অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिमेंटच्या जंगलातील टेरेस शेती

सिमेंटच्या जंगलातील टेरेस शेती

शहरीकरणाच्या मर्यादेत पर्यावरणपूरक आणि स्वावलंबनावर आधारित अशा गोष्टी करणं मोठ्या प्रमाणात शक्य होत नसलं तरी एका मर्यादेत ते शक्यही होतं हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ’टेरेस शेती’ हा असाच एक उपक्रम. सिमेंटच्या शहराला मातीचा स्पर्श देणार्‍या टेरेस शेतीविषयी

शेती म्हटले की शहर डोळ्यासमोर न येता गावच येते. आजच्या घडीला शहरातील लहान मुलांना विचारले की आपण ज्या भाज्या, फळ खातो ती कुठे उगवतात तर त्यांना ते माहीतच नसते. ती सांगतात की भाज्या, फळं मार्केटमध्ये किंवा भाजी घेऊन येणार्‍या टेंपोमध्ये, मॉल, चौकातल्या भाजीवाल्या मावशीकडे मिळतात. याचे कारण असे दिसते की शहरं जसजशी वाढायला लागली तशी शहरांपासून शेती लांब जायला लागली. शिवाय शेती आतबट्ट्याची व्हायला लागल्यामुळेही शेतीचे प्रमाण कमी व्हायला लागले आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरालगतही दाट लोकवस्ती संपल्यानंतर थोडी-थोडी शेती पूर्वी दिसायची. पण गेल्या १०-१५ वर्षात तर अशी शेती दिसणे अशक्यकोटीतली बाब होत आहे. मात्र अलीकडे भारतात टेरेस शेती आपली मुळं रुजवत आहे. अनेकजण केवळ हौस म्हणून का होईना टेरेस शेतीचे प्रयोग करत आहेत. काही वेळा आपल्यापर्यंत भाज्या, फळं येईपर्यंत खूप कालावधी जातो. त्यामुळे ताज्या भाज्या, फळ मिळवीत यासाठीही अनेकजणटेरेस शेतीचे प्रयोग करत आहेत.

टेरेस शेतीचा पर्याय

अलीकडे शेतीतील औदासिन्य तसेच घाट्यातली शेती यामुळे अनेकदा अनेक भाज्या, फळं न मिळणे हे प्रकार होत आहेत, त्यामुळेही अनेकजण टेरेस शेतीचा पर्याय अवलंबित आहेत. शिवाय अगदी काही जण त्यांना काहीतरी वेगळे करायचे आहे किंवा बागकामाची आवड आहे म्हणून टेरेस शेती करत आहेत. पण आता वेळ आली आहे जाणूनबुजून अशी शेती करणे. शिवाय स्वयंपाकघरातील ओला कचरा कुठे जिरवायचा सध्या मोठा प्रश्न पुण्या-मुंबई सारख्या शहरांमध्ये वारंवार डोकं वर काढतो आहे. महानगरे एवढ्या झपाट्याने वाढत आहेत की या शहरांजवळ असणारी शेते, फळांचे मळेही दूर दूर जात आहेत. त्यामुळे आपल्याकडे येणारी भाजी मार्केटमध्ये येणारी भाजी, फळं बराच प्रवास करून बाजारात विकायला येतात आणि त्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतात. वाहतुकीचा वेळ, खर्च, इंधनाचा अपव्यय या सर्वांमुळे त्या भाजीची किंमतही वाढते, ताजेपणा कमी होतो आणि कार्बन फूटप्रिंटही वाढायला मदत होते. आपल्या शहरातून महिन्यालाच काय पण दिवसालाही टनावारी ओला कचरा जमा होतो. हा कचरा मोठ्या प्रमाणात जिरवायची, विकेंद्रित करायची व्यवस्था अद्याप नाही. कचर्‍याचे सुयोग्य व्यवस्थापन नसल्यामुळे तो कचरा वाहून नेताना मानवी ऊर्जा, वेळ, पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आहे, शिवाय आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

म्हणजे एक व्यक्ती रोजच्या जीवनात प्रकृतीतून किती कार्बन शोषतो आणि किती कार्बनचा कचरा वातावरणात सोडतो, त्याचं माप म्हणजे कार्बन फूटप्रिंट. कारण वनस्पती कार्बन डायऑक्साईड वापरून आपले अन्न तयार करतात. शिवाय त्या त्या परिसरातील कचरा त्याच परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात जिरवणे हाच एक मार्ग सध्या तरी दिसतो. पण मग हा कचरा जिरवायचा कुठे? तर शहराच्या मध्यवर्ती भागातल्या किंवा ठिकठिकाणच्या उपनगरांमधील उद्यानांमध्ये व शहरी शेतांमध्ये ! कारण आपल्या घरातल्या बागेत आपण ठराविक प्रमाणापलीकडे जास्त कचरा जिरवू शकत नाही. त्यामुळे शहरात हा कचरा जिरवून त्या माध्यमातून शेती करण्यासारखा उत्तम पर्याय नाही. सिमेंट-कॉन्क्रीटच्या जंगलात ही हिरवाई आजूबाजूच्या वातावरणासाठीही चांगली ठरते.

टेरेस शेती करण्याची कारणे

जंगलातली झाडे कशी वाढतात? तेच तत्त्व इथेही लावता येते. जंगलामधील जमीन ही उच्च प्रतीची समजली जाते. असे का? तर त्या जमिनीवर वर्षानुवर्षे पालापाचोळा, फळे-फुले, झाडांचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र, पक्ष्यांचे मलमूत्र, किड्यांची शरीरे इत्यादी जमा होऊन, मिसळून त्यांचे विघटन होत असते. अशा जमिनीमधील कार्बन- नायट्रोजनचे तसेच जीवाणूंचे प्रमाण हे झाडांच्या वाढीसाठी योग्य असते. हा जो वनस्पतींसाठी आवश्यक घटक तयार होतो, त्याला ‘ह्युमास’ असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जाते. ही प्रक्रिया घडून यायला पाचशे वर्षे लागतात. टेरेस शेतीमध्ये अशा मातीची नक्कल केली जाते. ही माती बनवायला किमान चार महिन्यांचा अवधी लागतो. ‘अमृत माती’ बनविण्याची व तिच्या वापराची प्राथमिक माहिती अनेकांनी त्यांच्या त्यांच्या वेब साईट, ब्लॉगवर वगैरे उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा उपयोग करता येऊ शकतो. मात्र प्रत्येक ठिकाण, तेथील पर्यावरण, हवामान आवश्यकता यानुसार या कृतीत आपापल्या परीने आणि सोयीने बदल केला जाऊ शकतो. टेरेस शेतीतील जे वाफे किंवा कुंड्या आहेत त्यामध्ये सुरवातीला शेणखत तसेच गोमूत्र यांचा वापर केला जातो. निसर्गाच्या जवळ जाणे, ताज्या भाज्या, फळं मिळवणे तसेच प्रयोग किंवा शेतीची आवड पूर्ण करणे अशा विविध कारणांमुळे अलीकडे मोठमोठ्या शहरांमध्ये टेरेस शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे.

ही सर्व कारणे तर आहेतच पण मुख्यत्वे जगभरात प्रत्येकच क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्या (multinational company) आपली पाळंमुळं पक्की करत आहेत. त्यातून भारत आणि भारतातली शेतीही सुटलेली नाही. बी-बियाणं, खतं, कीटकनाशकं, औजारं सर्व काही या कंपन्यांची आहेत. त्या केवळ नफा आणि प्रचंड नफा कमावण्यासाठीच धंदा करत आहेत. शिवाय या कंपन्यांच्या पायाखाली भारतासारख्या देशांची बोटं चेपत चालली आहेत. त्यामुळे सरकार शेतीतील सबसिडीही दिवसेंदिवस कमी करत आहे. याचा परिणाम शेती महाग होत चालली आहे. ही महागाई थेट आपल्यालाही भिडतेच. कारण आपला चरितार्थही त्यावर चालतो. त्याच वेळी अमेरिकेतल्या शेतीला मात्र जवळपास ८०% सबसिडी तेथील सरकार देते. त्यामुळे तेथील भाज्या, फळं आपल्या बाजारातही भारतात उत्पादित झालेल्या भाज्या, फळांपेक्षा स्वस्त मिळतात. म्हणजेच भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी सुती कापडाबाबत जे करत होती त्याचप्रमाणे आज या MNC फासे टाकत आहेत. त्यामुळे महाग भाज्या, फळं घेणे सर्वसामान्य माणसाला परवडणारं नाही. शिवाय अमेरिकेतील बहुतांश पिके जी.एम. बियाणं वापरून उत्पादित केलेली आहेत. त्यामुळे आपल्याकडे अशावर पर्याय म्हणून पर्यायी शेती म्हणजेच टेरेस शेतीचे प्रयोग केले जात आहेत. आज आपल्याला काही बदल करायचे असतील तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. टेरेस शेतीच्या या प्रयोगामध्ये मुंबईतील ‘अर्बन लीव्हज्’ या सामुदायिक टेरेस शेती करणार्‍यांप्रमाणे आपली संख्या वाढवावी लागेल.

पूनम बा. मं.
चलभाष : ९४२३०८०२२४

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate