कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश से.च्या पुढे जाऊ लागल्याने पिकांना स्ट्रोक बसतो. परिणामी फळपिकांत वाढ खुंटणे, फळगळ होणे, फळे काळी पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. पिकात प्रकाशसंश्लेषण क्रिया योग्य प्रकारे होत नाही, पानांतील हरितद्रव्याचे प्रमाण घटते. सलग पंधरा दिवस तापमान चाळीस अंशांपुढे राहिल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. उष्म्याच्या स्ट्रोकपासून हानी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पिकांचे व्यवस्थापन चोख करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कमाल तापमान चाळीस अंशांवर गेल्यास डाळिंब फळांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात, फळे काळी पडून तडकतात, दाणे फळाबाहेर पडतात. यासाठी
बागेला समप्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करावे. पाणी शक्यतो रात्री वा सकाळी लवकर द्यावे. फळाच्या वरची कोवळी फूट काढू नये, ती तशीच ठेवावी, जेणेकरून सूर्यप्रकाश थेट फळावर पडणार नाही. केओलीन बाष्परोधकाची पाच ते सात ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात 15 दिवसांतून
एक फवारणी केल्यास उन्हाची किरणे परावर्तित होण्यास मदत होते. शक्य झाल्यास झाडांवर कापडाची सावली करावी, फळांवर पॉलिमर बॅग लावाव्यात, बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
- डॉ. सचिन सुरोशे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर
कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास संत्रा झाडांची वाढ कमी व्हायला सुरवात होते. 42 अंशांवर ती वाढ संथपणे होते. संत्र्याच्या उशिरा फुटलेल्या बहराची देठे नाजूक असतात, ती उन्हाचा ताण सहन करू शकत नाहीत. अशा वेळी ठिबक सिंचन असल्यास उत्तम; परंतु पारंपरिक पद्धतीने पाणी देत असाल तर दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवून, जमिनीत ओलावा टिकून राहील यासाठी आच्छादन करावे. पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर चार- पाच दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये. पूर्ण वाढलेल्या व फळे असलेल्या झाडाला 100 ते 150 लिटर पाणी प्रति दिवस द्यावे. पाण्यात खंड पडला तर पोटॅशिअम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात 10 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. यासोबत 2,4 डी किंवा जिब्रॅलिक ऍसिडची दीड ग्रॅम प्रति शंभर लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
डॉ. अंबादास हुच्चे, प्रमुख शास्त्रज्ञ, उद्यानविद्या, राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र, नागपूर
तापमान वाढल्याने आर्द्रता घटली असून हवामान कोरडे झाले आहे. बाष्पीभवनाचे वाढते प्रमाण तसेच कमी पाण्यामुळे झाडे वाळत आहेत. फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्या झाडांवर फळे आहेत, त्यांना प्रति झाड 70 ते 80 लिटर पाणी देण्याची गरज असेल. झाडाला फळे नसतील तर प्रति झाड दहा लिटर पाणी द्यावे. बागेत आच्छादन करावे. झाडांच्या फांद्या कमी कराव्यात. पोटॅशिअम नायट्रेट प्रति लिटर दहा ग्रॅम या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
डॉ. एम. बी. पाटील, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर
कोकणात अद्याप फार तापमानवाढ नाही. काही ठिकाणी फळे अंड्याच्या आकाराची आहेत, तर काही ठिकाणी याहून मोठी, तसेच काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. कमाल तापमानात अचानक म्हणजे एकदम तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली तर जी फळे अंड्याच्या आकाराची असतील, त्यांची गळ होऊ शकते. ती रोखण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेटची दहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. अंड्याच्या आकाराहून
फळे मोठी असतील तर ही फवारणी फायदेशीर ठरणार नाही. तापमानवाढीमुळे फळगळ होते. शक्य असल्यास झाडांना पाणी द्यावे. जी फळे तयार होत आहेत, ती उष्णता वाढल्याने लवकर तयार होतील, काढणी योग्य वेळी, सकाळी लवकर करावी. जास्त जून फळे ठेवली तर फळांत साका येण्याचे प्रमाण वाढते.
डॉ. पराग हळदणकर, उद्यानविद्या, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
तापमान व पाणीटंचाईमुळे केसर आंब्याच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होऊ शकते. फळांचा आकारसुद्धा लहान राहिला आहे. ज्या ठिकाणी केसरची नवीन लागवड आहे, अशा ठिकाणी तापमान वाढल्याने उन्हाच्या झळा बसून पाने करपतात, झाडाची वाढ अनियमित होते, वाढीवर परिणाम होतो. बाष्पीभवन तसेच प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होतो, फळांची प्रत खालावते, उत्पादनावर परिणाम होतो. झाडांच्या खोडांना बोर्डोपेस्ट लावावी. झाडांभोवती आच्छादन करावे. पोटॅशिअम नायट्रेट प्रति लिटर 10 ग्रॅम या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, यामुळे झाडात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते. छोटी बाग असेल, फळे येत असतील, तर झाडांच्या खोडांना गवत किंवा बारदान बांधावे, म्हणजे खोड तडकणार नाही. फळे पोसण्यासाठी किंवा दर्जेदार फळे येण्यासाठी जिथे पाणी कमी आहे, त्यांनी ठिबकचा कार्यक्षम वापर करावा. आच्छादन केल्याने वाफसा टिकून राहील. सायंकाळी पंपाने केवळ पानांवर पाण्याची फवारणी केल्यास पानांची पर्णरंध्रे थंड होतात. झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी चांगली मदत होते.
- प्रा. संजय पाटील, फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद
वेळेवर लावलेला गहू कापणीला आला आहे, त्यामुळे त्यावर परिणाम होणार नाही; परंतु तापमान वाढल्याने उशिरा पेरलेला गहू सात ते आठ दिवस आधीच पक्व होईल. यामुळे दाणे भरण्याच्या अवस्थेला जो कालावधी मिळाला पाहिजे, तो मिळणार नाही. परिणामी दाणे बारीक राहतील. नंतरच्या गव्हाला थंडी मिळत नसल्याने उशिरा पेरलेल्या गव्हावर परिणाम होतो, तेव्हा वेळेवर पेरणी फायदेशीर ठरते.
- डॉ. प्रमोद रसाळ, गहू संशोधन केंद्र, निफाड
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...