औरंगाबाद जिल्ह्यातील वरझडी येथील भारत पठाडे यांनी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी डाळिंबाची निवड केली. प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, कृषी विभागाचे साह्य व अभ्यास व कष्टातून पिकाचे व्यवस्थापन यातून पठाडे यांना हे पीक लाभदायक ठरले आहे. उत्पादनवाढीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
जे करायचे ते मन लावून व आदर्शव्रत करायचे आणि त्यासाठी संपूर्ण वेळ द्यायचा. ही वृत्ती ज्या शेतकऱ्यांची असेल, त्याची शेती उच्च दर्जाचीच असू शकते. जमीन कशीही असली तरी ती कसणारा चांगला असेल आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेतीला आकार देणार असेल तर यश त्याच्यापासून दूर नसते. वरझडी गावचे 31 वर्षीय भारत शिवनाथ पठाडे यांनी हे दाखवून दिले आहे.
औरंगाबाद-जालना महामार्गावर करमाडपासून केवळ 14 किलोमीटर अंतरावरील वरझडी हे कोबी पिकासाठी प्रसिद्ध गाव आहे. येथील सरासरी शेतकऱ्यांकडे कमी जमीन. त्यामुळे जमिनीच्या प्रत्येक कोपऱ्याकडेदेखील लक्ष ते देतात. याच मातीत जन्मलेले, राबलेले भारत पठाडे यांनी फळबागेकडे वळण्याचा विचार केला आणि लावले डाळिंब!
डाळिंब लागवडीची पार्श्वभूमी
करमाड परिसरात बहरत असलेल्या डाळिंब बागा पाहून गावचे काही काळ सरपंच राहिलेले शिवनाथ पठाडे यांनी डाळिंब लागवडीचा निर्णय घरी सांगितला. पारंपरिक कोबी व भोपळ्याचे बीजोत्पादन सोडून डाळिंबासारखे नवखे पीक घेण्याचा धोका पत्करू नये, असे घरातील सर्वांना वाटत असतानाही याच पिकाचा निश्चय त्यांनी केला. त्यांना साथ दिली ती मुलगा भारत पठाडे यांनी.
अनुभवी शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन
डाळिंब लागवड करण्याचे नक्की झाल्यानंतर परिसरातील अनुभवी बागायतदारांच्या बागेची पाहणी व चर्चा केली. यात जडगावचे विठ्ठल भोसले, भांबर्ड्याचे शेषराव दौंड, पिंपळखुट्याचे विष्णू घोडके, तसेच टोणगावचे जयाजीराव सरोदे आदींचा अनुभव त्यांच्या उपयोगी आला. सन 2006 मध्ये कृषी विभागाशी संपर्क साधला. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेऊन लागवड केली.
लागवडीतील महत्त्वाचे मुद्दे
बागेचे प्रातिनिधिक नियोजन असे. जमिनीची चांगली मशागत केली. जमीन हलकी व मुरमाड अशी असल्याने प्रथमतः 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे खोदले. त्यात गाळाची माती, चांगले कुजलेले शेणखत व सुपर फॉस्फेट खताचे मिश्रण टाकले. तत्पूर्वी 10 ते 15 ग्रॅम फोरेट टाकले. कृषी विभागाच्या परवान्याच्या आधारे शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून आणलेली भगवा डाळिंब कलमे आणून लावली. ठिबक सिंचन होतेच. सुरवातीला चार तास पाणी दिले. त्यानंतर तीन दिवसाआड दीड ते दोन तास पाणी दिले. एक महिन्याच्या अंतराने विद्राव्य खते दिली. डाळिंबाची वाढ चांगली होत होती. दोनच महिन्यांत झाडाच्या फांद्या जमिनीवर लोळू लागल्या. जमिनीपासून दीड फुटांपर्यंतच्या सर्व फांद्या काढून घेतल्या. इतर फांद्यांचे शेंडेही कापून झाडास योग्य आकार दिला. एक फुटाचे गादीवाफे तयार केले. ते करतानाच त्यात शेणखत टाकले. त्यावर कीडनाशक पावडर टाकली. डाळिंबाची दुसरी छाटणी पहिल्या छाटणीनंतर चार महिन्यांनी केली. त्यामुळे झाडाची अवास्तव वाढ थांबवून त्यास चांगला आकार देता आला. गादीवाफे पुन्हा व्यवस्थित करून घेतले. पाण्याबरोबर रासायनिक व जैविक खतांच्या नियोजनाबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही नियोजन केले. त्यामुळे झाडाची निरोगी व सशक्त वाढ झाली.
एकूण 11 एकर जमिनीचे नियोजन
पठाडे यांची एकूण जमीन 11 एकर असून ती दोन ठिकाणी आहे. त्यांची पावणेचार एकर डाळिंब जुनी आहे. त्यातही सहा व चार वर्षे असे बागेचे दोन प्रकार आहेत. नवी तीन एकर बाग असून ती 14 महिने वयाची आहे. लागवडीची अंतरे 11 x 8, 12 x 8, 15 x 8 अशी वेगवेगळी ठेवली आहेत.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
झाड सशक्त असेल तरच त्यापासून चांगले उत्पादन घेता येते. त्यासाठी रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खताचेही व्यवस्थापन तेवढेच महत्त्वाचे होते. आपल्या शेतातील शेणखत, गोबरगॅस स्लरी व काही विकतचे कंपोस्ट खत आणून ते झाडांना दिले. प्रति 50 झाडांसाठी एक ट्रॉली कंपोस्ट खत हे प्रमाण वापरले. तसेच 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम पोटॅश व एक किलो युरिया तसेच एक ते दीड किलो निंबोळी पेंड प्रति झाड असा वापर केला. त्यानंतर एक दिवसाआड प्रति एकर तीन किलो १९:१९:१९ तसेच ०:५२:३४ व अन्य विद्राव्य खते वाढीच्या शेवटच्या टप्प्यात वापरली. खताच्या मात्रा देण्यापूर्वी पान व देठांचे पृथक्करण केले जाते.
सिंचन व्यवस्था
1) राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 50 लाख लिटर व 75 लाख लिटर क्षमतेची दोन शेततळी घेतली आहेत.
यंदा अद्याप एकच पाऊस झाला असून आता त्याची अधिक प्रतीक्षा आहे. मात्र मागील वर्षी शेततळ्याचा आधार राहिल्याने बाग जगवणे सुलभ झाले. शेतात दोन विहिरी आहेत. एक विहीर नदीच्या काठाजवळ असल्याने पावसाळ्यात ती तुडुंब भरते. त्यातील पाणी उचलून शेततळे भरले जाते. तसेच सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील बनगाव येथील तलावाजवळ जमीन घेऊन तेथे विहीर खोदली व त्यातून पाणी आणले. विहिरीचे पाणी संपले की शेततळ्यातील पाण्याचा उपसा करण्यात येतो. त्यामुळे किती पाणी द्यायचे याचा अंदाज बांधणे सोपे जाते. उन्हाळ्यात दोन वेळेस मोकळे पाणी देऊन आर्द्रता कायम राखण्याचा प्रयत्न केला.
2) नवी डाळिंब लागवड शेततळ्याशेजारी असून पूर्वीची लागवड गावाजवळील शेतात आहे. दोन्ही शेतांतील अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. पूर्वीच्या डाळिंब बागेपासून शेततळ्याचे अंतर 1000 मीटर आहे. त्यासाठी 160 पाइप वापरून पाइपलाइन केली व डाळिंबासाठी सिंचन केले.
उत्पादन व विक्री
एकूण नियोजनातून पठाडे यांनी बागेतून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. सन 2012 मध्ये पावणेचार एकर बागेतून त्यांना एकूण 46 टन उत्पादन मिळाले. त्याला प्रति किलो 45 पासून ते 65 रुपयांपर्यंत दर मिळत राहिला. सुमारे 11 टन नाशिक बाजारपेठेत विकला. उर्वरित सर्व माल व्यापाऱ्यांना जागेवरच दिला.
सन 2011 मध्येही त्यांनी उत्पादन घेतले. त्याला प्रति किलो 52 रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
दरवर्षी आंबेबहर घेण्याचे पठाडे यांचे नियोजन असते. यंदाही या बहराची अवस्था समाधानकारक असून
सन 2012 च्या तुलनेत अधिक उत्पादन आपण घेऊ अशी त्यांना अपेक्षा आहे.
डाळिंबाचा उत्पादन खर्च एकूण उत्पादनयोग्य क्षेत्रात सुमारे सहा लाखापर्यंत येत असल्याचे पठाडे म्हणाले.
सुरवातीच्या 50 गुंठे क्षेत्रातील 625 डाळिंबापासून 16.50 टन उत्पादन वाढत वाढत जाऊन 29 टन उत्पादन मिळाले. परिसरातील डाळिंब उत्पादन हे सरासरी 30 ते 35 किलो प्रति झाड असे आहे. पण योग्य नियोजनामुळे भारत पठाडे यांना 44 पासून 47.20 किलोपर्यंत प्रति झाड उत्पादन मिळाले.
कृषी विभागाची साथ
डाळिंब लागवड, शेततळ्याचे खोदकाम व अस्तरीकरण, प्लॅस्टिक आच्छादन व गोबर गॅस संयंत्रासाठी कृषी विभागाच्या अनुदानाची मदत पठाडे यांना झाली. कृषी सहायक मंगेश निकम, तत्कालीन कृषी अधिकारी श्रीकांत देशपांडे, सध्याचे मंडल कृषी अधिकारी कैलास पाडळे व प्रदीप अजमेरा यांनीही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
(लेखक बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत कृषी पर्यवेक्षक आहेत.)
संपर्क - भारत पठाडे, 942518801
माहिती संदर्भ : अॅग्रोवन