एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गटातल्या नऊ महिलांनी गाय घेण्यासाठी कर्ज काढले. नव्या गायी खरेदी केल्या. सुमनताईंनी मात्र खरेदी केलेल्या गायीचा विमा उतरविला. पुढे आठ महिन्यांनी सुमनताईंची गाय आजारी पडली... त्यांनी विमा कंपनीकडे धाव घेतली. सुनमबाईला माहिती होते, की गायीचा विमा काढल्यामुळे विमा कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार चालावे लागेल. पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावले. सगळे उपचार करूनही सुमनबाईची गाय मेली.
संगमनेरच्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने त्यांना गायीच्या विम्याचे पंधरा हजार रुपये दिले. त्याचा उपयोग त्यांना उरलेले कर्ज फेडण्यासाठी झाला. त्यांनी पुढचा विचार करून विमा काढण्याच्या निर्णयामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली.
याच गावातल्या लताबाईंनीसुद्धा कर्ज काढून गाय घेतली होती. पण घरातल्या अडचणींमुळे त्यांना गायीचा विमा काढता आला नाही. काही दिवसांनी त्यांच्या गायीला विणेच्या वेळी खूप त्रास झाला. पशूच्या डॉक्टरांना बोलावले आणि भरपूर औषधोपचार केले. तरीपण त्यांची गाय मेली. काही दिवासातच पंधरा हजारांचे नुकसान झाले. आता कर्जाचे पैसे फेडणार कसे? असा प्रश्न त्यांना पडला. त्या फार निराश झालेल्या होत्या. जर तिने गायीचा विमा उतरविला असता तर तिला नुकसान भरपाई म्हणून विमाकंपनीकडून १५,०००/- रु. मिळाले असते.
लताबाईला ह्या गोष्टीचा फार पश्चाताप झाला. गुंजाळवाडीतल्या संयुक्त महिला समितीला ही गोष्ट समजली. त्यांनी सर्व गटांतल्या महिलांना बोलावले. त्यांना लताबाईंची व्यथा सांगितली. मग महिलांनी मिळून निर्णय घेतला, की गावात पाणलोटाचे काम चालू आहेच तेथे लताबाईंसाठी श्रमदान करायचे. श्रमदानातून मिळालेला पैसा लताबाईंना बाहेरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दिला. असा समितीने व गटाने बाहेरचे कर्ज फेडण्याचा प्रश्न सोडवला. तसेच लताबाईंनी हळूहळू गटाचे कर्जही फेडले.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच, की आपण खरेदी केलेल्या जनावराचा आणि औजारांचा विमा उतरवायचा हे लक्षात ठेवायचे आणि इतरांनाही हेच सांगायचे.
आपल्या स्वतःचा, जनावरांचा, वीजपंपाचा विमा उतरविता येतो. तालुक्याच्या गावी विमा एजंट असेल, तुमच्या गटाची मिटिंग असेल त्या दिवशी त्यांनी बोलावा. तुम्हास आवश्यक असणाऱ्या विम्याविषयी माहिती करून घ्या.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 6/24/2020
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड...
महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासू...
कानापुरच्या महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वादि...
गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त...