राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात गावपातळीवर आशा कार्यकर्तीचे खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात आशाची निवड ग्रामपंचायत/ग्रामसभेकडून होते.10वी झालेल्या स्त्रियांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना निरनिराळया कामांसाठी मोबदला मिळतो. त्यातून त्यांना महिन्याला सुमारे 1000 ते 1500 रु. मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गावाच्या सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी पुढील महत्त्वाची कामे अपेक्षित आहेत.
गावातील लोकांना समजून घेणे
खेडेगावातले बहुतेक लोक शहरी उच्च-मध्यमवर्गीय लोकांसारखे श्रीमंत नसतात. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ते शेतीवर अवलंबून असतात. काही लोक जवळपासच्या शहरांमध्ये मजुरीही करतात. गावांमध्ये पोट भरण्याकरता काही लोक गुरे सांभाळण्याचे काम करतात. बहुतेक शेतकरी पावसावर अवलंबून असतात. अनेकजण कारागीर म्हणून काम करतात. जगण्यासाठी या सर्वांनाच खूप कष्ट करावे लागतात. यातही काही लोक खूपच गरीब असतात. सरकारी भाषेत त्यांना दारिद्रयरेषेखालील लोक असे म्हणतात. अनेकदा ते मागासवर्गीय, आदिवासी किंवा अशाच कठीण परिस्थितीतले लोक असतात. दारिद्रयरेषेखालच्या कुटुंबांना सरकारी योजनांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. ब-याच गावात जातींनुसार वस्त्या आढळतात. आरोग्य सेवा सर्वांनाच आवश्यक असते. परंतु काही लोक आजारपणाला अधिक सहजपणे बळी पडतात. गरीब जनता, स्त्रिया, तान्ही आणि वाढत्या वयातली मुले, आणि म्हातारी माणसे यांना आरोग्यसेवांची अधिक गरज पडते. त्यांच्या आरोग्याच्या गरजांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यांच्याकडे पैसे कमी असतात किंवा कधी अजिबातच पैसे नसतात. आपल्या मुलांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी किंवा औषधे विकत घेण्यासाठी त्यांना प्रसंगी जास्त व्याजाने कर्ज काढावे लागते. अशा लोकांना योग्य वेळी चांगली आणि परवडेल अशी सेवा मिळवून देण्यासाठी आपला खूप मोठा वाटा असेल. हाताशी असलेलीच साधने वापरून आपले प्रश्न कसे सोडवायचे ते खेडयातल्या लोकांना चांगले ठाऊक असते. म्हणूनच गावाचा आरोग्य आराखडा तयार करण्यामध्ये, गावातील लोकांच्या आरोग्याच्या गरजा शोधण्यामध्ये आपण सर्वांची मदत घ्यावी.
गावाचे आरोग्य नियोजन (सूक्ष्म नियोजन)
गावाच्या आरोग्य नियोजनात भाग घेऊन नर्सताई, अंगणवाडी ताई आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आपण मदत करायची आहे. गावातील आरोग्यासंबंधीच्या पुढील सर्व कामांचा हा पाया असेल. गावाच्या आरोग्य नियोजनामुळे आपल्याला आरोग्यासंबंधीचे महत्त्वाचे प्रश्न कोणते हे ठरवता येईल. ते सोडविण्याकरता कृती आराखडा तयार करता येईल. यात सर्वांनीच भाग घ्यायला हवा. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते,शिक्षक, बचत गटाचे सदस्य हे सर्वच या सूक्ष्म नियोजनात असावेत. अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, स्त्रिया व अशा इतर वंचित गटांना या नियोजनात सामावून घेतले पाहिजे. नियोजनात भाग घेणा-या लोकांचीच पुढे उपाय सुचवण्यात आणि काम करण्यातही मदत होते.
आरोग्य संवाद
आरोग्यविषयक माहिती घेणे-देणे आणि त्यासंबंधी एकमेकांत संवाद होणे हे गोळया,इंजेक्शनांपेक्षाही महत्त्वाचे आहे. योग्य माहिती व सल्ल्यामुळे लोक आजार टाळू शकतील व निरोगी राहतील. आरोग्याची माहिती ही एक प्रकारची कायमची ठेवच आहे. आज गावातल्या लोकांना, विशेषतः गरीब महिला, मुले, वाढत्या वयातली मुले यांना आरोग्याची माहिती मिळू शकत नाही. ही माहिती देऊन आपण त्यांची मोठी मदत करू शकतो. या माहितीमुळे हानीकारक सवयी बदलून चांगल्या आरोग्यदायी सवयी लागण्यास मदत होईल.
अंगणवाडी , दाई , नर्स , बहुउद्देशीय कार्यकर्ता यांच्याशी सहकार्य
आरोग्यासाठी काम करणा-या इतर व्यक्तींचीही आपल्या कामात जोड मिळाली तर त्याचा खूप उपयोग होईल. आपल्या गावात अंगणवाडी ताई, दाई तसेच उपचार करणा-या काही इतर व्यक्ती असतात. त्यांच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊ या.
आरोग्यविषयक समुपदेशन
समुपदेशन म्हणजे व्यक्तिगत सल्लामसलत. अनेक लोकांना आपल्या आरोग्याबद्दलच्या समस्यांची उत्तरे शोधण्याकरता मदत लागते. खालील आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये आपण त्यांना मदत करू शकतो.
- गरोदरपण व बाळंतपण
- गर्भपात
- वंध्यत्व किंवा मूल न होणे
- बाळाचे आरोग्य व पोषण
- लसीकरण
- संततिप्रतिबंधाच्या अपूर्ण गरजा
- किशोरवयातल्या मुलांचे आरोग्य
- लैंगिक आजार किंवा एड्स यांसारखे आजार. तसेच लपून राहणारे रोग कॅन्सर, टी.बी,कुष्ठरोग यांसारखे जास्त मुदतीचे आजार शोधून काढणे.
- सोप्या उपचारांची निवड.
समुपदेशनाकरता त्या विषयाचे ज्ञान आवश्यक असते. आपले ज्ञान अनुभवाने तसेच वाचन व चर्चेतून वाढते. समुपदेशनाकरता निरनिराळया व्यक्तींशी संवाद करण्याचे तंत्रही शिकून घ्यावे लागते. मुख्य म्हणजे समोरच्या माणसाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचे तंत्र. स्त्री, पुरुष, तरुण, वृध्द अशा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. यासाठी लोकांचे दुःख व त्यांचे अनुभव सहानुभूतीने समजून घेणे जरुरीचे असते. समुपदेशनात मन वळवण्याचे तंत्रही लागते. निरनिराळया प्रश्नांची उत्तरे निरनिराळया पध्दतीने मिळतात. म्हणूनच मन वळवण्याची गरज जाणवते. आपण आपापल्या कुटुंबामध्ये हे करतच असतो. अशाच पध्दतीने अनेक पर्यांयांचा बरावाईट विचार करून आपण निर्णय घेत असतो. पण काही वेळा आपल्यालाही या सर्व विषयांची पूर्ण माहिती देणे शक्य नसते. मात्र गरज पडल्यास मदत कुठे मिळेल हे ठरवण्यात आपण लोकांना मदत करू शकतो. प्राप्त परिस्थितीत कोणकोणते उपाय करणे शक्य आहे हेही आपण लोकांना सांगू शकू. पुन्हापुन्हा भेटून, मिळालेल्या मदतीचा ते कसा उपयोग करीत आहेत हेही आपण पाहू शकू. काही समस्या असल्यास पर्याय सुचवू शकू.
रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत
अनेक लोकांना विशेष उपचारासाठी एखाद्या मोठया गावात वा शहरात न्यावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना बावरल्यासारखे किंवा हरवल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत त्यांना अनेक अडचणीही येतात. शिवाय घरातली मुले, जनावरे यांच्याकडे पाहायला किंवा शेतीच्या कामांकरिता किंवा रोजगाराकरता कुटुंबातल्या काही माणसांना घरीच थांबावे लागते. अशा वेळी शक्य असल्यास सोबत म्हणून आजारी माणसाबरोबर आपण जावे. याप्रकारे अडल्या नडल्याला आपण योग्य मदत मिळवून देऊ शकतो. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे की समूह आरोग्य केंद्रात की जिल्हा रुग्णालयात हे ठरविण्यासही आपण मदत करू शकू. ही केंद्रे दूर असल्यास एखाद्या खाजगी वा सेवाभावी रुग्णालयाची निवडही लोक करू शकतात. काही प्रसंग कठीण असतात उदा. बाळंतपणात किंवा त्यानंतर जास्त अंगावर जाणे. सोबतीची जरूर भासेल असे काही प्रसंग म्हणजे :
- गरोदरपणातल्या अडचणी किंवा बाळंतीण अडल्यास.
- गर्भपात किंवा जास्त प्रमाणात अंगावर जाणे
- जास्त आजारी असलेले मूल
- मेंदूज्वरासारख्या गंभीर रोगाचा रुग्ण
- टी.बी किंवा एच.आय.व्ही. ची चाचणी करून घेण्याकरता निघालेली व्यक्ती.
- साप चावणे, भाजणे, गंभीर इजा वा विषबाधा यांसारखे अपघात.
- तांबी बसवायला किंवा संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी इच्छुक मंडळी
- यासाठी आपल्यापाशी ही थोडी माहिती व कौशल्ये असायला हवीत.
- कोणते रुग्णालय केव्हा योग्य ठरेल? त्याचे इथून अंतर व खर्च किती?
- कुटुंबाला निर्णय घेण्यास मदत करा. कुठे जायचे हे तुम्ही कुटुंबाशी बोलूनच ठरवायला हवे.
- गावकऱ्यांच्या किंवा पंचायतीच्या मदतीने वाहनाची व्यवस्था करायला हवी.
- रुग्णालयास आधी कळवता आले तर फार चांगले. फोनचाही वापर करण्यास शिकले पाहिजे. (मोबाईल फारच उपयुक्त असतो.)
योग्य व वेळेवर मिळालेल्या प्रथमोपचाराने व सोबतीने जीव वाचू शकतात तसेच धोकेही टळू शकतात. यामुळे आपल्यात आणि त्या कुटुंबात आपुलकी तर वाढतेच पण गावातील इतर माणसांचा आपल्यावरचा विश्वासही वाढतो. यामुळे रुग्णालयाशीही आपले चांगले संबंध तयार होतात.
प्राथमिक वैद्यकीय सेवा
लोकांना अनेक कारणांकरता उपचाराची गरज भासते. त्यांना आपण योग्य आणि चांगली प्राथमिक वैद्यकीय सेवा मिळवून दिली पाहिजे. योग्य प्राथमिक वैद्यकीय सेवा मिळाल्याने कुटुंबाचा वेळ व पैसा यांची बचत होते. यामुळे आरोग्याला धोकादायक असणा-या तसेच जीवावर बेतणा-या प्रसंगांपासून बचाव होतो. गावातील आपले काम सोपे होते कारण आपल्या सेवेचे महत्त्व लोकांना कळते. आपण यासाठी काय काय करू शकतो
- साध्यासोप्या आजारांवर (उदा. सर्दी खोकल्यावर) साधा, सोपा इलाज करणे. बहुतेक आजार साध्या प्रकारचेच असतात.
- मध्यम प्रकारच्या आजारात (उदा. जुलाबावर) उपचार करणे आणि धोक्याच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे. जरूर वाटल्यास अन्य ठिकाणी उपचारासाठी पाठवणे.
- जास्त मुदतीच्या आजाराचे लवकर निदान होण्याकरता मदत करणे. उदा. टी.बी. किंवा कॅन्सर. रुग्णास उपचाराकरिता योग्य ठिकाणी पाठवणे ही मदत फार महत्त्वाची आहे.
- अपघातानंतर इतर ठिकाणी नेण्याआधी योग्य प्रथमोपचार करणे.
- राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी साधने व औषधसाठा ठेवणे.
- उपचारात काळजी मात्र घ्यायला हवी
- आपल्याला ज्याची पूर्ण माहिती असेल तेवढेच उपचार आपण करावेत. जरूर तिथे मदत मागा. या पुस्तकात सांगितलेल्या औषधे व उपचारांचाच वापर करा. वेगळे काही करु नका.
- कोणताही साधा मध्यम आजार बरा होण्याकरता दोन दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू नये,डॉक्टरांकडे न्यावे.
- गंभीर आजारासाठी ताबडतोब डॉक्टरकडे पाठवा.
- आपण वापरत असलेल्या औषधांचे इतर काय परिणाम होतात याची माहितीसुध्दा रुग्णाला द्यायला हवी.
- काही आजारांमध्ये पुढचे धोके आधीच समजावून सांगा. उदा. बाळदमा असल्यास त्यातून न्यूमोनिया होऊ शकतो.
- रोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ते सांगा. चांगले आरोग्य राखायलाही शिकवा.
- औषधांचा साठा सुरक्षित आणि नेहमी तयार ठेवा. लहान मुलांपासून तो दूर ठेवा.
- घडलेल्या घटना योग्य पध्दतीने लिहून ठेवा.
- औषधांविषयी गावातील नर्सताईकडून अधिक माहिती मिळवा.
नोंदी व अहवाल
प्रत्येक जन्माची किंवा जन्मतःच मृत्यू झाल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये 14 दिवसांच्या आत करायला हवी. प्रत्येक मृत्यूची नोंद ग्रामपंचायतीत 7 दिवसांच्या आत करायला हवी. आपल्या कामाच्या नोंदी 'आशा'च्या नोंदवहीत किंवा डायरीत कराव्यात. आपले अनुभव,अडचणी किंवा विचार नोंदविण्याकरता स्वतंत्र डायरी ठेवा. आपल्या नोंदी बैठकीच्या वेळेस अंगणवाडीच्या किंवा उपकेंद्राच्या नोंदींशी ताडून पहा. आपल्या गावात मुलींपेक्षा मुलगेच जास्त जन्माला येतात असे वाटले तर गर्भलिंग चाचणी व गर्भपात होत असतील. गर्भलिंग चाचणी रोखायला आपण काय करू शकतो ते पुस्तकात पुढे येईलच. कोणत्याही साथरोगाची अचानक गावात लागण झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिका-यास,जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण खबर देऊ शकतो. या नेहमीच्या आठ कामांशिवाय आणखी दोन कामे आपण करायची आहेत.
आपत्ती व्यवस्थापन
जेव्हा पूर, आग, अपघात इ. आपत्ती येतात तेव्हा आपण सर्वांची मदत करावी. यासाठी काही विशेष प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
कुपोषणाची मोठी लढाई
आपल्या देशात 50% मुलेबाळे निरनिराळया प्रकारे कुपोषित असतात. त्याची उंची तरी कमी असते किंवा वजन तरी. यासाठी मोठेच लोकशिक्षण करावे लागेल. प्रथम कुपोषण कशाला म्हणावे याचीच जाणीव महत्त्वाची आहे. सामाजिक व कौटुंबिक स्तरावर यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. केवळ अंगणवाडीने हे काम होणार नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या