उसातील कलिंगड ठरले फायदेशीर
नगर जिल्ह्यातील शेरी चिखलठाण येथील सूर्यभान काकडे यांनी शेतीतील खर्च कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा वापर महत्त्वाचा मानला आहे. उसात कांदा, तसेच कलिंगड अशी पद्धती वापरत त्यांनी मुख्य पिकातील खर्चात बचत केली. यंदाच्या दुष्काळी स्थितीत ठिबक सिंचन, पाचटाचे आच्छादन आदी गोष्टींचा वापर करीत त्यांनी नियोजन सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुरी तालुक्यातील (जि. नगर) शेरी चिखलठाण येथील सूर्यभान काकडे यांचा पूर्वापार शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. ऊस, टोमॅटो, कापूस, घास अशी विविध पिके घेतानाच अलीकडील काही वर्षात त्यांनी सुधारित तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली आहे. टोमॅटो पिकात काकडी, उसाच्या सुरू पिकात कांदा तर खोडवा उसात त्यांनी टरबुजाचे पीक घेण्याचे प्रयोग केले आहेत. आंतरपिकांमुळे मुख्य पिकाचा म्हणजे उसाच्या उत्पादन खर्चात तर बचत झालीच. शिवाय टरबूज (कलिंगड) व कांदा अशी आंतरपिके त्यांना चांगला फायदादेखील देऊन गेली.
काकडे यांचे तीन भाऊ नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात. तर सूर्यभान, भारत, भानुदास, रंगनाथ असे चौघेजण शेती करतात. काशिनाथ हे बाजार समितीचे संचालक व आडतदार आहेत. सूर्यभान काकडे यांचे स्वतंत्र असे एकूण क्षेत्र सुमारे पाच एकर आहे. त्यात दोन एकरावर ऊस तर दोन एकरावर टोमॅटो घेतला आहे. कांदा पिकाचा बेवड म्हणून उसाला फायदा होत आहे. चार फूट सरीवर उसाची लागण केलेली आहे. प्रारंभी ठिबक संचाच्या दृष्टीने पाइपलाइन अंथरली. मात्र सुरू हंगामाच्या लागवडीसाठी प्रवाही पद्धतीनेच पाणी दिले. काकडे यांची उसाची सरासरी उत्पादकता एकरी पन्नास ते साठ टन आहे. सध्या त्यांच्या शेतात खोडवा ऊस उभा आहे. याच पिकात त्यांनी कलिंगडाचे आंतरपीक घेतले.
तत्पूर्वी लावण उसाचे उत्पादन एकरी 56 टन मिळाले. पहिला हप्ता प्रति टन 2300 रुपये याप्रमाणे मिळाला. उसासाठी ठिबक संचाचा खर्च एकरी तीस हजार रुपये आला. या उसात त्यांनी कांदा आंतरपीक घेतले होते. खते देताना शेणखत व रासायनिक खते एकत्रित करून दिली. बियाणे, लागवड, तणनाशक, खुरपणी, काढणी व वाहतूक असा मिळून 14 हजार रुपये कांद्यासाठी एकरी खर्च आला. एकरी सुमारे दोनशे गोणी म्हणजेच प्रति गोणी पन्नास किलो कांदा मिळाला. त्याला सहा ते सात रुपये प्रति किलो दर मिळाला. सरासरी सहा रुपये प्रति किलो प्रमाणे स्थानिक बाजारपेठेत साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. कांदा पिकाचा बेवड म्हणून उसाच्या खोडव्यास चांगला फायदा होत आहे. उसाच्या खोडव्याची परिस्थिती लावण उसापेक्षा चांगली असून एकरी साठ ते 70 टन उत्पादनाची त्यांना आशा आहे. या उसात कलिंगडाचे पीक घेताना लेंडीखतात रासायनिक खतांचे मिश्रण करून त्याचा वापर केला.
अनिल कढणे यांच्याकडील कलिंगडाचा उसातील आंतरपीक म्हणून प्रयोग यशस्वी झाल्याचे काकडे यांना समजल्यानंतर अभ्यासाअंती त्यांनीही हा प्रयोग करण्याचे ठरवले. तालुका कृषी अधिकारी नामदेव रोकडे तसेच कृषी सहायक अशोक चोपडे यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. कलिंगडाला उन्हाळी हंगामात असलेली मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले. लागवडीसाठी दोन रोपांतील अंतर तीन फूट, तर दोन ओळींतील अंतर चार फूट अशा अंतरावर ठेवून खड्डे घेतले. लेंडीखत व रासायनिक खतांचे केलेले मिश्रण प्रत्येक खड्ड्यात टाकले. तेथे टरबुजाचे बी टोकले. त्यांची जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम हलकी आहे. कार्बेन्डाझिम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करूनच लागवड केली. ह्युमिक ऍसिडचाही वापर केला. लेंडीखताचा वापर करण्याबरोबरच सिंगल सुपर फॉस्फेट या खताचा वापर केला. त्या व्यतिरिक्त 19-19-19, 0-52.34, 12-61-0 आदी विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे दिली. सुमारे 45 दिवसांनी खुरपणी केली.
अळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात. नियंत्रणासाठी निंबोळी अर्क चार टक्के किंवा ट्रायऍझोफॉस वीस मि.लि. दहा लिटर पाण्यातून फवारले.
पिल्ले व मोठी माशी पानांतील रस शोषून घेते त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारले. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे दुष्काळी स्थितीतही पाण्याचा कार्यक्षम वापर झाला.
खोडवा उसाचे पाचट शेतात ठेवल्यामुळे कलिंगडाला त्याचा उपयोग झाला. या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले. खुरपणी तसेच जमिनीची धूप कमी झाली. झाडांच्या मुळांचा विस्तार झाला. आच्छादनाचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग झाल्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली. फळे जास्त लागली.
मुंबईच्या व्यापाऱ्याने कलिंगडांची जागेवर रोख रक्कम देऊन खरेदी केली. सरासरी सहा हजार रुपये प्रति टन, म्हणजे सहा रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळाला. एकूण चार क्षेत्रात सुमारे पन्नास टन उत्पादनाची विक्री काकडे यांनी केली. पहिल्या तोडीच्या 15 टन मालास सहा हजार रुपये प्रति टन दर मिळून नव्वद हजार रुपये मिळाले. तर नंतरच्या दोन्हीही तोडीतील 35 टन मालास पाच हजार रुपयांचा दर मिळाला. एकरी उत्पादन सुमारे 12 टन मिळाले. एकरी 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
संपर्कः सूर्यभान काकडे- 9921988901
काकडे टोमॅटोचे पीकही एप्रिल ते जुलै या काळात घेतात. त्याचा उत्पादनखर्च एकरी 50 हजार रुपयांपर्यंत येतो. सरासरी प्रति क्रेटला तीनशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. हे पीक निघाले की त्या जागी काकडीचे पीक घेतले जाते. सप्टेंबरच्या सुमारास काकडीचे पीक निघून जाते. त्यांना या हंगामात एकूण क्षेत्रात एक हजार क्रेट काकडीचे उत्पादन मिळाले आहे. दुष्काळात आवक घटल्याने त्यांना प्रति किलो 50 रुपयांच्या वरही दर काही वेळा मिळाला आहे. आंतरपीक घेतल्याने मुख्य पिकाच्या उत्पादन खर्चात बचत होतेच. सद्यःस्थितीत शेतीतील वाढता खर्च लक्षात घेता आंतरपीक पद्धती फायद्याची ठरणारी आहे असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे. काकडे यांच्या एकत्रित कुटुंबात छोटी- मोठी 25 जनावरे आहेत. त्यातून घरच्यासाठी दुधाची व शेतीची सेंद्रिय खतांची गरज बरीचशी पूर्ण होते.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...