অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तोंडली, गवती चहा पीक

प्रस्तावना

गंगापूर (जि. नाशिक) येथील दत्तात्रेय देशमाने यांची द्राक्षबाग 2006 च्या गारपिटीने होत्याची नव्हती झाली. त्यानंतर कमी जोखमीची पीक पद्धती त्यांनी स्वीकारली. त्यात छोट्या, मात्र नियमित उत्पन्न देणाऱ्या तोंडली, गवती चहा, कढीपत्ता आदी पिकांचा पर्याय निवडला. मागील सात वर्षांत या पिकांच्या मदतीने कर्ज फेडून शेतीत समाधान मिळवणे त्यांना शक्‍य झाले आहे.

नाशिक शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर गंगापूर गावाजवळ गोदावरीच्या काठालगत जलालपूर शिवारात दत्तात्रेय देशमाने यांची शेती आहे. गंगापूर गावातून नदीवरील कच्चा पूल ओलांडून जलालपूरला जाता येते. शेताच्या मधोमध साधेसे घर, समोर गवती चहाच्या क्षेत्राचा पट्टा, घराजवळ उत्तरेला शेवग्याचे पीक, त्यापलीकडे तोंडल्याची बाग पाहताना एकूणच नीटनेटकेपणा, नियोजन नजरेत भरते. 
देशमाने यांच्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्वी हलाखीची होती. उरातील हिम्मत आणि आईचा आशीर्वाद हेच भांडवल होतं. बहिणींच्या लग्नांची जबाबदारी घेण्याबरोबर स्वत:च्या संसाराची घडी बसविताना वेळोवेळी कसोटींचा सामना करावा लागला. पुस्तकांच्या वाचनाची आणि परिघाबाहेरील जनमानसात फिरण्याची आवड. त्यामुळे दृष्टी व्यापक झाली. अडचणींच्या काळात वाचलेलं "अब्राहम लिंकन' यांचं चरित्र अन्‌ प्रसिद्ध अभिनेता दादा कोंडके यांच्यावर लिहिलेलं "एकटा जीव' या पुस्तकांनी त्यांना मोठा दिलासा दिला.

संकटांवर केली मात

शालेय शिक्षणानंतर घरची जबाबदारी अंगावर घेतली. घरची जमीन असूनही भांडवल नसल्याने सुरवातीला दुसऱ्यांची जमीन खंडाने करायला घेतली. मित्राच्या मदतीने टोमॅटोसह अन्य भाजीपाला घेतला. वडिलोपार्जित क्षेत्रात 1990 मध्ये 30 गुंठ्यांत माणिकचमन, तर 1993 मध्ये "तास ए गणेश' वाणाची एक एकरावर लागवड केली.

आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा ध्यास होता. दीड एकरावर गुलाबाचा ग्लॅडिएटर वाण फुलत होता. सतत बेभरवशाच्या दरांमुळे अखेर ही शेती बंद केली. सन 1997 ते 2006 या काळात द्राक्ष उत्पादनात एकरी 10 ते 12 टनांचे सातत्य होते. सन 2006 च्या फेब्रुवारीत वादळी पाऊस व गारपिटीने द्राक्षबागेचे होत्याचे नव्हते झाले. सात-आठ लाख रुपयांपर्यंत कर्ज डोक्‍यावर होते. आणि याच संकटामुळे दत्तात्रेय यांना पीक पद्धती बदलण्याबाबत पुनर्विचार करणं भाग पडलं.

संकटाने शोधून दिला पीकबदल


द्राक्षाचं पीक खरं तर चांगलं, पण सांभाळायला अत्यंत नाजूक. खर्चही मोठा; नुकसान झालं तर मोठं. अशा वेळी जोखीम नसणारी कोणती पिकं आपण घेऊ शकतो, हा विचार सुरू झाला. वेलवर्गीय पिकांत भोपळा चांगला पैसा देणारं पीक माहीत होतं. द्राक्षवेली तोडल्यानंतर वर्षभर भोपळा घेतला. त्यातून सुमारे 90 हजार रुपये मिळाले. मात्र भोपळा खर्चीक होता.

द्राक्षबागेत बांधाला तोंडल्याचा एक वेल दहा वर्षांत काढला नसल्याने 500 फुटांपर्यंत मांडवावर पसरला होता. त्यापासून सात महिने उत्पादन मिळत होतं. त्याच्या मार्केटविषयी नाशिकच्या मार्केट यार्डात चौकशी केली..तोंडली बाजारात आणणारे शेतकरी कमीच असल्याचं समजलं. परिसरातील तीन-चार गावांमध्येही कुणाकडे तोंडली नाही म्हटल्यावर द्राक्षबाग काढून 10 × 10 फुटांवर तोंडली लावली. तारी, बांबू, ठिबक पुन्हा नीटनेटकं करून घेतलं. 
तोंडली शेती दृष्टिक्षेपात

  • या पिकात सुमारे सहा वर्षांचा अनुभव आहे.
  • सध्या दोन टप्प्यांत लागवड. 30 गुंठ्यांत एक प्लॉट व 20 गुंठ्यांत सहा महिन्यांचं पीक.
  • वर्षातील सहा ते आठ महिने उत्पादन सुरू राहते

किती उत्पादन मिळते?

आठ महिन्यांचा हंगाम पकडला व महिन्याला 150 ते 200 क्रेट धरले तर तेवढ्या काळात 1200 ते 1600 क्रेट एवढे उत्पादन मिळू शकते. दर पाचशे रुपये मिळाला व एक हजार क्रेट उत्पादन धरले तरी 
पाच लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. 
खर्च वजा जाता तीन लाख रुपये मिळू शकतात. 
सर्वाधिक खर्च मजुरांवर. कारण प्रति दिन एक ते दीड क्रेट मालाची काढणी होते. मजूरबळ जास्त लागते. 
  • मुख्य हंगाम - फेब्रुवारी ते जून-जुलै (पाऊस सतत सुरू होण्याआधी)
  • दर - 400 ते 500 रुपये प्रति 20 किलो क्रेट

हिरवा रंग, लांबी व छोटा आकार असेल तर तोंडल्याला हा दर मिळतो. 
तोंडली जर जाड, कमी हिरव्या रंगाची असतील तर हाच दर 150 ते 200 रुपये इतका कमी मिळतो. 
थंडीत डिसेंबर- जानेवारीत 
छाटणीचा हंगाम, आवक कमी, साहजिकच दरही जास्त म्हणजे 800 रुपयांपर्यंत 
- जुलै ते ऑगस्ट काळात तोंडली हंगाम फारसा सक्रिय नसतो.

दमदार पीक तोंडल्याचं!

सन 2009 च्या पावसाळ्यात तोंडल्याचा मांडव जास्तीच्या वजनाने जमिनीवर पडला. त्यानंतर कमकुवत बांबू बदलले. नवा अँगल वाढवला. एकरी 70 हजार रुपये खर्च आला. मांडव उभा होईपर्यंतच्या काळात वेल जमिनीवर 15 दिवस पडून होता. तरीही या काळात तोंडल्याने 40 हजार रुपयांचे उत्पन्न दिले. 
सन 2010 ला पुन्हा गारपीट होऊन तोंडल्याच्या बागेचे नुकसान झाले. पुढील चार-पाच दिवस मांडव उभा करण्यास लागले. पाने झडली होती. जणू छाटणीच झाली होती. मधल्या काळात पिकाला विश्रांती मिळाली. मात्र त्यानंतर वेलीने जोरदार जोम घेतला. जिथे 8 क्रेटपर्यंत उत्पादन निघायचे तिथे ते 14 क्रेटपर्यंत उत्पादन गेले.

तोंडली व्यवस्थापनातील मुद्दे

लागवड 10 × 10 फुटांवर. एकरी सुमारे 400 झाडे.
  • लागवडीवेळी दोन टन शेणखत, त्यानंतर दर पंधरा दिवसांनी 18:46-0, म्युरेट ऑफ पोटॅश, युरिया व विद्राव्य स्वरूपातील 19:19:19 यांचा वापर,
  • लाल कोळी, अळी, भुरी यांची समस्या असते.
  • वर्षातून एकदा छाटणी होते. त्यानंतर उत्पादन जोमाने वाढते.
तोंडली पिकाची वैशिष्ट्ये 
  • लागवड, पोषण व पीक संरक्षणाचा खर्च अन्य वेलवर्गीय पिकांच्या तुलनेत कमी
  • जास्तीत जास्त सहा वर्षांपर्यंत एक पीक चालते. तीन वर्षांनंतर उत्पादन घटत जाते.
गवती चहापासून दररोज उत्पन्न 
दत्तात्रेय यांनी 2009 मध्ये एका ओळ लावून गवती चहाची शेती सुरू केली. मागणी वाढू लागल्यानंतर दर हंगामात एकेक ओळ लागवड वाढू लागली. सध्या 18 गुंठ्यांत 5000 बेटे, तर प्रति ओळीत 500 ते 700 पर्यंत बेटे आहेत. प्रति व्यक्ती एका दिवसात 100 गड्डी इतका माल काढतो. 

अर्थशास्त्र
  • प्रत्येक बेटापासून चार ते पाच गड्ड्या मिळतात.
  • दररोज शंभर गड्ड्या विकल्या व प्रति गड्डी पाच ते दहा रुपये दर मिळाला तरी 500 ते एक हजार रुपये दररोज हाती पडतात.
  • पाचशे रुपयांत शंभर रुपये खर्च असतो.
दर 
  • पावसाळा व हिवाळ्यात मागणी जास्त असते. त्या वेळी सर्वाधिक म्हणजे 10 रुपये (गड्डीला)
काही वेळा तो 25 रुपयांपर्यंतही गेला आहे. 
- उन्हाळा - पाच रुपये. 
  • अर्ध्या एकरातून 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते.
  • मार्केट
80 ते 90 टक्के ग्राहक हे नाशिकमधील किरकोळ विक्रीवाले दुकानदार आहेत. 
दूरध्वनीवरूनच त्यांच्याशी संपर्क साधून ऑर्डर घेतली जाते. 
व्यापाऱ्यांनाही उर्वरित माल दिला जातो.

अन्य प्रयोग


  • कढीपत्ता - दोन वर्षांपूर्वीची व नवी मिळून सुमारे 150-175 झाडे आहेत. गावातील व्यापाऱ्यांनाच प्रति गड्डी 10 रुपये दराने दररोज 10 गड्ड्या विकल्या जातात. त्यापासून शंभर रुपये दररोज मिळतात.
  • ऍग्रोवन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या शहा (ता. सिन्नर) येथील बाळासाहेब मराळे यांच्या शेवगा शेतीकडे लक्ष जाऊन त्यांनीच विकसित केलेल्या "रोहित 1' वाणाची लागवड मागील वर्षी 30 गुंठ्यांत केली. त्यातून फार नाही, पण 5 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले.
  • प्रतिकूल परिस्थितीत जोडधंदा म्हणून अलीकडेच संगमनेरी वाणाच्या चार शेळ्या आणल्या आहेत. वर्षभरात त्यांची संख्या 25 पर्यंत वाढविण्याचा मनोदय आहे.
दत्तात्रेय झाले सर्पमित्र 
दत्तात्रेय यांच्या वाचनात जेव्हा "सर्पजगत' हे पुस्तक आले त्या वेळी सापांविषयी कुतूहल वाढून नाशिक परिसरातील सर्पमित्रांकडून मार्गदर्शन घेण्यास व अभ्यासास सुरवात केली. गैरसमजुतीतूनच सापांना मारले जाते. गवत्या, डुरक्‍या घोणस आदी साप बिनविषारी आहेत, हे सांगताना ते त्यांना योग्य प्रकारे हाताळतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सांगताना ते म्हणतात, की साप दिसला की घाबरून जाऊन त्याची हत्या करणे योग्य नाही. 

दत्तात्रेय देशमाने - 8796995699 
प्रयोगशील शेती करणारे दत्तात्रेय कवीदेखील आहेत. त्यांनी सुमारे पावणेदोनशे कविता लिहिल्या आहेत. कांद्याचे दर कोसळून जेव्हा आंदोलने झाली त्या वेळी त्यांनी लिहिलेली ही कविता. 

तुझ्यासाठी संघर्ष आहे अटळ 
बळिराजा दाखव तुझे बळ 
तुझ्या हातात नांगराचा फाळ आहे 
खांद्यावर वखराची पास आहे 
तुझ्याकडून संघर्षाची आस आहे 
आजचा दिवस ठीक 
उद्याचे काही खरे नाही 
हातावर हात ठेवून 
नुस्ते बसणे बरे नाही 
संघर्ष तुझा जगाला दाखवायचा आहे 
अन्याय अत्याचाराला वाकवायचे आहे 
साधा किडाही करतो 
स्वत:साठी वळवळ 
तू तर माणूस आहेस 
तुझ्यासाठी संघर्षच आहे अटळ

 

लेखक : ज्ञानेश उगले

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate