स्त्री आणि पुरुष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही चाके व्यवस्थित चालली की संसाररुपी जीवनाचं रहाट गाडगं व्यवस्थित चालण्यास मदत होते. ग्रामीण भागातील महिला आता बचतगटाच्या माध्यमातून कुटुंबातील कर्त्या पुरुषाला अर्थात कुटुंबाच्या अर्थार्जनात हातभार लावीत आहेत.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यात नवेगावबांध हे एक गाव. या गावाची ओळख प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून आहे. नवेगावबांध मध्ये डिसेंबर 2003 मध्ये दहा महिलांनी एकत्र येऊन सिद्धार्थ स्वयंसहायता बचतगटाची स्थापना केली. त्या बचतगटाच्या सदस्यांपैकी भिमाबाई शहारे ह्या एक. शेतीच्या हंगामाशिवाय कामाची वाणवा असतांना अशावेळी कोणते काम करावे हा प्रश्न भिमाबाईसह इतर महिलांना भेडसावत असे. भिमाबाई व त्यांच्या बचतगटातील महिला विविध समाजसुधारकांची जयंती वा पुण्यतिथी साजरी करीत असत. येथे होत असलेल्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून त्यांनी डिसेंबर 2003 मध्ये सिद्धार्थ बचतगटाची स्थापना केली.
नवेगावबांधमध्ये कुठले कार्यक्रम घ्यायचे असले तर कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य बाहेर गावातून आणावे लागत असे. आपल्या गटाने हे साहित्य खरेदी केल्यास गावामध्येच साहित्य सहजतेने उपलब्ध होईल आणि आपल्या गटाला यापासून उत्पन्नसुद्धा मिळेल या विचाराने गटाच्या बचतीतून आणि मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या फिरत्या निधीतून 100 खुर्च्या, गाद्या आणि स्वयंपाकाची भांडी घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. गावात गटाद्वारे साहित्य उपलब्ध झाल्याने गावकरी आनंदी आहेत. बिछायतच्या व्यवसायातून बचतगटाची झालेली प्रगती पाहता सिद्धार्थ बचतगटाने बँकेकडून 1 लक्ष 50 हजार रुपये कर्ज घेतले. गावातील लोकांनी विविध कार्यक्रमासाठी भाडे देऊन साहित्य घेतल्याने मिळालेल्या उत्पन्नातून बचतगटाने बँकेच्या कर्जाची पूर्ण परतफेड केली. या व्यवसायामुळे महिलांना गावातच रोजगार सुद्धा मिळत आहे.
महिलांच्या या कामामुळे आणि भिमाबाईच्या पुढाकाराने बचतगटातील महिलांना गावात आज मान मिळत आहे. भिमाबाई स्वत:च हिशेब करुन गटाचे पूर्ण व्यवहार सांभाळतात आणि इतर बचतगटांना सुद्धा मार्गदर्शन करतात. बचतगटातील सर्व महिला साक्षर आहेत. सिद्धार्थ महिला स्वयंसहायता बचतगटाचा हा चढता आलेख भिमाबाईच्या प्रेरणेने विकासाची नवी पहाट घेऊन आला आहे. तो इतरांसाठी देखिल नक्कीच प्रेरणादायी ठरेल, हे निश्चित.
लेखक - विवेक खडसे
जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया
स्रोत - महान्यूज
अंतिम सुधारित : 11/9/2019
अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला... देखा पिलास...
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहे...
मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा ज...
सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्त...