অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदल आणि महाराष्ट्र

हवामान बदल आणि महाराष्ट्र

हवामान बदल आणि महाराष्ट्र

अमित वाडेकर

कार्यकारी संपादक, वनराई

पर्यावरणविषयक समस्या, हवामान बदल व जागतिक तापमानवाढ हे आता केवळ आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांपुरते विषय राहिलेले नाहीत, तर आपल्या जीवनाची सर्वांगे या समस्यांनी ग्रासली गेली आहेत. दुष्काळाच्या झळा असो. गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान असो. जीवघेणी उष्णतेची लाट असो किंवा आखाती देशातून आलेले धुळीचे वादळ असो. गेली सहा महिने उभा महाराष्ट्र निसर्गातील व ऋतुचक्रातील विविध बदल अनुभवत आहे.

गेल्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. राज्य शासनाने एकूण 39 हजार 453 गावांपैकी 24 हजार 811 गावांमध्ये म्हणजेच जवळपास 60 टक्के गावांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचे जाहीर केले. अशातच 2015 मध्ये प्रवेश करत असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येला व पहाटेच मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी लिंबाच्या आकाराएवढ्या गारा कोसळल्या. मराठवाड्यातील लातूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबादसह विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ व नागपूरात या अवकाळी पावसाचा फटका बसला.

खानदेशातील जळगाव व भुसावळ जिल्ह्यातही गारांसह पाऊस पडला. यानंतर महिनाभराने म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस बरसला. या पावसाचा सर्वाधिक फटका कोकणवासियांना बसला. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसात 282 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यानंतर परत फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यातही विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. मात्र, फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला. या पावसाने काढणीला आलेल्या ज्वारी व गव्हाचे प्लॉट भुईसपाट झाले. द्राक्षबागा कोसळल्या. संत्रा व डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले.

कोल्हापुरातील ऊस तोडणी व वाहतूक ठप्प झाल्याने साखर कारखाने, गुर्‍हाळघरे बंद पडली. कोकणातील आंबा व काजू उत्पादकांनाही मोठा फटका बसला. रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. कित्येक पशु-पक्षी दगावले. विजेचे खांब पडले. अनेक गावे अंधारात गेली. ठिकठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. घरांवरील छप्परे उडाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. शेतकरी धीर सोडत आत्महत्येचा पर्याय निवडू लागले. या दोन दिवसांमध्ये विदर्भात 6 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. राज्याच्या मा. कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, दोन दिवसात तब्बल साडे सात लाख हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पाऊस पडला, तर अडीच लाख हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले होते.

वास्तविक पाहता ऋतुमानानुसार मार्च महिन्यात उकाड्याचे वातावरण असायला हवे होते, मात्र यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात तुलनेने थंड वातावरण होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तर राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ व पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे
दि. 1 मार्च, 2015 रोजी महाराष्ट्राला सूर्यदर्शनच झाले नाही. त्यामुळे बोचर्‍या थंडीने नागरिक अक्षरशः गारठून गेले होते. या वातावरणाचा परिणाम विविध पिकांबरोबरच मानवासहित सर्व पशु-पक्ष्यांवरही झाल्याचे दिसून आले. स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग होणार्‍यांची व या संसर्गाने मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्याही यादरम्यान वाढली होती.

मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात पुन्हा गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे 5 दिवसांमध्ये यवतमाळ, वाशीम, अमरावती, सांगली, अकोला, अहमदनगर, सातारा, सोलापूर, नांदेड इत्यादी 9 जिल्ह्यांमधील जवळपास 40 हजार हेक्टरवरील शेती पिके व फळ पिके भुईसपाट झाली. यापाठोपाठ 14 मार्च रोजी नाशिक, अहमदनगर, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या गारांच्या तुफानी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब व केळी या फळबागांसह रब्बी पिके, उन्हाळी पिके आणि भाजीपाला उत्पादकांवर अवकळा कोसळली. मार्च महिन्यात मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळाची धग वाढत असतानाच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत होता.

एप्रिल - मे महिन्यात राज्यातील तापमान अचानक वाढले; परंतु एप्रिल महिन्यातही महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरूच होते. एप्रिलमध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादसह, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना वादळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे 13 जणांचा बळी गेला, तर काही गंभीर जखमी झाले. मे महिन्याच्या 13 तारखेला पुणे, पिंपरी चिंचवड व उपनगरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढत ढगफुटीसदृश पाऊस झाला.

दि. 31 मे, 1927 रोजी झालेल्या विक्रमी पावसानंतर मे महिन्यात पहिल्यांदाच पुण्यात एवढ्या पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पाण्याच्या अक्षरशः लाटा उसळत होत्या. रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. तळमजल्यावरील घरे, सोसायट्या व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. साधारणपणे याचदरम्यान म्हणजेच मे महिन्यात तिकडे वर्धा आणि नागपूरात तापमानाच्या चढत्या पार्‍याने उच्चांक गाठला होता. वर्धा येथे 19 मे 2015 रोजी 47.5 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची विक्रमी नोंद झाली. हे त्या दिवसाचे जगातील सर्वाधिक तापमान असल्याचे जागतिक हवामानाची दखल घेणार्‍या ‘एल डोरेडो’ या संकेतस्थळाने नोंदविले. वर्ध्यानंतर पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील ‘सीबी’ हे ठिकाण 47 अंश सेल्सियससह जगात दुसर्‍या क्रमांकावर होते, तर नागपूर हे 46.9 अंशांसह त्या दिवशी तिसर्‍या स्थानी होते. राज्यात उष्माघाताने बळी जाणार्‍यांची संख्याही यंदा लक्षणीय होती. आता दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात सर्वांना मान्सूनचे वेध लागलेले आहेत. मात्र, यंदा ‘एल निनो’चा प्रभाव अधिक असल्याने भारतात कमी पाऊस पडणार असून, दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तविला आहे.

जागतिक तापमानवाढीशी या सर्व घडामोडींचा संबंध आहे की नाही हे संशोधनाद्वारे येत्या काळात सिद्ध होईलच; परंतु गेल्या सहा महिन्यांतील बदलांचा हा आलेख नक्कीच चकित करणारा आणि आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे. निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा म्हणून या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जावे आणि निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठीची कृतिशीलता वाढीस लागावी, या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिना’निमित्त प्रस्तुत विषयाकडे लक्ष वेधून घेत आहोत.

 

स्त्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate