অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा - श्रीमती चंद्रकला अत्राम

परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा - श्रीमती चंद्रकला अत्राम

"तमसो मा ज्योतिर्गमय"

परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा

गाव-शरद, ता.कळब जि.यवतमाळ

श्रीमती चंद्रकला अत्राम–(वय ३२ वर्ष)

सख्यानो आपण रोजच आयुष्य जगत असतो..... पण प्रत्येक जण आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगतो .......  जीवनात अनेक चढ - उतार येतात ..... सुख दु:ख येतात...कुणाचे जीवन खूप सरळ असत तर कधी खूप कठीण परिस्थितीतून जावे लागते .....   जीवन कसेही असो  ते आनंदाने स्वीकार केला  पाहिजे ... आणि जो कठीण परिस्थितीचा  आनंदाने स्वीकार करतो त्याच्यासाठी  काहीच अशक्य नाही.....

हे मी आता इतक्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने बोलू शकते ते केवळ WOTRया संस्थेमुळेच. मी माझा सारा आत्मविश्वास हरवून बसले होते, माझ्या आयुष्यात घटनाही तशीच घडली होती. माझ्या पतीला दारूचे व्यसन होते. या व्यसनातूनच आमचे आमचे वाद होत होते आणि एक दिवस या वादाचा कळस झाला, माझ्या पतीने मला व मुलांना घरातून हाकलून दिले. त्यावेळी माझी मोठी मुलगी पाच वर्षाची आणि मुलगा दोन वर्षाचा होता, माझ्या डोळ्यापुढे अंधार दाटून आला होता . पतीने कोणत्याही प्रकारची दया-माया न दाखवता वा-यावर सोडून दिले.आता पुढे काय हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला.शेवटी माहेरी जाण्याचा निर्णय मी घेतला. आई- वडिलांनी माझी परिस्थिती पाहून मला धीर दिला.

म्हणतात ना, "ज्याने चोच बनवली त्याने चारा बनवला" या उक्तीप्रमाणे माझ्या आयुष्यात तो दिवस उगवला आणि परमेश्वराच्या रूपाने WOTRहि संस्था आमच्या गावात आली. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. २०१३ मधील ही घटना आमच्या लहान गावात WOTRचे कार्यकर्ते आले त्यांनी सर्व प्रथम आत्महत्याग्रस्त कुटुंबाची माहिती जमा केली त्याच बरोबर निराधार महिलांचीही माहिती जमा केली. आमच्यासाठी हे फारच नवीन होते, कारण अनोळखी व्यक्ती आमच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करत होते. सर्व प्रथम गावातील आमच्यासारख्या महिलांची मिटिंग घेतली व मिटिंगमध्ये मनावरचे दडपण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम राळेगाव मध्ये कार्यशाळा घेउन आत्मदर्शन तसेच जीवन जगण्यासाठी डॉ.मनीषामॅडम व मिरीकरसरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. माझ्या सारख्याच इतर महिलादेखील या कार्यशाळेस उपस्थित होत्या.कोणतेही आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले पाहिजे याची जाणीव त्यांनी करून दिली. कारण जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या तीन गोष्टी आपल्याजवळ असल्या की, जगातली कुठलीही गोष्ट आपल्या पायाशी लोळण घेते. कोण काय म्हणेल, कोण काय टीका करेल याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त चांगल्या गोष्टीचाच विचार करायचा. जितके होईल तितके मिळवण्याचा प्रयत्न करायचा.

प्रत्येक गोष्टीमधून वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी शिकायच्या. आपल्याला काय करायचं, आपले ध्येय कोणते याकडे लक्ष द्यायचं. आपल्या सर्वांमध्ये एक वाईट सवय असते की, आपणच स्वत:मध्ये एक प्रकारचा ‘न्यूनगंड’ निर्माण करतो. आपल्याला प्रथम न्यूनगंडाला बाजूला ठेवावे लागेल. एखाद्या वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट आले तरी आपण धैर्याने पुढे जायचं. मन स्थिर ठेवायचं. प्रत्येक गोष्टीला धैर्याने उत्तर द्यायचं. या कार्यशाळेत आम्हाला श्री.मिरीकरसर तसेच प्रीतीलतामॅडम यांच्याकडून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकडून बदलून गेला. जगण्याचा नवीन मार्ग मिळाला.

या कार्यशाळेत काही उद्योग- व्यवसाय करता येईल का? या विषयी चर्चा झाली आणि डोक्यात विचारांचे काहूर  माजले होते. सर्वकाही नवीन होते, काय व्यवसाय करावा, व्यवसाय कसा असतो याची कल्पना देखील आम्हाला नव्हती. परंतु काहीतरी करण्याची जिद्द होती. या सर्व प्रश्नाचे, शंकाचे निरसन श्री मिरीकर सर यांच्या मार्गदर्शनातून झाले. मिरीकर सरांनी व्यवसायाविषयी अतिशय मोलाची माहिती दिली. तुमच्या गावामध्ये काय करता येऊ शकते? असा प्रश्न त्यांनी आम्हा महिलांना विचारला, या प्रश्नांची विचारणा झाल्यावर सर्व महिलांमधून वेगवेगळे उत्तर आले. परंतु या सर्व उत्तरामध्ये मला शेळीपालन हे एकदम सोयीस्कर वाटले. आणि बस्स त्याच क्षणी मनाने पक्क ठरविले शेळीपालनच करायचे.

निर्णय तर पक्का झाला होता परंतु आर्थिक प्रश्न होताच. WOTR या संस्थेकडून हा प्रश्न सुटला आणि संस्थेकडून १०८००/- चे आर्थिक सहाय्य मिळाले त्यामध्ये मी माझ्याकडील रुपये- २०००/- गुंतवणूक करून दोन शेळ्याची खरेदी केली. मनामध्ये अतिशय आनंद निर्माण झाला. या कामी WOTR चे अधिकारी श्री वसंत कोरडे. श्री.विनोद काटलाम व सौ. प्रतिभा जोजारे मार्गदर्शन करत होते.

शेळीपालन कसे करावे, त्यांचे आरोग्य, आहार, लसीकरण, पिल्लांची निगा, बोकडांची विक्री इ. बद्दल कोरडे प्रत्येक भेटीदरम्यान माहिती देत तसेच व्यवसाय कशाप्रकारे सुरु आहे याचा लेखा जोखा घेत असत. इतर कौटुंबिक अडचणी, मुलांचे आरोग्य या  सर्व अडचणी जाणून घेत होते आपुलकीने चौकशी करीत होते. तसेच WOTR चे पूर्ण लक्ष असायचे. दोन ते तीन महिन्यांनी श्री मिरीकर सर समक्ष भेट देत असून व्यवसाया बद्दल माहिती घेत असत व येणा-या अडचणी विषयी मार्गदर्शन करत असतात. तसेच मनीषामॅडम, प्रितीमॅडम व श्री किरणसर कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करीत असत.

सहा महिन्याने दोन शेळ्यांना दोन गोंडस पिल्ले झाली, सुरु केलेल्या व्यवसाय यशस्वी झाल्यामुळे अतिशय आनंद झाला. पिल्लांच्या संगोपनाविषयी श्री.कोरडे माहिती देत होते. पिल्लांची वाढ चांगली सुरु होती आणि सहा महिन्यांनी दोन पिल्लांची विक्री रुपये- ८२००/- झाली, प्रथमच इतके रुपये पाहत होते, याचे सर्व श्रेय मनापासून WOTR च्या डॉ.मनीषामॅडम यांना आहे. कर्जाची परतफेड वेळेवर चालू होती.या बरोबरच शेतमजुरी करून कुटुंबाची देखभाल चालू होती.

मुदतीपूर्वीच कर्जाची फेड करून नवीन व्यवसायासाठी कोरडेकडे विचारणा केली. चर्चा करीत असताना देशी गाय पालनाचा व्यवसाय चांगल्याप्रकारे होऊ शकतो  असे समोर आले. त्यासाठी रुपये- २००००/- मागणी केली, यावर मिटींगमध्ये चर्चा होऊन रुपये- १५०००/- चा प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवण्याचे कोरडेनी मान्य केले या प्रसंगी WOTR चे काटलाम यांनी  मार्गदर्शन केले. सदर प्रस्तवाची सविस्तर माहिती घेऊन मिरीकरसरांनी मंजुरी दिली. मी माझा सहभाग रुपये – ५०००/- ची गुंतणूक करून रुपये – २००००/- ची पांढरी शुभ्र गाय खरेदी केली आणि आनंद गगनात मावेनासा झाला. मी अगोदर सुरु केलेला शेळीपालन व्यवसाय चांगला सुरु असून त्यांची संख्या चार आहे. तो माझा पूर्ण नफा असून त्या प्रेरणेतूनच मी नवीन व्यवसाय सुरु करू शकले आणि तो व्यवसाय देखील चांगल्याप्रकारे यशस्वी करण्याची मला पूर्णपणे खात्री आहे.

मी नम्रपणे कबूल करते कि, माझ्या आयुष्यामध्ये जो बदल घडून आला त्याचे पूर्णपणे श्रेय WOTR चे असून मी त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील. आज माझी मुलगी इयता- ५ वी मध्ये व मुलगा इयता पहिली मध्ये शिक्षण घेत आहेत. मला व प्रोजेक्ट मधील सर्व महिलांना WOTR चे अधिकारीवर्ग यांचेकडून सतत मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. परसबाग, आरोग्य विषयी सल्ला, बचत गटाची मिटिंग, वेळोवेळी होणारे प्रशिक्षण यामुळे मनोबल वाढण्यास मदत झाली आणि यामुळेच आमच्यासारख्या महिलांचा जीवनाकडे बघण्याचा  विचार सकारात्मक झाला  अशाच प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी घेऊन मला आपल्या सहकार्याची कायम अपेक्षा आहे.

पूर्ण WOTR चे अधिकारी वर्गाचे मन:पूर्वक आभार.

धन्यवाद!!!!

वसंत कोरडे

उपजीविका अधिकारी

संपदा ट्रस्ट, अहमदनगर

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate