অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दर्जेदार भेंडी उत्पादन

युरोपलाही भेंडी पाठवण्याचा प्रयोग यशस्वी

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील हिरालाल पाटील यांनी आपल्या शेतात रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर कमी करण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच निर्यातदारांमार्फत आपली भेंडी युरोपसारख्या खंडात पाठवणे त्यांना शक्‍य झाले आहे. आरोग्यदायी मालाचे उत्पादन हेच त्यांनी आपले उद्दिष्ट ठेवले आहे.  लहरी निसर्गाचा सामना करीत असताना कमी कालावधीत चांगले उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून, भेंडीसारखे पीक आश्‍वासक ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात रेल (ता. धरणगाव) येथील हिरालाल पाटील यांनी रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर कमी करीत भेंडी पिकविण्यास प्रारंभ केला आहे.

भेंडी पिकवणारे रेल गाव

गिरणा नदीलगत वसलेलं रेल हे छोटंसं गाव. शेती हाच गावाचा मुख्य व्यवसाय. गाळाच्या सुपीक जमिनीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कपाशीसह ज्वारी, मका आदी पिकांची शेती करणाऱ्या येथील शेतकऱ्यांचा भेंडी उत्पादनात हातखंडा राहिला आहे. खरिपात मुगासारखे अल्प मुदतीचे पीक घेतल्यावर पोळा सणानंतर, तसेच कपाशी पिकाची काढणी झाल्यानंतर भेंडीची मोठ्या प्रमाणावर लागवड रेल परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते. साहजिक जळगाव जिल्ह्यातून मुंबईच्या वाशी मार्केटला दररोज पाठविल्या जाणाऱ्या भेंडीत रेलचा मोठा वाटा असतो.

हिरालाल यांनी केला रसायनांचा वापर कमी

गावातील हिरालाल पाटील यांची सुमारे 25 एकर शेती. त्यात कपाशी, ज्वारी, मका यासारख्या मुख्य पिकांसोबत भेंडीचे पीकही ते घेतात. सुरवातीच्या काळात त्यांना भेंडीपासून चांगली कमाईदेखील झाली. मात्र विषाणुजन्य रोगांची समस्या या पिकात जाणवू लागली. दोन- तीन तोडे होत नाही तोच संपूर्ण शेत पिवळे पडू लागले. भेंडी उपटून फेकण्याची वेळ आली. भरमसाट रासायनिक खते व कीडनाशकांसाठी झालेला खर्च भरून निघणेही मुश्‍कील झाले. भेंडी बऱ्यापैकी निघाली तरी एरंडोल मार्केटला नेल्यानंतर व्यापारी हातकाट्यावर भेंडीला किलोला जेमतेम 10 ते 12 रुपये भाव द्यायचे. नेहमीच्या नुकसानीला कंटाळून शेवटी भेंडीचा नाद सोडून पारंपरिक पिकांवर जोर देण्याचा विचार करीत असताना हिरालाल यांना परदेशात भेंडी पाठवण्याबाबत आणि त्यासाठी रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनाबाबत माहिती मिळाली. त्या दृष्टीने त्यांनी निर्यातदारांशी संपर्क साधला. 
अशी भेंडी निर्यातीसाठी पाठवण्याचे निश्‍चित केले.
मागचा अनुभव लक्षात घेऊन घाबरत घाबरत दीड एकरांवर भेंडी लावली. पूर्वी रासायनिक कीडनाशकांचा वापर निर्यातीच्या दृष्टिकोनातून होत नव्हता. आता मात्र जैविक कीडनाशकांचा वापर व सेंद्रिय पद्धतीवर हिरालाल यांनी भर दिला. केवळ भेंडीच नव्हे, तर अन्य पिकातही त्यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून जैविक वा सेंद्रिय पद्धतीचा वापर अधिक प्रमाणात सुरू केला. निर्यातदार त्यांच्याकडून भेंडी घेताना त्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी कीडनाशक अवशेषांच्या दृष्टीने करतात. त्यानंतरच मालाची पाठवणी हे निर्यातदार युरोपात करतात. "लोकल' मार्केटपेक्षा निर्यातीच्या भेंडीला अधिक दर तोडणी सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या काळात दीड एकरांतून एक दिवसाआड एक ते दीड क्विंटल भेंडी निघते. त्यानंतर हे प्रमाण वाढत जाते. काढणीच्या नंतरच्या टप्प्यात उत्पादन थोडे कमी होते. 
सुमारे दीड एकर क्षेत्रात एकूण सुमारे 70 तोडे होतात. प्रति तोडा 250 ते 400 किलोंच्या दरम्यान माल मिळतो. 
एकूण सुमारे साडेसतरा टन मालाचे उत्पादन होते. एकरी 10 ते 11 टन उत्पादन मिळते. पाच किलोच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग केले जाते. प्रति किलो 22, 25, 30, 35 ते कमाल 43 रुपयांपर्यंत दर निर्यातदारांकडून मिळतो. दीड एकरात चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यात सुमारे एक ते दीड लाख रुपये उत्पादन खर्च असतो. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी केल्याने त्यावरील खर्चात बचत झाली आहे. 
रासायनिक पद्धतीच्या शेतीसाठी खर्च अधिक येत असे. भेंडीला लोकल मार्केटमध्ये जेव्हा किलोला 10 ते 12 रुपये दर असतो, त्या वेळी निर्यातीसाठीच्या भेंडीला तो किमान 22 रुपये तरी मिळतोच, असे हिरालाल म्हणतात.

पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • खरिपात मुगाचे पीक घेतल्यानंतर दर वर्षी सुमारे दीड एकरावर भेंडीची लागवड
  • भेंडीचे चार किलो बियाणे दीड एकरावर वापरले जाते.
  • लागवडीपूर्वी प्रति एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखताचा वापर. घरची सुमारे 12 ते 13 जनावरे. त्यांच्या माध्यमातून खत उपलब्ध होतेच, शिवाय वेळप्रसंगी बाहेरूनही खरेदी केले जाते.
  • गोमूत्राचाही वापर केला जातो.
  • जैविक पद्धतीच्या निविष्ठा वापरण्यावर अधिक भर असल्याने रासायनिक कीडनाशकांचे अवशेष शेतमालात राहण्याची जोखीम कमी होते.
  • हिरालाल यांची शेती पद्धती पाहून परिसरातील शेतकरीसुद्धा आता त्यांचे अनुकरण करताना दिसत आहेत

पूर्वी रासायनिक खते व कीडनाशकांचा भरमसाट वापर केल्यानंतरही पदरी निराशेशिवाय काहीच पडत नसल्याचे लक्षात आले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी सेंद्रिय पद्धतीने भेंडीचे पीक घेण्यासाठी प्रेरित झालो. आता प्रयत्नपूर्वक भेंडीचे दर्जेदार उत्पादन घेणे मला शक्‍य होत आहे. व्यापाऱ्यांमार्फत ही भेंडी परदेशात निर्यात होत आहे. चांगल्या दराचा लाभही मिळू लागला आहे. मुख्य म्हणजे रसायनांचे प्रमाण शेतीत कमी केल्याने आरोग्याला चांगल्या मालाची निर्मिती माझ्या हातून घडत आहे, याचे मला समाधान आहे. 


संपर्क -जितेंद्र पाटील ,हिरालाल पाटील - 9823986586

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 


 

 

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate