आहेत. बऱ्याच बहुवर्षायू जाती बागेत वाफ्यांच्या कडेने अथवा खडकाळ जागी लावलेल्या आढळतात. काही जाती किरकोळ औषधी उपयोगाच्या असून अनेक स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणाऱ्या) आहेत; काहींच्या मुळांत भरपूर टॅनीन असते. त्यांचा उपयोग कातडी कमाविण्यास व रंगविण्यास करतात.
जिरॅनियम तेल हा व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ पेलार्गॉनियमशी संबंधित आहे. जिरॅनियमच्या संयुक्त फुलोऱ्यातील [वल्लरी, पुष्पबंध] प्रत्येक भागात एक किंवा दोन फुले असतात; फुलांतील मधुरस स्त्रवणाऱ्या संरचना (मधुप्रपिंड) केसरदलांच्या तळाशी असतात. केसरदले आरंभी अपक्व किंजलाभोवती उभी असून परागकोश तडकल्यावर बाजूस वळतात; त्यानंतर किंजल्के उघडतात [फूल]. शुष्कफळ (पालिभेदी) तडकते त्याच वेळी फलांश (फळाचे सुटे झालेले भाग) फुटतात व प्रत्येकातून ते बाहेर फेकले जातात [→ विकिरण, फळांचे व बीजांचे]; परंतु तत्पूर्वी किंजदले बाहेरून किंजल्काकडे वर स्वतंत्रपणे गुंडाळत जातात [→फळ]. इतर शारीरिक लक्षणे जिरॅनिएसी अथवा भांड कुलात [→ जिरॅनिएलीझ] वर्णिल्याप्रमाणे असतात.
(भांढ). ह्या हिंदी नावाने (लॅ. जिरॅनियम नेपालेन्स; इं. नेपाल जिरॅनियम) ओळखली जाणारी ही सु. १५–४५ सेंमी. उंच बहुवर्षायू ओषधी हिमालयाचा समशीतोष्ण (सु. १,५००–२,७०० मी.उंचीचा) भाग, काश्मीर आणि खासी, पळणी व निलगिरी टेकड्या येथे आढळते. हिला हस्ताकृती व तीन ते पाच खंडांत विभागलेली दातेरी पाने असून फुले लाल किंवा जांभळी असतात. हिच्या मुळांतील लाल रंगाचा उपयोग औषधी तेलांना रंग येण्यास करतात; कातडी कमाविण्यासही ही मुळे (रोएल) वापरतात. गॅलिक व सक्सिनिक अम्ले आणि क्वेर्सिटीन ही द्रव्ये या वनस्पतीत आढळतात. हिच्या खेरीज जिरॅनियम च्या सु. नऊ जाती हिमालयाच्या परिसरात आढळतात आणि त्यांपैकी काहींत लघवी साफ करण्याचे व जखमा बऱ्या करण्याचे गुणधर्म आहेत;
यांशिवाय दंतविकार, नेत्रविकार, अतिसार, रक्तस्त्राव इत्यादींवर गुणकारी असणाऱ्या काही जाती आहेत. भांड हे नाव जि. ऑसेलॅटम या जातीलाही दिलेले आढळते. भांड हे पंजाबी व रोएल हे काश्मीरी नाव आहे. मुळांतील लाल रंगाला अनुलक्षून ‘कषायमूल’ असे अर्थपूर्ण नाव जिरॅनियम वंशाला व ‘कषायमूल कुल’ जिरॅनिएसी या कुलाला डॉ. रघुवीर यांनी सुचविलेले आढळते.‘कओअशुद’ हे काश्मीरी नाव जिरॅनियमच्या (जि. वॉलिचिएनम ) दुसऱ्या एका भारतीय जातीच्या मुळांस लावतात; ते ⇨मायफळासारखे संग्राहक असून अतिसार, रक्तस्त्राव, परमा, आर्तवदोष (मासिक पाळीचे दोष), दातदुखी इत्यादींवर गुणकारी आहे. मुळांचा लेप सुजलेल्या पापण्यांवर लावल्यास सूज उतरते.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, New Delhi, 1956.
२. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९२७.
लेखक: परांडेकर, शं. आ.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
रासायनिक पद्धतीवर भर देऊन हायब्रीड भात पिकांचे उत्...
कॅन्स्कोरा डिफूजा : (कुल-जेन्शिएनेसी). सु. १५-६० स...
भरमसाट येणारे वीजबिल व दिवसेंदिवस वाढणारे भारनियमन...
वनस्पती