অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जळगावच्या अत्याधुनिक ऑडिटोरियममुळे खानदेशच्या लौकिकात भर

जळगावच्या अत्याधुनिक ऑडिटोरियममुळे खानदेशच्या लौकिकात भर

जळगाव शहराच्या नावलौकिकात भर घालून जळगावकरांसाठी भूषणावह ठरावे असे, प्रशस्त वातानुकुलित नाट्यगृहाचे (ऑडिटोरियम) काम महाराष्ट्र राज्य शासनातर्फे सुरू आहे. जळगावला सांस्कृतिक वारसा मोठा आहे. जळगावसह जिल्हा हौशी कलावंतांची भूमी आहे. जळगावनेच सुरभी हांडे (‘जय मल्हार'मधील म्हाळसा), अभिनेता गिरीश ओक (भुसावळ) यासह एकापेक्षा एक कलावंत सिनेसृष्टीला दिले आहेत. नाटक, सिनेमाच्या निमित्ताने अनेक कलावंतांनी जळगावला भेटी दिल्या आहेत. जळगावला बंदिस्त नाट्यगृह नसल्याची खंत कलावंतांनी व्यक्त केल्याने राज्य शासनातर्फे येथे बंदिस्त अशा प्रशस्त, तीन मजली वातानुकुलित नाट्यगृहाचे (ऑडिटोरियम) काम येथील महाबळ रोडवर शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे आहे.

जळगावात बालगंधर्व खुले नाट्यगृह आहे. मात्र ते खुले आहे. सोबतच अनेक असुविधा तेथे आहेत. जळगाव जिल्हा बॅंकेचा हॉल नाटकासाठी चालू शकतो. तेथे अनेक नाट्यप्रयोग सादर होतात. मात्र, सध्या तो नाटकांसाठी देणे बंद झाला आहे. यामुळे जळगावकर रसिकांना नाटक पाहता येत नव्हती. त्यामुळे जळगावच्या रसिकांची बंदिस्त नाट्यगृहाची मागणी अनेक वर्षांपासून होती. जळगावला वातानुकुलित ऑडिटोरियम बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शासनाकडून मंजूर करवून घेतला. उपनगरांमधील खोटेनगरातील खदानीजवळ बंदिस्त नाट्यगृहाची जागा निवडण्यात आली. मात्र, ती रसिकांना जाण्या-येण्यासाठी सोईची नसल्याने स्थानिक कलावंतांनी या जागेस नापसंती दर्शविली. यामुळे महाबळ कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर मायादेवीनगरात प्रशस्त जागेत बंदिस्त, वातानुकुलित ऑडिटोरियम बांधण्याचा निर्णय झाला. त्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री, आमदार एकनाथराव खडसे यांनी स्वतः पुढाकार घेऊन तीस कोटी रुपये निधी नाट्यगृहासाठी मंजूर करून घेतले. ते उपलब्धही करून देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण करून जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडे ते सोपविण्याची जबाबदारी दिली जाणार आहे.

बांधकाम पूर्ण

तीनमजली वातानुकुलित प्रशस्त असलेल्या या नाट्यगृहाची इमारत बाहेरूनच नागरिकांना आकर्षित करते. बांधकाम करावयाचे सर्व काम पूर्ण झाले असून, बाहेरून रंग देण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

नाट्यगृहाचे इलेक्‍ट्रिफिकेशनचे काम सुरू आहे. त्यात विविध ठिकाणी लायटिंग बसविणे, खुर्च्या बसविणे, प्रकाशझोत टाकता येईल अशी व्यवस्था करणे, आतील व बाहेरील झगमगाटासाठी विविध दिवे बसविणे आदी कामांचा समावेश आहे.

असे आहे भव्य ऑडिटोरियम

* 1200 आसनांचे एकमेव वातानुकुलीत नाट्यगृह

* तळमजल्यात 50 कार पार्किंगची सोय

* नाट्यगृह परिसरातच दुचाकी पार्किंगची सोय

* कलावंतांना राहण्यासाठी रूमची व्यवस्था

* लहान कार्यक्रमांसाठी छोट्या हॉलची निर्मिती

- देविदास वाणी, जळगाव

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 11/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate