शेती करत असताना काही शेतकरी वेगळ्या वाटा शोधतात आणि त्यावर परिश्रम घेऊन त्यात यशस्वी होतात. त्यापैकी एकंबे (ता. कोरेगाव) येथील विनोद प्रल्हाद ननावरे यांनी शेती करत आल्याचे सरबत व जोडीला अन्य उत्पादने तयार करून कृषी प्रक्रिया उद्योगात वेगळी ओळख तयार केली आहे.
सातारा जिल्ह्यातील एकंबे (ता. कोरेगाव) येथील विनोद ननावरे कृषी पदवीधर युवा शेतकरी आहेत. तीन भाऊ, भावजयी व आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. कुटुंबास एकूण 15 एकर जमीन आहे. त्यामध्ये सध्या दोन एकर आले, पाच एकर ऊस व अन्य क्षेत्रांत हंगामानुसार गहू, ज्वारी, सोयाबीन यासारखी पिके घेतली जात.
मुलांना शिक्षण देत असताना विनोद यांच्या वडिलांवर आर्थिक कर्ज झाले होते. त्यामुळे आपण नोकरी करीत राहिलो तर ते लवकर फिटणार नाही, असे विनोद यांना वाटत होते. त्यातूनच शेतीपूरक किंवा प्रक्रिया उद्योग करावा असे त्यांना वाटत होते. दरम्यान, मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश दळवी यांच्याशी त्यांची भेट झाली. कृषी प्रक्रिया उद्योग निवडताना आपल्या भागात कोणता कच्चा माल उपलब्ध आहे, याचा विचार महत्त्वाचा असतो, असे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून पुढे आले. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध आले पिकावर आधारीत सरबतनिर्मितीचा पर्याय पुढे आला.
- त्यानंतर विनोद यांनी डॉ. दळवी यांची मदत घेऊन म्हैसूर येथे प्रक्रिया उद्योगाशी संबंधित "सीएफटीआरआय' संस्था गाठली. तेथे आठ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
- सन 2003 मध्ये व्यवसायाला सुरवातही केली. प्रथम प्रदर्शनांतून केवळ सरबत पिण्यासाठी म्हणून विकले जाऊ लागले. ग्राहकांना चव आवडू लागली. ते घरी नेण्यासाठी पॅकिंग मागू लागले.
- त्यानंतर आपल्या उद्योगाचे "इनाका प्रोडक्स' या नावाने नामकरण केले. त्याअंतर्गत अमाई जिंजर या नावाने आले सिरप किंवा सरबत पॅकिंगमध्ये सादर केले. वर्षाकाठी एक हजार "बॉटल' उत्पादित होऊ लागल्या. दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढू लागली. अधिक प्रमाणात उत्पादन व ऑर्डर पुरवण्याच्या दृष्टीने यांत्रिकीकरण वाढविण्याचे ठरवले.
यांत्रिकीकरणावर दिला भर
सन 2005 च्या सुमारास सरबतनिर्मितीसाठी आवश्यक यंत्रे खरेदी केली. यामध्ये सिरप मेकिंग मशिन, ज्युसर, प्रदर्शनात सरबत देण्यासाठी डिस्पेन्सर आदींचा समावेश होता. त्या काळात या यंत्रांसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला. यंत्रसामग्री घेतल्याने पाक, तसेच सरबतातील अन्य घटकांचे चांगले मिश्रण तयार होऊ लागले. पहिल्यापेक्षा चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळू लागले. पूर्वी बॉटलमध्ये तळाला साका राहत होता. आता ही त्रुटी कमी झाली. यंत्राच्या वापरामुळे वेळ व मजुरीत बचत झाली. दिवसेंदिवस दर्जा चांगला ठेवल्याने "ऑर्डर' वाढत गेली.
ननावरे यांच्या उद्योगाची वैशिष्ट्ये
- स्वतःच्या दोन एकरांतील आले, तसेच कमी पडल्यास परिसरातील शेतकऱ्यांकडून ते कच्चा माल म्हणून घेतले जाते.
- आल्याची सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर
- मागणीनुसार आवळा कॅंडी, सुंठ पावडर, आवळा सरबत तयार केले जाते.
- जास्तीत जास्त सरबत हे विविध प्रदर्शनांतून विकले जाते.
- जिंजर सिरप हे मुख्य उत्पादन, त्याचे 700 मिलिचे पॅकिंग- त्याची एमआरपी 120 रु.
- वर्षभर सुमारे 15 विविध प्रदर्शनांत सहभाग, राज्यासह हैदराबाद, दिल्ली, बेळगाव, धारवाड येथेही भाग
- परराज्यांत जाण्यासाठी एनएचएम किंवा कृषी विभागाचे अनुदानसाह्य मिळते.
विक्रीला चांगला प्रतिसाद, मागणीही भरपूर
- मोठ्या प्रदर्शनात संपूर्ण कालावधीत 500 ते 1000 बॉटल खप.
- प्रदर्शनात सरबत पिण्यासाठी आर्थिक खप त्याहून दीड ते दुप्पट.
- छोट्या प्रदर्शनात 250 ते 300 बॉटल खप.
- आवळा सरबत- पॅकिंग 700 मिलि., एमआरपी 100 रु.
- कोल्ड्रिंक व अन्य व्यावसायिकांकडूनही सिरपला सतत मागणी.
- एकूण मागणीनुसारच वर्षभर सिरपनिर्मिती.
- पावसाळ्यातील काही महिने उद्योग तात्पुरता बंद.
- एकूण उद्योगाची उलाढाल सुमारे बारा कोटी रुपयांपर्यंत.
- प्रति बॅच सुमारे 75 बॉटल उत्पादन तयार होते.
- एकूण खर्च वजा जाता 15 ते 20 टक्के नफा.
- कच्च्या मालाच्या किमतीनुसार नफ्याचे प्रमाण कमी-जास्त
ननावरे यांच्या सरबताची वैशिष्ट्ये
- कोणतीही रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह वा रंगद्रव्ये वापरली जात नाहीत.
- संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने निर्मिती.
- मालाची गुणवत्ता कायम चांगली ठेवली जाते.
- कच्चा माल घेताना परिचित शेतकऱ्यांकडूनच घेतला जातो.
- अन्न व भेसळ प्रशासन संस्थे (एफडीए) चा परवाना.
- आले सरबत हा थोडा वेगळा प्रकार असल्याने त्याला अधिक मागणी.
प्रक्रिया उद्योजक म्हणून महत्त्वाची जबाबदारी
- वेळेवर ऑर्डर पोचविण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते.
- दररोज खडतर कष्ट, प्रसंगी 16 ते 18 ताससुद्धा कामाची तयारी हवी.
- घरातील सर्व सदस्य राबतात.
- मालाची गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते.
ऍग्रोवन प्रदर्शन सुरू झाल्यापासून ननावरे येथे आपला स्टॉल घेतात. प्रदर्शनात मोठी जाहिरात झाल्याने सर्व ठिकाणांहून ऑर्डर सुरू झाल्या.
व्यवसायात झालेली वाढ थोडक्यात
आले सरबत उत्पादन - लिटरमध्ये
लिटरमध्ये खालीलप्रमाणे
सन...................उत्पादन
2008 .............20,000
2009............. 24,000
2010.............32,000
2011............36,000
2012............41,000
2013............46,000
(नोव्हेंबरअखेर)
स्वतःची वाहतूक व्यवस्था
प्रदर्शनास उत्पादने नेत असताना सुरवातीस वेळेत ती वेळेवर न पोचणे, शिल्लक राहिल्यास सहन करावे लागणारे नुकसान अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे 2006 मध्ये फोर व्हीलर घेतली. कालांतराने "ऑर्डर' वाढत गेली. आता मोठी जीप घेऊन स्वतःची वाहतूक व्यवस्था यंत्रणा उभारली आहे.
ननावरे म्हणतात, की व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचा मोठा हातभार आहे. मी किंवा बंधू दत्तात्रेय प्रदर्शनाच्या निमित्ताने बाहेर असलो तरी पत्नी सौ. प्रिया, वहिनी सौ. शिल्पा, तसेच आई, वडील उद्योगाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. कुटुंबाच्या मदतीने व प्रक्रिया उद्योगामुळे कर्ज फेडू शकलो. कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. कृषी सहसंचालक उदय देशमुख, तालुका कृषी अधिकारी विश्वास कुराडे, उपविभागीय कृष्णराव धुमाळ यांचेही सहकार्य लाभले आहे.
विनोद ननावरे - 9158974846.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन