অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला

धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला

धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला : सुविख्यातभारतीय अर्थशास्त्रज्ञ व नामवंत प्राध्यापक. वडिलांचे नाव तुलसीदास पुरूषोत्तमदास व आईचे नाव मोतीगौरी. पत्‍नीचे नाव चंद्रबाला. लाकडावालांना दोन मुलगे आहेत. लाकडावाला यांचे शिक्षण एम्‌. ए.; एल्‌एल्‌. बी., पीएच्‍. डी. असे झाले. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात ते प्रथम अधिव्याख्याता म्हणून नियुक्त झाले (१९४३–४७), नंतर क्रमाक्रमाने ते प्रपाठक (१९४७–५४), प्राध्यापक (१९५४–५६), कार्यकारी संचालक (१९६५ –६६), संचालक (१९६६–६७) असे काम करीत राहिले. लाकडावालांनी केंद्र सरकार व राज्य सरकारे यांनी वेळोवेळी नियुक्त केलेल्या विविध समित्या, वेतनमंडळे यांचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम केले. यांशिवाय पाचव्या वित्त आयोगाचे सदस्य (१९६८–६९), उत्तर प्रदेश राज्य सरकारनियुक्त कर चौकशी समितीचे अध्यक्ष (१९७२–७४), भारतीय समाजिक विज्ञान संशोधन संस्थेचे राष्ट्रीय अधिछात्र (१९७४–७५), नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (१९७७–८०) अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

अखिल भारतीय अर्थपरिषद १९६४, गुजरात आर्थिक परिषद १९६७, अखिल भारतीय कृषिविषयक अर्थशास्त्रीय परिषद, १९७५ या परिषदांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. भारतीय श्रम अर्थशास्त्र संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. लाकडावाला यांनी अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक सर्वेक्षणांचे संयोजन केले आहे. प्रचलित आर्थिक समस्यांवर उद्‌बोधक असे लेख त्यांनी लिहिले आहेत. चलनवाढ, दुसऱ्या महायुद्धानंतर उद्‌भवलेली वित्तप्रबंधाबाबतची समस्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, वाढत्या किंमती व अर्थसंकल्प, विविध वित्त आयोग आणि त्यांचे मूल्यमापन, केंद्र व राज्ये यांमधील आर्थिक संबंध, रूपयाचे अवमूल्यन, परदेशी भांडवल, अर्थसंकल्प, स्वतंत्र भारताचे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध, भारतीय करपद्धती आदी विविध महत्त्वपूर्ण आर्थिक विषयांवर त्यांनी लेखन केले. सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी, सिमेंट उद्योग, राहणीमान निर्देशांक, जकात आयोग, प्रशासकीय सुधारणा आयोग, लोखंड व पोलाद उद्योग, महागाई भत्ता आयोग, राष्ट्रीय श्रम आयोग, बंदर व गोदी कामगारांचे केंद्रीय वेतन मंडळ इत्यादींच्या विविध अहवालांशी व अभ्यास गटांशी लाकडावाला यांचा संबंध आला आहे.

सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्तींमध्ये लाकडावाला यांची गणना होते. अर्थशास्त्र विषयातील भरीव कार्याबद्दल लाकडावाला यांना दोन वेळा दादाभाई नवरोजी पुरस्काराचा सन्मान प्राप्त झाला आहे. १९७४ मध्ये महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. मुंबई विद्यापीठातील आपल्या सु. ३० वर्षांच्या अध्यापनसेवा कारकीर्दीत अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या, तसेच डॉक्टरेटसाठी संशोधन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. अहमदाबाद येथे ‘सरदार पटेल आर्थिक व सामाजिक संशोधन संस्था’ स्थापन करून तिला लाकडावाला यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. भारतात व परदेशांत भरविल्या जाणाऱ्या विविध आर्थिक परिषदा व चर्चासत्रे यांमध्ये लाकडावाला यांनी भाग घेऊन आपले शोधनिबंधही सादर केले आहेत. त्यांची विपुल ग्रंथसंपदा असून निवडक ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत :

(१) वॉर अँड द मिडल क्‍लास (सहलेखन),१९४५;

(२) प्राइस कंट्रोल इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू फुड सप्‍लाय, १९४६;

(३) जस्टिस इन टँक्सेशन इन इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू ब्रिटिश गुजरात, १९४६;

(४) इंटरनॅशनल अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ इंडियन इकॉनॉमिक डिव्हलपमेंट, १९५१;

(५) टॅक्सेशन अँड द प्‍लॅन, १९५६;

(६) स्मॉल इंडस्ट्री इन ए बिग सिटी–ए सर्व्हे ऑफ बाँबे, १९६१;

(७) युनियन–स्टेट फिनॅन्शियल रिलेशन्स, १९७२;

(८) कमॉडिटी टॅक्सेशन इन इंडिया, १९७२;

(९) मोबिलायझेशन ऑफ स्टेट्‌स रिसोर्सिस, १९७२;

(१०) सर्व्हे ऑफ पब्‍लिक फिनॅक्स, १९७५;

(११) रीडिंग्ज इन द थिअरी ऑफ इंटरनॅशनल टेड अँड कमर्शियल पॉलिसी.

भारताच्या आर्थिक विकासात परदेशी मदतीने मोलाची कामगिरी बजावल्याचे मत लाकडावाला यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते संचय (बचत) व भांडवल गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद, अर्थसंकल्पीय जमा व खर्च यांमधील अंतर कमी करण्यात त्याचप्रमाणे विशिष्ट साधनसामग्रीचा व कौशल्याचा अभाव दूर करण्यात परदेशी मदतीने चांगलाच हातभार लावला आहे. युनियन-स्टेट फिनॅन्शियल रिलेशन्स या नावाजलेल्या ग्रंथामुळे लाकडावाला यांची केंद्र सरकारने पाचव्या वित्त आयोगाचे एक सदस्य म्हणून नियुक्ती केली. केंद्र शासनाने स्थापिलेला तदर्थ वित्त आयोग आणि स्थायी स्वरूपाचा नियोजन आयोग या दोन्ही आयोगांच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या वित्तविषयक समस्यांचे विश्लेषण या ग्रंथात आढळते. वित्त आयोग नियोजन आयोगाप्रमाणे स्थायी स्वरूपाचा असावा यावर लाकडावाला यांनी भर दिला आहे. सांप्रत लाकडावाला अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल आर्थिक व सामाजिक संशोधन संस्थे’त गुणश्री प्राध्यापक म्हणून कार्यरत असून मुंबईच्या ‘भारतीय अर्थव्यवस्था संनियंत्रण केंद्रा’चे सन्माननीय संचालक म्हणूनही ते काम पाहतात.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate