অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रॉबर्ट स्टॉटन व हेलेन लिंड

रॉबर्ट स्टॉटन व हेलेन लिंड

रॉबर्ट स्टॉटन व हेलेन लिंड : (२६ सप्टेंबर १८९२-१ नोव्हेंबर १९७० व १७ मार्च १८९६-३० जानेवारी १८८२). अमेरीकेतील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ दांपत्य. लिंड पति-पत्‍नींनी सामाजिक संशोधनक्षेत्रात कत्रित काम केले आहे, म्हणून त्यांचा संयुक्त रीत्या उल्लेख केला जातो. रॉबर्ट लिंड यांचा जन्म न्यू अ‍ॅल्बरी (इंडियाना राज्य) येथे झाला. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी १९१४ मध्ये पदवी घेतली. नंतर ‘युनियन थिऑलॉजिकल सेमिनरी’ या महाविद्यालयातून १९२३ मध्ये त्यांनी धर्मशास्त्राची पदवी घेतली. त्यांना १९३१ मध्ये कोलंबिया विद्यापिठाची डॉक्टरेट मिळाली सुरुवातीस रॉबर्ट यांनी पब्‍लिशर्स वीकली या साप्ताहिकाचे संपादन केले. (१९१४-१८) नंतर न्यूयॉर्कमधील काही पुस्तक प्रकाशकांकडे काम केले.

‘इन्स्टिट्यूट ऑफ रिलिजस रिसर्च’ या संस्थेत त्यांनी काही काळ काम केले. (१९२३-२६); नंतर ‘सोशल सायन्स रिसर्च काउन्सिल’ या संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले (१९२७-३१). पुढे कोलंबिया विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. (१९३१-६५). निवृत्तीनंतर त्यांनी उर्वरीत जीवन संशोधनात व्यतीत केले. त्यांचे वॉरन (कनेक्टीकट राज्य) येथे निधन झाले. रॉबर्ट यांनी हेलेन (माहेरचे नाव मेरल) या सुविद्य युवतीबरोबर विवाह केला (३ सप्टेंबर १९२९) मेरल यांचा जन्म ला ग्रेंज (इलिनॉय राज्य) येथे झाला. त्यांनी वेलस्ली महाविद्यालयातून पदवी घेऊन ब्राँक्सव्हिलच्या साराह लॉरेन्स महाविद्यालयात सामाजिक तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. (१९२९-६४) निवृत्ती नंतर त्यांनी उर्वरीत जीवन संशोधन, स्फुट लेखन यांत व्यतीत केले. त्यांचे वॉरन (ओहायओ राज्य) येथे निधन झाले. ऑन शेम अँड द सर्च फॉर आयडेन्टिटी (१९५८) आणि टोअर्ड डिस्कव्हरी (१९६५) ही हेलेन यांची दोन स्वतंत्र पुस्तके होत.

अमेरिकेतील इंडियाना राज्याच्या मन्सी या शहरातील सामाजिक स्तरीकरणाचे निरीक्षण करून लिंड पति-पत्‍नींनी मिडलटाऊन : अ स्टडी इन कंटेम्पोररी अमेरिकन कल्चर (१९२९) आणि मिडल टाऊन इन ट्रॅन्झिशन : अ स्टडी इन कल्चरल कॉन्फ्लिक्ट्‍स (१९३७) हे दोन ग्रंथ लिहिले. त्यांना या विषयातील औपचारिक प्रशिक्षण नसतानाही अमेरिकन समाजाचा सांस्कृतिक-मानवशास्त्रीय दृष्ट्या केलेला पहिला तपशीलवार अभ्यास म्हणून या ग्रथांस आगळे महत्त्व आहे. लिंड पति-पत्‍नींचे हा विषय हाताळण्यामधील वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मध्यम वर्गाला मानवशास्त्रीय दृष्टीने एक जमात कल्पून आपले लिखाण केले. मिडलटाऊनवरचा दुसरा ग्रंथ अर्थातच दहा वर्षांत झालेल्या सामाजिक स्थित्यंतरांसंबंधीचा आहेत आणि ही स्थित्यंतरे १९३० नंतरच्या दशकात आलेल्या आर्थिक मंदिमुळे निर्माण झालेली होती. हे दोन्ही ग्रंथी समाजशास्त्रीय अभ्यासात अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता तर पावलेच, पण त्यांना अफाट लोकप्रियता लाभली.

सांस्कृतिक मानवशास्त्रीय पद्धतींचा आधुनिक पाश्चात्य शहराच्या अभ्यासात उपयोजन करण्याचा हा आद्य प्रयत्‍न म्हणून उल्लेखिला जातो. अमेरिकेतील तत्कालिन समाजशास्त्राच्या अभ्यासकांवर त्यांचा खूपच प्रभाव पडला. त्यानंतर रॉबर्ट यांनी नॉलेज फॉर व्हॉट? : द प्‍लेस ऑफ सोशल सायन्स इन अमेरिकन कल्चर (१९३९) हे पुस्तक लिहिले. यात त्यांचा तत्कालिन अमेरिकेतील उत्क्रांत होणाऱ्या नवीन समाजशास्त्रीय पद्धतींशी जुळवून घेण्याचा प्रयत्‍न दिसतो. समाजशास्त्रातील ‘सिंक्लेअर ल्यूइस’ असा रॉबर्ट लिंड यांचा उल्लेख करतात; कारण सिंक्लेअर ल्यूइस (१८८५-१९५१) यांनी आपल्या कादंबऱ्यांतून अमेरिकेतील मध्य-पश्चिम भागांतील समाजजीवनाविषयी उपहासगर्भ लेखन केले आहे. त्यांनी रंगविलेल्या व्यक्ती, प्रसंग आणि परिस्थिती यांना रॉबर्ट लिंड यांनी त्याच भागाचे निरीक्षण करून लिहिलेल्या आपल्या ग्रंथांनी वास्तवतेचा भक्कम आधार मिळवून दिला, असे म्हटले जाते.

लिंड पति-पत्‍नींनी केलेला समाजशास्त्रीय अभ्यास अनेक दृष्टींनी व्यापक आणि मार्गदर्शक ठरला. शहरातील वस्ती ही सामाजिक वर्गांनुसार अलगअलग असते, हे त्यांनीच प्रथम दाखवून दिले. मिडलटाऊन शहराचा अभ्यास हा अमेरिकेच्या तत्कालिन समाजिक जीवनातील एक ठळक नोंद म्हणून गणला जातो. मानवजातिवर्णन, स्तरीकरण आणि परिमाणात्मक आधारसामग्री या सर्वांची सुसंवादी व अर्थपूर्ण समुच्चयात केलेली गुफण, हे लिंड दांपत्याचे प्रशंसनीय कौशल्य होय; म्हणून त्या दोघांचे हे कार्य समाजशास्त्रीय साहित्यात आद्वितीय ठरले आहे. या ग्रंथातील अनेक विधाने वैयक्तिक अनुभवांवर अगर समजुतींवर आधारलेली आहेत, मिडलटाउन हे शहर अगर त्यातील परिस्थिती ही काही एकून अमेरिकन नागरी समाजाची प्रातिनिधीक नाही, परंतु ते पडताळून पाहणे खर्चिक अतएव दुष्कर होईल इ. मते अभ्यासकांकडून व्यक्त केली जातात.

संदर्भ : 1. Bierstedt, Robnert, The Social Order, New York 1970.

2. Gouldner, Alvin; Gouldner, Helen, Modern Sociology : An Introduction to the study of Human Interaction, New York, 1963.

3. Sanders Irwin Taylor, Community : An Introdnction to a Social system, New York, 1958.

लेखक - मा. गु. कुलकर्णी

स्त्रोत -  मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/26/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate