चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी चंदीगड हे शहर असून या प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 114 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार प्रदेशाची लोकसंख्या 10,54,686 इतकी आहे. या प्रदेशाची साक्षरता 86.43 टक्के आहे. चंदीगडच्या अधिकृत भाषा हिंदी, पंजाबी आणि इंग्रजी या आहेत. या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 1 नोव्हेंबर 1966 रोजी करण्यात आली.
शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी हा नयनरम्य परिसर आहे. चंदीगड म्हणजे सुंदर शहर. शहराचे सुंदर हे विशेषण सार्थ ठरावे याचा प्रत्यय येत राहतो. आधुनिक स्थापत्यशास्त्र आणि नगररचनेचा उत्कृष्ट प्रातिनिधिक नमुना म्हणजे हे शहर. 1 नोव्हेंबर 1966 रोजी चंदीगड व भोवतालचा परिसर मिळून केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. वायव्येला पंजाब व आग्नेयेला हरियाणा ही राज्य आहेत.
चंदीगड हा प्रदेश केंद्रशासित आहे. पंजाब व हरियाणा या दोन्ही राज्यांची ही संयुक्त राजधानी आहे. या शहराची सुप्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद ला कॉर्ब्युझर व पेरी जेनेरट यांनी नियोजनबद्ध आखणी करून निर्मिती केली. या शहरात कॉलनी व उंच इमारतींना स्थान नाही. हे शहर 47 सेक्टर्समध्ये विभागण्यात आले आहे. सर्व सेक्टर्स सर्व प्रकारच्या सुविधांनी परिपूर्ण आहेत. तसेच या शहराचे चार प्रमुख कॉम्प्लेक्स आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे रोझ गार्डन, सुखना सरोवर, उत्क्रांतीवरील प्रदर्शन प्रेक्षणीय आहे. संपूर्ण शहरांमध्ये सुंदर उद्याने पसरलेली आहेत. या शहराच्या आसपास छतबीर प्राणिसंग्रहालय, मनसादेवी, चंडीदेवी व मोहाली हे औद्योगिक शहर आदी स्थाने आहेत.
शहराच्या आजूबाजूची 1515 हेक्टर क्षेत्र शेती लागवडीखाली येते. त्यातील 1450 हेक्टर जमिन सिंचित आहे. गहू, भाजीपाला व पशुचारा प्रमुख ही पिके आहेत. या केंद्रशासित प्रदेशात 15 मोठे व काही मध्यम उद्योग आहेत. या प्रदेशात 3026 लघु उद्योग आहेत. यात 29400 व्यक्तींपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो. 60 कोटी रूपयांचे उत्पादन दरवर्षी निर्यात होते.
चंदीगडला शेजारील राज्यांकडून तसेच मध्यवर्ती निर्मिती प्रकल्पातून वीज पुरवठा होतो. भाक्रानांगल धरणामध्ये 3.5 टक्के समभाग आहे. औष्णिक, आण्विक व वायुधारित हे समभाग आहेत. केंद्रिय निर्मिती प्रकल्पाकडून 82.9 मे.वॅ. ची निश्चित वीज तरतूद आहे. शहराबाहेरील सर्व गावांचेही विद्युतीकरण करण्यात आले आहे. सर्व गावांत सार्वजनिक दिव्यांची सोय. राष्ट्रीय महामार्गाची या प्रदेशातील लांबी केवळ 15.275 किमी आहे. रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्गे देशाच्या इतर भागाशी जोडलेले आहेत.
रॉक गार्डन, गुलाबांचा बगीचा, सुखना तलाव, वस्तुसंग्रहालय व कलादालन, शहर संग्रहालय. भूमितीय टेकडी, उत्क्रांतीचे संग्रहालय, कलाग्राम. ओंडक्यांची झोपडी, नेपलीवन, लेझर फिटनेस ट्रेलस आदी पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत असते. व्यक्तिचित्रांचे राष्ट्रीय दालन, बाहुल्यांचे आंतरराष्ट्रीय संग्रहालय. मध्यवर्ती चौक व स्मृती उपवन आदींसोबतच सरकारी म्युझियम आणि आर्ट गॅलरी, शांती कुंज, चोकी धानी, नेक चांदचे रॉक गार्डन, फुलपाखरू पार्क ही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत.
चंदीगडला वर्षातून एकदा साहित्योत्सव होत असतो. याव्यतिरिक्त बैसाखी, आंबा उत्सव, बाग उत्सव, कार्निवल उत्सव, तेज उत्सव आदी उत्सवही पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
काही लोकनृत्य चंदीगड मध्ये लोकप्रिय आहेत. गिद्धा, साम्मी, भांगडा, तियाम, जुमार, गाटका, धमाल, लुद्दी, किकिली, जुल्ली, दनकरा आदी लोकनृत्य चंदीगड मध्ये प्रचलित आहेत.
लेखक - डॉ.सुधीर राजाराम देवरे
स्रोत - महान्यूज
अंतिम सुधारित : 3/6/2024
राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर हे शहर असून या ...
गुजरातची राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्...
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे ...
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी दिल्ली हे ...