नारायण गणेश चंदावरकर : (२ डिसेंबर १८५५—१४ मे १९२३). अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष्ठावान सभासद, कायदेपंडित आणि समाजसुधारक. होनावर (उत्तर कॅनरा) या ठिकाणी सुखवस्तू कुटुंबात जन्म. त्यांचे बहुतेक शिक्षण मुंबईस एल्फिन्स्टनमध्ये झाले. बी.ए. नंतर वयाच्या बाविसाव्या वर्षी ते इंदुप्रकाश या द्वैभाषिक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे संपादक झाले(१८७८). सु. दहा वर्षे त्यांनी या साप्ताहिकात अत्यंत आत्मीयतेने काम केले आणि त्याचा खप व दर्जा वाढविला. या काळात मथुरा सिरूर या युवतीशी ते विवाहबद्ध झाले आणि त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिलीस सुरुवात केली. यशस्वी कायदेपंडित म्हणून त्यांनी लवकरच नावलौकिक मिळविला. इंग्लंडच्या जनमताचा कानोसा घेण्याकरिता ते त्रिसदस्य आयोगातून १८८५ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले. त्यांच्या कार्याबद्दल फिरोजशाह मेहतांनी प्रशंसोद्गार काढले. त्याच वर्षी काँग्रेसची स्थापना झाली, त्याचे ते आजीव सभासद झाले. १९०० मध्ये ते लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. १८९६ पासूनच ते प्रार्थना समाजाचे प्रमुख होते आणि १९०१ मध्ये सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव झाले. या दोन्ही पदांवरून त्यांनी महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा पुरस्कारिल्या. स्त्रिया व मागास वर्ग यांच्या उद्धाराकरिता त्यांना राजकीय हक्क दिले पाहिजेत, हे मत त्यांनी प्रतिपादिले. याकरिता ते १९०६ मध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ चे अध्यक्ष झाले.
त्यांच्या कायदेविषयक अभ्यासामुळे त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्यात आले (१९०१—१२). त्यानंतर ते काही दिवस इंदूर संस्थानचे मुख्य मंत्री होते. या काळात ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले. पण १९१४ नंतर ते पुन्हा राजकारणात पडले आणि १९१९ च्या कायद्यानुसार मुंबईस जी विधानपरिषद स्थापन झाली, तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले आणि अखेरपर्यंत त्याच पदावर होते. याशिवाय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, रॉयल एशियाटिक सोसायटीचे (मुंबई शाखा) अध्यक्ष वगैरे पदे त्यांनी भूषविली. तत्कालीन राजकारणात एक स्पष्ट वक्ता, तळमळीचा कार्यकर्ता व विद्वान कायदेपटू म्हणून त्यांची ख्याती होती. तेलंग, रानडे, भांडारकर प्रभृतींनी घातलेल्या परंपरेचे ते निष्ठावान अनुयायी होते. ते बंगलोर येथे मरण पावले.
संदर्भ : 1. Chandavrkar, G. L. Wrestling Soul, Bombay, 1955.
२. वैद्य, द्वा. गो. नारायण गणेश चंदावरकर, मुंबई, १९३७.
लेखक - सु. र. देशपांडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही त...
सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. ल...
आधुनिक समाजसुधारक व पत्रकार. तमिळनाडूतील तंजावर ये...