অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिनी डाळ मिल उद्योग

लातूर जिल्ह्यात मौजे पाथरवाडी हे रेणापूर तालुक्‍यातील अगदी छोटेसे व आडवळणाचे गाव आहे. येथील ज्ञानचंद्र प्रल्हाद खोत गेल्या सात वर्षांपासून मिनी डाळ मिल उद्योग नेटाने चालवीत आहेत. आपल्या सात एकर जिरायती शेतीतून आणि पारंपरिक पीक पद्धतीतून कुटुंबाचा आर्थिक उदरनिर्वाह चालवणे अशक्‍य आहे. त्यामुळे शेतीला प्रक्रिया उद्योगाची दिलेली जोड खोत यांच्या संसाराला चांगला हातभार लावत आहे. मौजे पाथरवाडी गावातील ज्ञानचंद्र खोत यांची सात एकर जिरायती शेती आहे. सोयाबीन, तूर आदी पिके त्यात घेतली जातात. त्यातून फार काही उत्पन्न मिळत नाही. खोत यांचे आयटीआयपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर ते शेतीतच उतरले. सध्या ते सुमारे 28 वर्षांचे आहेत. शेतीत नव्या वाटा शोधताना सात वर्षांपूर्वी लातूर येथे कृषी प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली होती. त्यात मिनी डाळ मिल त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी उत्पादित कंपनीच्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती घेतली. पुण्यातील कृषी प्रदर्शनातही त्यांना हे यंत्र पाहण्याचा अनुभव मिळाला. आपण डाळ मिल उद्योगच सुरू करायचा, असा निर्णय त्यांनी घेतला. 

खोत झाले डाळनिर्मिती उद्योजक


अकोला येथील उत्पादक कंपनीकडून सुमारे 63 हजार रुपयांना मिनी डाळ मिल यंत्र खरेदी केले. खोत यांचे घर शेताजवळच व रस्त्याच्या कडेला आहे. घराशेजारी कमी खर्चाची पत्र्याची शेड बनवली. तेथे यंत्राची उभारणी केली. ग्राहक त्यांच्याकडे हरभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा आदी कच्चा माल घेऊन येऊ लागले. त्यावर प्रक्रिया करून त्याची डाळनिर्मिती ते तयार करून देऊ लागले.
ग्राहकांनाही खोत यांच्याविषयी विश्‍वास वाटू लागला. शेतकरी आपला माल त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आणून देऊ लागले. व्यवसायवृद्धी होऊ लागली. एका यंत्रावर सर्व व्याप सांभाळणे अशक्‍य होते. त्यामुळे दोन वर्षांनी आणखी एक मिनी डाळ मिल खरेदी केली.

अशी होते डाळनिर्मिती


हरभराडाळ तयार करण्याआधी हरभऱ्यावर पाणी प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी डाळ मिलवर पाण्याचा टॅंक असतो. साधारणतः प्रति 100 क्विंटल हरभऱ्याला 10 लिटर पाणी लागते. पाणी प्रक्रियेनंतर त्या हरभऱ्याला दोन दिवसांची विश्रांती दिली जाते. त्यानंतर पुन्हा पाणी प्रक्रिया करून हरभरा यंत्रातून काढला जातो. पाणी प्रक्रियेमुळे हरभऱ्याची साल मोकळी होते. त्यानंतर हरभरा सुकत घातला जातो. यानंतर हरभरा "हलर'मधून काढला जातो. यामुळे हरभऱ्याचे दोन भाग होऊन डाळ तयार होते. यानंतर डाळ व भुसा वेगवेगळा केला जातो.
तुरीची डाळ तयार करण्यापूर्वी तुरीला गोडेतेल लावले जाते. यंत्रामध्येच तेल सोडण्याची सोय असते. त्यानंतर सहा तास विश्रांती देऊन पुन्हा तूर यंत्रातून काढली जाते. तुरीवर तीन वेळा प्रक्रिया केली जाते. मिनी डाळ मिलला तीन प्रकारच्या चाळण्या असतात. दोन चाळण्यांमधून डाळ बाहेर पडते. एका चाळणीतून भुसा बाहेर पडतो. 

घरच्या घरी होणारा उद्योग


मिनी दाळ मिल हा लघू उद्योग आहे. त्यासाठी मर्यादित मजूर लागतात. खोत स्वतः, आपले आई-वडील व पत्नी असे चौघे जण हा सारा व्याप सांभाळतात. उन्हाळ्यातील तीन महिने व्यवसाय चालतो. शेतकऱ्यांनाही यंत्राद्वारा डाळ तयार करून घेण्याची सोय या उद्योगाच्या माध्यमातून झाली आहे.

खोत यांच्याकडे अद्याप "ग्रेडर मशिन' नाही. भांडवल कमी पडत असल्याने अद्याप ते खरेदी केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीच आपला माल काडीकचरा वेगळा करून निवडून आणावा, अशी सूचना खोत देतात. तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास 500 क्विंटल डाळ येथे तयार होते. वर्षाला सुमारे दीड लाख रुपयांची उलाढाल होते. शिवाय घरच्यांना तीन महिने रोजगार मिळतो.

मिनी डाळ मिलची क्षमता कमी असते. हरभऱ्याची दिवसाला सुमारे चार क्विंटल, तर तुरीची 2 ते 2.5 क्विंटल डाळ तयार होते. मजुरीच्या खर्चाव्यतिरिक्त विजेचा मुख्य खर्च असतो. महिन्याला तीन ते चार हजार रुपये विजेचे बिल येते. याशिवाय गोडेतेलाचा खर्च असतो. वीज भारनियमनाची मुख्य समस्या असते. त्यामुळे उपलब्ध वीज कालावधीतच काम करावे लागते.

उतारा व डाळप्रक्रिया दर


एक किलो शेतमालापासून सुमारे 750 ग्रॅम डाळीचा उतारा पडतो. यात सुमारे 600 ग्रॅम पहिल्या क्रमांकाची मिळते. याला स्थानिक भाषेत फटका असे म्हणतात, तर त्याहून बारीक डाळ जी दुसऱ्या क्रमांकाची असते ती सुमारे 150 ग्रॅम असते. तिला सव्वा नावाने संबोधले जाते. एक किलो डाळीसाठी पाच रुपये दर आकारला जातो. सर्व शेतमालासाठी हाच सामूहिक दर आहे. डाळीबरोबर सुमारे 20 टक्के भुस्साही मिळतो. हा भुसा शेतकरी ग्राहक आपल्या जनावरांसाठी घरी घेऊन जातात. खोत यांच्याकडे अद्याप पॉलिशिंग मशिन नाही आणि त्यांची त्यांना गरजही भासत नाही. त्यांच्या ग्राहकांकडूनही अद्याप तशी काही मागणी नाही.

पन्नास किलोमीटर परिघात ग्राहक तयार झाले

खोत यांच्या डाळ मिल उद्योगाची चांगली प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे परिसरातील पन्नास किलोमीटर अंतरावरील विविध गावांतून डाळ तयार करून घेण्यासाठी ग्राहक येतात. त्यांची संख्या सुमारे तीनशे ते चारशेपर्यंत आहे. परळी तालुक्‍यातील (जि. बीड) सारडगाव, धर्मापुरी, खापरटोन, पिंपरी; अहमदपूर तालुक्‍यातील (जि. लातूर) सताळा, किनगाव; रेणापूर तालुक्‍यातील हाणमंतवाडी, मुरढव, घनसरगाव, तळणी, गोविंदनगर, भंडारवाडी, पानगाव आदी गावांतील कार्यक्षेत्रात आपल्या उद्योगाचा विस्तार खोत यांनी केला आहे. खोत कुटुंबीयांना जिरायती शेती पद्धतीत पूरक उत्पन्नाचे ते चांगले साधन ठरत आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना


पाथरवडीत आता किसानसेवा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांनी स्थापन केली आहे. त्याचे 30 शेतकरी सभासद आहेत. कंपनीच्या पाच संचालकांपैकी श्री. खोत एक आहेत. कंपनीच्या माध्यमातून सध्या बियाणे व निविष्ठा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रास्त दरात निविष्ठा देण्याचे त्यातून उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षण करून दिले जाणार आहे. त्यासंबंधीचे "किट' खरेदी करण्यात आले असल्याचे खोत म्हणाले.

डाळ मिल उद्योगात उतरण्यापूर्वी


खोत म्हणाले, की या उद्योगात श्रम फार करावे लागतात. त्याची तयारी हवी. मजूरबळ लागते. मात्र घरचे सदस्य कामासाठी उपलब्ध असतील तर तो खर्च कमी होतो. ग्राहकांमध्ये आपल्या कामाविषयी विश्‍वास तयार करावा लागतो. इतक्‍या वर्षांच्या काळात आपण ग्राहकांमध्ये तो निर्माण केला असल्यानेच व्यवसायात स्थिरता येण्यास मदत झाली आहे. 

ज्ञानचंद्र खोत - 9623131988 डॉ. टी. एस. मोटे
(लेखक लातूर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate