অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओळख रानभाज्यांची... बांबू

शास्त्रीय नाव - Bambusa arundinacea (बाम्बुसा एरुन्डिनेशिया)

कूळ - pooceae (पोएसी) 
स्थानिक नाव - कासेट, काष्ठी, कळक 
संस्कृत नाव - वंश, शतपर्वा, तृणध्वज. 
हिंदी नाव - बांस 
गुजराती नाव - वान्स 
इंग्रजी नाव - स्पाईनी थॉनी बाम्बू

बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो.

  • ही वनस्पती भारत, श्रीलंका व म्यानमार देशात आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळच्या जंगलात बांबू नैसर्गिकपणे वाढतो. काही ठिकाणी या वनस्पतीची लागवडही करतात. गवा व हत्ती हे वन्यप्राणी बांबूची पाने अगदी आवडीने खातात, हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
  • महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने, कोकण व पश्‍चिम घाट परिसरात तसेच खानदेश व विदर्भात आढळते.

ओळख

बांबूचे बहूवर्षायू सरळसोट वाढणारे उंच वृक्ष, समूहाने वाढतात. त्यांची बने किंवा बेटे तयार होतात. ओढ्यांच्या व नद्यांच्या काठांवर बांबू वाढतात.

  1. खोड - बांबूचे खोड 20 ते 30 मीटर उंच वाढते, त्यांना फांद्या नसतात. खोडांवर पेरे असतात. पेरे अनेक असून दोन पेरांच्यामधील भाग पोकळ असतो.
  2. पाने - साधी, एका आड एक, 17 ते 20 सें.मी. लांब, 2.2 ते 2.5 सें.मी. रुंद, लांबट भाल्यासारखी, टोकांकडे निमुळती, टोकदार तर तळाशी गोलाकार असून पाने खरबरीत असतात.
  3. फुले - लहान, असंख्य, साधी, एकलिंगी असून, फुलांचे अनेक घोस, बहुशाखीय लांब पुष्पमंजिरीत येतात. फुलांचा समूह 1.2 ते 2.5 सेंमी लांब व 0.5 सें.मी. रुंद व लांबट, दोन्हीकडे निमुळता असतो. समुहात प्रत्येकी दोन लहान फुले असतात. फुलांना पाकळ्या नसतात. पुंकेसर तीन, लांब, बिजांडकोश एक कप्पी, परागधारिणी दोन केसाळ.
  4. फळे - लहान, मध्यभागी साधारण फुगीर, दोन्ही टोकांकडे निमुळते. फळधारणेनंतर बांबूचे आयुष्यमान संपते व बांबू वाळून जातो. बांबूच्या बियांना "वेणुज' म्हणतात.

बांबू या वनस्पतीमध्ये नर व मादी फुले वेगवेगळ्या वृक्षांवर येतात.

स्त्री जातीच्या बांबूमध्ये, बांबू पक्व होऊ लागल्यानंतर त्यांच्या खोडांच्या पेरात घनस्राव जमा होऊ लागतो, त्यास "वंशलोचन' म्हणतात. हे दम्यावरील उत्तम औषध आहे. वंशलोचन बाजारात भेसळ करून विकतात, त्यामध्ये चुन्याचे खडे मिसळतात.

बांबूचे औषधी उपयोग

बांबूचे इमारती व कागदनिर्मितीसाठी व्यापारी मूल्य आहे. सोबतच ही वनस्पती औषधी गुणधर्माचीही आहे.

  • बांबूचे मूळ, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात.
  • बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात. हे कफ, क्षय आणि दम्यात अत्यंत उपयोगी आहे. हे उत्तेजक व ज्वरशामक म्हणूनही गुणकारी आहे. यामुळे कफरोगातील त्वचेचा दाह कमी होतो व कफातून रक्त पडत असल्यास ते बंद होते.
  • बांबूच्या मुळांचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यासाठी उपयुक्त आहे. बांबूचे बी रुक्षोष्ण असून स्थूलांसाठी आणि मधुमेहींच्या आहारात उपयुक्त आहे.
  • बिया कोमोत्तेजक व संसर्गरक्षक म्हणून उपयोगी आहेत.
  • बांबूच्या कोवळ्या कोंबाचा किंवा कोवळ्या पानांचा काढा गर्भाशयाचे संकोचन होण्यासाठी बाळंतपणात देतात. यामुळे विटाळ पडतो व विटाळ स्राव नियमित होतो.
  • गुरांना अतिसारात बांबूची पाने व काळी मिरी मिठाबरोबर देतात.
  • बांबूच्या कोंबापासून बनविलेले पोटिस, व्रणातील किडे काढण्यासाठी वापरतात.
  • कोवळ्या कोंबापासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे. यामुळे भूक व पचनशक्ती वाढते.
  • कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
  • कोवळी पाने दालचिनीबरोबर वाटून कफातून रक्त पडत असल्यास देतात.

बांबूच्या भाजीचे औषधी गुणधर्म

बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी, यामुळे मासिक पाळी साफ होते.

  • बांबू ही खूपच तंतुमय वनस्पती आहे, शिवाय ती क्षारयुक्तही आहे, यामुळे या भाजीतील तंतू व क्षार शरीराला मिळतात.

बांबूच्या कोंबाची भाजी

पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात, तेव्हा ते कोवळे असतात. हेच कोंब भाजी करण्यासाठी योग्य असतात. हे कोंब सोलून त्यावरील टणक आवरणे काढून टाकावीत. आपले नख खुपसता येईल, असा आतला कोवळा भाग काढून घ्यावा, तो पाण्याने धुवावा. बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवावा. त्याला असणारा उग्र वास यामुळे कमी होता. तो मऊदेखील होतो. यासाठी आदल्या रात्री कोंब चिरून ठेवून, दुसऱ्या दिवशी भाजी करावी.

साहित्य

चिरलेला कोंब, कांदा, भिजवलेली मसूरडाळ किंवा हरभराडाळ, तिखट, ओले खोबरे, तेल हळद, मीठ, मोहरी, हिंग इ.

कृती

चिरलेला कोंब कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावा. भांड्यात तेल तापवून मोहरी, हिंग घालून फोडणी करावी, त्यावर चिरलेला कांदा टाकून परतावा. मग शिजवून घेतलेला कोंब व भिजवलेली डाळ घालावी. नंतर हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतावे. भाजी वाफवून शिजवावी. नंतर किसलेले ओले खोबरे वरून पसरावे व सुकी भाजी बनवावी. पातळ भाजी करायची असेल तर भाजीत थोडे पाणी घालावे. ओले खोबरे बारीक वाटून घालावे व भाजी परतून शिजवून घ्यावी.

साहित्य

बांबूचे कोवळे कोंब, भिजवलेली हरभळाडाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे, दूध, तेल, फोडणीचे साहित्य इ.

कृती

बांबूचे कोंब सोलून घ्यावेत. कोंब किसणीवर किसावा. थोडा वेळ तो पाण्यात टाकावा. नंतर कीस चांगला वाफवून घ्यावा. फोडणी करून घ्यावी. भिजवलेली डाळ फोडणीत परतून घ्यावी. त्यावर वाफवलेला कीस, तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून भाजी शिजवावी. शिजवताना भाजीत पाणी घालू नये, दूध घालावे. ही अतिशय चविष्ट अशी भाजी आहे.

 

लेखक - डॉ. मधुकर बाचूळकर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate