निरनिराळ्या कारखान्यांतून आणि औद्योगिक वसाहतींतून उत्पादन होत असताना निरुपयोगी झालेला माल किंवा वस्तू म्हणजे ‘औद्योगिक अपशिष्ट’ होय. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात औद्योगिकीकरणाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानातही वेगाने प्रगती होत गेली. निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगांत स्वयंचलित यंत्रे, जीवाश्म इंधने, कच्चा माल इत्यादींचा वापर वाढत जाऊन औद्योगिक उत्पादनांत प्रचंड वाढ झाली. वाढत्या औद्योगिक उत्पादनांबरोबरच प्रचंड प्रमाणात अपायकारक अशा औद्योगिक अपशिष्टांचीही निर्मिती होत गेली.
खनिज तेल शुध्दीकरण, विविध रासायनिक उद्योग, रासायनिक खते, साखर, सिमेंट, औषधनिर्मिती, रंगनिर्मिती, रंजनक्रिया, कॉस्टिक सोडा निर्मिती, चर्मोद्योग, कागदाचा लगदा व कागदनिर्मिती, कीटकनाशके व मद्यनिर्मिती, औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प, लोह व पोलाद उद्योग, वस्त्रोद्योग, रबर व प्लॅस्टिक निर्मिती, भाजीपाला, फळे, दूध व अन्न- प्रक्रिया, बांधकाम व्यवसाय, खाण उद्योग, यंत्रसामग्री-निर्मिती, जस्त, बॉक्साइट, तांबे इ. खनिजांचे शुध्दीकरण, आवेष्टन उद्योग अशा विविध उद्योगांतून दररोज हजारो टन घन, द्रव व वायुरूपातील विषारी आणि अपायकारक अपशिष्टांची व प्रदूषकांची निर्मिती होते.
वेगवेगळ्या उद्योगांतून निर्माण होणारी अपशिष्टे वेगवेगळ्या स्वरूपाची व गुणधर्मांची असतात. उद्योगांमधील अपशिष्ट निर्मितीचे प्रमाण त्या उद्योगाच्या प्रकारावर व आकारावर अवलंबून असते. वेगवेगळ्या कारखान्यांच्या धुराड्यांतून धूर, कार्बनचे कण, कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोक्लोरिक अम्ल, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, क्लोरीन, नायट्रोजनाची ऑक्साइडे यांसारखे विषारी वायू व इतर अनेक अपशिष्टे वातावरणात सोडली जातात. उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी दररोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. प्रक्रियेनंतर त्यातील बरेचसे पाणी सांडपाण्याच्या म्हणजेच द्रवरूप अपशिष्टाच्या स्वरूपात बाहेर सोडले जाते. साखर कारखान्यांतून बगॅस व मळी ही अपशिष्टे; रासायनिक खते, कीटकनाशके, प्लॅस्टिक, स्फोटके व डिटर्जंट निर्मिती उद्योगांतून विविध रसायनयुक्त अपशिष्टे; धातूला मुलामा देणार्या उद्योगांतून सायनाइड, क्रोमियम व निकेलयुक्त विषारी अपशिष्टे; तसेच खनिज तेल व धातू शुध्दीकरण कारखान्यांतून अनेक टाकाऊ, विषारी व अपायकारक अपशिष्टे बाहेर पडतात. अन्नप्रक्रिया व वस्त्रोद्योगात कार्बनी अपशिष्टे असतात. कागदाचा लगदा व कागद उद्योगातील अपशिष्टांत कार्बोहायड्रेटांचे तर दुग्ध-प्रक्रिया, कातडी कमावणे व कत्तलखाना इत्यादींतील अपशिष्टांत नायट्रोजनाचे प्रमाण अधिक असते. औद्योगिक उत्पादनांच्या आवेष्टनासाठी पॉलिथीन, प्लॅस्टिक, पुठ्ठा, कागद, बारदान इत्यादींचा वापर केला जातो; परंतु त्या उत्पादनाच्या पहिल्या उपयोगानंतरच सर्व आवेष्टन साहित्य अपशिष्ट स्वरूपात साचून राहते. औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील अपशिष्टे राखेच्या स्वरूपातील असतात. यांशिवाय इतरही असंख्य वायुरूप, द्रवरूप व घनरूप अपशिष्टे वेगवेगळ्या उद्योगांमुळे तयार होतात.
अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, युनायटेड किंग्डम, जर्मनी, फ्रान्स, इटली, जपान, रशिया, चीन, भारत या औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांत औद्योगिक अपशिष्टे प्रचंड प्रमाणात निर्माण होत असतात. एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी (इपीए) च्या अंदाजानुसार जगात निर्मिती उद्योगांतून दरवर्षी सु. १०,००० दशलक्ष टन (वायुरूप प्रदूषके वगळता) अपशिष्टे निर्माण होतात. त्यात दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी वाढ होत आहे. एकूण अपशिष्टांपैकी सु. १० टक्के अपशिष्टे स्फोटक व विषारी असतात. औद्योगिक अपशिष्टांमुळे जगभर पर्यावरणविषयक असंख्य गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक अपशिष्ट व्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौधरी, वसंत
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/24/2020
महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्...
महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात असलेली तीव्र विषमता...
ईस्ट इंडिया कंपनीकडून १८५० मध्ये राज्यकारभार राणीक...
अखिल भारतीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. त्यांचा जन्...