टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे काम. जंगलातील ऐन व अर्जुन वृक्षांच्या फांद्यांवर कोषाचे उत्पादन घ्यायचे म्हणजे जंगलातील हिंस्त्र श्वापदांसोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांशीही गाठ ठरलेलीच. त्यामुळे हे काम पुरुषांचेच म्हणून याकडे बघितले जायचे. मात्र सितेपार गावच्या महिलांनी या पुरुषी कामावरही आपली छाप उमटवली. या महिलांनी जंगलात कोष उत्पादनच केले नाही तर त्यापासून सुंदर अशा टसर कापडाची निर्मिती करुन या क्षेत्रातील पुरुषी मक्तेदारीला आव्हान देत त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. मोहाडी तालुक्यातील सितेपार हे जंगलाला लागून असलेले सुमारे 600 लोकवस्तीचे गाव. सुमारे 34 हेक्टर झुडपी जंगल या गावाला लागून आहे.
यामध्ये मोठ्या प्रमाणात ऐन व अर्जून वृक्षाची झाडे आहेत. मात्र या जंगलात गावातील लोकांऐवजी इतर जिल्ह्यातील मजूर येऊन कोष उत्पादन करायचे. माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर आणि आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे यांच्या ही बाब निदर्शनास आली. जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या गावातील बचत गटाच्या महिलांना टसर कोष उत्पादन घेण्याविषयी प्रोत्साहित केले.
2013 मध्ये गावातील पाच बचत गटातील 10 महिलांनी एकत्र येऊन ‘अंकुर’ उत्पादक गट तयार केला.पण टसर कोष उत्पादन कसे घ्यायचे ? याची काहीही माहिती बचतगटाच्या महिलांना आणि त्यांना प्रेरणा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनाही नव्हती. यासाठी रेशीम विभागाच्या सहाय्याने महिलांना प्रशिक्षण देण्याचे ठरले.
रेशीम विभागाने या बचतगटाला 2200 अंडीपूंज पुरवठा केला. पावसाळ्यात प्रशिक्षणासोबतच जंगलात प्रात्यक्षिकासह महिलांनी कामाला सुरुवात केली. महिला ऐन व अर्जुन वृक्षाची ओळख करुन घेतानाच टसर अळींचे जीवनचक्रही समजून घेत होत्या. अंड्यातून निघालेल्या अळ्यांना वृक्षांच्या फांद्यांवर चरण्यासाठी सोडण्यात येत होते.
महिलांनी न घाबरता, ऊन-वारा, पाऊस याला न कंटाळता झाडावर चढून हे काम केले. अळीला एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर सोडतांना त्यांची कसरत व्हायची. कारण हे काम झाडावर चढून करावे लागे आणि महिलांना झाडावर चढण्याची सवय नव्हती. मग त्यांनीच आपापसात प्रत्येकीच्या ‘स्कील’प्रमाणे कामाचे वाटप केले. यामुळे कामाचा ताण कमी झाला. हळूहळू अळी मोठी होत तिने स्वत:भोवती कोष निर्माण केले. या सर्वांवर महिलांचे बारीक लक्ष होते. कारण अळीच्या जीवन चक्रासोबत त्यांचेही नवीन जीवनचक्र सुरु झाले होते.
पहिल्या हंगामात महिलांनी 10 हजार कोष निर्मिती केली. ज्याची किंमत बाजारभावाप्रमाणे 20 हजार रुपये होती. केवळ कोष उत्पादन करुन आर्थिक परिस्थिती फारशी बदलणार नाही. कारण या व्यवसायाचे आर्थिक रहस्य कापड निर्मिती आणि साडी निर्मितीमध्ये दडलंय हे निंभोरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी कोषाचे ‘व्हॅल्यु ॲडीशन’ करुन धागा व कापड तयार करण्यापर्यंतचे स्वप्न महिलांना दाखवले. पुन्हा रेशीम विभागाने 7 रिलींग मशीन देऊन या स्वप्नाला बळ दिले.
प्रशिक्षणानंतर महिलांनी सुंदर असा टसर रेशीम धागा तयार केला. आता पुढची पायरी म्हणजे कापड विणणे. मात्र त्यासाठी लागणारे ‘लुम’ या बचतगटाजवळ नव्हते. माविमने प्रेरणा देऊन आंधळगावमधील पूर्वी विणकाम करणाऱ्या मात्र सद्यस्थितीत बंद असलेल्या ओमसाई बचत गटाला प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडून सुरुवातीस दुसऱ्यांच्या मशिनवर कापड तयार करुन घेतला. महिलांनी उत्पादित केलेल्या कोषापासून तयार झालेले हे कापड म्हणजे त्यांच्या कष्टाला मिळालेले पहिले फळ होय. ज्याची किंमत 70 हजार रुपये आहे.
आता ओमसाई बचत गटाला सुद्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी यांनी दोन लुम उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आता या महिला स्वत:च्या मशिनवर कापड विणू शकतील. एका बचत गटाचा ‘कोष निर्मिती ते कापड निर्मिती’ पर्यंतचा हा प्रवास सुखद वाटत असला तरी अनंत अडचणींचा सामना त्यांना करावा लागला.
कारण जिल्ह्यात कोसा कापड निर्मिती करणाऱ्यांची ‘मोनोपल्ली’ झालेल्या या व्यवसायाला हा धक्का होता. यामध्ये खऱ्या अर्थाने कसोटी लागली ती महिलांची खंबीरता आणि संयमाची. वर्षभर कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता एक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला.
पैशाची गरज रोहयोचे काम करुन पूर्ण केली. या कष्टकरी महिलांचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. या बचतगटासोबतच कापड विणणारा ओमसाई बचत गट, साड्यांवर काथा वर्क करणारा सहयोग महिला बचत गट, ब्लॉक प्रिंटींग करणारा मैत्री बचत गट या महिलांनाही यामुळे रोजगार मिळू लागला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत उपवनसंरक्षक विनय ठाकरे, रेशिम विकास अधिकारी रायसिंग यांचाही महत्वपूर्ण सहभाग आहे.
लवकरच महिलांनीच उत्पादित केलेल्या कोषापासून महिलांनीच तयार केलेली पहिली साडी बाजारात येणार आहे. ज्याची किंमत बाजार भावाप्रमाणे किमान 5 ते 25 हजार रुपये असू शकते. यातून खऱ्या अर्थाने हा बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. ‘टसर सिल्क’ ची साडी जेव्हा या महिला स्वत:साठी विकत घेतील, तेव्हा या कष्टकरी महिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या रापलेल्या चेहऱ्यावर बघून त्या तलम रेशीम वस्त्रालाही ‘अभिमान’ वाटेल. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांचे हे सबळीकरण ठरेल.
-मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020
एकदा काय झाले, गुंजाळवाडीतल्या तीन स्वयंसाहाय्य गट...
महिलांना बचतगटाच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार मिळ...
माझे नाव शबाना युनिस शेख आहे.सर्व प्रथम मी वाटरशेड...
गरीब हे जास्त गरीबच होत चालले आहेत. ही परिस्थिती त...