क्षार मिश्रणाचे महत्त्व जाणा
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभावाचा आहार उपयोगी ठरत नाही. याचा विपरीत परिणाम दुधाचे उत्पादन आणि पशुप्रजननावर होतो. क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पशुधनाला कमी प्रमाणात लागतात मात्र ती अत्यावश्यक असतात.
भारतीय शेतीत पशुधनाला फार महत्त्व आहे. शेतीची कामे करण्याबरोबर दुधाचे उत्पादन पशुधनातून मिळते. पशुधनाद्वारा शेतीकरिता मिळणारे शेणखत ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू म्हणावी लागेल. उपयुक्त असा पशुधनाचा आहार, आरोग्य याकडे मात्र फारसे लक्ष दिले जात नाही. जनावरांना चारा देण्याच्या पद्धती बहुतांश ठिकाणी पारंपरिक आहेत. आहारातील घटक, त्यांचे प्रमाण, देण्याच्या वेळा यात शास्त्रीय दृष्टिकोनाचा मोठा अभाव दिसून येतो. त्यामुळे राज्यातील पशुधनामध्ये कॅल्शियम, सोडियम आणि मॅग्नेशियम आदी खनिजद्रव्यांची कमतरता असल्याचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जिल्हानिहाय अभ्यासातून नुकतेच पुढे आले आहे. खरेतर राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड या दोन संस्थेच्या क्षार मिश्रण किंवा पशुखाद्य देण्याच्या शास्त्रीय शिफारसी आहेत. या शिफारसी संगणकीय प्रणालीद्वारा जिल्हा दूध संघ किंवा सर्वच दूध संघाकडे मोफत उपलब्ध असतात. मात्र दुर्दैवाने त्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात होतो.
क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांद्वारा जनावरांच्या शरीर क्रियेला चालना देण्याचे काम केले जाते. मात्र तेच जर आहारातून उपलब्ध होत नसतील, तर जनावरांना आहार मिळतो; पण तो नीट पचत नाही. पचला तर त्याचे योग्य शोषण होत नाही. शोषण झाले तर शरीर क्रियेला चालना मिळत नाही. पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभावाचा आहार उपयोगी ठरत नाही. याचा विपरीत परिणाम दुधाचे उत्पादन आणि पशुप्रजननावर होतो. क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पशुधनाला कमी प्रमाणात लागतात मात्र ती अत्यावश्यक असतात.
कामधेनू दत्तक योजनेत दूध वाढीकरिता क्षार मिश्रणाचे वाटप केले जाते. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत. मात्र ही योजना असो की इतर कोणत्याही शास्त्रीय महत्त्वपूर्ण शिफारशी या शेवटच्या घटकांपर्यंत एकतर पोचतच नाहीत. पोचल्या तर त्यांचे बरे-वाईट परिणाम पशुपालक सांगत नाहीत. आता राज्यातील पशुधन विकासाकरिता जिल्हानिहाय गरजेप्रमाणे खनिजद्रव्यांचे मिश्रण तयार करून त्याचा पुरवठा शासकीय योजनांमधून करण्याचा निर्णय राज्य पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचे काटेकोर पालन होण्याकरिता विशिष्ट विभागानुसार क्षार मिश्रणातील घटक, त्यांचे प्रमाण याबाबत पशुसंवर्धन विभागांचे तज्ज्ञ, विस्तार कार्यकर्ते यांच्यात स्पष्टता हवी. त्यानंतरच ते पशुपालकांना योग्य प्रबोधन करू शकतील, तसेच प्रमाणबद्ध क्षार मिश्रण, सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यानंतर जनावरांत झालेले बदलसुद्धा त्यांना मांडता आले पाहिजेत.
तालुका स्तरावरील लघू पशू चिकित्सालयात रक्त तपासणी यंत्रे आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी ते बंद अवस्थेत असल्यामुळे रक्त तपासणी करून आवश्यकतेनुसार क्षार देण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याच्या नोंदी सूक्ष्म दर्शकाखालीच पाहाव्या लागतील, हे चित्र बदलावे लागेल. राज्यातील पशुचिकित्सालयातील रक्त तपासणी यंत्रासह सर्व उपकरणे चालू करावी लागतील. त्यांचे अत्याधुनिकीकरण करावे लागेल. मिनरल मॅपिंग हे राष्ट्रीय पातळीवर केले गेले आहे. आता पुढील टप्प्यात ते ‘रिमोट सेन्सिंग’तंत्राद्वारा होणार आहे. त्या वेळी यापेक्षाही अधिक स्पष्टता येईल. मात्र एक गोष्ट निश्चित प्रत्येक जनावरांच्या खुराकात दररोज अपेक्षित प्रमाणात क्षार मिश्रण दिले जाईल, याची खात्री पशुसंवर्धन तज्ज्ञासह पशुपालकांनीही करणे गरजेचेच आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने...
नोकरीऐवजी शेती व शेतीपूरक व्यवसायातच करीअर करण्यास...
दूधाळ जनावरांना संमिश्र आहार देण्याच्या दृष्टीने स...
हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत...