नोकरीऐवजी शेती व शेतीपूरक व्यवसायातच करीअर करण्यासाठी वडप (ता.मालेगाव, जि.वाशिम) येथील श्रीराम महाजन या युवकाने पुढाकार घेतला. कुटूंबाची अवघी एक एकर शेती असताना शेतीपूरक शेळीपालनाकडे वळलेल्या श्रीरामने कुटूंबासाठी नवा आर्थिक स्त्रोत निर्माण करीत भरभराटीची वाट चोखाळली.
श्रीराम भीमराव महाजन हे गोपालक समाजातील आहेत. शेळी व गुरांचे पालन हा या समाजाचा मुख्य व्यवसाय. त्याच व्यवसायात श्रीराम महाजन यांनी मोठी भरारी घेतली. या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प, मात्र श्रीराम महाजन यांनी धाडसाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गावतांड्यावरील एकमेव उच्चशिक्षित म्हणून श्रीरामकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलला. त्यामुळेच शेती किंवा तत्सम व्यवसायात रमण्याऐवजी आपल्या मुलाने शासकीय नोकरी करावी, अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय करु लागले. त्यादृष्टीने नोकरीसाठी अर्ज भरण्याच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू झाले.
मात्र काही कारणांमुळे त्यांच्या नोकरीचा हेतू साध्य होऊ शकला नाही. व्यवसाय सुरू करावा तर कुटुंबियांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय नसताना हे धाडस कशाच्या बळावर करावे, असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण श्रीराम महाजन यांच्या कुटुंबियांकडे वडिलोपार्जित अवघी एक एकर शेती. त्यातील पिकाची उत्पादकता व उत्पन्नाच्या बळावर कुटुंबाची गुजराण शक्य नसल्याच्या जाणिवेतून पाच भावंडांपैकी चौघे मजूरी काम करत. परिणामी श्रीराम महाजन यांना देखील इतरांकडे मजुरी कामाला जावे लागले. सर्व जण राबत असतानाच दोनवेळच्या जेवणाशिवाय इतर दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या पैशाची नेहमीच चणचण भासू लागली. या आर्थिक कुंचबनेवर मात कशी करावी या विवंचनेत हे कुटुंबीय होते.
विदर्भात सर्वदूर मजूरांच्या उपलब्धतेच्या प्रश्न निर्माण झाला होता. शेतमजूरांना वाढती मागणी असल्याच्या संधीचा फायदा घेत शेतीकामासाठी मजूर पुरविण्याच्या कामात त्यांनी नशीब आजमावले. त्यातून मिळालेल्या पैशाचा विनीयोग त्यांनी शेतीपूरक व्यवसायासाठी करण्याचा निर्णय घेतला. शेळीपालनासारख्या व्यवसायात त्यांनी नशीब आजमाविण्याचा निर्णय घेतला. 2011 या वर्षाच्या अखेरीस त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात आणला.
सुरूवातीला त्यांनी अवघ्या सहा शेळ्यांची वाशीम बाजारपेठेतून तीस हजार रुपयांना खरेदी केली. सहा शेळ्यांच्या जोडीला पाच हजार रुपयांना एका बोकडाची खरेदी त्यांनी वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव बाजारपेठेतून केली. या शेळ्यांच्या माध्यमातून पहिल्याचवर्षीच्या वेतातून प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा पिल्ले मिळाली. त्यातील पाच बोकड असल्याने त्यांची सहा महिन्याच्या वाढीनंतर वाशीम बाजारात विक्री करण्यात आली. 25 हजार रुपयांना या पाच बोकडांची विक्री केल्याचे ते सांगतात.
सुरवातीला खरेदी केलेल्या पाच बोकडाच्या विक्रीतून चांगला पैसा मिळाल्याने त्यांनी याच व्यवसायात सातत्य ठेवण्याचा निर्णय घेतला. बोकडाच्या विक्रीनंतर त्यांच्याकडे पाच शेळ्या आणि सात पिल्ले होती. त्यातील तीन शेळ्यांनी प्रत्येकी तीन तर नऊ शेळ्यांनी 2-2 पिल्ले दिली. याप्रमाणे शेळ्यांच्या प्रत्येक वेतातून मिळणाऱ्या बोकडांच्या विक्रीस त्यांनी सुरवात केली. 4500 ते 5500 रुपये प्रती नगाप्रमाणे बोकडाची विक्री ते करतात.
आजमितीस त्यांच्याकडील शेळ्यांची संख्या 25 वर पोचली असून इतक्या अल्पसंख्येतील पशुधनही मालामाल करेल, असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे याच व्यवसायात पाय रोवण्याचा मानस श्रीराम महाजनने व्यक्त केला. शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतांना करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहाय्यक डॉ.डी.एल.रामटेके यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. दूधाळ जनावरांच्या शेतीशाळेसाठी डॉ.रामटेके वडप गावी आले होते. या शेतीशाळेला श्रीराम महाजन उपस्थित होते. यातूनच या दोघांचे ऋणानुबंध जुळले आणि पुढच्या काळात ते अधिक घट्ट झाले.
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 4/17/2020
दूधाळ जनावरांना संमिश्र आहार देण्याच्या दृष्टीने स...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
सध्याच्या काळात उपलब्ध हिरवा चारा विशिष्ट पद्धतीने...
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभा...