भावा-बहिणींच्या नात्याला भारतीय संस्कृतीत अन्यनसाधारण महत्व आहे हे तर सारेच जाणतात. हे नातं अधिकाधिक समृद्ध व्हावं, त्याला वैश्विकता लाभावी यासाठी रक्षाबंधन या सणाची मौलिकता जगभरात ख्यातीप्राप्त आहे. बहिणीने भावाला राखी बांधून प्रेम आस्था व्यक्त करणाऱ्या या सणाने इथलं संपूर्ण भावजीवन व्यापून टाकलं आहे. मात्र अलीकडे राखी बनवितांना त्यासाठी लागणारं साहित्य हे रसायनयुक्त असल्याने निसर्ग-प्रेमी त्याबाबत खंत व्यक्त करु लागले. या बदलत्या सामाजिक व धार्मिक पर्यावरणात अमरावती जिल्ह्यातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राने केवळ बांबूपासून मनमोहक राख्या तयार करण्याचा प्रेरणादायी उपक्रम सुरु केला. 'सृष्टीबंध' असं नामाभिधारण केलेल्या या उपक्रमाने प्लास्टीक, थर्मोकाल व इतर अनैसर्गिक साधनांना पुर्णतः फाटा दिला अन् त्यातून साकारली खास 'मेळघाट राखी.....'
आर्थिक प्रगतीचे चक्र गतीमान करीत असताना त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रांचा वापर होतो. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही. शिवाय त्या त्या भागातील सामाजिक व सांस्कृतिक पाऊलखुणा नष्ट होऊ लागतात. हे टाळण्यासाठीच आदिवासी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे उपक्रम शासनाकडून सातत्याने राबविल्या जात आहेत. लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राला योग्य आर्थिक पाठबळ मिळाल्याने बांबूपासून शेकडो वस्तू तयार करुन स्थानिक कारागिरांच्या कलात्मक गुणांनी मोठी संधी दिली.
संपूर्ण बांबू केंद्राने गेल्या अठरा वर्षापासून मेळघाट भागातील ग्रामीण, आदिवासी समुदायासोबत राहून तेथील वनसंपदा व मनुष्यबळाचा अभ्यास केला. या वनसंपदेवर आधारीत लघूउद्योग सुरु केल्यास स्थानिक कारागीरांना रोजगार मिळू शकतो, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले. त्यातूनच राखी तयार करण्याची संकल्पना पुढे आली. नाबार्डच्या माध्यमातून बेंगलोर येथे संपर्क साधण्यात आला.
बांबूवर आधारीत या उपक्रमाची महती पटल्याने बेंगलोर वरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक चमू लवादा (मेळघाट) येथे दाखल झाला. या अधिकाऱ्यांनी स्थानिक कारागीरांशी सखोल चर्चा करुन विशिष्ट मार्गदर्शन केले. केवळ पंधरा दिवसात 5 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याने साऱ्यांचाच आत्मविश्वालस वाढला. वेणू शिल्पी औद्योगिक सहकारी संस्था लवादा या नावाने पंजीबद्ध झालेली ही संस्था् आता उत्पा्दन व वितरण या दोनही बाजू कामगारांच्या सामर्थ्यावर गतीमान झाली आहे.
कारागीर कार्यकर्तेच उत्पातदनाचे नियोजन करतात. राखीसाठी लागणारा बांबू शेजारच्या तीन गावांमधून आणल्याल जातो. प्रती नग बांबूचा दर आय.आय.टी. गेज नुसार निर्धारीत केल्यां जातो. अन्य कच्चा माल उदा. कागद, रेशमी धागा व लाकडी मनी नागपुरातून आणल्या जातो. नैसर्गिक रंग प्रक्रिया, बांबूचे कटींग तसेच अन्य उत्पादन पुरक प्रक्रियांमध्येब रासायनिक घटकांचा वापर अजिबात केल्या जात नाही.
या राखी निर्मितीच्या व्यवसायात अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर, मोर्शी हे चार तालूके सक्रीय झाले. दिदम्दा, काटकुंभ, धारणमहू, दाबीदा, कढाव, घूलघाट, पिलीग्राम, करजगाव, शिरजगाव इत्यादी गावातील जवळपास 100 युवक-युवतींच्या हाताला रोजगार प्राप्त झाला. याशिवाय अप्रत्यक्षरित्या 50 पेक्षा अधिक व्यक्ती या रोजगारात सहभागी झाले आहेत.
आतापर्यंत 70 हजार राख्यांची निर्मिती करण्यात आली. त्यात बारा प्रकारचे खास डिझाईन्स आहेत. 40 हजार राख्या विकल्यावर उरलेल्या राख्यांमधून पुन्हा नवीन डिझाईन तयार झाले. मोमेन्टीड, ग्रिटींग कार्ड, वॉल हॅगीग हे देखील ग्राहकांच्या पसंतीस पडले आहेत. अत्यंत विषम परिस्थितीत नैसर्गिक संसाधनावर आधारीत 'राखी' व्यवसाय आता भरभराटीला येऊ लागला आहे. स्वयंरोजगाराच्या संधी नाहीत असा त्रागा व्यक्त करणाऱ्यांसाठी 'मेळघाट राखी' निश्चितच प्रेरणादायी आहे.
लेखक : अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभ...
बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात ख...
बांबूपासून सुमारे साडेतीनशे प्रकारच्या विविध कलाकृ...
बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर ...