महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.
कोल्हापूरची अंबाबाई हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. इ. स. 634 च्या सुमारास हे मंदिर बांधण्यात आले. चालुक्य घराण्यातील राजा कर्णदेव याने मूर्तीची प्रतिष्ठापना केली. येथे नवरात्र उत्साहात होतो. हेमांडपंथी प्राचीन बांधकाम असलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अठराव्या शतकात त्यावरील शिखरे बांधण्यात आली. मंदिराच्या बाजूस तटबंदीच्या आत अनेक देवालये असून सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायणाच्या प्रारंभीचे तीन दिवस महालक्ष्मीची पावले, शरीर आणि मूर्तीवर सूर्याचे किरण पडतात. मंदिर बंदिस्त असून दिशातंत्राच्या रचनेचा केलेला हा चमत्कार पाहण्यासाठी भक्तांची गर्दी लोटते.
कसे पोहोचाल?
कोल्हापूरपर्यंत रेल्वे आणि एस. टी. सुविधा उपलब्ध आहे.
पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षाने बहरलेला असून पावसाळा वगळता तेथील हवामान आल्हाददायक असते. पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटक तेथे जातात. सह्याद्री पर्वताच्या कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या ताराराणींनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती. सध्या किल्ल्यावर हॉलिडे होम्स असल्याने पर्यटकांची उत्तम सोय झाली आहे.
कसे पोहोचाल?
कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकापासून 23 कि.मी अंतर असून याठिकाणी जाण्यासाठी बसेस, रिक्षाची सुविधा उपलब्ध आहेत.
कोल्हापूरच्या वैभवात भर टाकणारी वास्तू म्हणजे न्यू पॅलेस. या सुंदर व देखण्या वास्तुत भव्य वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्रे, आरमार, शस्त्रास्त्र आणि शिकार अशी बारा दालने येथे आहेत. वास्तुबाहेरील तलाव, तेथे मुक्त संचार करणारी हरणे, मोर यामुळे ही वास्तू करवीर नगरीचे वैभव बनली आहे. मराठ्यांच्या इतिहासाशी निगडित मौल्यवान वस्तू येथे पाहावयास मिळतात. शहाजी छत्रपती म्युझियम या नावाने हे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे.
कसे पोहोचाल?
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकापासून न्यू पॅलेस हे 2.5 कि.मी. अंतर असून शाहू जन्मस्थळ 4 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी बसेस, रिक्षाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
गवा (रानरेडा) अभयारण्य म्हणून दाजीपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे. हा परिसर संरक्षित असून येथे अंजनी, आंबा, जांभूळ, हिरडा इत्यादी जातीची घनदाट वृक्षराजी आहे. या अभयारण्यात गव्याबरोबरच रानमांजर, बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रा, भेकर आदी प्राणी आढळतात. पर्यटन महामंडळाने पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय केली आहे.
कसे पोहोचाल?
दाजीपूर अभयारण्य हे कोल्हापूरपासून 82 कि. मी अंतरावर अंतरावर व राधानगरी पासून 26 कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी कोल्हापूर, राधानगरी येथून एस.टी बसेस व खासगी वाहनांचा सुविधा मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे.
स्रोत - महान्यूज
अंतिम सुधारित : 4/28/2020
ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द होण्यास बराच काला...
सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्त...
मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा ज...
स्त्री आणि पुरुष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही च...