बिटरगाव खु. (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील रमेश बोरगडे यांनी कमी शेतीत अधिक उत्पन्न घेण्यासाठी रोपवाटिका, फुलशेती, भाजीपाला व नगदी पिकांची शेती सुरू केली आहे. विविधांगी शेती व त्याला दुग्ध व्यवसायाची जोड देत एकाच प्रकारच्या शेतीतील जोखीम कमी करून शेती अधिकाधिक फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आमीन चौहान
रमेश बोरगडे यांनी उद्यानविद्या शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवसाय निर्मितीसाठी करण्याची त्यांची इच्छा होती. पण घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. सहा भाऊ आणि सहा एकरच जमीन. त्यातून उदरनिर्वाह किती होणार? त्यामुळे त्यांनी रोपवाटिकेचा व्यवसाय निवडला.
गाव परिसरातच त्यांच्या भावाच्या शिक्षक मित्राचे चार एकर शेत त्यांना भाडेतत्त्वावर मिळाले. मनापासून काम करण्याची तयारी, उत्साह यातून रमेश यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरू केली. रोपवाटिकेचा परवाना मिळाला. कमी जमीन असूनही टप्प्याटप्प्याने रोपवाटिका, भाजीपाला व फुलशेतीला पुढे दुग्ध व्यवसायाची जोड दिली. एकाच प्रकारच्या शेतीत असणारी जोखीम कमी करताना शेतीतील फायदा वाढवण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालविला. एकेकाळी रोजगारासाठी इतरांकडे काम शोधणाऱ्या बोरगडे यांनी दोन पुरुष आणि सहा महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध केला आहे. सध्या त्यांचे स्वतःचे चार एकर शेत असून, शेतालगतचे चार एकर शेत त्यांनी भाडेतत्त्वावर घेतले आहे. चार एकरांपैकी एक एकर रोपवाटिका, दीड एकर फुलशेती, एक एकर भाजीपाला आणि 10 गुंठे चारा पिकांचे नियोजन आहे. भाडेतत्त्वावरील चार एकर शेतात ऊस आहे. पैकी दोन एकर ऊस सेंद्रिय पद्धतीने केला आहे. त्यांची पट्टा पद्धतीने ऊस लागवड असते. या उसात हरभरा आणि चवळीचे आंतरपीक ते घेतात.
...अशी आहे रोपवाटिका
- संत्री, मोसंबी, चिकू, आंबा, पेरू, रामफळ आदी फळपिकांचे मातृवृक्ष रोपवाटिकेत आहेत. त्यापासून कलमे बांधली जातात.
- सीताफळ, आवळा, कढीपत्ता, बांबू यांची रोपे तयार केली जातात.
- आंब्याची 13 जातींचे मातृवृक्ष आहेत. पैकी केशर, दशहरी व रत्ना जातीला परिसरात मोठी मागणी
- गुलाब, मोगरा, शेवंती, कागडा, निशिगंध, जास्वंद तसेच क्रोटॉन, ऍकॅलिफा, जरबेरा या शोभेच्या वनस्पतींची रोपे.
- जानेवारीच्या सुमारास रोपे, कलमांच्या निर्मितीस सुरवात होते. जुलै व ऑगस्टमध्ये रोपे विक्रीस येतात.
- दरवर्षी सुमारे 10 हजार रोपांचे उत्पादन. विक्री स्थानिक बाजारात.
- लिबूवर्गीय कलमे 25 रुपये आणि आंबा कलमे 45 रुपये प्रति नग, तर शोभेच्या झाडांची रोपे प्रति नग 10 रुपये दराने विकली जातात.
- उमरखेड शहरात ढकलगाडीवर रोपे आणि कलमे ठेवून किरकोळ विक्री. तर ठोक रोपांची रोपवाटिकेतून विक्री.
- संत्री, आवळा, मोसंबी, लिंबू, आंब्याच्या कलमांची शासकीय योजनांसाठी, सरकारी कार्यालयांना वृक्षलागवडीसाठी विक्री. बहुतांश रोपे नगदीनेच विकली जातात.
फुलशेती
गॅलार्डिया, मोगरा, शेवंती, काकडा, निशिगंधा यांची शेती केली जाते. वर्षभर फुले पुरतील असे लागवडीचे नियोजन असते. हिवाळ्यात शेवंती, काकडा, उन्हाळ्यात मोगरा आणि पावसाळ्यात निशिगंध, गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. मोगरा व गुलाबाच्या लागवडीनंतर सात ते 10 वर्षांपर्यंत तर काही फुलांचे हंगामापुरते उत्पादन मिळते. मार्केटच्या मागणीनुसार फुलांची स्थानिक बाजारात विक्री केली जाते. 20 ते 25 किलो फुलविक्रीतून 500 रुपयांचे उत्पन्न दररोज मिळते. जानेवारी ते मार्चमध्ये सर्वांत कमी, पावसाळा व हिवाळ्यात मध्यम तर एप्रिल व मेमध्ये सर्वाधिक मागणी असते.
भाजीपाला
टोमॅटो, मिरची, चवळी, कारले, दोडके आदींची लागवड बोरगडे करतात. प्रति हंगामात एकरी चार पिके घेतात. स्थानिक बाजारात त्यांची विक्री होते. काही प्रमाणात आंतरपिकेही घेतली जातात. फुलशेतीचे व भाजीपाला पिकांचे प्लॉट यांची फेरपालट केली जाते.
दुग्ध व्यवसाय
बोरगडे यांच्याकडे दोन मुऱ्हा म्हशी आहेत. प्रति म्हैस सुमारे पाच ते नऊ लिटर दूध मिळते. घरची गरज संपून उर्वरित दुधाची किरकोळ विक्री होते. या व्यवसायातून दररोज सुमारे सात लिटर विक्रीतून किमान 150 रुपये उरतात. 10 गुंठ्यांत गजराज, कडवळ, मका आदी पिके घेतली आहेत. म्हशींची संख्या वाढवून दुग्ध व्यवसाय पुढे नेण्याचे त्यांचे नियोजन आहे.
भाडेतत्त्वावरील शेती
गेल्या तीन वर्षांपासून या चार एकरात ऊस आहे. पीक व्यवस्थापन खर्च व शेतीचे भाडे जाता किमान दीड लाख रुपये नफा उरतो. नर्सरी, फुलशेतीतून हाती येणाऱ्या पैशातूनच या शेतीचा खर्च भागतो. रोपवाटिका व फुलशेतीतील मजूरच या शेतावर काम करतात. त्यामुळे किफायतशीर शेती करता येत असल्याचे बोरगडे सांगतात.
पीक व्यवस्थापनातील काही गोष्टी
-शेणखत (घरचे), गांडूळ खताचा उपयोग (त्याची परिसरातून खरेदी केली जाते).
-पाण्यासाठी विहीर व एक कूपनलिका. कूपनलिकेचे पाणी उपसून ते विहिरीत जमा केले जाते. विहिरीतील पाण्याचा उपसा करून फुलशेती, रोपवाटिका, चारा पिके व अन्य पिकांना दिले जाते.
रोपवाटिकेमध्ये मायक्रो स्प्रिंकलर, फुलशेतीसाठी ठिबक व भाजीपाला पिकासाठी तुषार सिंचनाचा उपयोग होतो. रोपवाटिकेसाठी शेडनेट केलेले आहे. उद्यानविद्या अभ्यासक्रमाचे शिक्षक राम राऊत व श्री. राठोड यांचे मार्गदर्शन मिळते. काटेकोर पद्धतीने पीक व्यवस्थापनातून दरवर्षी एकरी एक लाख रुपयाचा नफा शिल्लक राहतो, असे रमेश बोरगडे आत्मविश्वासाने सांगतात.
शिकण्यासारखे काही
- शून्यातून शेतीची निर्मिती
- भरपूर कष्ट घेण्याची तयारी
- हंगामापूर्वी पिकांचे, जमिनीचे पद्धतशीर नियोजन
- मजुरांचे सुयोग्य व्यवस्थापन
- मिश्र पिके व मिश्र शेतीतून अधिक नफा, जोखीम कमी
- नगदी पिके, व्यवसायाची निवड.
- जमीन, वेळ, मजूर व पैसा रिकामा राहणार याची दक्षता घेतात.
बोरगडे यांना जाणवणाऱ्या समस्या
नर्सरीतील रोपे शासकीय कार्यालयांना व फलोद्यान योजनांसाठी विकली जातात. मात्र त्यांची देयके उशिरा मिळतात. त्यामुळे या वर्षातील देयके पुढील वर्षाचा खर्च म्हणून ठेवतात. कुशल मजुरांचा अभाव ही रोपवाटिका व फुलशेतीतील महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे दोन पुरुष व सहा महिला मजूर वर्षभर कामावर ठेवावे लागतात. त्यांना वर्षभर काम राहील असे नियोजन करावे लागते. भारनियमन, योग्य मार्गदर्शनाचा अभाव या काही समस्या आहेत. फुलशेतीत स्पर्धा वाढली आहे. फुलांना हमीभाव नाही. निविष्ठांचा खर्च वाढल्याने भाजीपाला पिके आणि दुग्ध व्यवसायाचा खर्चही वाढला आहे.
एकाच झाडाला संत्री, लिबू आणि मोसंबी
बोरगडे आपल्या रोपवाटिकेत एकाच फांदीवर तीन वेगवेगळी कलमे बांधतात. असा प्रयोग आंबा व गुलाबाच्या बाबतीत केला आहे. एकाच झाडाला तीन वेगवेगळ्या रंगांची फुले मिळतात. तर एकाच फांदीला तीन प्रकारचे आंबे घेता येतात. जंबेरीच्या खुंटावर संत्री, लिंबू आणि मोसंबीचे डोळे बांधून देतात. अशा कलमांना ग्राहकांची पसंती मिळत असून, किंमतही चांगली मिळत असल्याचे ते म्हणाले.
संपर्क - रमेश बोरगडे, 9422192716
माहिती संदर्भ : अॅग्रोवन