मानवी जीवन हा एक सतत संघर्ष आहे. आदिमानवांनी जेव्हा पहिल्यावहिल्या शिकारी केल्या असतील किंवा अन्नाच्या शोधात वणवण केली असेल तेव्हापासून कितीतरी धोके त्याच्या मागे आहेत. असे कितीतरी आदिमानव श्वापदांचे बळी ठरले असतील,कितीतरी जखमा त्यांनी सोसल्या असतील. मनुष्य आता कितीतरी प्रगत झाला आहे. काही थोडे मनुष्यसमूह अजूनही 'कंदमुळे-फळे-शिकार' या जीवनचक्रात असले तरी बहुसंख्य लोक अनेकविध कामधंदे करतात. संगणकयुगात तर अनेक गोष्टी बटन दाबून घडू शकतात. पण आदिमानवांना जसे व्यावसायिक धोके होते तसे आजही सर्वत्र आहेत, फक्त व्यावसायागणिक त्यांचा प्रकार बदलला आहे. व्यवसायही काही चांगले तर काही मनुष्यजातीला कलंक लावणारे (उदा. वेश्याव्यवसाय आणि भंगीकाम). प्रत्येक कामधंद्याचा माणसाच्या शरीरमनावर बरावाईट परिणाम होतो. काही व्यवसायांचा शरीराच्या काही भागांवर चांगला परिणामही होतो, उदा. लोहाराचे पीळदार स्नायू किंवा डोंबा-याचे लवचीक शरीर. पण या व्यवसायातही धोके, आजार आहेतच.
व्यावसायिक दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाय करणे हे आता एक शास्त्र झाले आहे. कारखान्यांमध्ये कामगारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कायदे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर यासाठी संघटनाही आहे. ही संघटना (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) सर्व देशांमध्ये कामगारांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पाहण्या करते व सुधारणा सुचवते. मात्र भारतासारख्या देशात कारखान्यांच्या बाहेरच जास्त कामकरी जनता आहे. तिचे आरोग्य पाहण्यासाठी काहीही यंत्रणा नाही. उदा. शेतीव्यवसायातल्या लोकांचे आजार व त्यात असलेले धोके याबद्दल फारसे संशोधन झालेले नाही. असंघटित कामगार,बालकामगार, वेश्या, भंगीकाम करणारे, इ. गट असेच दुर्लक्षित आहेत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...