অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंगल वसवणारा माणूस

जंगल वसवणारा माणूस

चौदाशे एकर जमिनीवर एक एक झाड लावत जंगल उभारणारा आसाममधला जादव पायेंग. अनेक प्राण्यांना, पक्ष्यांना ‘घर’ देणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त जादव यांची ही सुरस कथा आजच्या जागतिकवन दिनानिमित्त.

एखादा माणूस एखादं झाड लावतो, कुणी बाग लावतो, कुणी आपला परिसर झाडं लावून हिरवीगार करतो, पण कुणी एक एक झाड लावत जंगल वाढवू शकतो? तेही चौदाशे एकर जमिनीवर? कल्पना तरी करू शकाल का? पण ही कल्पना सत्यात आणली आहे, आसामच्या जादव पायेंग यांनी. आज हे जंगल वाघ, गेंडे, गवे, हरिण, हत्ती, माकड, ससे, गिधाडं अनेक प्रकारच्या पक्षी-प्राण्यांचं निवासस्थान झालं आहे. मानवजातीवरच उपकार करणाऱ्या या कार्याबद्दल त्यांना नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कारही मिळाला आहे.

पस्तीस वर्ष सातत्याने सुरू असलेल्या त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीची ही कथाही तेवढीच रोमांचकारी आहे. मिशिंग जमातीत जन्मलेला जादव पायेंग हा मूळचा आसाममधला जोरहाटचा रहिवासी! ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर. याच ब्रह्मपुत्रेमध्ये मजुली (Majuli) नावाचं बेट आहे. नदीमधल्या बेटामधलं हे खूपच मोठं बेट मानलं जातं. गेल्या काही वर्षांपासून जादव याच बेटावर राहत आहेत. ब्रह्मपुत्रेला सतत येणाऱ्या पुरामुळे या बेटावरच्या मातीची झीज झालीय. वाळू पसरलेली असल्यानं सर्व भाग ओसाड/ वाळवंट झालाय. आज जादव पायेंग बावन्न वर्षांचे आहेत. ते या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या कार्याकडे वळले १९७९ मध्ये. तेव्हा जादव सोळा वर्षांचे होते, ब्रह्मपुत्रेला प्रचंड पूर आला व अतोनात नुकसान झालं. या पुरानंतर मजुली बेटापासून जवळच असलेल्या ‘अरुणा शापोरी’वर जादव आले (आसामी भाषेत शापोरी म्हणजे बेट). तिथे त्यांना किनाऱ्यावर जिकडेतिकडे मेलेल्या सापांचे असंख्य सांगाडे पडलेले दिसले. पुराबरोबर वाहत आलेले ते साप होते. एकाही झाडाचा आसरा नाही. शिवाय वरून रणरणतं ऊन. त्यामुळे ते साप मृत्युमुखी पडले होते. हळुवार मनाच्या जादवला हे सहन झालं नाही. त्याला रडू कोसळलं. ‘एक दिवस आपणही असेच मृत्युमुखी पडणार का?’ त्याने तिथल्या स्थानिक

अनुभवी रहिवाशांना विचारलं. त्या वेळी सर्वानी ‘असं काही होणार नाही’ असं आश्वासनही दिलं. मात्र जादवचं समाधान झालं नाही. त्याचं मन शोध घेत राहिलं. ‘असं का झालं असावं?’ याचा शोध घेतला असता काहींनी सांगितलं, ‘झाडं नसल्यानं असं झालं. या ओसाड वाळवंटात काहीच करता येत नाही. तुलाच काही करता आलं तर बघ.’ असं म्हणून त्यांनी जादवलाच वीस बांबूंची रोपं दिली. जादवनं मग एक कुंपण तयार केलं आणि त्या वाळुमय मातीत ती रोपं लावली व त्यांची काळजी घेऊ लागला. आणि ती रोपं खरोखरच वाढू लागली. मग जादवनं अरुणा शापोरीवरचा तो सर्व भाग हिरवा करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो दररोज परिश्रम घेऊ लागला. सोळा वर्षांचा जादव आता एकाच ध्येयानं झपाटला गेला ..

एखादी गोष्ट करायचं पक्कं असलं की त्यासाठी आपोआप वातावरण तयार होतं म्हणतात. तसं इथे झालं. १९७९ मध्येच आसामच्या जंगल खात्यानं अरुणा शापोरीतल्या दोनशे हेक्टर (जवळजवळ पाचशे एकर) जागेवर जंगल उभारणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी अनेक मजूर नेमलेही गेले. त्यामध्ये जादवही एक होते. असं म्हणतात की, काही काळानंतर हे काम मध्येच बंद पडलं व सर्व मजूर शहराकडे निघून गेले. एकटे जादव मात्र मागेच राहिले व या निर्जन, ओसाड भागात झाडं लावण्याचं काम एकहाती करू लागले. दररोज न कंटाळता. हे करीत असताना त्यांनी एकर, हेक्टर असा हिशेब न करता केवळ झाडं लावण्याचा ध्यास घेतला आणि पस्तीस र्वष हे काम करताना चौदाशे एकर जमिनीवर एक घनदाट जंगल उभं राहिलं. या जंगलाला मोलाई कठोनी ((Molai Kathoni) किंवा मोला फॉरेस्ट म्हणतात. (आसामी भाषेत कठोनी म्हणजे जंगल. जादव यांना लाडाने ‘मोलाई’ म्हणतात आणि म्हणून त्यांनी लाडाचं ‘मोलाई’ हे नाव त्या जंगलाला दिलं आहे.) हे काम करीत असताना त्याला मानाचं, प्रसिद्धीचं, पैशाचं कसलंही भान नव्हतं. पण कस्तुरीचा सुगंध दरवळल्याशिवाय कसा राहील? जादव यांच्या कार्याची माहिती तब्बल तीस वर्षांनी २००८ साली जगाला झाली. तीही एका योगायोगानंच!

जितू कालिता नावाचा एक वार्ताहर ‘प्रांतिक’ नावाच्या आसामी भाषेतल्या मासिकासाठी काम करायचा. जितू जोरहाटचाच. तो उत्तम फोटोग्राफरही असल्याने विविध प्रकारचे माहितीपट करायचा. असाच एकदा तो अरुणा शापोरीवर आला. तिथे त्याला आकाशात काही गिधाडे दिसली. त्यांचा फोटो काढण्याच्या उद्देशाने पाठलाग करताना वाळूतून चालत चालत तो खूप दूरवर आला आणि त्याला समोर घनदाट जंगल दिसलं. त्याचा विश्वासच बसेना. तिथेच त्याला जादव जंगलाच्या दिशेने चालताना दिसले. जितू आता गिधाडांच्या ऐवजी जादव यांचा पाठलाग करू लागला. जादव आपले झाडं लावण्याच्या कामाला रोजच्याप्रमाणे चालले होते. जादव यांनी मागे वळून पाहिल्यावर हातात मोठ्ठा कॅमेरा घेतलेला जितू त्यांना दिसला. असल्या कॅमेऱ्याची माहिती नसल्याने जादव यांना वाटलं की शिकारीच आला आहे. त्या वेळी त्या जंगलात नुकतंच एका गव्याचं आगमन झालं होतं. जादव यांना वाटलं की, या ‘शिकाऱ्याला’ कुठून तरी त्याचा सुगावा लागला असावा आणि त्याची शिकार करण्यासाठीच हा आला असावा. जादव यांनी हातात दगड घेतला व ते जितूला परतवण्याचा प्रयत्न करू लागले. पण जितूनं आसामी भाषेत बोलून आपला स्वच्छ उद्देश सांगितला. मग मात्र जादव शांत झाले आणि त्यांची जितूशी मैत्री झाली. जितूनं एका लेखाद्वारे जादव यांच्या कार्याची माहिती प्रसिद्ध केली. त्याच वर्षी आणखी एक घटना घडली.

या घटनेमुळे तीस वर्षांनंतर आसाम सरकारचं लक्ष जादव यांच्या कार्याकडे गेलं. अरुणा शापोरीवर अचानक शंभर- दीडशे हत्तींचा एक कळप आला आणि मोलाई फॉरेस्टच्या दिशेनं चालू लागला. वाटेत येईल ते तुडवत ते हत्ती चालत होते. त्यामुळे तिथल्या घरांचं, पिकांचं अतोनात नुकसान झालं. सर्व माणसं भयभीत झालेली होती. जादव यांच्या घराचाही चक्काचूर झाला होता. तेही प्रथम गोंधळले, पण नंतर थक्क झाले आणि आनंदानं बेभानही झाले. आपल्या हातून केवढं कार्य घडलं आहे याची त्यांना जाणीव झाली, कारण त्यांनी निर्माण केलेल्या जंगलाच्या आकर्षणानं पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा संख्येनं हत्ती त्या भागात आले होते. परंतु त्यांचा आनंद फारच थोडा काळ टिकला. कारण या सर्व नुकसानासाठी तिथल्या रहिवाशांनी जादव यांनाच दोषी ठरवलं. इतकंच नव्हे तर त्यांना जबर मारहाण केली. जादव यांनी हे सहन केलं. परंतु लोकांनी रागाचा उद्रेक म्हणून झाडं कापायला सुरुवात केली. तेव्हा मात्र जादव संतापले व ‘प्रथम मला तोडा, मगच झाडं तोडा’ हा पवित्रा घेतला. तेव्हा झाडं कापणं थांबलं, पण या लोकांनी जंगलाच्या दुसऱ्या बाजूला आग लावली. जवळजवळ एकदशांश जंगल जळून गेलं. हे दु:ख सहन करणं त्यांना शक्यच नव्हतं. लगेचच जादव यांनी जंगल खात्याला कळवलं. खात्याचे लोक आले आणि त्या ओसाड भागावर उभे राहिलेलं एवढं मोठ्ठे जंगल पाहून थक्क झाले. आसाम सरकारला याची दखल घ्यावी लागली. त्या सरकारनं तेथील सर्व रहिवाशांना नुकसानभरपाई करून दिली तेव्हा कुठे लोकांचा राग शांत झाला. सरकारनं जादव यांच्या कार्याची प्रशंसा केली. (तेव्हापासून दरवर्षी हे हत्ती मोलाई फॉरेस्टमध्ये येतात व सहा महिन्यांसाठी तेथे मुक्काम करतात.) या प्रसंगापासून जादव यांची माहिती माध्यमाद्वारे सर्वाना समजली. त्यानंतर त्यांना  अनेक पुरस्कार मिळाले.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं २२ एप्रिल २०१२ या दिवशी (जागतिक वसुंधरादिनी) जादव यांचा सत्कार केला व त्यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ हा पुरस्कार दिला. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनीही जादव यांचा सत्कार केला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वर्षीच्या (२०१५) पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

२०१२ पर्यंत जादव यांच्या कार्याची माहिती भारतात पसरली होती, परंतु परदेशात त्याच्या कार्याची माहिती करून देण्याचं काम विल्यम डग्लस मॅकमास्टर या अमेरिकी माणसानं केलं. त्यानं २०१३ मध्ये जादव यांच्या कार्यावर एक माहितीपट तयार केला. तिचं नाव ‘फॉरेस्ट मॅन’ (यू टय़ूबवर हा माहितीपट उपलब्ध आहे.) माहितीपटाला २०१४ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हल (अमेरिकन पॅव्हेलियन)मध्ये ‘उत्कृष्ट माहितीपट’ (एमर्जिग फिल्म मेकर कॅटेगरी)चा पुरस्कार मिळाला. जादव यांच्या कार्याचाही हा सन्मानच!
जंगल उभारणारा हा माणूस मात्र अजूनही आपल्या कुटुंबीयांसमवेत मजुली बेटावरच राहतो. पत्नी बिनीता, दोन मुलगे व एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. घरातले सर्व जण त्यांना त्यांच्या कार्यात मनापासून मदत करतात. जादव यांच्याकडे पन्नासेक गाई, म्हशी आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसायातून येणाऱ्या पैशावर जादव यांचा चरितार्थ चालतो. त्यांची मुलं शाळेत शिक्षण घेत आहेत.

जादव यांनी लावलेल्या जंगलात आयुर्वेदिक औषधी असलेली असंख्य झाडं आहेत. पण याव्यतिरिक्त जंगलात त्यांनी तीन प्रकारचं गवत लावलं आहे. यातला एक प्रकार हत्तींसाठी, दुसरा गेंडय़ांसाठी व तिसरा गाई, म्हशी, हरिण, शेळय़ा यांच्यासाठी. त्यांना या गवताची नावं माहीत नाहीत, पण ते गमतीत म्हणतात, ‘जनावरांना तरी कुठं नावं माहिती असतात?’ जमिनीचा कस (पोत) वाढवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. कुणी काही सांगितलं की जादव ते करायचा प्रयत्न करायचे. एकदा कुणी तरी सांगितलं की, लाल मुंग्यांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. झालं, लगेचच ते एका खेडय़ात गेले व तिथून भरपूर लाल मुंग्या अरुणा शापोरीवर आणल्या. हे करताना त्यांना इतक्या मुंग्या चावल्या की त्या वेदना त्यांना आजही जाणवतात.

ही जंगल उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लक्ष ब्रह्मपुत्रेतल्या दुसऱ्या बेटाकडे, मेकाही (Mekahi) कडे लागलंय. तिथल्या सहाशे हेक्टर (१५०० एकर) जागेवर आता त्यांना जंगल उभं करायचं आहे. हे काम त्यांनी २०११ पासून सुरूही केलं आहे. अजूनही दररोज सकाळी स्वत: न कंटाळता हे काम करीत आहेत. मात्र आता त्यांना आसाम सरकारची साथ आहे.

जादव पायेंग यांचं कार्य पाहिल्यावर जाँ गिओनो या फ्रेंच लेखकानं लिहिलेल्या ‘द मॅन हू प्लांटेड ट्रीज’ या कथेची आठवण होते (मूळ कथा फ्रेंच भाषेत आहे). ही कथा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली आहे. एलझेआर्ड बाऊफिए नावाच्या मेंढपाळाची ही कथा आहे. पत्नी निवर्तल्यानंतर बाऊफिए एकाकी होतो आणि हा एकाकीपणा घालवण्यासाठी झाडं लावायचं ठरवतो. त्याप्रमाणे आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी ओसाड जागेवर एकटाच झाडं लावतो व तीस-चाळीस वर्षांनी तिथे एक घनदाट जंगल तयार होतं, अशी काहीशी ती कथा आहे. या कथेवर त्याच नावाचा इंग्रजी चित्रपटही निघाला. बाऊफिए ही खरीखुरी व्यक्ती आहे असंच लोकांना वाटायचं. जाँ गिओनोनही त्याविषयी मौन पाळलं, पण बऱ्याच वर्षांनी (१९५७ मध्ये) त्यानं ही कथा काल्पनिक असल्याचा गौप्यस्फोट केला. लोकांमध्ये झाडांविषयी प्रेम वाटावं, त्यांनी लावावीत या हेतूनंच त्यानं ही कथा लिहिली असं सांगितलं. त्या वेळी (१९५७ मध्ये) आपले जादव पायेंग केवळ चार वर्षांचे असल्यानं त्यांना या कथेची माहिती असणं अशक्य आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा विलक्षण असतं या म्हणीप्रमाणे जादव ‘मोलाई’ पायेंग हा हाडामासांचा खराखुरा मनुष्य आहे! भारतीय मातीत जन्मलेला आणि वाढलेला अस्सल ‘फॉरेस्ट मॅन!’

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले जादव पर्यावरणतज्ज्ञच म्हणायला हवेत.

त्यांची काही मतं आहेत ती अशी,
  • ग्लोबल वॉर्मिगचे परिणाम टाळायचे असतील तर झाडांना पर्याय नाही.
  • आयुष्याचा मंत्र- कमी झोपा, सकस अन्न खा, अपाँग प्या, पण काम मात्र कसून करा. (अपाँग हे मिशिंग जमातींचं एक पेय आहे. जंगलात मिळणाऱ्या वेगवेगळय़ा एकशे एक पानांपासून बनवलेलं!)
  • पर्यावरणशास्त्र हा विषय शाळांमध्ये सक्तीचा असला पाहिजे. यापुढे ऑक्सिजनचा तुटवडा न जाणवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनं दोन झाडं लावली पाहिजेत व त्याची निगा राखली पाहिजे. जर एखाद्यानं हे केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांला (चक्क) नापास करावं!
  • अनुदान मिळालं की लोक आळशी बनतात. त्यांची कष्टाची सवय जाते. अनुदान नकोच

 

स्त्रोत : लोकसत्ता, २१ मार्च २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate