অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोल्ट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान

गेल्या काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. इनक्‍युबेटर व हॅचर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. यामध्ये सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केली जातात. याचा पोल्ट्री व्यावसायिकांनी फायदा करून घेतला पाहिजे.

पोल्ट्रीतील आधुनिकीकरणातून मजुरांवरील अवलंबन कमी होते. पक्ष्यांच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते, गुणवत्ता कायम राखली जाते. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वाचे आहे. हॅचरीज, ब्रॉयलर फार्म, ब्रीडर फार्म, खाद्य तयार करण्याचे युनिट, औषधे व लस तयार करणारे युनिट, मशिनरी तयार करणाऱ्या उद्योग समूहांमध्ये आधुनिकीकरण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायात नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये करार पद्धतीने कुक्कुटपालन, खाद्यनिर्मिती असे उद्योग सुरू करणे शक्‍य आहे. पोल्ट्री व्यवस्थापनामध्ये आता संगणकीकरणही वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवणे सोपे जात आहे.

पोल्ट्री प्रकल्पाची आखणी

1) जागेची निवड - पोल्ट्रीची जागा निवासी भागापासून दूर असावी. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नसावे. पक्ष्यांचे व्यवस्थापन करताना जैव-सुरक्षेचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. 
2) पाणीपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता - चांगल्या प्रतीचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे किंवा पाणी प्रक्रिया संयंत्राच्या वापरानेही हे करता येईल. 
3) कायम वीजपुरवठ्याची सोय - विद्युतपुरवठा खंडित झाल्यास पुरेशी क्षमता असलेले जनरेटर किंवा इतर काही पर्यायांची सोय असावी. 
4) कमी आर्द्रता - विविध रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आणि पक्ष्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य वातावरण आवश्‍यक असते. 
5) तांत्रिक कर्मचारी - प्रशिक्षित, योग्य ज्ञान असलेले कर्मचारी प्रकल्पावर असणे आवश्‍यक आहे. 
6) बाजारपेठांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. 
7) पक्ष्यांचे प्रकार, निवासाची पद्धत आणि प्रकल्पाचा प्रकार यावरून योग्य सामग्रीची निवड करावी. 

लागणारी साधनसामग्री

1) केजेस (पारंपरिक प्रकारचे किंवा बॅटरी टाइप)
2) पिण्याच्या पाण्याची योजना (निपल)
3) स्वयंचलित खाद्यपुरवठा
4) पक्ष्यांची विष्ठा गोळा करणारी यंत्रणा
5) अंडी गोळा करण्याची यंत्रणा
6) सायलो आणि खाद्य वाहतूक यंत्रणा
7) अंड्यांसाठीचे काउंटर 
8) वायुविजन आणि थंड करण्याची यंत्रणा
9) संगणक प्रणाली
10) उच्चदाब असलेले फॉगर्स
11) गॅस ब्रुडिंग यंत्रणा
12) इनक्‍युबेटर व हॅचर्स (ऑटोमॅटिक व सेमी ऑटोमॅटिक)
13) हॅचरीज वायुविजन यंत्रणा.

पोल्ट्रीमधील आधुनिकीकरण

1) स्वयंचलित खाद्य यंत्रणा

मानवी पद्धतीने खाद्यपुरवठा करताना काही वेळा असमान पद्धतीने खाद्याचे वितरण होते. त्यामुळे पक्ष्यांच्या शरीराच्या वजनावरून बराच मोठा फरक पडतो. वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण मिळविणे अवघड जाते. व्यावसायिक ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगामध्ये खाद्याचा खर्च हा एकूण उत्पादनावरील खर्च व वाया जाणाऱ्या खाद्याच्या 60 ते 70 टक्के इतका असतो. याउलट, स्वयंचलित खाद्य यंत्रणेतून अचूक प्रमाणात आणि कमी वेळेत खाद्य संपूर्ण शेडमध्ये एकसमान प्रमाणात दिले जाते. यामुळे पक्ष्यांचे वजन एकसमान राखले जाऊन खाद्य रूपांतरणाचे प्रमाण कमी होते. खाद्य वाया जात नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होते. मजुरांची गरज कमी होते. आजारांच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविता येते. पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन होऊन अपेक्षित उत्पादन मिळते.

2) स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्रणा

नेहमीच्या पाणीपुरवठा पद्धतीमुळे शेडमध्ये पक्ष्यांना देताना पाणी भरपूर प्रमाणात वाया जाते. लिटर ओले होऊन अमोनिया व इतर वायूंचे प्रमाण वाढते. त्यामुळे पक्ष्यांचे कार्य बिघडते. आजारी पक्ष्यांची लाळ पाण्याच्या भाड्यात गळल्याने रोगांचे संक्रमण जलद गतीने होते. जर पाणी साठविण्याचे भांडे व्यवस्थित स्वच्छ केले नाही, तर जिवाणूंमार्फत होणारा संसर्ग पक्ष्यांना खूप घातक ठरतो. स्वयंचलित प्रणालीमध्ये निपलने पाणी देण्याची सोय आहे. शेडमध्ये पक्ष्यांच्या उंचीच्या वरच्या पातळीत निपल बसविले जातात. बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी वाया जात नाही. लिटर कोरडे राहाते. वातावरण चांगले राहाते. पक्ष्यांची लाळ पाण्यामध्ये पडत नाही. यामुळे होणारे प्रदूषण थांबले जाते. पाणीपुरवठ्याचे पाइप्स बंद व अपारदर्शक असल्याने जिवाणू अथवा शेवाळामुळे होणारे रोगाचे संक्रमण होत नाही. मजुरांची गरज कमी होते. आजार व संक्रमणावर नियंत्रण राखले जाते.

