विद्युत वापरासाठीच्या घरगुती, शेती, उद्योग इत्यादीमधील संचमांडणीच्या कामाची उभारणी, देखभाल व दुरूस्तीची कामे ही योग्य तांत्रिक ज्ञान असलेल्या, मान्यताप्राप्त व प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करवून घ्यावी.
विद्युत संचमांडणीमध्ये वापरण्यात येणारे साहित्य व उपकरणे ही दर्जेदार व शक्यतो आय.एस.आय. प्रमाणित असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत संचमांडणीत कार्यक्षम अर्थिंग (भूसंबंधन) असणे अत्यावश्यक आहे व सर्व विद्युत उपकरणे कार्यक्षम अर्थिंगसोबत जोडलेली असावीत. विद्युत संचमांडणीत इ.एल.सी.बी. चा वापर असावा. संचमांडणीतील वायर्स व इतर साहित्य विद्युत भारानुसार योग्य क्षमतेचे असावे. वापरण्यात येणारी उपकरणे अर्थिंग कॉर्डसह, 3-पीन सप्लाय कॉर्डचीच असावी. स्वीच बोर्ड, प्लग सॉकेट्स इत्यादी लहान मुलांचा हात सहज पोहचेल, अशा ठिकाणी लावू नयेत. प्लग सॉकेट्समधून विद्युत पुरवठा घेताना उघड्या वायर्स प्लग सॉकेट्समध्ये न खोचता, थ्री पीन टॉपचाच वापर करावा. एकाच सॉकेटमध्ये अनेक प्लग-पीन वापरून ओव्हरलोडिंग न करता वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे प्लग-पीन वापरावेत.
विद्युत उपकरणे विद्युत पुरवठ्याशी जोडलेली असताना ती ओल्या हाताने हाताळू नये. विद्युत पुरवठ्याचे स्वीच ओल्या हातांनी चालू/बंद करू नये. शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर करू नये, तसेच मुख्य विद्युत प्रवाह त्वरीत बंद करावा. मीटर रूम, पंपरूम, लिफ्ट मशीन रूमचा वापर सामान ठेवण्यासाठी करू नये. लघुदाब/उच्चदाब वाहिन्यांच्याजवळ मुलांना पतंग उडवू देवू नये. विद्युतवाहक ताराजवळ कपडे वाळत घालू नये.
कपडे वाळत घालण्यासाठी वापरलेली धातूची तार किंवा वायर ही कुठल्याही माध्यमातून, विद्युतभारीत तारेशी, अर्थिंग तारेशी, विद्युत उपकरणाशी किंवा विद्युतवाहिनीच्या खांबाशी संपर्कात आलेली नसेल, याची निश्चित खात्री करावी. शक्यतो विद्युत वाहक तारेचा किंवा वायरचा वापर कपडे वाळत घालण्यासाठी करू नये. विजेच्या ताराखाली किंवा त्या तारांपासून असुरक्षित अंतरापर्यंत घराचे अथवा कुठलेही बांधकाम करू नये. विद्युत वाहिनीजवळील झाडे उपरी तारमार्गाच्या संपर्कात येत असल्यास ती तोडण्यापूर्वी त्याची सूचना वीज पुरवठाकार कंपनीस द्यावी. त्यांच्याकडून तारमार्गातील विद्युत पुरवठा बंद केल्यानंतरच झाडे तोडण्याची कामे करण्यात यावीत. अति आत्मविश्वास बाळगून विद्युतभारीत विजसंच मांडणीतील दुरूस्तीची कामे करण्यात येवू नयेत.
लेखक - दिनेश ज. खोंडे,
अधीक्षक अभियंता,
प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, ऊर्जा व कामगार विभाग, नागपूर
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/15/2020
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...