অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पैदाशीसाठी हवा जातिवंत वळू

पशुसंवर्धनातील फायद्याचा विचार करता दूध उत्पादन क्षमता आईच्या नव्हे, बापाच्या आनुवंशिकतेशी संबंधित बाब असते. तीस लिटर दुधाच्या गाईची कालवड हमखास तीस लिटर दूध देतेच असे नाही. अशा गाई भरवताना कोणता वळू वापरला याचा विचार महत्त्वाचा असतो. वळू तीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या आईपोटी जन्मलेला असला, तरच पुढची पिढी तीस लिटरची आणि वळूच जर वीस लिटर दूध देणाऱ्या गाईचा, तर त्यापासूनची कालवड वीस लिटरचीच. थोडक्‍यात, दूध उत्पादनक्षमता वळूकडून पुढील पिढ्यांत संक्रमित होते असे शास्त्र सांगते.

गेल्या वीस वर्षांतील राज्यातील पशुधन, दूध उत्पादन आणि ग्रामीण विकासाची संख्यात्मक तुलना केल्यास पशुपालनास ग्रहण सुरू असल्याचे चित्र सुस्पष्ट आहे. दिवसेंदिवस कमी होत जाणारे दूध उत्पादन, जनावरांच्या वाढत्या किमती आणि दुधापासून दूर गेलेला ग्राहक यांचा पशुपालकांच्या बरोबरीने सर्वच यंत्रणांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

फायदेशीर उत्पन्नाची बाब म्हणून पशुधनाकडील दूध उत्पादन महत्त्वाचे ठरते. भारतीय पशुवंशाची उत्पादन क्षमता केवळ 10 ते 15 टक्के एवढीच मिळविली जात असल्याने प्रत्येक पशुधनामागे 85 ते 90 टक्के एकूण उत्पादकता पशुपालनाच्या गंभीर प्रश्‍नांमुळे मिळू शकत नाही. अपुरा आहार, आरोग्याची हानी, दुर्लक्षित व्यवस्थापन आणि शून्य तंत्रज्ञान या प्रश्‍नांची योग्य उकल करण्याची गरज जाणून घेतली पाहिजे. देशी गोवंशाची हानी, संकरित पशुधनाचे अल्प उत्पादन आणि गावठी जनावरांचे हाल याचा विचार करायला हवा.

पैदाशीचे वळू आणि रेडे राज्यातून नाहीसे झाले आहेत. जातिवंत वळू किंवा रेडा शाश्‍वत यंत्रणेकडून मिळत नाही आणि जन्मणारी पिढी उत्पादकतेच्या दृष्टीने "शाश्‍वत' होत नाही, ही गंभीर परिस्थिती गेल्या दहा वर्षांपासून अधिक गंभीर होत आहे. गोऱ्हा किंवा हेल्या चीक न पाजता मारून टाकणारी मानसिकता पशुपालकांकडून दूध घटविण्यास कारणीभूत ठरली आहे.

"निर्भेळ दर्जेदार दूध' मिळतच नाही, हा दावा बहुअंशी खराच असल्याची खुद्द पशुपालकांचीच कबुली असल्याने ग्राहकांसाठी तो तंतोतंत योग्य ठरतो. जनावरे सांभाळण्याच्या खर्चात स्वस्त दूध विकणे परवडत नाही; पण जनावरांचे दूध सरासरीने वाढवता येणार नाही का? किंवा दूध उत्पादनवाढ कशी घडवायची? याची दखल कोण घेणार हाच यक्ष प्रश्‍न आहे.

सिद्ध वळू तयार करा...

सिद्ध वळू किंवा उन्नत रेडा हे चांगल्या पशुपालनाचे महत्त्वाचे अंग आहे. दहा हजार नर वासरांची पडताळणी झाल्यानंतर एक पैदाशीचा वळू निर्माण होतो. परदेशांत पैदाशीच्या तपासण्यांत नापास झाल्यानंतर गोऱ्हे मारले जातात. एका नरवासराच्या शंभरावर तपासण्या आणि अनुवंश शुद्धतेच्या काटेकोर पद्धती अवलंबल्यानंतरच पैदाशीत नराचा अंतर्भाव केला जातो.

नर वासरे जगत नाहीत असा खोटा दावा नेहमी केला जातो. बाह्य वातावरणात तग धरण्याची क्षमता असणारे वासरूच जन्म घेत असल्याने जन्मानंतर वासराची जगण्याची क्षमता चांगलीच असते. पहिले दूध, आजार प्रतिबंध, जंतनाशन आणि सांभाळ दुर्लक्षित असताना जगण्यासाठी संघर्ष करणारी नरवासरे केवळ आपल्याच देशात का पहावयास मिळवीत? भविष्यातील समस्यांचा वेध घेताना पशुपालनातील गंभीर मुद्दे असणाऱ्या यादीत नवजात नर वासरांची मरतूक याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मानवी जीवनातील अडथळे समजावून घेणाऱ्या जागृत नागरिकांनी लेक वाचवा अभियानाची मजबूत अंमलबजावणी राज्यात केली आहे आणि त्यास प्रतिसादही मोठा आहे. दुधासाठी सतत कोरड्या दिसून येणाऱ्या कासेतील दूधनिर्मिती गतिमान होण्यासाठी शास्त्रोक्त आधाराचे "ल्योक वाचवा अभियान' पशुपालनात गांभीर्याने राबविण्याची गरज आहे.

अनुवंशशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा

दूध उत्पादन क्षमता आईच्या नव्हे बापाच्या आनुवंशिकतेशी संबंधित बाब असते. तीस लिटर दुधाच्या गाईची कालवड हमखास तीस लिटर दूध देतेच असे नाही. अशा गाई भरवताना कोणता वळू वापरला याचा विचार महत्त्वाचा असतो.
वळू तीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या आईपोटी जन्मलेला असला तरच पुढची पिढी तीस लिटरची आणि वळूच जर वीस लिटर दूध देणाऱ्या गाईचा, तर त्याची कालवड वीस लिटरचीच तयार होते. थोडक्‍यात, दूध उत्पादनक्षमता वळूकडून पुढील पिढ्यांत संक्रमित होते असे शास्त्र सांगते.

पशुपालकाला काय करायचं अनुवंशशास्त्र? असा विचार झाला की दूध व्यवसायाला ग्रहण सुरू होतं. अनिर्बंध पैदास याबाबत कोणीही बोलत नाही, त्यामुळे पशुपालनामध्ये अनेक अडचणी तयार होत आहेत. पिढीत येणारी उत्पादनक्षमता वळू, रेड्याकडून 94 टक्के एवढी मोठी असल्याने जनावरे माजावर असताना भरवितेवेळी होणारा विचार महत्त्वाचा ठरतो. यासाठी आता योग्य पैदास धोरणाची आवश्‍यकता आहे.

गोऱ्हा काय किंवा हेल्या काय जगवलाच नाही तर गाई, म्हशी कशा ठरणार गाभण? शुद्ध देशी जातींचे वळू केवळ डझनात उपलब्ध आहेत. राज्यात चांगले पैदाशीचे रेडे कोठे मिळणार, अशी परिस्थिती आहे. बाह्य वर्णनात दिसणारा वळू जातिवंत असल्याची थाप मारत चौपट अधिक किमतीचा, तर पैदाशीचा रेडा म्हशीच्या पाव किमतीचा. याचा अर्थ असा, की सर्वसामान्य पशुपालकांना वेठीस धरल्याशिवाय जनावरे भरविण्यासाठी सोय नाहीच.

कृत्रिम रेतनाचे तंत्र उपयोगी असले तरी अतिशीत वळूबीजमात्रा तयार करणाऱ्या प्रयोगशाळांपुढे जातिवंत वळू आणि रेड्यांची वानवा आहे. या परिस्थितीवर गांभीर्याने विचार करायला हवा. आधीच गर्भधारणेचे प्रमाण कमीत कमी असणारे पशुधन माजावर असताना रेतनासाठी वळू / रेडा उपलब्ध नसल्याने रिकामेच राहील. त्याचा पशुपालनाच्या आर्थिक गणितावर निश्‍चितच परिणाम होईल. 

संपर्क - डॉ. मार्कंडेय - 9422657251 
(लेखक पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate