दूधाळ जनावरांना संमिश्र आहार देण्याच्या दृष्टीने सुपारीची पाने पोषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. कर्नाटकातील किनारपट्टीच्या भागातील शेतकऱ्यांना तसेच सुपारी बागायतदारांना या संशोधनाचा विशेष उपयोग होणार आहे.
दूध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने दुधाळ जनावरांच्या आहारासंबंधी सातत्याने संशोधन केले जात आहे. त्यातून विविध पर्याय उपलब्ध केले जात आहेत. कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी याच विषयात समाधान वाटावे असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. शास्त्रज्ञांनी सुकवलेल्या सुपारी पानांचा संमिश्र आहारातील वापर जनावरांचे दूध वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी असल्याचे म्हटले आहे.
बंगळूर येथील जनावरे पोषण व शरीर क्रियाशास्त्र राष्ट्रीय संस्थेने (एनआयएएनपी) याविषयी संशोधन केले आहे. या संशोधन प्रकल्पाला नाबार्ड संस्थेने आर्थिक साह्य देऊ केले आहे. विशेष म्हणजे दूध उत्पादकांनी सुपारीच्या पानांचा वापर सुरूही केला आहे.
"एनआयएएनपी' ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत कार्यरत आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे, की भाताच्या भुसकट्यांच्या तुलनेत सुपारीची पाने पोषणाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहेत. त्याचे विश्लेषण सांगायचे तर त्यात लिग्नीनचे प्रमाण कमी म्हणजे तीन टक्क्यांपेक्षा कमी, सिलिकाचे चार टक्क्यांपेक्षा कमी, तर ऊर्जा वा कॅलरीचे प्रमाण अधिक असते. कॅल्शिअम, गंधक, तांबे आदींचे प्रमाणही त्यात आढळते.
मेंढ्या व दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर सुपारीच्या पानांचा प्रतिकूल परिणाम होत नसल्याचेही या शास्त्रज्ञांचे निष्कर्ष आहेत. संस्थेने जनावरांच्या संमिश्र आहारात सुकवलेल्या सुपारी पानांचा योग्य प्रमाणात समावेश करून खाद्याचे तंत्रज्ञान तयार केले आहे. दुधाचे उत्पादन वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
कर्नाटकातील काही भागात विशेषतः समुद्रकिनारपट्टीच्या परिसरात सुका चारा व भाताची भुसकटे यांचा तुटवडा जाणवतो. शेजारील जिल्ह्यांमधून तो आणावा लागतो. साहजिकच त्याचा दर चढा असतो. सुपारी हे या भागातील महत्त्वाचे व्यावसायिक पीक असून, त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. त्यामुळे सुपारीची गळणारी पाने खाद्यात उपयोगी आणण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थेने त्यावर कार्य केले आहे.
नाबार्ड संस्थेने ग्रामीण नवनिर्मिती निधी प्रकल्पासाठी साह्य केले आहे. पानजे येथील सहकारी दूध संस्थेला सुपारीच्या पानांपासून प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणे त्यामुळे शक्य झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आवश्यक यंत्रसामग्रीही मागवण्यात आली आहे. "एनआयएएनपी' संस्थेतील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक या आहाराचा वापरही करू लागले आहेत.
या प्रकल्पस्थळाचे उद्घाटन व कार्यशाळा यांचे आयोजन येत्या 19 फेब्रुवारीस पानजे (पुट्टुर, कर्नाटक) येथे करण्यात येणार असल्याचे आयसीएआरच्या सूत्रांनी कळवले आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पशुधनाला क्षार आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या अभा...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
नोकरीऐवजी शेती व शेतीपूरक व्यवसायातच करीअर करण्यास...
हा खूप महत्वाचा आहे. त्यादृष्टीनेच शेतक-यांनी दुभत...