जलसंधारणाच्या विविध कामांनी घेतला वेग
उन्हाळा आला की गावातील लोकांच्या अंगावर काटा फुटायचा, कारण दरवर्षी जानेवारी महिन्यातच विहिरी व कूपनलिका कोरड्या पडायच्या.... गाव तसं कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेलं; मात्र पावसाळा आहे तोपर्यंतच नदीला पाणी उपलब्ध असायचं, इतर वेळेस नदी कोरडीठाण पडलेली... प्यायलाच पाणी नाही, तिथं शेतीची काय कथा! ही वस्तुस्थिती आहे पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील जळगाव सुपे या गावची. अर्थात, ही परिस्थिती मात्र बदलताना दिसत आहे. यापुढे गावाला पाणी टंचाईला सामोरे जावं लागेल असं वाटत नाही, कारण गावाने या वर्षी दुष्काळ हीच सुवर्णसंधी समजून एकीच्या बळावर जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांचा डोंगरच उभा केला आहे. जळगाव सुपे हे बारामती (जि. पुणे) पासून पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावरील कऱ्हा नदीच्या तीरावरील गाव आहे. गावाला पाणी टंचाईचं गेल्या अनेक वर्षांपासून ग्रहण लागलेलं होतं. गावातील लोक आठमाही शेतीच्या जोडीला दुग्ध व्यवसाय करतात, त्यामुळे गावाचं अर्थकारण प्रामुख्याने दुग्ध व्यवसायावरच चालतं. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यातील तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडत असे. यातच भर म्हणून की काय, दोन वर्षं वरुणराजाच रुसला आणि गावाला मोठ्या दुष्काळाशी सामना करावा लागला. मात्र, खचून न जाता त्यावर यशस्वी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली. गावच्या सरपंच मंदाकिनी चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर ग्रामपंचायत, लघु पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) व छोटे पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून खानदेशातील शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर गावात जलसंधारणाची कामं सुरू केली.
शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर जलसंधारणाची कामं...
गावात कामं सुरू झाली तसे लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने पोकलेन मशिनच्या साह्याने दीड किलोमीटर पदमाई ओढ्याचं खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करण्यात आलं. या कामासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या ओढ्यावर कृषी विभागाच्या वतीने अकरा ते बारा ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. सध्या येथील चोपण वस्तीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून दोनशे ते अडीचशे मजुरांमार्फत ओढ्याचं खोलीकरण सुरू आहे. आतापर्यंत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तब्बल अठरा ते वीस लाख रुपयांपर्यंत निधी खर्च करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी दिली. या कामामुळे गावातील लोकांना रोजगार मिळाला आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शेकडोंची शक्ती एकवटली असून, गावचा एकोपा वाढला आहे; तसेच गावात 21 हातपंपांसाठी पुनर्भरण योजना राबविण्यात आली आहे. या कामामुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी गावाला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली होती, त्यानुसार बारामतीचे प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची विविध कामं सुरू आहेत. जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
रोजगार हमी योजनेतून गावात कामं....
सुमारे दोन वर्षांत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तब्बल 80 लाख रुपयांची विविध कामं करणारं जिल्ह्यातील जळगाव सुपे हे एकमेव गाव आहे. यामध्ये एकूण सत्तावीस कामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोपवाटिका, पाच फळबाग लागवड, सात वैयक्तिक विहिरी, दोन रस्ते, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणं ही कामं झाली; तर वनविभागाच्या माध्यमातून सामाजिक वनीकरणातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वृक्ष लागवड; तसेच लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागाच्या वतीने दोन विहिरी, तीन नाल्यांचं खोलीकरण व रुंदीकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चार किलोमीटर अंतराचं दोन रस्त्यांचं काम करण्यात आलं आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार...
गेल्या अनेक वर्षांपासून पदमाईवस्ती, कवठीमळा व चोपनवस्ती येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता, त्यामुळे पावसाचं पाणी साचून राहात नव्हतं व जमिनीत मुरत नव्हतं, त्यामुळे गाळ काढणं गरजेचं होतं. त्यानुसार साचलेला गाळ काढून शेतीत भरण्याचं नियोजन करण्यात आलं. गाळ उचलण्यासाठी जणू गावात स्पर्धा लागली. मोठ्या प्रमाणावर ओढ्यातील गाळ उचलून पडीक वा नापिक जमिनीत तो पसरण्यात आला आहे, त्यामुळे या जमिनींची प्रत सुधारण्यास वाव मिळणार आहे. जलसंधारणाच्या कामामुळे येत्या पावसाळ्यात पावसाचा थेंब- थेंब जमिनीत जिरून भूजलपातळीत वाढ होणार आहे, त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई संपुष्टात येऊन शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचा विश्वास सरपंच मंदाकिनी चव्हाण व उपसरपंच संजय निंबाळकर यांच्यासह गावकऱ्यांना वाटत आहे.
40 दशलक्ष घनफूट पाणी साठणार...
याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे (स्थानिक स्तर) शाखा अभियंता दत्तात्रेय आहेरकर म्हणाले, "जळगाव सुपेत पाणी मुरण्यासाठी जमीन चांगली आहे. ओढा खोलीकरणाच्या कामामुळे व ओढ्यात ठिकठिकाणी पाणी अडविण्यासाठी केलेल्या भरावामुळे दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये तब्बल 40 दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. तेच पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे.'' विविध कामांमुळे गावची पीक पद्धती अधिक समृद्ध होणार आहे. सध्या गावपरिसरात बाजरी, कांदा, गुलछडी, हरभरा, रब्बी ज्वारी तसेच चिकू, सीताफळ आदी फळपिकं घेतली जातात. गावचा दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा आहे. गावात सुमारे दोन ते अडीच हजारांच्या संख्येने जनावरं आहेत. त्यात गाईंची संख्या चांगली आहे. गावचं दररोजचं दूधसंकलन सुमारे साडेसहा हजार लिटर आहे. बारामती तालुक्यात जिरायती भागातील सर्वाधिक दूध संकलन करणारं गाव म्हणून जळगाव सुपे ओळखलं जातं.
संपर्क ः मंदाकिनी चव्हाण - 9763399512 सरपंच, जळगाव सुपे (तनिष्का सदस्या)
लेखक : विजय मोरे
माहिती संदर्भ : अॅग्रोवन