फायदे

1) नियंत्रित वातावरणाची शेड तयार केली, तर नेहमीपेक्षा जास्त पक्षी तेवढ्याच आकाराच्या शेडमध्ये सांभाळता येतात. त्यामुळे उभारणी खर्च, वीज, मजूर, नियंत्रण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जागेच्या खर्चाची बचत होते. 
2) प्रकल्प क्षेत्रावरील दैनंदिन कामकाजावर सहज लक्ष ठेवता येते, नोंद ठेवता येते. 
3) अंड्यांचे, पक्ष्यांचे वजन चांगले मिळते. 
4) जैव सुरक्षा व्यवस्थापन चांगले राखले जाते. 
5) पिल्लांसाठी आरोग्यदायी वातावरण आणि अति आरामदायी वातावरण मिळते. 
6) खाद्य वाया जाण्याचे प्रमाण कमी होते 
7) खाद्य रूपांतरणाचे प्रमाण कमी होते 
8) मालाच्या साठ्याचे व्यवस्थापन चांगले होते 
9) कमी जागेत, मोठा प्रकल्प उभारता येतो. 

शेड बांधणीचे प्रकार

कमी खर्चात पक्ष्यांसाठी आवश्‍यक शेड उभारता येते. पक्ष्यांच्या योग्य व्यवस्थापनासाठी योग्य वातावरण राखता येते. स्वयंचलित पद्धतीमुळे निवारे सहज वाढविता येतात. भोवतालचे वातावरण वर्षभर साधारण राहत असेल तर आपण ओपन हाऊसचा वापर करू शकतो. अशा परिस्थितीत अतिरिक्त रोधक व वातावरण नियंत्रणाची गरज नसते. काही भागांत लोक "मल्टिस्टोअरेज हाऊसेस' बांधतात.

पक्ष्यांसाठी शेड बांधताना सॅंडविच तावदानांचा वापर, फायबर रोधकासह द्विस्तरीय कोरूगेटेड शीट्‌स, हॉलो बॉक्‍स, थर्मोकूल इन्सुलेटेड भिंती, ऍसबेस्टॉस शीट तसेच बाजूची भिंत खुली असलेली शेड बांधणे गरजेचे आहे.

इनक्‍युबेटर व हॅचर्सचे प्रकार

दोन्ही बाजूंवर गॅल्व्हनाइज्ड शीट लावलेले इनक्‍युबेटर्स हे पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या भिंतींचे बनविले जातात. पाऱ्याच्या तापमापकाचा उपयोग तापमान नियंत्रणासाठी होतो. गनी रिंग्जचा वापर आर्द्रता नियंत्रणासाठी केला जातो. एम.एस. केबिनमध्ये ट्रॉलीज बाहेर येऊ शकणार नाहीत अशाप्रकारे बसविल्या जातात. त्यामुळे जेव्हा अंडी आतमध्ये घेतली जातात त्या वेळी आतमध्ये योग्य वातावरण राखले जाते. परंतु यामध्ये सर्व नियंत्रण हे मानवी असते; म्हणून माणसाकडून चूक झाल्यास उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम होऊ शकतो. या सर्व घटकांमुळे इनक्‍युबेशनवर ताण येतो आणि पिल्लांची प्रत खालावते. त्याचबरोबर, होणारे कार्य हे सभोवतालच्या वातावरणावर आणि मानवी कौशल्यावर अवलंबून असते, त्यामुळे शेवटी नफा कमी मिळतो.

गेल्या काही वर्षांत इनक्‍युबेटर व हॅचर्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. काही कंपन्यांनी उच्च-तंत्रज्ञानावर आधारित इनक्‍युबेशन यंत्रणा तयार केली आहे. यामध्ये सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित केली जातात. या इनक्‍युबेटरमध्ये लिक प्रूफ स्थिती राखणाऱ्या अधिक घनतेच्या ईपीएस, एबीएस पॅनेल्स केबिन्सचा वापर केला आहे. प्लॅटिनम (PT-500) प्रोब्समुळे तापमान व आर्द्रता नियंत्रणात ठेवली जाते. ऊर्जेमध्ये बचत होते. या सर्व गोष्टींमुळे इनक्‍युबेशनचा ताण कमी केला जाऊन अतिशय चांगल्या प्रतीची पिल्ले विकसित होतात. या पिल्लांचे त्यानंतरचे कार्य इतर पिल्लांच्या मानाने नक्कीच सुधारते. या यंत्रणेला संगणकाची जोड आहे. ज्यामुळे सर्व माहिती साठवली जाते. त्यात बदल करता येत नाही. आधुनिक यंत्रणेमुळे 50 टक्के जागेची, 45 टक्के ऊर्जा आणि मजुरांवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे जरी प्राथमिक गुंतवणूक अधिक असली तरी येत्या काळात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.

लेखक व्यंकटेश्‍वरा हॅचरीजमध्ये व्यवस्थापक (विक्री) या पदावर कार्यरत आहेत.)

 

स्त्रोत: अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate