शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड दिली तर फायदा होतोच. धोंडेवाडी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील विष्णू देठे व त्यांच्या दोघा बंधूंनी हे सिद्ध करून दाखवले आहे. अलीकडील वर्षांत आलेल्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात डाळिंब बागेतून त्यांनी चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीच्या आर्थिक प्रगतीचा आलेखही उंचावला आहे. भारत नागणे पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी (ता. पंढरपूर) येथे विष्णू देठे यांची 12 एकर शेती आहे.
त्यांचे वडील किसन देठे हे पारंपरिक पद्धतीने ऊस, ज्वारी, मका, गहू आदी पारंपरिक पिके घेत. त्यातून मुलांचे शिक्षण आणि घरखर्चापुरते उत्पन्न मिळत होते.
विष्णू यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी धडपड केली; पंरतु ती काही मिळाली नाही. अखेर आपल्याच शेतात करिअर घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सन 2009 मध्ये त्यांनी आपल्या मध्यम ते हलक्या जमिनीत 12 बाय 10 फूट अंतरावर सुमारे 35 ते 36 गुंठ्यात भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. बागेचा पूर्वीचा अनुभव नव्हता. मात्र अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी शेतीचे व्यवस्थापन सुरू केले. पहिल्या वर्षी चार टन उत्पादनापर्यंत पोचणे त्यांना शक्य झाले.
धोंडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना अलीकडे आलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले.
उसासह अन्य पिके पाण्याअभावी जागेवरती जळून गेली होती. अनेक शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी घालून मोठ्या कष्टाने बागा जगवल्या. देठे यांच्याकडील परिस्थितीही वेगळी नव्हती. त्यांच्या दोन विहिरी कोरड्या पडल्या होत्या. त्यात निरा उजव्या कालव्यातूनही पाणी मिळाले नाही. अशा परिस्थितीमध्ये उसासह अन्य चारा पिके जळून गेली होती. अशा वेळी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या डाळिंब बागेचे काय होणार अशी भीती निर्माण झाली होती. बाग वाचविण्यासाठी देठे यांनी शेतात बोअर घेतले. त्याला फक्त सव्वा इंच पाणी मिळाले. मात्र मिळालेल्या पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून विष्णू यांनी आपले बंधू मंगेश व अशोक यांच्या मदतीने आपली डाळिंब बाग चांगल्या प्रकारे जोपासली.
देठे बंधू दर वर्षी मेच्या दरम्यान बहर धरतात. यंदा 36 गुंठ्यात त्यांना 11 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. त्यातील सुमारे साडेनऊ टन डाळिंबाला जागेवरच सरासरी 75 ते 80 रुपये किलो दर मिळाला. उर्वरित डाळिंबाची हैदराबाद येथील व्यापाऱ्याला 50 रुपये किलोप्रमाणे विक्री केली. यंदा खर्च वजा जाता सुमारे सहा ते साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. गेल्या वर्षी 11 टनांपर्यंत उत्पादन मिळाले होते. त्या वेळी जागेवर 80 ते 85 रुपयांपर्यंत (प्रति किलो) दर मिळाला होता.
बागेतील 10 ते 12 झाडांचे मर रोगाच्या प्रादुभार्वामुळे नुकसान झाले.
मात्र त्यानंतर डाळिंब बागेतील स्वच्छतेकडे सतत लक्ष दिले. ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर केला. तेलकट डाग रोगावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
उपलब्ध असणाऱ्या सव्वा इंच पाण्याचा अगदी नियोजन पूर्व वापर केल्यामुळे दुष्काळातही बागेला वेळेवर पाणी देता आले. ठिबक सिंचनामुळे सुरवातीच्या काही दिवसांमध्ये एक दिवस आड पाणी दिले.
फळधारणा झाल्यानंतर दररोज एक ते दीड तास पाणी दिले. बागेला मोजकेच आणि तेही वेळेवर पाणी दिल्यामुळे फळांचे वजन वाढण्यास मदत झाली.
देठे बंधूंनी शेतीत केलेल्या विविध प्रयोगांमुळे आपल्याकडील पिकांची उत्पादकता वाढवण्यात त्यांना मदत झाली आहे. सहा एकर ऊस तसेच नवीन लागवड केलेली सहा एकर डाळिंब बाग असे मिळून 12 एकर क्षेत्र ठिबक सिंचना खाली आणले आहे. पूर्वी आडसाली उसाचे असलेले एकरी 40 टन उत्पादन आता 70 ते 80 टनांपर्यंत पोचले आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून देठे यांनी गेल्या वर्षीपासून दूध व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे सध्या चार जर्सी गायी, दोन म्हशी अशी सहा मोठी, तर पाच लहान जनावरे आहेत.
गाईपासून दररोज 30 लिटर दूध उत्पादित होते. दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर दैनंदिन घरखर्च भागवला जातो. शिवाय जनावरांच्या शेणापासून होणारे खत दर वर्षी डाळिंब बागेला घातले जाते. यामुळे जमिनीचा पोत सुधारला आहे.
पूर्वी पारंपरिक शेतीत देठे यांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम दीड ते दोन लाख रुपये होते. शेतीत करावा लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नव्हता. अनेक वेळा उसने पैसे घ्यावे लागत होते. मात्र सुधारित शेतीचा अवलंब व बाजारपेठेचा अभ्यास करून मार्केटचे नियोजन केल्यानंतर उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
त्यातूनच सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन करणे त्यांना शक्य झाले. टप्प्याटप्प्याने उत्पन्नाची जोड मिळत गेल्याने नवीन घर बांधले आहे. या वर्षी ट्रॅक्टर खरेदी केला आहे. घरातील मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दाखल केले आहे.
शेतीमध्ये होत राहणाऱ्या बदलांची माहिती दैनिक ऍग्रोवनमधून मिळत राहिल्यानेच डाळिंबासारखे पीक यशस्वी करणे शक्य झाल्याचे विष्णू यांनी अभिमानाने सांगितले. शेतकऱ्यांसाठी ऍग्रोवन हा खरा मित्र ठरला आहे अशी पावतीही त्यांनी दिली.
- विष्णू देठे - 7588215503
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
डाळिंब आणि पेरू या फळांपासून बनविलेले क्रश हे पचना...
कृषीमालाची एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात होत अ...