অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फॉर्‌कॉश (व्होल्फगांग) बोल्यॉई

फॉर्‌कॉश (व्होल्फगांग) बोल्यॉई

फॉर्‌कॉश (व्होल्फगांग) बोल्यॉई : (९ फेब्रुवारी १७७५ - २० जानेवारी १८५६). हंगेरियन गणितज्ञ. अयूक्लिडीय भूमितीसंबंधीच्या कार्याकरिता प्रसिद्ध. त्यांचा जन्म हंगेरीतील बोल्या (आता रूमानियातील सीबीऊ) येथे झाला. त्यांनी प्रथमतः नॉड्यासेव्हेन येथील इव्हँजेलिकल-रिफॉर्म्‌ड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले (१७८१-९६). नंतर जर्मनीतील येना येथे काही महिने व १७९९ पर्यंत गटिंगेन विद्यापीठात त्यांनी अध्ययन केले. तेथे कार्ल फ्रीड्रिख गौस या पुढे प्रसिद्धीस आलेल्या महान गणितज्ञांबरोबर बोल्यॉई यांची मैत्री झाली व ती पुढे आयुष्यभर टिकली. याच वेळेपासून बोल्यॉई यांना भूमितीच्या मूलाधारांविषयी, विशेषतः यूक्लिड यांच्या समांतर रेषांच्या गृहीतकात, रस निर्माण झाला आणि याबाबत त्यांनी गौस यांच्याबरोबर आयुष्यभर पत्रव्यवहाराद्वारे विचारांची देवघेव केली. १८०४ मध्ये ते हंगेरीतील मॉरॉशव्हाशाऱ्हे (आता टर्गू मुरेश, रूमानिया) येथील इव्हँजेलिकल-रिफॉर्म्‌ड कॉलेजमध्ये गणित, भौतिकी व रसायनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक झाले आणि १८५३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

बोल्यॉई यांनी १८०४ मध्ये समांतर रेषांचे गृहीतक सिद्ध करण्याचा प्रयत्न करून त्यासंबंधीचे हस्तलिखित गौस यांना पाठविले, तथापि त्यातील तर्कक्रम गौस यांना व बोल्यॉई यांना स्वतःलाही समाधानकारक वाटला नाही. यामुळे निराश होऊन त्यांनी काव्य, संगीत व नाट्यलेखन यांत मन गुंतविले. १८१७-१८ मध्ये त्यांनी दोन नाटके लिहिली. त्यांचे पुत्र यानोश यांच्यात अपूर्व गणिती बुद्धी दिसून आल्यावर फॉर्‌कॉश यांनी पुन्हा गणिताकडे आपले लक्ष वळविले. १८२९ मध्ये त्यांनी आपला प्रमुख ग्रंथ (Tentamen या संक्षिप्त शीषकाने ओळखण्यात येणारा) पूर्ण केला; पण आर्थिक व तांत्रिक अडचणींमुळे तो १८३२-३३ पर्यंत प्रसिद्ध होऊ शकला नाही. या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या पुरवणीत त्यांनी यानोश यांच्या यूक्लिड समांतर गृहीतकाचा त्याग करून विकसित केलेल्या पूर्णपणे परंपराविरोधी अशा भूमितीय प्रणालीचा समावेश केला होता आणि त्यामुळे त्या ग्रंथाला मागाहून मोठे महत्त्व प्राप्त झाले.

फॉर्‌कॉश यांनी या ग्रंथाच्या पहिल्या खंडात भूमितीचा आणि दुसऱ्या खंडात अंकगणित, बीजगणित व विश्लेषण यांचा पद्धतशीर व तर्कशुद्ध पाया घालण्याचा प्रयत्न केला होता. तथापि गौसखेरीज इतर तत्कालीन गणितज्ञांनी या ग्रंथाची फारशी दखल घेतली नाही. १८५१ मध्ये त्यांनी आपल्या ग्रंथाची संक्षिप्त जर्मन आवृत्ती प्रसिद्ध केली. ते मॉरॉशव्हाशाऱ्हे येथे मृत्यू पावले.

 

लेखक - स. ज. ओक

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate