অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुकुंद रामराव जयकर

मुकुंद रामराव जयकर

मुकुंद रामराव जयकर : (१३ नोव्हेंबर १८७३–१० मार्च १९५९). भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते व राजकीय पुढारी. मुंबईस मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून लवकरच त्यांनी नाव कमावले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीनेगांधी–आयर्विन करार (१९३१) आणि पुणे करार (१९३२) या बाबतींत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. याशिवाय त्यांनी टिळक स्वराज्य फंडाला मोठी देणगी दिली.

मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी १९२३–२६ च्या दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते (१९२६–३०). प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने दिले.

त्यांनीस्टडीज इन वेदान्त हे पुस्तक संपादित केले आणिमराठा मंदिर या नियतकालिकातून आपले हिंदू धर्मासंबंधीचे विचार लोकांसमोर मांडले. त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. लहानपणापासून त्यांना कलासाहित्याची आवड होती. शास्त्रीय संगीताचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचे इंग्रजी वक्तृत्व अत्यंत प्रभावी असे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ : Jayakar, M. R.The story of My life, 2 Vols., Bombay,1958–59.

लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate