामंध्ये 8 ते 10 दिवसांत मृत्यू होतो.

2) पॅरालायटिक प्रकार ः 
1) या प्रकारात हळूहळू लकव्याची लक्षणे दिसून येतात. मुख्यतः जबड्याकडील भागाला लकवा होतो. 
2) जनावरे अन्न, पाणी घेऊ शकत नाहीत. जबड्याला लकवा झाल्यामुळे जनावरे तोंड उघडू शकत नाहीत. 
3) जनावरे जास्त प्रमाणात लाळ गाळतात. पाण्याची भीती निर्माण होते. यालाच हायड्रोफोबिया असे म्हणतात. 
4) जबडा व गळ्याभोवतीच्या मांसपेशी पॅरालाईज्ड झाल्यामुळे श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो. शेवटी कोमात जाऊन प्राण्याचा 6 ते 7 दिवसांत मृत्यू होतो. 
----------------------------------------------------------------------- 
संपर्क ः डॉ. विजय बसुनाथे ः 7709068544 
(डॉ. शीला बनकर या कोराडी येथे पशुधन विकास अधिकारी आहेत, तर डॉ. विजय बसुनाथे हे नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत आहेत)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate